खंडोबा ग्रंथ, साहित्य, कला

खंडोबा विषयक विविध ग्रंथांचा परिचय, श्री मार्तंड भैरव अवतार सचित्र कथासार, खंडोबा विषयक विविध लोकगीते, वाघ्या मुरुळी पदे, संतांचे लिखाणातून होणारे खंडोबा दर्शन, विविध कला माध्यमातील खंडोबा दर्शन,

खंडोबा ग्रंथ

संस्कृत मल्हारी महात्म्य जयाद्री महात्म्य मल्हारी महात्म्य मार्तंड विजय

खंडोबा अवतार सचित्र कथासार

खंडोबा लोकवाणी खंडोबा उपासकवाणी खंडोबा संतवाणी खंडोबा कला


*

खंडोबा विषयक ग्रंथ

खंडोबा विषयक अनेक ग्रंथाचा नाम उल्लेख विविध ठिकाणी आढळतो पण आज ते उपलब्ध होत नाहीत. जुन्याकाळी छपाईची कोणतीच व्यवस्था नव्हती मुळ लेखकाने तयार केलेल्या प्रतीवरून नक्कल करून दुसरी प्रत तयार करणे. अशास पद्धतीने एका वरून दुसरी प्रत तयार करीत ग्रंथांचा प्रसार अनेक शतके होत राहिला. श्रद्धा आणि भक्ती मधून अनेक भक्तांनी हा वारसा संचित करून पुढे चालविला. साक्षरतेचा अभाव ग्रंथावर असणारी विशिष्ट समाजाची मक्तेदारी यात अनेक ग्रंथ दुर्लभ झाले. तर काही यातूनही हि अपना पर्यंत पोहचले. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय, सारखे ग्रंथ आज छापील स्वरुपात उपलब्ध आहेंत. तर जयाद्री महात्म्य, सारखा ग्रंथ आज त्यावर झालेल्या काही अनुवादित लिखाणातूनच समजत आहे.

खंडोबा विषयक काही ग्रंथाचा हा थोडक्यात परिचय.

*

मल्हारी महात्म्य,

या संस्कृत गंथाचा लिखाणकाळ इस. १२६० ते १३९८ दरम्यानचा आहे. या ग्रंथाचा कर्ता अज्ञात आहे. यातील कथानक ब्रम्हांड पुराना मधील असल्याचे ग्रंथकर्ता लिहितो. खंडोबा विषयी ग्रंथा मधील हा आद्य ग्रंथ २२ अध्याय व ९३० श्लोकाचा आहे.
मानिचुल पर्वतावरील ऋषी आश्रमावर मल्लनामक राक्षस हल्ले करून त्यांना त्रास देत होता. त्रस्त ऋषी शंकराकडे याचना घ्येऊन गेले. शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करून मल्ल व त्याचा भाऊ मणि याचा वध केला. व ऋषीचे विनंती वरून लिंगरूपाने देव प्रगट झाले. हा या कथेचा सार आहे. या ग्रंथाचे लिखाण प्रेमपूर बिदर येथील खंडोबा क्षेत्री झाल्याने तेथील क्षेत्र वर्णन या ग्रंथात आहे.

*

जयाद्री महात्म्य,

हा संस्कृत ग्रंथ ज्ञानदेव विरचित असून इस. १५४० चे दरम्यान याचे लिखाण झाले आहे. जेजुरी क्षेत्र वर्णन हा याचा गाभा आहे. बालपणी खंडोबाचे अवकृपेने श्रीकृष्णाचे कुत्र्यात झालेले रुपांतर, कऱ्हा नदी ,मल्हार तीर्थ, लक्ष्मितीर्थ, मणि मल्ल, भंडार उत्पती. या बरोबर पंचलिंग, म्हाळसा, बाणाई, जानाई, साक्ष विनायक, वाघ्या, मुरुळी, धृतमारी, अन्नपूर्णा यांची निर्मिती विषयक कथानके यात आहेत. जेजुरी क्षेत्र माहिती साठी महत्व पूर्ण ग्रंथ.

*

मल्हारी महात्म्य,

malhari mahatmya

[माझे वडील कें.भिकोबा वि.टाक यांनी इस.१९६४ मध्ये तयार केलेल्या ‘मल्हारी महात्म्य’ ग्रंथाचे प्रतीतील एक पृष्ट]

Download मल्हारी महात्म्य Pdf

हे मुळ संस्कृत मल्हारी महात्म्याचे मराठी रुपांतर आहे. सिद्धपाल केसरी यांनी इस १५८५ मध्ये २२ अध्याय मध्ये ओवी छंदात हे लिखाण केले आहे. मराठी भाषिका मध्ये सर्वाधिक प्रसार पावलेला हा ग्रंथ आहे.

मल्हारी महात्म्य,

Download मल्हारी महात्म्य Pdf

हा ग्रंथ श्रीधरस्वामी नाझरेकर [इस.१६५८ ते १७२९] रचित असून हा ग्रंथ २ अध्याय व ३५५ ओवीचा आहे. मुळ संस्कृत मल्हारी महात्म्य मधील कथाच येथे आपल्या रसाळ वाणीने मांडली आहे. नित्य पठण करू इच्छिणाऱ्या साठी उपयुक्त

*

मार्तंड विजय,

martanda vijay

[माझे वडील कें. भिकोबा वि.टाक यांनी इस.१९६६ मध्ये तयार केलेल्या ‘मार्तंड विजय’ ग्रंथाचे प्रतीतील एक पृष्ट]

Download मार्तंड विजय Pdf

हा ग्रंथ जेजुरी येथे कडेपठारी गंगाधर कमलाकर यांनी इस. १८२४ मध्ये लिहिला. ३७ अध्याय व ७७७ ओवीचे या ग्रंथात मल्हारी महात्म्य, जयाद्री महात्म्य, व त्या काळी उपलभ्ध असणारे खंडोबा विषयक इतर ग्रंथ व जनश्रुती यांचा सुंदर मिलाफ या ग्रंथात आहे. खंडोबा विषयक कथा, कुलधर्म कुलाचाराच्या पद्धती, पूजांचे प्रकार , व्रत पद्धती, तपशीलवार माहिती या ग्रंथा मध्ये आहे. खंडोबा विषयी सर्वाधिक माहिती एकाच ठिकाणी देणारा हा ग्रंथ आहे.


*

श्री मार्तंड भैरव अवतार कथासार

1 martanda vijay

दक्षिण प्रदेशात मनीचुल नावाचा पर्वत प्रदेश होता. या प्रदेशात मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता त्याचा भाऊ मणि व तो पराक्रमी होता. या राज्यात सुख व समृद्धी नांदत होती. देव राज इंद्र ही त्यांना घाबरत असे. आपल्या शौर्याचा व समृद्धीचा त्यांना गर्व झाला होता.

2 martanda vijay

एकदा मल्ल शिकारी साठी जंगलात जात असताना या परिसरातील सप्तऋषी चा आश्रमा मल्लाच्या दृष्टीस पडला. नैसर्गिक संपन्नतेने या आश्रमात ऋषी आपल्या परिवारा सह सुखाने नांदत होते.

3 martanda vijay

मल्लाने आपल्या सैन्यास हा आश्रम उध्वस्त करण्यास सांगितले सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले. त्यांची विटंबना केली द्रव्य, गाई, याची लुट केली व आश्रम जाळले. व मल्ल सैन्यासह निघून गेला.

4 martanda vijay

उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन एकामेकांना धीर देऊ लागले. व स्तलांतरित होण्याचा विचार करू लागले. याच वेळी तेथे नारदांचे आगमन झाले. नारदांनी सर्व घटना ऐकली व त्यांना इंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला. ऋषी इंद्रा कडे जाण्यास तयार झाले पण ऋषी आपल्या परिवारांना कोठे सुरक्षित ठेवावे या काळजीत होते.

