महाराष्ट्र गणेश मंदिरे

महाराष्ट्र गणेश मंदिरे

 

गणेश रूपे

अष्टविनायक

मोरगाव  सिद्धटेक  थेऊर  रांजणगाव  ओझर  लेण्याद्री  महड  पाली  

गणेश आरती मंत्र

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणपती भारतीय संस्कृती मधील विघ्न निवारक देव आहे. विघ्नांचा नाश करून मांगल्याची स्थापना करणारा देव म्हणून गणेशाला आज आसेतु हिमालय मान्यता आहे. पितृ कार्य सोडून इतर सर्व कार्या प्रारंभी त्याचे स्मरण केले जाते.”कार्याचा श्रीगणेशा” म्हणजेच कार्याची सुरवात असा अर्थ मानला जाते. प्रत्येक घरे, वाडे, मंदिरे याच्या मुख्य दरवाज्यावर गणेशाचे शिल्प काढले जाते याला गणेश पट्टी असे म्हणतात. असा हा सर्व व्यापुन राहिलेला गणेश. प्रचलित असणारी गणेशाची लोक प्रियता पाचव्या शतका पुढील दिसते. या शतका पूर्वीच्या त्याच्या मुर्ती सापडलेल्या नाहीत.सनातनी पंडितांच्या मते गणपती ही संर्पूणत: वैदिक देवता आहे. त्यांचे मतानुसार ऋग्वेदातले ब्रह्मणस्पतिसूक्त हेही गणपतीचेच सूक्त आहे. परंतु अभ्यासकांचे मते हे मंत्र देवगणांचा पती ब्रहस्पती यांचा आहे, गणपतीचे स्पष्ट उल्लेख अतिप्राचीन वाङमयात सापडत नाहीत, गणपतीचा स्पष्ट उल्लेख मैत्रायणी संहितेतील गणेश गायत्री मध्ये मिळतो यांचा अर्थ साहित्यात गणपतीचा जन्म इसवीसनाचे सुरवातीचे खुप अगोदर झाला होता. पण त्याचे मुर्ती स्थापना पाचव्या शतका पर्यंत दिसत नाही. आजच्या गणपतीची आठवण करून देणाऱ्या सगळ्यात जुन्या प्रतिमा म्हणजे हत्तीचे तोंड असलेल्या मानवाकृती प्रतिमा शुंग-कुशाण कला पासुन मथुरा व अमरावती येथे मिळाल्या आहेत काही विद्वान यांना गजमुख यक्ष मानतात. गणेशाचे रुपाकडे लक्ष दिल्यास त्याचे ठेगना बांधा, आखूड मांड्या, सुटलेले पोट,यांचा संबंध यक्ष प्रतिमांशी आहे, अश्या गजमुख यक्ष प्रतिमा मध्ये गणेश मुर्तीचे मुळ असल्याचे सिद्धांत डॉ कुमारस्वामी यांनी मांडला होता. पुराणात गणेशाचा उल्लेख वक्रतुंड असा केलेला आहे. तर महानिर्वाण तंत्रात त्याचा उल्लेख रक्ततुंड असा केलेला आहे, वैदिक देवता मध्ये समावेश नसला तरी त्याचे पुजन ग्रामदेवताचे रूपाने त्या काळी होत असावे. गणेश ही प्रथम आर्येतरांची एक ग्रामदेवता होती. कदाचित तिचे पूजक तिच्यापुढे नरबळी देऊन रक्ताचा तिच्यावर अभिषेकही करीत असावेत. यामुळेच त्याचा उल्लेख रक्ततुंड असा केलेला असावा, आजही गणपतीला सिंदूरचर्चन केले जाते. आर्येतर लोक हत्तीची पूजा करीत होते व त्या पूजेतूनच गणेशपूजा विकास पावली असे काही अभ्यासकांना वाटते. गणपती मूळची आर्येतर देवता असल्याबद्दल अनेक संशोधकांचे एकमत आहे. मुलत अनार्य हे सुर्य पुजक त्यांचे दृष्टीने गणेश हे सूर्याचे व त्याचे वाहन उंदीर हे अंधाराचे प्रतिक होय. विघ्न निर्माण करणारा विनायक, विघ्नकृत, विघ्नेश, विघ्नराज, ही गणपतीची नावे पाहता सुरवातीला विघ्न निर्माण करणारी देवता म्हणून त्याची मान्यता असावी, कार्य निर्विघ्न पडावे यासाठी त्याचे आध्य पुजन सुरु झाले त्याचे विघ्नकर्ता हे रूप पुढे लोप पावले व तो विघ्न विनाशक म्हणून मान्यता पावला. विघ्नकर्ता विनायक विघ्नहर्ता, सिद्धीदाता झाला. काळाचे ओघात त्याचे महत्व वाढू लागले. सुरवातीला गणपतीची गणना शिवगणात होऊ लागली. तो शिवगणांचा सेनापती झाला. पुढे त्याच्या भक्तांनी त्याला शिव पार्वतीचा पुत्र मानले. पुराणात त्याचे संबंधी नवीन आख्याने येवू लागली मध्यकाळाचे शेवटी गणेश पुराण, मुद्गल पुराण, या सारखी संपूर्ण पुराणे लिहिली गेली. व गणपती उपासकांचा गाणपत्य हा स्वतंत्र संप्रदाय झाला. व योग व तंत्र शास्रात गणपतीचा समावेश झाला. गणपती व शंकराचे नाते जुन्या काळा पासुन मानले जाते. शिव आणि गणपती हे पिता पुत्र होत हे सर्व पुराणांना मान्य आहे, पण त्याचे जन्म कथेत मात्र बरीच भिन्नता आहे. विविध आख्यान मधुन गणपतीच्या विविध जन्म कथांनी जन्म घेतला.