5 martanda vijay

नारदांनी त्यांना धवलगिरी पर्वता जवळील लवथळेश्वर येथे जाण्यास सांगितले. या ठिकाणी द्रूर्वास ऋषीचा शिष्य लव यांची तपोभूमी आहे. ही भुमी वरदान प्राप्त असुन येथे दैत्य येऊ शकत नाही त्या मुळे या ठिकाणी तुम्ही तुमचे परिवार सुखरूप ठेवा व इंद्रा कडे जा हे नारदांचे म्हणणे ऐकून ऋषींनी
लवथळेश्वरला येऊन तेथील धवलगिरी जवळील दरीत आपले परिवार ठेवले.

6 martanda vijay

ऋषीमुनी आपले गाऱ्हाणे घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने मल्लाचा बंदोबस्त करण्यास असमर्थता दाखवली व विष्णू कडे जाण्यास सांगितले

7 martanda vijay

ऋषी विष्णू कडे गेले व आपली पिडा कथन केली मणि मल्लास ब्रह्मदेवाने वरदान दिले असल्याने फक्त शंकरच आपणास मदत करू शकतात तेव्हा आपण शंकराकडे जावे असे विष्णूनी ऋषींना सांगितले.

8 martanda vijay

ऋषिगण विष्णू सहित कैलासा कडे निघाले. कैलासावर पोहचल्यावर त्यांनी आपली पीडा शंकरांना कथन केली

9 martanda vijay

हे ऐकून शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपली जटा आपटली त्यातून महाभयंकर महामारी उत्पन्न झाली. तिला तुपाने शांत करण्यात आले म्हणून तिला धृतमारी नाव मिळाले. मणि मल्ला मर्दना साठी शंकरांनी चैत्र पौर्णिमेस मध्यान्ही धवलगिरिवर मार्तंड भैरव अवतार धारण केला व सर्व देवांना आपल्या सैन्या सह सज्ज होण्यास सांगितले व धवलगिरी वरून मारताना भैरवाची सेना देव सेने सह मनीचुल पर्वता कडे निघाली.

10 martanda vijay

मार्तंड भैरवाची सेना येत असलेली समजताच मल्लानेही आपली सेना सज्ज केली. व आपला प्रधान शर्भानन याला शिष्टाई साठी इंद्राकडे पाठविले इंद्रास शर्भाननाणे युद्ध न करण्या बाबत मल्ल व इंद्र याच्या मधील समझोत्याची आठवण करून दिली. इंद्राने मी मार्तंड भैरवास युद्धास आणले नसून त्यांच्या आदेश्याने मी आल्याचे सांगितले व शर्भाननाला मार्तंड भैरवाशी चर्चा करण्यास सांगितले. युद्ध टाळावयाचे असल्यास मल्लाने पाताळात निघून जावे अथवा युद्धास तयार व्हावे असे मार्तंड भैरवानी शर्भानन यास सांगितले. व शर्भाननाची शिष्टाई अयशस्वी झाली.

11 martanda vijay

मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात लढाई सुरु झाली. इंद्र व निर्जरध्वन्सी दैत्य यांच्यात युद्धास तोंड फुटले. घनघोर लढाईत इंद्राचे एका बाणाने निर्जरध्वन्सी गतप्राण झाला व इंद्रास विजय मिळाला.

12 martanda vijay

दुसरया दिवशी मल्लासुराने आपला सेनापती खड्गद्रष्ट याला रणात युद्धासाठी उतरविले मार्तंड भैरवांनी कार्तिकस्वामीस त्याच्या प्रतिकारासाठी पाठविले कार्तिकेय मयुरावर स्वार होऊन युद्ध भूमीवर आला. खड्गद्रष्ट व कार्तिकेय यांच्यात तुंबळ युद्ध झाले खड्गद्रष्टचे बाणाचे वर्षावाने कार्तिकेय घायाळ झाला पण दुसर्याचक्षणी त्याने खड्गद्रष्टवर शक्ती टाकली त्या शक्तीने खड्गद्रष्ट गतप्राण झाला व दैत्यसेना पळू लागली व कार्तिकेय विजयी झाला.

13 martanda vijay

खड्गद्रष्ट पडल्यावर मल्लाने उल्कामुखास आपला सेनापती नेमला व उल्कामुख युद्धास आला. त्याचा सामना करण्यासाठी मार्तंड भैरवाचे आदेशाने गणपती युद्धास आला उल्कामुखाचे बाणांनी गणपतीच्या रथाचे नुकसान झाले व त्याचे प्रखर हल्याने देव सैन्य पळू लागले. गणपतीने बाणांचा वर्षाव करून उल्कामुखाचा रथ नष्ट केला. त्याने गणपतीवर गदेने प्रहार केला. गणपतीने हा प्रहार अडविला व त्याला खाली पाडले. उल्कामुखाने सिहरूप धारण करून गणपतीवर हल्ला केला गणपतीने आपला दंड त्याचे छातीवर मारला व उल्कामुख गतप्राण झाला. व गणपतीस विजय मिळाला.

14 martanda vijay

मल्लासुराने कुंतलोमा या महापराक्रमी दैत्यास युद्धास पाठविले त्याचे बरोबर युद्ध करण्यास नंदी सिद्ध झाला या दोघांचे तुबळ युद्ध सुरु झाले. नंदीने सोडलेल्या महाहलाल अस्त्राने कुंतलोमा घायाळ झाला पण पुन्हा सज्ज होऊन त्याने बाणांचा वर्षाव करून नंदीचा रथ मोडला नंदीच्या एका बाणाने कुंतलोमाचा वेध घेतला व तो गतप्राण झाला. दैत्य सैन्य पळू लागले व नंदीस विजय मिळाला.

15 martanda vijay

दैत्य सैन्यात दुखाची अवकळा पसरली क्रोधीत झालेला मल्लासुर स्वताच युद्धास निघाला पण मनीने आपल्या या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला. त्याचे सैन्य व आवेश पाहून देव सेनाही घाबरली

16 martanda vijay

मणि बरोबर युद्ध करण्याचा निर्णय मार्तंड भैरवांनी घेतला व ते रणात उतरले. मार्तंड भैरवानी मणिवर गदा भिरकावली त्याने ती अडवली व दोघांमध्ये भीषण युद्धास सुरवात झाली कोणत्याही शस्त्र व अस्त्र मारले तरी मणि लढतच होता. शरभ, घोडा, यांची मायावी रूपे घेऊन त्याने मार्तंड भैरवांस जेरीस आणले शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूल सोडला तो मणि च्या छातीवर आदळला व मणि कोसळला मार्तंड भैरवांनी त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला या स्पर्शाने मानितील सदविवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली आपल्या युद्ध कलेने व स्तुतीने मार्तंड भैरवांस त्याने संतुष्ट केले संतुष्ट मार्तंड भैरवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. मनीने मार्तंड भैरवांचा पाय आपल्या मस्तकी कायम असावा व माझे स्थान तुझे जवळ आसवे असा वर मागितला मार्तंड भैरवांनी तथास्तु म्हंटले आणि मनीने आपला प्राण सोडला.

17 martanda vijay

मणि वधा नंतर मार्तंड भैरवांनी शिष्टाई साठी विष्णुना मल्लासुरा कडे पाठवून माल्लासुरास पाताळात जाण्यास सांगितले. मल्लासुराने ही शिष्टाई फेटाळून तो युद्धास तयार झाला.
आपल्या परिवाराला उलूक नावाचे दैत्याचे स्वाधीन करून मल्ल मोठ्या शक्तीने युद्धास निघाला देव सेनाही सज्ज झाली.

18 martanda vijay

भीषण युद्धास सुरवात झाली वीरभद्राने मोठा परक्रम केला व मल्लासुराचा सेनापती कोलासुर याचा वध करून त्याने केलेल्या व्यूहरचनेचा विध्वंस केला.

19 martanda vijay

मार्तंड भैरवांनी धृतमारिस युद्धाची आज्ञा दिली व तिने दैत्य सैन्य गिळण्यास सुरवात केली. आपल्या सेनेचा नाश पाहून मल्लासुराने तीच्या वर गदेने प्रहार केला व दोघांचे युद्ध सुरु झाले. मल्लासुराने तिच्यावर बाणांचा वर्षाव केला व ती मूर्च्छित होऊन पडली व शिव चरणी लीन झाली.

20 martanda vijay

मल्लासुर व मार्तंड भैरवांचे युद्धास सुरवात झाली मार्तंड भैरवांने बाण सोडले मल्लासुराने ते निवारले व अस्त्रांचे युद्धास सुरवात झाली. दोघेही एकामेकांवर अस्त्र सोडीत व प्रती अस्त्राने त्याचा प्रतिकार करीत होते शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला मल्लासुराने अनेक अस्त्रांनी त्याच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासुर कोसळला दैत्य सेना पळू लागली वीरभद्रानी त्या सेनेचा संहार केला. कोसळलेल्या मल्लासुराचे मस्तकावर मार्तंड भैरवांनी आपला पाय ठेवला त्या स्पर्शाने पावन झालेला मल्लासुर मार्तंड भैरवांची स्तुती करू लागला. व तुझे नावा आधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे त्याने मार्तंड भैरवांस मागितले मार्तंड भैरवांनी त्याला वर दिला व मल्लासुर शिवतत्वात विलीन झाला.
मल्लासुराचे वधाचे वृत ऐकून त्याचे कुंभ, शुलधर, देवगंधर्व, लोहगर्ल व महाबाहू हे पाच पुत्र पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी रणात आले पण मार्तंड भैरवांनी त्यांना पर्वत बनवले. पुढे उलुकाने मल्ल स्त्रीयांसह मार्तंड भैरवांची विनवणी केली व पाचही मल्ल पुत्रांना जीवदान मिळाले व ते सर्वजण पाताळात जाऊन राज्य करू लागले.

21 martanda vijay

सर्वत्र आनंद झाला देव गणांनी पुष्प वृष्टी केली. लोक व ऋषीगण भय मुक्त जीवन जगू लागले.


*

लोकवाणीतील जेजुरी

जेजुरीचा खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचा लोकदेव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जाती पंथ यांच्या चरणी लीन झालेले खंडोबा वरील लोक श्रद्धे तून मराठी वाड्मयात मोलाची भर पडली आहे. अभंग पासून लावणी पर्यंत व जात्या वरच्या ओवी पासून डफावरच्या थापे पर्यंतच्या लोकगीता मध्ये खंडोबा व जेजुरी आढळते. चराचरा मध्ये संगीत भरलेल्या महाराष्ट्राची पहाट उगवत असे ती कोंबड्याचे आरवण्याने व जात्यावरच्या ओवी ने जात्यावर दळणाऱ्या माताभगिनींना जेजुरीच्या खंडेरायाची आठवण येत नसेल तर नवल अशीच एक भगिनी आपल्या ओवी मधून गाते

jatyavarchi ovi

दळण दळीते सूप भरून बाजरी ग सईबाई
भरून बाजरी ग बाई बाजरी बाजरी
बंधुवाचा गाडा माझ्या जायचा जेजुरी ग सईबाई
जायचा जेजुरी ग बाई जेजुरी जेजुरी
जेजुरीची वाट आहे खंगळ खोंगळ ग सईबाई
खंगळ खोंगळ ग बाई खोंगळ खोंगळ
बैल अचाट गाडी खिडक्याची सांगड ग सईबाई
खिडक्याची सांगड ग बाई सांगड सांगड
धनगराच्या वाडयावरी कुत्र्याने केला गेगा ग सईबाई
कुत्र्याने केला गेगा ग बाई गेगा गेगा
धनगराची बानू देवानं नेली बगा ग सईबाई
देवानं नेली बगा ग बगा बगा

घरघरातून पहाटेची चाहूल सुरु असताना टाळाचा नाद करीत वासुदेवाची स्वारी येत असे, वासुदेव खरतर हरीचा उपासक खंडोबा तर शंकराचा अवतार पण पंडितांच्या बुद्धीला पडलेला हा भेद येथील लोकमानसाला आणि लोक उपासकांना कधी पडला नाही. तो दान मागताना म्हणतो

vasudev

पुण्या जवळी गाव जेजुरी
देव नांदतो खरोखरी
येड तुझे लागले मल्हारी
येतो तुझे गडावरी
नवलाख हि पायरी
चढू देवा कुठवरी
बानू म्हाळसा दोघी जनी
नांदती गडावरी
येड तुझे लागले मल्हारी

येथल्या स्त्री मनाला नेहमीच माहेरची ओढ वाटत आली आहे, खंडोबा वरील श्रद्धेने अश्या एका भगिनीला जेजुरीच माहेर आणि त्या ओढीने ती म्हणते

आल्या ग जन्मात सये जेजुरी करावी
नवलाख पायरी ध्येनात धरावी
जेजुरी गडावरी आरोळी कोणी दिली
बाळकाची माज्या तळी शिखराला गेली
जन जाती जत्रेला मी जाते माहेराला
बाप्पाजी बयाच ग तीरथ घ्यायाला
जेजुरीचा गड अवघड सांगत्याती
भंडाराच्या गोण्या नंदी पायऱ्या चढती

खंडोबा विषयीची श्रद्धा आणि जेजुरीची ओंढ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनामनात दिसते, खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई चंदनपुरीची खानदेशा जवळचीच या बाणाई च्या ओढीने खानदेशी मन म्हणते

बानू चाल ग, बानू चाल ग, सारंग्या बागात
तिथ उतरीला उतरीला जेजुरीचा वाणी
त्यांनी भरविल्या, भरविल्या, भंडाराच्या गोणी
जाऊन टाकल्या, टाकल्या, बाणुच्या अंगणी
बानू चाल ग, बानू चाल ग, सारंग्या बागात
तिथ उतरीला उतरीला जेजुरीचा वाणी
त्यांनी भरविल्या, भरविल्या, तांदळाच्या गोणी
जाऊन टाकल्या, टाकल्या, बाणुच्या अंगणी
बानू चाल ग, बानू चाल ग, सारंग्या बागात
तिथ उतरीला उतरीला जेजुरीचा वाणी
त्यांनी भरविल्या, भरविल्या, नारळाच्या गोणी
जाऊन टाकल्या, टाकल्या, बाणुच्या अंगणी
बानू चाल ग, बानू चाल ग, सारंग्या बागात
तिथ उतरीला उतरीला जेजुरीचा वाणी
त्यांनी भरविल्या, भरविल्या, सुपारीच्या गोणी
जाऊन टाकल्या, टाकल्या, बाणुच्या अंगणी

कोकणच्या दर्या सागरावर राज्य करणारी सोनकोळी जमात जेजुरीच्या खंडेरायाची भक्त, खोल समुद्रात होडीवर माश्यांनी भरलेले जड झालेले जाळे ओढताना त्यांच्या हाकेला ओ देणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची त्यांना आठवण होत नसेल तर नवल ते यावेळी आपल्या आबवण्या मधून गातात

पावलाय रे देव मलारी हें
देव माजा जेजुरीघरचा मलारी हें
देवाचा हलद्या भंडार मलारी हें
देव पावण्यानी पावशी मलारी हें
देवाची नवलाख पायरी मलारी हें

खंडेरायाच्या कृपेने भरभरून मिळाल्यावर जेजुरीच्या दर्शनाचे ओढीने निघाल्यावर हाच कोळी गातो

………..पावलाय रे देव मलारी
रे पाव माज्या देव मला मलारी
देवा तुजी निंगली स्वारी मलारी
करे नयला देव चाल्लाय मलारी
देवाची गबल्यान झोली हाय मलारी
देवाची उरतेय भंडार रे मलारी
देवा चिमटीन भुशान रे मलारी
देवा तुज्या झयल्या अंगोळी मलारी
देव रथाव चरविलाय रे मलारी
देव किल्ल्याला येतोय यो मलारी
भानूचे वाऱ्याला देव एकलाय रे मलारी
भानूचे नवलाख मेंडर मलारी

महाराष्ट्राचे दुसरे आराध्य देवत पंढरीचा विठोबा याचा भक्त वारकरी त्याची खंडोबा वरील श्रद्धेतून पंढरी आणि जेजुरीत साम्य शोधतो आणि म्हणतो