गणपतीच्या विविध जन्म कथा
एकदा पार्वती स्नान करत होती, तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनविले आणि प्रवेशद्वारावर उभे करून त्याला सांगितलं कि कुणालाही महालात प्रवेश करायची अनुमती देऊ नकोस. नंतर ती स्नान करायला महालात निघून गेली, थोड्याच वेळाने भगवान शंकर आले, त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा शंकरांनी गणपतीचे मुख धडावेगळे केले कारण त्यांना माहित नव्हता कि हा आपलच मुलगा आहे , जेव्हा हि बातमी पार्वतीला माहित पडली तेव्हा ती क्रोधीत आणि दुखी झाली. तेव्हा शिव नि तिचे सांत्वन केले आणि आपल्या गणाना आदेश दिला, कि तुम्ही पृथ्वीतलावर जा आणि जो कुणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल, त्याचे शीर घेऊन या, तेव्हा गणाना हत्ती सापडला. तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले, व गणपती गजमुख झाला.
शिव पुराणातील ही कथा वामन पुराण व मत्स्य पुराणास मान्य आहे. तरीही इतर काही कथा आहेत.
गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शंकरांनी आपल्या तप:सामर्ध्याने एक महा तेजस्वी बालक निर्माण केला. या बालकाला पार्वतीने पाहिले. अशा सुंदर पुत्राला आपल्या साहचर्यावाचून एकट्या शिवानेच जन्म द्यावा, यांचा तिला राग आला व तिने त्या बालकाला शाप देऊन गजमुख बनविले. पार्वतीला मुलगा झाला तेव्हा सर्व देव त्याला पाहण्यास आले. शनि आला नाही पार्वतीचे आग्रहाने तो आला पण गजाननाकडे न पाहता खाली मान घालून बसला. पण पार्वतीने शनीला गणपतीकडे पाहण्यास सांगितले.शनीने त्याच्यावर दृष्टी टाकताच. गणपतीचे मस्तक गळून पडले. तेव्हा पार्वती शोकाकुल होऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने तिला सांगितले की तुला सर्वात प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक आढलेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव, म्हणजे तो सजीव होईल. त्यानुसार पार्वती मस्तक शोधू लागली तेव्हा पथम तिला गजाचे मस्तक मिळाले. ते आणून तिने गणपतीच्या देहाला लावले. व गणपती गजमुख झाला.
सिंदुरासूर नावाचे राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने पार्वतीचे पोटी जन्म घेण्याचे ठरविले. सिंदुरासुरास हे समजले त्याने गर्भात असलेल्या बालकाचे गर्भात शिरून शीर तोडले, पुढे मस्तक हीन मुल जन्माला आले. पण ते जिवंत होते. शंकरांनी हत्तीचे शीर तोडून त्याला लावले व पुढे हा गजानन झाला व त्याने सिंदुरासुराचा वध केला.
शिव पार्वती हिमालयात विहार करीत होते. तिथे एक हत्तीचे जोडपे रतिक्रिडा करताना त्यांना दिसले. मग शिव-पार्वतींनीही गजरूप घेऊन रतिक्रिडा केली आणि त्या क्रीडेतून त्यांना गणपती हा गजमुख पुत्र प्राप्त झाला जनात पापकार्ये निर्विघ्न होवू लागली मुळे देव चिंतीत झाले व ते रुद्र कडे गेले. रुद्र पार्वतीकडे पाहून हसले व तेथे आकाश तत्वाचा प्रतिनिधी म्हणून एक पुरुष प्रगट झाला.पार्वती त्याला पाहू लागली तेव्हा क्रोधीत रुद्राने त्याला तु हत्ती तोंडाचा होशील असा शाप दिला. या वेळी अनेक विनायकांची उत्पती झाली. ब्रह्मदेवांचे मध्यस्तीने शंकरांनी त्याला विनायकांचा अधिपती केले.
अश्या विविध जन्म कथा असणारा गणेश विविध कलागुणांचा व विद्येचा अधिपती मानला जातो ऋग्वेदापासून तमाशाच्या फडावरही गणेशाची वंदना केली जाते. नृत्य, नाट्य सर्वत्र त्याचा जयजयकार झालेला आहे, देवनागरी लिपीचा त्याला जनक मानला जातो.
*
गणपतीची चार युगांची रूपे गणेश पुराणात वर्णन केली आहेत.
१) कृतयुगात गणेशाचे नाव ‘विनायक’ असुन तो दशभुजा व सिंहारूढ आहे
२) त्रेतायुगात गणेशाचे नाव ‘मयुरेश्‍वर’ असून, तो सहा भुजांचा मोरावर बसलेला आहे.
३) द्वापारयुगात गणेशाचे नाव ‘गजानन’ चतुर्भुज असून, उंदीर त्याचे वाहन आहे.
४) कलियुगात गणेशाचे नाव ‘धूम्रकेतू’ द्विभुज असून, घोडा त्याचे वाहन आहे.
याच पुराणात गणपतीच्या ५६ रूपांचा उल्लेख असुन यातील काही चार, सहा, दहा हातांची असुन सिह मोर, उंदीर ही त्यांची वाहने आहेत हेच ५६ विनायक म्हणून ओळखले जातात. स्कंद पुराणात काशीखंड मध्ये वानर, सिह,व हत्ती अश्या त्रिमुख गजाननाचा उल्लेख आहे, महेश्वर खंडात गणेश मुर्तीचे तीन प्रकारात विभाजन केले आहे.
.
१) सात्विक – पाच तोंडे दहा हात असलेला.
२) राजस – चार हात व सोनेरी रंग असलेला.
३) तामस – निळ्या रंगाचा
या शिवाय तंत्रात त्याची विविध ध्याने वर्णन केली आहेत, शिल्पांचे आधारे त्याचे पुढील प्रकार दिसतात.
१) नृत्य गणेश : नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्‍यावरील डोक्‍यावर चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग मुद्रा, तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हातात वाद्येही असतात. व शेजारी वाद्ये घेतलेले साठी ही दिसतात.
२) शक्ती गणेश : थोड्याच प्रमाणात या मूर्ती आहेत. यात आपल्या शक्तीला गणेश आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला दिसतो.
३) पंचविनायक पट्ट स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप ओळीने पाच गणपती शिलापट्टीवर आहेत.
४) महागणपती किवा पंचमुख गणेश : पाच सोंडा व दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. गणपती जवळ सिह, उंदीर, मुंगुस हे प्राणी दिसतात.
५) यक्षविनायक : पाच मुखे, दहा कान ,पाच दात एकदंत, मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत. चार हात मधील दोन मांडीवर व मागील हातात अंकुश व सर्प आहेत.
६) राक्षसारूढ गणपती : पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, गणपतीच्या हातात निलोत्पल, परशु,खड्ग,शंख,फल. बाण, पाश या वस्तू आहेत. तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. राक्षसाची तोंडे पशूची असुन त्याला आठ हात आहेत,दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.
७) हेरंब गणपती : हा गणपती सिहावर बसलेला असुन याला पाच सोंडा आणि दहा हात आहेत,दोन हात अभय मुद्रेत असुन बाकी हातात माळा, परशु, दात, पाश, मोदक आहेत.. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.
देशाचे कानाकोपर्यात व देश विदेशात ही गणपतची अनेक स्थाने आढळतात परंतु पुराणा मध्ये गणेशाची प्रमुख २१ स्थाने वर्णन केलेली आहेत, पुराण प्रसिद्ध अष्टविनायक भारताच्या आठ दिशांना आहेत.पूर्वादी दिशा क्रमाने त्यांची नावे
१) वक्रतुंड, २) एकदंत, ३) महोदर, ४) गजानन, ५) लंबोदर, ६) विकट, ७) विघ्नराज, ८) धूम्रवर्ण,
अशी आहेत.
पुराण प्रसिद्ध २१ स्थाना मधील १२ गणेश क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत,
१)मोरगाव, २) कळंब, ३) आदासा, ४) गंगामसले, ५) राक्षसभुवन, ६) सिद्धटेक, ७) रांजणगाव, ८) लेण्याद्री, ९) वेरूळ, १०) पद्माळे, ११) नामलगाव, १२) राजूर