ह्या बाई जेजुरी नगरात कोऱ्या चांदणी महालात
म्हाळसा बाणाई भांडती ऐकून मल्हारी हासती
सवती सवतीचे भांडण भोळ्या भक्ताचे कांडण
दोघी मुरुळी नाचती बघून मल्हारी हासती
पंढरीत आहे रखुमाई येथे म्हाळसा बाणाई
तेथे विटेवरी उभा येथे घोड्यावरी शोभा
तेथे पुंडलिक निधान येथे हेगडी प्रधान
तेथे बुक्याचे रे लेणे येथे भंडार भूषणे
तेथे वाहे चंद्रभागा येथे जटी वाहे गंगा
तेथे मृदंग वीणा टाळ येथे वाघ्या-मुरुळीचा घोळ

जेजुरी मध्ये होणाऱ्या उत्सव व यात्रा यांच्या वर्णनांनी येथील मराठी साहित्य सिद्ध झाले आहे, जेजुरीच्या सोमवती यात्रेचे वर्णनही लोकगीतातून दिसते

खंडोबाला नवस केला
चल जाऊ गो जेजोरीला ll दृ ll
कडेपठारावर दिसेल शोभा
गडावरती केसी येल ती मजा
बेल भंडाराचा भडीमार झालाया
चल जाऊ गो जेजोरीला ll १ ll
गादी मखमली घोड्यावर
चमके चांदी सोन्याचा पदर
ढामा टाकील वारू जायला
चल जाऊ गो जेजोरीला ll २ ll
बैसे खंडोबा घोड्यावर
त्यांनी घेतली म्हाळसा नार
आकाशी घोडा उरविला
चल जाऊ गो जेजोरीला ll ३ ll
करा नदीच पाणी झुळझुळ
देव तय अंघोळी करतील
तो अंघोळीचा बघू सोहला
चल जाऊ गो जेजोरीला ll ४ ll

जेजुरीच्या अनेक यात्राचे वर्णन लोक गीतातून मधून केलेले आहे अश्याच एका यात्रेचे वर्णन करणारे हें गीत

यात्रा भरली कि घनदाट
बोला मल्हारीचा येळकोट ll दृ ll
नवलाखाची हि पायरी l
खंडेरायाची हि जेजुरी l
चला आनंदान चढू घाट ll १ ll
मिळूनी आलो कि सर्वजण l
भरले आनंदाने माझे मन l
पाहू डोळ्यानं देवाचा थाट ll २ ll
उद कापूर नारळ फोडू l
चला भक्तानो लंगर तोडू l
मग होणार देवाची भेट ll ३ ll

खंडोबाशी लग्न लावून त्याची दासी झालेली मुरुळी कडे पाहण्याचा लोकमानस श्रद्धेचा आणि थोडा वेगळाही या असेच लावणी कडे झुकणारे वर्णन या गीतात दिसते

muruli

वय सोळा कोवळी काया l हूडपणात घुंगरू पाया
लागे नाचाया l लागे नाचाया l लागे नाचाया l
पोर बावरी झाली पहा जेजुरीला जाया ll दृ ll
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग
या अश्या वयातच बदलू पाहे ढंग
उतावीळ मल्हारी संगे लगीन लावाया ll १ ll
तुनतुण्याला टाक द्यावा तशी हिची हालचाल
कमरेला पदर खोउनी उडवी रुमाल
भारीच झाली बेताल हिला अवराया ll २ ll
भंडाराचा मळवट भरुनिया गोऱ्या ललहाटी
तशी कवळ्या कवळ्या हाती घेउनी घाट
चहू दिसेला भंडारा वाटी लागे उधळाया ll ३ ll
खंडोबाशी लग्न लाउनी आनंदी हि मुरुळी राहील
पवित्र हिची भावना हो
पायात आपली कुळी निघे बुडवाया ll ४ ll

बाणाई च्या सौदर्याला भुलून गेलेल्या खंडोबाचे रूप जनमानसाला लुभावणारे अश्याच खंडोबाचे वर्णन अनेक लोक गीताच मुळ बनले आहे

पुन धरती हि अलीकड
गड जेजुरी पलिकड l
रूप दावून बानू गेली
स्वारी देवाची येडी झाली l
अवो बानुबाईच येड लागले
मल्हारी देव मल्हारी …..
अहो विसरून गेले कोण्या झाडाला
भंडारी देव भंडारी l
अवो येळकोट येळकोट बोलती,
अन नित काय भंडारा उधळती l

बाणाईशी विवाह करून घेऊन आलेल्या खंडेरायावर क्रोधीत झालेल्या म्हाळसाबाईचे मन या गीतातून व्यक्त होते

रागकुरध बोलली म्हाळसाबाई, तुमची चोरी
मलुराया केली काई ।जी।
म्हाळसा बोले नेवास माझं माहेर, तमसेर पीता
राव पीता माझे सावकार जी ।
आपल्या उमतीचा सोयिरा न बरोबर, नऊ लख तांगड
आणुन केला गजर जी ।
मांडिले लग्न बसविले भवल्यावर, पाची ब्राह्मण
बोलाविले परमेश्वर जी
मला परतूनी आणिले जेजूरा ठाया, नऊ खंडात मालुची
फिरती धोई जी ।
॥मिळवणी॥रागकुरध बोलली म्हाळसाबाई ॥१॥
आदले जलमीची काय होती तुझी वादीण मजवर सवत
बाणुला आला घेऊन जी ।
दुःख सवतीचे महा दारुण, सगळी भाकर अर्धाल्या
केल्या दोन जी ।
तापल पाणी ह्याला चव येईना परतून, भोळ्या देवा
तूला कसा घ्यावा वाढून जी ।
सवत लोण्याची दृष्टी नसावी, हीचेकडे पाहाता शरीराची
होती लाही जी ।
॥मिळवणी॥राग कुरध बोलली ॥२॥
एक्या हाडाला दोन सुर्‍या कश्या करवत, कुठवर शिकवू
कांहीं उमज धरा मनात ।जी।
दोहीचा झगडा जाईल जनलोकांत, खाली बसाल बसाल
माती उकरीत जी ।
हेगडी बोले बोले रे देवा कांहीं, लिंब घोटावा बाणुच्या पायीं
जी ॥ मिळवणी ॥ रागकुरध बोलली ॥३॥
चारी समया जळती पलंगा शेजारी, तुमच्या स्वपनी
देखली बानु धनगरणी ।जी।
उठून बैसले देव मल्हारी, बाणुला आणुन ठेवली तळ
भोयेरी ।जी।
चैत्री पौर्णिमेचा हा गजर होतो भारी चोरुन भंडार लोटतो
बानुवरी ।जी।
मल्लवाघा चरणावर लोट मारी, पाहिले चरण गळ्यांत
लींग भंडार जी ।
राग कुरध बोलली ॥४॥

जेजुरी गडावर निवास करणारा खंडेराया व त्याच्या गडाचे सुंदर वर्णन अनेक लोकगीता मधून केले गेले आहे असंच हें एक गीत

या कडेकपारी देवाचं ठाण l
संकट पडे भक्ताला उदेकारण ll
देव उतरले तळवटी जागा पाहून l
हि गुपित काया साक्ष वादळ दोन ll
देवाचं लागलं ध्यान रात्रदिन l
दक्खनात खंडेराया नांदे हौसेन ll १ ll
लई पैसा खरचला त्या की होळकरान l
देवाचं देण त्याला प्रसन्न मलुखान ll
पायऱ्या बांधिल्या दाट दिवट्याचा लखलखाट l
हि करनी केली आगळी आगीनझाडी अचाट ll
धन्य धन्य तू मल्हारी देवा धन्य तुझं देणं l
दक्खनात खंडेराया नांदे हौसेन ll २ ll

अशी अनेक लोकगीते त्यांच्या अनाम अजरामर असणाऱ्या गीतकारांच्या आठवणी जागवत आज हि समाजमन गात आहे आणि गात राहील