ही ती स्थाने होत,
लोकमताचे परंपरेने
*
१) श्रीमयूरेश्‍वर- मोरगाव,
२) सिद्धिविनायक, सिद्धटेक
३) चिंतामणी, थेऊर
४) महागणपती, रांजणगाव
५) विघ्नेश्वर, ओझर
६) गिरिजात्मज, लेण्याद्री
७) वरद विनायक, महड
८) बल्लाळेश्‍वर, पाली
हे अष्ट विनायक मानले जातात, या विनायकांचा व महाराष्ट्रातील जागत्या गणेश स्थानाचा हा सचित्र परिचय

अष्ट विनायक दर्शन

Ashtavinayak Route Map
*
१) श्रीमयूरेश्‍वर- मोरगाव, ( ता. बारामती जि. पुणे,)

morgoan
मोरगांव पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यातील हे श्री मोरेश्वर गणेशाचे स्वयंभू व आद्यस्थान अष्टविनायकात प्रमुख आद्यपीठ मानले जाते. मोरगांवचे मुळनांव “भुस्वानंदभुवन” असे होते असे म्हणतात . मोरावर स्वार झालेला गणपती तो मयुरेश्वर त्या मयूरेश्वराचे स्थान असलेले गाव म्हणुन याला मोरगांव असे नांव पडले आहे. काही मतानुसार या गावात पुर्वी खुप मोर होते म्हणुन याला मोरगांव असे नांव पडले आहे असे मानतात. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. मोरगांव कर्‍हा नदी काठी वसलेले आहे.
येथील मयुरेश्वराचे मंदिर गावाच्या मध्यभागी चोथार्यावर असून मंदिराला सभोवती कोट आहे, मंदिराचे प्राकाराचे समोर नगारखाना असून या नगारखान्या खाली हातात लाडू घेतलेली उंदीराची मोठी दगडी मूर्ती आहे. पुढील पायर्या चढल्यावर मंदिराचे प्राकाराचे दगडी चोथर्यावर मोठा नंदी आहे. या पुढे मंदिराचे प्राकाराचे प्रवेशद्वार लागते. मुख्यमंदिराची रचना सभामंडप, मुखमंडप,गर्भगृह अशी आहे. या मंदिराचा जीर्नोधार पेशवे काळात झाला आहे. गर्भगृहात शेंदूरचर्चित मयुरेश्वराची मूर्ती आहे, चतुर्भुज बैठ्या मूर्तीचे हातातील आयुधे स्पष्ट होत नाहीत. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मुद्गल पुराणात श्रींची मुर्ती चतुर्भुज व त्रिनेत्र असून वरच्या दोन हातात पाश व अंकुश धारण केले आहे. खालच्या दोन हातापैकी एक उजव्या गुडघ्यावर ठेवलेला असून डाव्या हातात मोदक धारण केलेला आहे. असे वर्णन केलेले आहे. या मुर्ती संबधी काही दंतकथा असून सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा निर्मिती नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, सुर्य, शक्ती यांना सृष्टीचा खरा निर्माता कोण असा प्रश्न पडला त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना एक दिव्या ज्योत दिसली, या ज्योतीत त्यांना मयूरेश्वराची प्रतिमा दिसली व त्यांनी या ठिकाणी तिची स्थापना केली ,आज दिसणारी मुर्ती आहे ती मुळ मुर्ती नसून श्रींची मुळ मुर्ती मृत्तिका, लोह व रत्न याच्या पासून बनविलेली होती ती या मुर्तीच्या मागे अदृष्य आहे. त्या मूर्तीची स्थापना पंचदेवांनी केली होती सिंधुरासुराने तीचा विध्वसं केला त्यानतर ब्रम्हदेवाने दोन वेळा या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमीत्त येथे आले असता मुळ मुर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी तीला बंदिस्त केले व या मूर्तीची स्थापना केली.
मंदिराचे प्रदिक्षणा मार्गावर नग्नभैरव व गणेशाचे विविध रूपातील प्रतिमा आहेत, मंदिराचे समोरील कर्‍हा नदी काठावर एक शिव मंदिर आहे
गणेश भक्त मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान. मोरया गोसावी हे मोरेश्वराचे निस्सीम भक्त होते. याचा जन्म मयूरेश्वराचे कृपा प्रसादाने झाल्याचे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी तप केले, त्यांना येथिल कर्‍हा नदीत एक गणेश मुर्ती सापडली या मुर्तीची त्यांनी चिंचवडला स्थापना केली. मोरया गांसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगांवला यात्रेला जात असत. आजही माघी शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगांवला गणेश देवांची पालखी जाते.
सर्वत्र प्रचलित असणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस हे दहा दिवस येथे यात्रा असते, या दिवशी गर्भगृहात सर्वाना मुक्त प्रवेश असतो, सोमवती अमावास्या व दसरा या दिवशी पारंपारिक सोहळा असतो.
*