*

उपासकांचे वाणीतील जेजुरी

वाघ्या मुरुळी हे खंडोबाचे उपासक अक्षर ओळख नसलेल्या सामाजिक स्तरामधून आलेले. आपल्या पुर्वाश्रमीच्या उपसकांची गीते गाताना त्यानी आपल्याही रचना रचल्या अश्या अनेक गीता मधून जागरणाच्या कथाकथनातुन त्यांची असामान्य प्रतिभा दिसते. ही गीते मोखिक परंपरेने चालत आली, त्यातील काही ओघात काळाचे उदरात गडप झाली तर काही विस्कळीत स्वरुपात टिकून राहिली अश्या अनेक गीता मधून जेजुरीचे व येथील यात्रा उत्सवांचे वर्णन केलेले दिसते. काही गीता मधून त्यांचे कर्त्यांचे नाम मुद्रा डोकावतात तर काही अनाम आहेत मात्र या गीता मधून श्रद्धेचे गंगा अखंड वाहताना दिसते
असाच एका गीता मध्ये जेजुरीच्या गडाचे वर्णन करताना उपासक म्हणतो

सुवर्णाचा गड जेजुरी दक्षिणेत कोट
नवखंडाचे माणूस येउनी बोलती येळकोट
नवलाख तारांगण नवलाखाची जेजुरी
सुवर्णाचा कोट राजा करितो मल्हारी
भाव पाहुनी देव पावला जेजुरीचा राजा

जेजुरीगडा बरोबरच जेजुरीतील खंडोबाचे आद्य स्थान असलेल्या कडे पठारच वर्णन सर्वाना कडेपठारी जाण्याचे निमंत्रण देत शंकर वाघ्या करतो

चला जाऊ कडेपठारी ग: ग: चला जाऊ कडेपठारी l गडे जेजुरी पाहू मल्हारी l
बेल दवणा खोबरे भंडार वहा देवाचे शिरी जी:
बानू म्हाळसा दोघी नारी ग: l बहिरव जोगेश्वरी प्रधान कारभारी l
नंदी कासव त्या समोरी दीपमाळ l चारी जी:
नवलक्ष गडा पायरी l गगनी विशाल किल्यावरी कळस सोनेरी l
हमेशा झडे चोघडा बारद्वारी: मनी देत्यपती न्हाणीला भडक शेंदुरी जी:
भंडार भरिता भाळावरी जी: देव भक्ताचा केवारी देव ग: शंकर कवन करी
येळकोट जेजुरी बोला भक्तानो हर्षे अंतरी जी l चला जाऊ कडेपठारी

हाच शंकर वाघ्या आपल्या दुसऱ्या पदात म्हणतो

गड जेजुरीला जाऊ या आता म्हाळसाकांत पाहू डोळा ll चाल ll
बेल दवणा वाहू देवाचे शिरी, देवा तुझ्यावीण कोण नित्य तारी ll धृ ll
आम्ही हीन दिन तारी तू दयाळा, आलो शरण तुम्ही करा प्रतिपाळा ll चाल ll
कवी शंकर वाघ्या उभा दरबारी देवा तुझ्यावीण नित्य कोण तारी

वाघ्या बरोबर त्याला खंडोबाचे उपासनेत साथ देणारी उपासिका म्हणजे मुरुळी हिचे बालवयातच खंडोबाशी लग्न लावून देवाला अर्पण केले जात असे अशीच मुरुळी आपल्या भावना या पदातून मांडते

केले सुख सोहोळे मायबापानी लग्नाचे ।
तुमच्या पदरी मल्हारे बांधिले राज हौश्याचें जी ।
घेऊनी आली जेजुरी चौघडे वाजती सोन्याचे ।
नऊ रे लक्ष पायरे, दख्खन आहे जडावाचे जी ।
दासी बटके व धरिल्या खरी नेल्या मंदिरी ।
विडे हो घेतले जी । विडे हो घेतले जी ।
हार गजरे गुंफुनी अंतरी पलंगावरी देवाला बसविले जी ।
आपल्या नांवाचा पिवळा झेंडा, भडके देवाचा झेंडा ॥१॥
म्हणे म्हाळसा देवाजीला ऐकावे अर्जी महाराज ।
उमर माझी लहान तुमचे रक्षणचे मर्जी ।
सासबाईनें ग वावर जत्राग नेले शांभाला ।
भुलेश्वर पुजून स्वारी आली जेजुरीला ।
नाहाणाचे सुख सोहाळे मोती ग खिळले मखराला ।
मग फुलांची जाळी घातली गांठ शेलेला ।
दोघे बसून चौकावरी तुम्हां शेजारी हळद लाविली जी ।
आल्या अवघ्या नगराच्या नारी राजमंदिरी ओटी ग भरली ।
वाट पाहात बैसली कचेरी गेले देवाचे ।
उमर माजी लहान तुमचे रक्षणचे मर्जी ॥

जेजुरी मध्ये वर्षभर अनेक यात्रा उत्सव असतात यातील सोमवती अमावस्या दिवशी जेजुरी गडावरून देव अंघोळी साठी कर्हा नदी वर जातात ह्या सोहळ्याचे वर्णन एका पदात येते

नागडधीम नागडधीम चोघडे वाजती l
कातू करणे शेडे गर्जती ll
बहिरव पाठीसी प्रधान सारथी l
पालखीत म्हाळसापती ll
वर छत्री अबदागिरी चवरी ढळती l
दोन्ही बाजू डंके वाजती l
डूब जाळी झालर गोंडे काय शोभती l
हिरे कोंदणात चमकती ll
अंबरी सहित भजन खर्याने चालती l
घोडे कोतवाल चालती ll
जशी लाट समुद्र थाट यात्रा दाटली l
स्वारी कर्हे जाता पहिली ll
सुखी यात्रा जेजुरी जागा चांगली l
स्वारी कर्हे जाता पहिली ll १ ll
आघाडी चमकली बुधवार पेठेला l
जाती होळकराच्या भेटीला ll
धाव चाल धुमाळी रीघ नाही वाटला l
थवे गर्दी थाट दाटला ll
सडी स्वारी चमकली ठरून कर्हा नदीला l
चकविले घोडे स्वाराला ll
रोहीचित्त सांबारे पळ सुटला हरणाला l
शिकारखाना सोडला ll
असी खेळत स्वारी कर्हे वरी आली l
स्वारी कर्हे जाता पाहिली ll
सुखी श्री जेजुरी साधन साधिती मोजी घटका पळ l
दुध स्नान होती अंघोळ ll
जसे सूर्याचे तेज कर्हे जप भागीरती केवळ l
एकवीस स्वर्गावर कर्हेचे मुळ शुद्ध सतरावीचे जळ ll
दिले पिवळे डेरे असंख्यात देवळ ऋषी मंडळ रम्य स्थळ l
चोफेर दुकान नजर पेठ रोखली पहा तहान भूक हरपली बरे सुखी यात्रा ll २ ll
रंभाई महाली देवाची बैठक l
सभा बसे इंद्रादिक सख्या आयना घेऊन उभा समुख करी सूर्य बिंब लखलख ll
अंगी चंदन सुवास सुरेख कस्तुरी भाळी टिळक घाली पाट रांगोळ्या ताट l
जडले माणिक आत चांदीच्या वाट्या चक्क रिद्धी सिद्धि वाढती ll
खीर साखर स्वयंपाक ऋषी जेवती अबोलिक l
अन्चुनी पानाची पट्टी रंभाईने दिली सुखी यात्रा स्वारी कर्हे जाता पाहिली ll ३ ll
कूच केले कर्हेचे चाल स्वारीची पुढे बैठक धालेवाडी ची घेती l
हारजीत घोडेस्वाराची रानोमाळ दवड फोजेची ll
रवी अस्तमान काळोखी रात्र अवसेची पहा l
दिवट्या हवाई दारूची, पुढे चंद्रज्योत महिताप प्रभा फाकली ll
स्वारी रस्त्याने चालली अशी मिरवीत स्वारी किल्ल्या वरी आली l
सभा बारद्वारी बेसली गुरु मुकुंद गिर बोलले गोडी लागली स्वारी बापूनी गायिली बर सुखी ll ४ ll