२) सिद्धिविनायक, सिद्धटेक (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर,)

sidhatek
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक या गांवी सिध्दीविनायक हे अस्ताविनायाकातील स्थान मानले जाते. सिध्दटेक हे गांव भिमा नदीच्या काठावर बसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम पेशवे कालीन आहे. हे मंदिर उत्तर भिमुख असुन मंदिराचे वेशी पासून देवाला पर्यंत फरासबंदीचा मार्ग सरदार फडके यांनी बांधला आहे. मुख्य महाद्वारातून मंडपात जाता येते. हा मंडप श्रीमंत मैराळ यांनी बांधला आहे, मंदिराचे गर्भगृह होळकरांनी बांधले आहे. गर्भगृहात सिद्धीविनायकाची स्वयंभू उजवीकडे झुकलेली सोंड असलेली शेंदूर चर्चित मूर्ती आहे या सिद्धीविनायका विषयी काही कथा प्रचलित आहेत प्राचीन काळी श्री गणेशाच्या कृपेने ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मीती करण्याची प्रेरण लाभली व ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण्‍ा करण्यास प्रारंभ केला. ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करण्यात मग्न होवून गेले असतांना श्री विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतांना त्यांच्या कानातुन दोन राक्षस जन्मास आले. त्यांची नांवे मधु व कैटभ असे होते. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देवून त्यांचे सृष्टी निर्माणचे कार्य बंद पाडले. त्याने सारी सृष्टी भयभीत झाली. मग ब्रम्हदेवाने प्रार्थना करुन विष्णुदेवाला जागे केले. श्री विष्णु जागे होताच ब्रम्हदेवाने त्यांना मधु आणि कैटभ याची माहिती दिली. भगवान विष्णुव मधु-कैटभ यांचे घनघोर युध्द सुरु झाले. पण विष्णुंना त्या राक्षसांचा पराभव करता आला नाही. म्हणुन ते शंकराकडे गेले. श्री शंकरांनी श्री विष्णुंना सांगीतले की युध्दास प्रारंभ करण्यापुर्वी श्री गणेशाचे पुजन केले नाही त्यामुळे तुला अपयश आले. तेव्हा श्री शंकराने श्री विष्णुंना षडाक्षरी मंत्र सांगुन त्यांना गणेशाची उपासना करण्यास सांगीतले.
तेव्हा विष्णु येथील एका आले तेथे त्यांनी “श्री गणेशाय नम:” या षडाक्षरी मंत्राने श्री गजाननाची आराधना केली व तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले. व विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व त्यांनी मधु-कैटभ ह्या दोन राक्षसांना ठार केले. ज्या ठिकाणी विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व श्री गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी विष्णुंनी गंडकी शिळे सिद्धीविनायकाची मुर्ती स्थापना केली. सिद्धी प्राप्त झालेले ठिकाण म्हणुन या ठिकाणाला सिध्दटेक व सिद्धी देणाऱ्या या गणेशाला सिध्दीविनायक नाव प्राप्त झाले. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात.
*