याच सोमवती सोहळ्याचे वर्णन एक अनाम वाघ्या आपल्या प्रतिभेने करतो

महाराज चरचिलें आगीं । भंडार भूशन पीवळे पीतांबर नेसुनी रेखिली भाळी ॥
महाराज ॥ उंच मैलागिरी चंदन, शिरी शिरी पेचतुरा, अंगामध्यें जामा ॥महाराज॥
पिवळी आसमान शोभती शाल पिवळी वरुन हातामधे खंडा ॥महाराज॥
झालि आसनावरती स्वार, हे गडी प्रधान बरोबरी पाहिले नयनी ॥महाराज॥१॥
महाराज उतरली स्वारी । किल्ल्याच्या तळवटी, झाली शहरामध्यें दाटी ।
देव पाहा जाती । महाराज । जाती होळकराच्या भेटी ॥
हातीवर निशान, वाजती घाटी ॥ छडी भालदार, संगे वोज वोटाटे उडती,
भले वान जेठी । महाराज ॥ कलावा घेती,
जाती कचेरीच्या कांठी रमस्थळ जागा ।महाराज ॥
जागा कर्‍हातीरीं, आमवशा दिवस सोमवारीं, पाहिलें नयनी ॥महाराज॥२॥
महाराज उडते पाणी ॥ स्नान कर्‍हाबाई निरमळ बाई ॥
चकरेमध्यें नाहाती ॥ महाराज ॥ जळो परवत पापांचें,
दर्शन होते पायांचें मनुश मिळालें ॥ महाराज ॥
देशोदेशींचें भवरगांव लहान मोठयाचे, घेणें देणें,
एका प्रहराचें, महाराज ॥ उठा वेळ झाला जलदी जायाचें जैजैकार होतो,
आम्हांवर उधळे भांडार, आणि पुढे वाद्याचा गजर पाहिलें नयनी ॥महाराज॥३॥
महाराज परतली स्वारी, जेजुरी नाम नगरी,
काळोखी रात्र अंधारी, दीप दिवटयाचा पाजळे म्हाद्वारी,
आणिक दीपमाळा हारोहारी, पुढें ललकारी ॥
महाराज, पोचली किल्ल्यावर स्वारी,>
घेऊन देऊन उजवी बसले बारद्वारी ॥म्हा०॥
आनीक लोक शीवबंदी हाजेरी घेती ॥म्हा०॥
धनीक ऊंद सरकार, जोंधळे बतीस भंडार पाहिलें नयनीं ॥महाराज॥४॥

श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो महिनाभर कडेपठारी भक्ताची गर्दी दाटते कर्हे वरून पाणी आणून त्याने देवास स्नान घातले जाते याचे वर्णन वाघ्या भक्ती भावाने करतो

बोला बोला हो तुम्ही बोला वाचे येळकोट तुम्ही बोला भंडार वाहूं मल्लारीला,
बाणूम्हाळसा नारीला, श्रावणमासी, भक्त येती, करेचें पाणी स्नानासी घेती ॥
उठा उठा व जलदी करा, खंडेरायाचें नाम स्मरा, अक्षी मनामध्ये भाव धरा
आदितवार दिवस आला ॥ कडे पठारी तुम्ही चला ॥
चुकेल चौर्‍याऐशींचा फेरा ॥ बोला हो बोला० ॥१॥
सोन्याची जेजुरी, तिथें नांदे मल्लारी,
तो आमुचा कैवारी, गळा घालूं भंडारी,
नवलक्ष पायरी दीपमाला हारोहारी तूं आमुचा कैवारी
गळा घालून भंडारी, उभा होय सामोरी ॥
सभा शोभे महाद्वारी ॥ बोला बोला० ॥२॥

नाग पंचमीला नाग पूजेसाठी खंडोबा मंदिरातून म्हाळसा बाणाई चे ताट काढले जाते ह्या सोहळ्याचे वर्णन उपासक करतो

नागपूजाया जातो म्हाळसा नगर नारींचा थाट
बरोबर नगर नारींचा थाट जी
देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचे ताट जी
अलंकार पिवळे अंगावर शालू पीतांबर पिवळे
आंत डोईस मुदराखडी सेस फुलें चंद्रकोर मोर आवळा
जी साचवगी साजणे मिळाल्या ग आणिक वारा सोळा
जी जसी रे म्हाळसा देवांगनामदी जोत चमकली चपला जी
जसा आकाशीं चद्र चांदण्या ग नक्षत्राचा मेळा
मिळाल्या ग नक्षत्र मेळा चौघीचे चौघडे पांचवी ग मुज्रावीण एक बाळा
जी एकच गरदी झाली मिळे ना ग वर जाण्या वाट
जी देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचें ताट जी
नागपूजाया चाल. दोर धरुन गुण गाती नाचती करकर लवती आंकडा
नाचती नाचवती कोंबडा घालिती पिंगा पकवा झगडा जी
शिरींचा पल्लव टाकून खांद्यावर भुजाबावटे उघडे
खांद्यावर कुणी इकडून तिकडे उभयता भार घालिती झगडा जी
चक्रावाणी गरगर फिरती एक हाताच्या फुगडया खेळती
चंद्रहार लखलखती गळ्यामधी करंडफुल कानीं बुगडया जी
पायीं पैंजण तोरडें हातामधीं कंकण पाटल्या गोट जी
देवांगना गजघाट हातामधीं कंकण पाटल्या गोट नागपूजाया

जेजुरीचा दसरा हा मर्दानी दसरा म्हणून ओळखला जातो जेजुरीगड व कडेपठार पालख्यानचे शिलंगण व नजर भेट या सोहळा वाघ्या आपल्या गीतातून कथन करतो

अश्विन महिना प्रातःकाळीं नहाती कर्‍हेच्या तिरीं, फुले पुष्पातें ओटया भरी,
भरुनि कर्‍हेचे पाणी कळस चंबू चांदिचा शिरी,
दाट कांसडया सोनेरी मिळुनी सर्वांचा थाट,
चालला वाट धरोनी हारोहारी, एका मागें एक सुंदरी,
सतरावीचा घाट चढता वाट जाती पठारी,
उंच मेरुच्या शिखरी, घालूनि कर्‍हेचे स्नान देवाला बाणु
म्हळसा सुंदरी, उभे भैरव जोगेश्वरी, आश्विन महिना यात्रा भरति
आनंद होतो जाग्रणी चला जेजुरी साजणीला
रात्रन् दिवस माझ्या नयनी बसतो दिसतो
माझ्या मनी चल जेजुरीला साजणी ॥१॥
पहिल्या प्रहरी निघतो छबिना उजवे मानेवरी वाघा गरजतो
दरबारी गर गर गर गर गिरक्या मारितो
नानापरि ढोल सनया नाद किलकारी मधे मुरळ्यांचा थाट
भोंवताली दिव दिवटया हारोहारी एका चढीत एक सुंदरी
उंच पैठणीचा शालू नेसाया काठ पदराला जरी खुप श्रृंगार बनला
परी तीन प्रहर मग जागरण झाले चौथ्या प्रहरी तोंड धुन चल जेंजुरीला साजणी ॥२॥
विजय दशमीला स्वारी शिलांगण हुकुम प्रधान प्रति कुंचाजीले
डंके वाजती मानकर्‍याचा थाट बरोबर गोपाळ आरती पालखीत म्हाळसापती ।
गिरीकंदराच्या चार रस्त्याकडून स्वारी पहाडाहून केवढी मौज दिसती बाणामागे बाण सोडिती ।एका बाणाचा घा उभयता आंत त्याने भेटती होती आवाज पहाड गरजती होती
आपटयाची पूजा ब्रह्मदेव सांगती नारदमुनी चला जेजुरीला साजणी ॥३॥
थेट रमण्यामध्ये स्वारी चमकती उत्तरे समोर जे जे
वाडी मूळ पाठार उजवी घेऊनी मारुति वेशीमध्ये येशवंत मल्हार बाजूला
भाक होळकर चंदी चंदवडजे राजे अक्कलकोट, भरतपूर, जाकपूर,
शाहु राजे सातारकर, शुष्क रंगाचे हत्ती सजविले,
हौद अंबारीवर लखलख कळस झालर नदर पेटमध्यें
स्वारी थोपली खुली रात्र चांदणी चला जेजुरी साजणी ॥४॥
झोकनोक स्वारी चाक लावा उजवी घेऊनी मारुती रस्त्यानें
स्वारि मिरविती दो रस्त्यावर सावकार मंडळी दीप दिवटया घेऊन हाती ।
भर ओंजळ भंडार उधळती । अपार पेटल्या दिवटया हारोहारी दीपमाळ जळती स्वारी चढतां
मौज दिसती आली किल्ल्यामध्यें स्वारी चौघडे गंगनाम गर्जती नानापरी वाद्ये वाजति मुकिदेगिर
प्रसन्न बापुचे चित्त त्याच्या चरणी कडे पठार आमचे धनी रात्रन दिवस माझ्या नयनी,
दिसतो बसतो माझ्या मनीं चल जेजुरीला ॥५॥