३) चिंतामणी, थेऊर (ता. हवेली, जि. पुणे,)

theuar
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात अष्टविनायकातील हे स्थान थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. या मंदिराचे मुख प्रवेशद्वार उत्तरेला असुन मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे, मंदिरावर ३० फुट उंचीचे शिखर आहे. या मंदिराची उभारणी धरणीधर महाराज यांनी एस १७४० मध्ये केली, मंदिरापुढील मंडप सरदार फडके यांनी बांधला, चिंतामणीची मूर्ती बैठी असुन डाव्या सोंडेची आहे, बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मूर्तीचे डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत
या स्थाना संधर्भात पुराणात काही कथा सांगितल्या आहेत
एकदा ब्रम्हदेवाच्या मनात चंचलता निर्माण झाली. आपल्या मनातील चंचलता कमी व्हावी यासाठी ब्रम्हदेवाने श्रीगणेशाची आराधना केली. त्यामुळे ब्रम्हदेवाच्या मनातील चंचलता नाहीशी होऊन त्यांचे मनाला शांतता लाभली. त्या मुळे या ठिकाणी ब्रम्हदेवाने श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. व या गणेशाला मनाची चिंता दुर करणारा “चिंतामणी” असे नांव दिले.
अहल्येचा पातिव्रत्य केल्याबद्दल गौतम ऋषींनी इंद्रला शाप दिला. इंद्र भयभीत झाला व त्याने गौतम ऋषींची क्षमा मागीतली व उ:शाप देण्याची विनंती केली. गौतम ऋषींच्या आज्ञेने इंद्राने या स्थानावर इंद्राने गणेशाची स्थापना केली व तपश्चर्या केली त्या मुळे तो शाप मुक्त झाला. या ठिकाणी बसून इंद्राने तपश्चर्या केली व त्या गणेश मुर्तीस ‘चिंतामणी’ असे नांव दिले.
मंदिर परिसरात राजा शिंगणदेव व माधवराव पेशवे, त्यांचे बरोबर बरोबर सती गेलेल्या त्यांचे पत्नी रमाबाई पेशवे यांची समाधी स्थाने आहेत, माधवराव पेशवे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार त्यांनी केला. येथे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी या काळात द्वार यात्रा असते.
*

४) महागणपती, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे,)

ranjangoan
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यात रांजणगांव येथे पुणे-नगर मार्गावर पुण्या पासून ५० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायकापैकी हा श्री महागणपती.रांजणगावचे मुल नाव मणीपुर असे होते त्याचे पुढे रांजणगांव झाले
पेशव्यांनी ईस १७९० मध्ये येथील गर्भगृहाचे काम केले, सरदार किबे यांनी मंडपाचे काम केले, सरदार पवार व शिंदे या मंदिराच्या ओवर्या बांधल्या. गर्भगृहातील शेंदूरचर्चित महागणपतीची मूर्ती बैठी आहे श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे.
या स्थान निर्मिती विषयी अनेक कथा प्रचलित आहेत
फार पुरातन काळी गृत्समद नावाचे एक थोर विद्वान ऋषी होवून गेले. ते महान गणेश भक्त होते. एकदा त्यांच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपला पुत्र मानले. मी मोठा झाल्यावर तीन्ही लोकांवर राज्य करेल असे तो मुलगा म्हणाला मग गृत्समदाने ‘गणानां त्वां’ या गणेश मंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने जंगलात जावून गणेशाची उपासपा केली गणेशाने प्रसन्न होवून प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. श्री शंकराशिवाय तुला कोणीच पराभुत करणार नाही असाही वर दिला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा शेवटी सर्व देव शंकराला शरण गेले. त्रिपुरासूरा बरोबरील युध्दात विजय प्राप्त व्हावा म्हणुन भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. नंतर शंकराचे व त्रिपुरासूराचे फार मोठे युध्द झाले. व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरासूराचा नाश केला. तोच हा श्री महागणपती.
भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते षष्टी या काळात येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
*