जेजुरीच्या उत्सवा बरोबर खंडोबा बाणाई लग्न, म्हाळसा बाणाई झगडा हे जन सामन्यांचे जिव्हाळ्या चे विषय उपासकांनी या वरही पदे रचली

पिकना पिकना चंदनपुरीचा बजरा
चंदनना मळा वर मल्हारी गोजरा
पिकना पिकना चंदनपुरीना शिवार
बानू नार करता सोडलं मल्हारीन घर
म्हाळसा बाणाई दोन्हीच्या दोन जाती
मल्हार देवा करिता जेवल्या एक ताटी
म्हाळसा म्हणे मी वाण्याची पोर
बानू धनगरनीने बाटवील घर
म्हाळसा म्हणे मी जेउनी दुधपुरी
बानुना जीव करता बोकडांना गळे सुरी
म्हाळसा सवाई कयी बाणाई चढणी
चडू नही दिघी तिले पायरी गडनी
बाणाईले पाही म्हाळसाले क्रोध बना
भंडारना थाळा उभाल्याने आदळंना
जेजुरीना देव देव तुना मना एक
भंडारना गाडा वारू जुपसू समाइक
जेजुरीना वाटे कशाची धावपळ
बेंल नंदीनी सुटी पडे गेजमाळ
जेजुरी गडावरी वाघ्यांचा झाला मेळा
तठूनी ओळखीला बाळ भगतना गळा
जेजुरीले जाता आडवी लागे कर्हाबाई
तठूनी आरती भोळा मल्हारीले दायी
नेनंता बाळले दिवटी बुधली तोलेना
जेजुरी गडावरी कोणी येळकोट बोलेना
मना घर खंडेराव मना खंडीना येव्हारा
सोनानी छत्री घडू मोत्यांना देव्हारा
देव खंडेराव आनंद कया मना
पानना फुलना घट उजवसू तुना

जेजुरी गडावर खंडोबा म्हाळसा बाणाई सह नांदतो आहे त्याचा धाक आणि थाट वर्णून विठू वाघ्या गातो

जेजूर नगरी आजाव गुजरी नांदे मारतंड मल्हारी ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
सभेसी बैसला कैलासराणा म्हाळसा बाणु दोघी या ललना ।
दोही बाजूला शोभे देवांगना ॥मिळवणी॥
भक्त येती नवस करिती प्रसन्न होती शिव हार हार हार ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापिती थार्‌थार् थार् ।
जेजुर नगरी अजाब गुजरी ॥१॥
नाम शोभले तुला मारतंडा त्रिलोकांमध्यें
शोभतो खंडा पिवळे निशाण झळकतो झेंडा ।
स्वर्ग घेतले, दैत्य मर्दिले, भक्त तारिले फार् फार् फार् ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
नऊ लक्ष पायरी शोभे गडाला, दीपमाळा हारोहारी दोहि बाजूला ।
भक्तांची दाटी झाली दरवाज्याला, छंद देवाचा, नाद घोळाचा ,भंडाराचा होतो बडीमार l
नाम घेता विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
चैत्र पोर्णिमेसी आनंद फार, भक्त मिळूनी करती जयजयकार l
विठू वाघ्या उभा जोडूनी कर, मनी भाव, चरणी ठाव, देवा पाव मज फार् फार् फार् ।
नाम घेता विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।

या उपासकांनी ज्या पद्धतीने मराठीतून पदाच्या रचना केल्या त्याच पद्धतीने हिंदी पदेही रचली

जोत खडे मलुखान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥
लगे दख्खनका मैदान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥चाल॥
नीले जर्दपर कडक सवारी, भडक पीले निशाण ॥
मनी मल्लेकु धडक लगाये, घेर लिया आस्मान ॥पहाडपर॥
राव होळकरने किल्ला बनाया, महल जडित हिरखाण ॥
नऊ लक्ष पायरी बनाया, कळस झडके दिनमान ॥पहाडपर॥
किल्ले अंदरसे निकला भुंगा मोगल कहे मलुखान ॥
कहे कुत्तेकु हाड ना बोले, चारि कोट सन्मान ॥पहाडपर॥
कहे मुकुंद गिर चाकर बोले रखो चरणपर ध्यान ॥
बापु वाघास सन्मुख गावे, सिद्ध करी अनुमान ॥पहाडपर॥

भिकाजी वाघ्या, शंकर वाघ्या, बापू वाघ्या, राम हाळकर, रामभाऊ, हरिभाऊ, विठू वाघ्या, अशी अनेक उपासकाची नावे त्यांचे काव्या मधून समजतात पण त्यांच्या विषयी माहिती मिळत नाहीं, तर अनेक पदा मध्ये नाम मुद्रा नसल्याने त्याचे रचनाकार अनामिकच आहेत, अश्या ज्ञात असलेल्या पदा मधील हि काही पदे या अश्या पदांचे संकलन करून हा ठेवा जतन होणे हि काळाची गरज


*
संत वाणीतील जेजुरी

मराठी संतानी महाराष्ट्रात समतेची शिकवण आणि नीती मुल्यांची मांडणी करून भक्तीचे खरा प्रबोधन केले. येथील परंपरांना आध्यत्मिक रूपके मांडून समाजाचे प्र्भोदन साधले, खंडोबाच्या भक्ती मार्गाला हि अध्यात्मिक दिशा देण्याचा प्रयत्न केला संतांच्या अभंग वाणी तूनही जेजुरीचे खंडोबाचे दर्शन घडते

संत नरहरी सोनार [ ईस ११९३ ते १२५५ ]

narhari sonar

हे पंढरपूर निवासी संत शिव भक्त असणाऱ्या नरहरीना स्वत विठ्ठलानीच चमत्काराने हरीहर एक असल्याचा दृष्टांत दिला अशी दंत कथा आहे. या नरहरीनी जेजुरीचे वर्णन केलेली आरती आजही जेजुरी मंदिरात गायली जाते

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥
जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥
मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥

संत जनाबाई [ईस १२९८ ते १३५० ]

jana-bai

संत नामदेवांची शिष्य असणाऱ्या जनाबाईनी नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या आपल्या भारुडा मधून जेजुरीच्या खंडेरायाला रूपकात्मक नवस बोलला आहे

खंडेराया तुज करिते नवसू l
मरू दे सासू खंडेराया ll
सासू मेल्यावरी तुटेल आसरा l
मरू दे सासरा खंडेराया ll
सासरा मेल्यावरी होईल आनंद l
मरू दे नणंद खंडेराया ll
नणंद मरता होईल मोकळी l
गळा घालीन झोळी भंडाराची ll
जनी म्हणे खंडी अवघे मरू दे l
एकटी राहू दे पाया पाशी ll

संत एकनाथ [ ईस १५३३ ते १५९९ ]

Sant_Eknath

पैठण निवासी संत आपल्या भारुडा मधून अध्यात्मिक भक्तीचा मार्ग त्यांनी दाखविला खंडोबाचे लोकाभिमुख दर्शन ते नाथांचे भारुडा मधून

वारी हो वारी l
देई का गा मल्हारी l
त्रिपुरारी हरी l
तुझे वारीचा मी भिकारी ll १ ll
वाहन तुझे घोड्यावरी l
वरी बैसली म्हाळसा सुंदरी l
वाघ्या मुरुळी नाचती परोपरी l
आवडी एसी पाहीन जेजुरी ll २ ll
ज्ञान कोटबां घेऊन आलो हरी l
बोध भंडार लावीन परोपरी l
एका जनार्दनी विनवी श्रीहरी l
वारी देऊनी प्रसन्न मल्हारी l

मुरुळी हि खंडोबाची उपासक आपल्या सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या चरणी लीन होते. सर्व विषय वासनांचा त्याग करून खंडेराया चरणी लीन झालेल्या मुरुळीला नाथ एका उच्च भुमिकेवर नेऊन बसवितात

नि:संग मुरुळी झाले l
या मालूचे घर निघाले ll
गळा भक्तीची भंडारी l
भावाचा कोटबां करी l
विवेकाची मागते मी वारी l
या संताच्या चोधा आले ll
चोहात घांड वाजती l
सोह शब्द घोळ गर्जती l
वाघ्या मुरुळी या नाचती
गुरु कृपेचे अंजन ल्याले l
वाजे वेराग्य तुणतुण l
ते कदा नव्हे व सुनं l
मंग घंगरू वाजे छुन छुन l
नाचत गेले जेजुरी l
गड देखिला जेजुरी l
आत्मा नांदतो मल्हारी l
जाऊन बसले मी मांडीवरी l
एका जनार्दनी बोले l

संत तुकाराम [ ईस १६०८ ते १५९९ ]

Sant Tukaram

देहू त्यांचं निवास तसे जेजुरी पासून जवळच असणारे . खंडोबाचा वाघ्या व असणारी प्रतीके यांना अध्यात्मिक उंचीवर नेऊन तुकारामांचा वाघ्या सांगतो

अनंत युगाचा देव्हारा l
निज बोधाचा घुमारा l
अवचित भरला वारा l
या मल्हारी देवाचा l
शुद्ध सत्वाचा कवडा मोठा l
बोध बिरडे बांधा गाठा l
गळा वेराग्याचा पट्टा l
वाटा दावू या भक्तीच्या l
हृदय कोटबां सांगते l
घोळ वाजवू अनुहाते l
ज्ञान भंडारचे पोते l
रिते नव्हे कल्पांती l
लक्ष चोऱ्याशी धरे चारी l
या जन्माची केली वारी l
प्रसन्न झाला देव मल्हारी l
सोहभावी राहिलो ll
या देवाचे भरता वारे l
अंगी प्रेमाचे फेपरे l
गुरगुर करी वेडे चाळे l
पहा तुके भुकविले l

संत रामदास स्वामी [ ईस १६०६ ते १६८२ ]

ramdas swami

रामदास हे बलउपासनेचे पुरस्कर्ते खंडोबा हे बलाचे देवत आपल्या अनेक लिखाणा मधून त्यांनी खंडोबा चे गुणगान केले, त्यांनी खंडोबाची लिहिलेली आरती सर्वदूर प्रचलित आहे

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

दिनकर स्वामी तिसगावकर

हे रामदास स्वामीचे प्रख्यात शिष्य आपल्या ” स्वानुभव दिनकर ” या ग्रंथाची सुरवातच ते जेजुरीच्या खंडेराया पासून करतात

जो सदेव देह जेजुरीनिवसिया l माया म्हाळसा विलासिया l
त्या आत्मराज खंडेराया l नमन सदभावे ll
सज्ज करुनी विवेकपर घोडा l हाती घेउनी सतेज ज्ञानखंडा l
काम क्रोधादी मणीमल्ल होडा l वधिले सैन्य ll
उधळीले प्रेम भंडार l उभे सप्तकोटी गणपरिवार l
जे दैवी संपदेचे नर l बळकट पने ll

मध्वमुनीश्वर

नासिकचे संतकवी ‘ पद्कार’ म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे या आरतीत ते जेजुरीचे खंडोबाचे वर्णन करतात

मस्तकी मुगुट अंगी सोन्याचा किल्ला
हाती खड्ग घेउनी मारीत मणी मल्ला
कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला
बसुनी रक्षित अससी दक्षिण किल्ला
जयदेव जयदेव जय खंडेराया
अखंड भंडाराने डव डवली काया l
चंपाषष्टीचे दिवशी जे करिती कुलधर्म
त्यांची सफलपूर्ण होताती कर्म
त्याची तोड्तोसी तत्काळ वर्म
जयदेव जयदेव जय खंडेराया
अखंड भंडाराने डव डवली काया l
तुमची भक्ती जे जन करिती ते सर्व
जिकडे तुमचा धर्म तिकडे गौरव
मध्वनाथ जपतो येळकोट बहिरव
निंदा करती त्यांना होती रव रव
जयदेव जयदेव जय खंडेराया
अखंड भंडाराने डव डवली काया l

मौनीनाथ महाराज

सिन्नर येथील सतपुरुष अनेक लघुग्रंथ व स्पुट रचना त्यांनी केल्या आपल्या खंडोबाचे आरतीत ते म्हणतात

जय देवा खंडेराया l निज शिवरूप सखया l
आरती ओवाळीतो l भाव भंडार सुप्रिया l
देहामय गड थोर l हेचि दुर्घट जेजुर l
येथे नांदतोसी l आत्मा साक्षीत्वे निर्धार l

वरील संतानी जेजुरी आणि खंडोबा यावर जे लिखाण केले याची हि थोडीशी झलक, या शिवाय अनेक संतानी खंडोबा जेजुरी यावर विपुल; लिखाण केले आहे


*
विविध कला अविष्कारातील खंडोबा

चित्रांमधील खंडोबा दर्शन
खंडोबाच्या भक्तांनी आपल्या विविध कलागुणांनी त्याचे रूप साकारण्याचा प्रयत्न केला, साहित्य , लोककला मधून संचार करणारा खंडोबा चित्रकारांचे हातातूनही मूर्त झाला. ही त्याची चित्र रूपे कधी श्रद्धेय पुजा प्रतीके बनली तर कधी देश विदेशातील संग्रहालयातून अजरामर झाली अश्याच चित्रांमधून साकारलेल्या काही खंडोबा चित्रांचे हे दर्शन

ब्रिटीश म्युझियम मधील खंडोबा चित्र

 khandoba

khanderao

ब्रिटीश म्युझियम मधील ही चित्रे सुमारे २०० वर्ष पूर्वीची आहेत

ब्रिटीश लायब्ररी मधील जेजुरी गडाचे रेखा चित्र

nash

ब्रिटीश लायब्ररीतील हे रेखा चित्र ईस १८४४ मध्ये या परिसराचा महसूल सर्वेक्षण करण्यासाठी आलेले इंग्रज अधिकारी अलेक्झाडर न्याश काढलेले असुन या चित्र खाली जेजुरीचा उल्लेख town and fort of Dejouri असा केलेला आहे, Dejouri या उच्चारा वरून हे चित्र देवगिरीचे असल्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे पण चित्रा वरून हे जेजुरीचे असल्याचे स्पष्ट होते .

http://vi.ebaydesc.com/ws/eBayISAPI.dll?ViewItemDescV4&item=390

प्रसिद्ध चित्रकार श्रीमती सारा जेन लेयार्ड यांनी इस १८६२ मध्ये जेजुरीस भेट दिली होती त्या वेळेस त्यांनी जेजुरी गडाचे पेशवे तलावाचे बाजूने काढलेले जलरंगातील चित्र

लोक प्रसार पावलेली चित्रे

Khandoba

khandoba

खंडोबा मणि मल्ल युद्धाची हे चित्रे लोकां मध्ये सर्वाधिक प्रसार पावलेली आहेत, खंडोबा विषयक ग्रंथात खंडोबानी प्रथम मणीचा व नंतर मल्लाचा वध केल्याचे वर्णन आहे, व संपूर्ण युद्ध वर्णनात म्हाळसेचा कोठेच उल्लेख नाही, पण चित्रकाराचे कल्पनेतुन हा वेगळाच युद्ध प्रसंग उभा केला आहे. पण तो भक्तांचे मनाला भावला व प्रसार पावत राहिला

जेजुरी गडावरील खंडोबा चित्र

jejuri khandoba
जुन्याकाळी आजच्या सारखी छायाचित्र उपलब्ध नव्हती. पण आपल्या जेजुरी गडावरील खंडोबाचे गर्भगृहाचे दर्शन नेहमी व्हावे ही भक्तांची आस मात्र होती या मधूनच ही काही चित्र प्रचलित झाली होती, प्रत्येक चित्रात चित्रकाराची वेगळी प्रतिभा जाणवते.


Comments are closed.