५) विघ्नेश्वर, ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे,)

ojhar
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गांवापासुन जवळच असलेल्या ओझर या गांवात अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे स्थान पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरले बाजीराव पेशवे व चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराचे कडेला येडगाव धरणाचा विस्तीर्ण जलाशय असुन मंदिराचे सभोवती तटबंदी आहे, मंदिराचे प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. गर्भगृहातील विघ्नहर डाव्या सोंडेचा असुन श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. बाजूला पितळी रिद्धी सिद्धी च्या मूर्ती आहेत. या शिवाय सुर्य, महादेवी, विष्णू शंकर पार्वती यांच्या मूर्ती आहेत.
या स्थान विषयी काही कथा प्रचलित आहेत.
प्राचीन काळी या विघ्नासूराने पृथ्वी व देव लोकांवरील सर्वच वैदिक सत्कर्माचा नाश करण्यास सुरूवात केली. देवांवर सर्वात मोठे संकट निर्माण झाले. तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना करण्यास सुरूवात केली. देवांच्या आराधनाने श्री गणेश प्रसन्न झाले.
श्री गणेशाने पराशर ऋषींचा पुत्र होवून विघ्नासूराशी प्रचंड युध्द केले . गणेशाच्या प्रचंड शक्ती मुळे विघ्नासूर जेरीस आला. तेव्हा गजाननाने त्याला आज्ञा केली की,”ज्या ठिकाणी माझे भजन-पुजन-किर्तन चालु असेल तेथे तु जाता कामा नये” त्यावर विघ्नासूराने गजाननाजवळ वर मागीतला, ” तुमच्या नावामागे माझे नांव असावे.’विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नांव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.व माळा तुझे गणात सामावून घ्यावे ” त्यावर श्री गणेशाने त्याला आपल्या गणांच्या समुदायात समाविष्ठ करून घेतले आहे. विघ्नासूराचा पराभव केला म्हणुन येथील गणेशास ‘विघ्नेश्वर’ किंवा ‘विघ्नहर’ असे नांव प्राप्त झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.
*

६) गिरिजात्मज, लेण्याद्री (ता. जुन्नर, जि. पुणे,)

lenyadri
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर हे स्थान वसलेले आहे. हे स्थान डोंगरात कोरून काढले असल्यामुळे ह्या स्थानाला ‘लेण्याद्री’ असे म्हणतात अष्टविनायकापैकी हा श्री गिरीजात्मज. या ठिकाणाचा प्राचीन उल्लेख जीर्नापूर,व लेखन पर्वत असा आढळतो,येथील लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात. .या देवस्थानचे पूर्व व पश्चिम बाजूस एकूण २८ लेण्या आहेत. या लेण्या मधील सातव्या लेणीत श्री गिरीजात्मज.स्थान आहे. या लेणी मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत गणेशाचे स्थान असलेली लेणी ५१ फुट रुंद व ५७ फुट लांब असुन लेणीत वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. या ठिकाणी गणेशाचे पाठीचेच दर्शन होते.
या ठिकाणाचे निर्मिती विषयी पार्वतीची कथा प्रचलित आहे.
पार्वतीच्या मनात अशी ईच्छा होती की, गजानन आपला पुत्र व्हावा म्हणुन तीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून मुर्तीची पुजा अर्चा केली. तेव्हा ती मुर्ती सचेतन होवून पार्वती पुढे प्रकट झाली. बाल गणेश येथेच वावरला येथे गौतम ऋषींनी गणेशाची मुंज केली. पुढे गजाननाचा ‘मयुरेश्वर’ अवतार येथेच झाला असे मानले जाते. भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात.
*

७) वरद विनायक, महड (ता. खालापूर, जि. रायगड)

mahad

 

रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे. हे स्थान मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे, रेल्वे अथवा बसने खोपोली किवा खोपोली फाट्यावरून येथे जाता येते. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. हा कौलारू मंडप सुभेदार बिवलकरांनी बांधला. जुन्याकाळी येथील मूर्तीचे संरक्षण व्हावे ती शेजारील तळ्यात लपवून ठेवली होती येथील गणेश भक्त भारती यांना श्रींनी दृष्टांत दिला व मी तळ्यात असल्याचे सांगितले त्यांनी हि मूर्ती तळ्यातून काढून तिची स्थापना केली. गर्भगृहातील हि मूर्ती पूर्वाभिमुख बैठी डाव्या सोंडेची आहे. शेजारी रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत.
या स्थानाविषयी एक कथा आहे.
प्राचीन काळी भीम नावाचा राजा होवून गेला त्याला रुक्मागंद नावाचा पुत्र होता. तो एकदा शिकारी साठी वनात गेला असतांना विश्रांतीसाठी येथील ऋषीच्या आश्रमात थांबला. रक्मागंदच्या तारुण्यावर भाळून ऋषीची पत्नी मुकुंदा त्याच्यावर भाळली. तिने रुक्मागंदाला आपल्या मनातला इच्छा सांगितली . पण रुक्मागंदाने नकार दिला. काम आतुर मुकुंदेने रुक्मागंदला ‘तु कुष्ठ रोगी होशील ‘ असा शाप दिला, रुक्मागंद तेथून गेल्यावर कामवासनेने व्याकुळ झालेली मुकुंदेची अवस्थापाहून इंद्राने रुक्मागंदाचे रुप घेवून मुकुंदेची इच्छा पुर्ण केली. त्याच्या पासून मुकुंदेला पुत्र प्राप्ती झाली. त्याच पुत्राचे नांव गृत्समद ऋषी. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीती झाली होती. तु ऋषी पुत्र नाही म्हणून त्याचा नेहमी अपमान होवू लागला. तेव्हा गृत्समदाने मुकुंदे कडून सत्य जाणून घेतले. व तिला शाप दिला व मुकुंदेनेही त्याला शाप दिला की, तिन्ही लोकाला भयभीत करणारा राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून पापमुक्तीसाठी गृत्सगंद पुष्पक वनात तप करु लागला. तपश्चर्या केल्यावर त्याला श्री गणेशाने प्रसन्न होवून वर मागण्यास सांगीतले. तेव्हा तो म्हणाला देवा तु सिध्दीदायी आहेस तेव्हा तु हया क्षेत्री कायमचे वास्तव्य कर. गणेशांनी ते मान्य करताच गृत्समदाने वरदविनायक या नावाने गजाननाच्या मुर्तीची स्थापना केली. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी या दोन कालावधीत येथे प्रमुख उत्सव साजरे होतात.
*

८) बल्लाळेश्‍वर, पाली (ता. सुधागड, जि. रायगड)

pali

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली हे स्थान स्थान आहे. अष्टविनायकांपैकी हे स्थान खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पाली कडे रस्ता जातो. या गावाचा प्राचीन उल्लेख पल्लीपूर असा होत असे पुढे ते पाली झाले. येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असुन, येथे दोन तलाव आहेत मंदिराचे सभोवताली दगडी फरासबंदी आहे. देवालयाचे बांधकाम चिरेबंदी आहे, मंदिराचे जीर्नाधाराचे काम ईस १७७० मध्ये बाबा फडणीस यांनी केले. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. पुढे ईस १९०५ मध्ये भाऊ हिंगे यांनी सभा मंडपाचे काम केले.
श्री बल्लाळेश्वर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. समोर मूषक वाहन आहे.
या मंदिरा विषयी एक कथा प्रचलित आहे
फार पुर्वी गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता तो आपल्या मित्रासोबत गावाबाहेर दगडाचे देव करायचे. फुले पाने तोडून त्या देवांची पुजा करायची असे खेळ तो खेळत असे. एक दिवस बल्लाळ आपल्या मित्रांसोबत जंगलात खेळायला गेला होता तेथे त्याला एक दगड सापडला त्याने त्याचा गणपती केला . व त्याची पुजा करु लागला. बराच वेळ हा खेळ असाच चालु राहिला त्यामुळे ती मुले घरी परतली नाहीत . गावातल्या लोकांनी बराच वेळ शोध घेतल्यावर ती मुले बल्लाळ सोबत जंगलात आढळली. तेव्हा गावकर्‍यांनी चिडून त्याच्या वडीलांकडे बल्लाळाची तक्रार केली, कल्याण रागानेच जंगलाकडे गेले तेथे सर्व मुले गणपतीच्या खेळात नाचत होती. व बल्लाळ ध्यान लावून बसला होता. मुलांनी तयार केले ले मंदिर कल्याणने उध्वस्त केले. ते पाहताच मुलांनी तेथुन पळ काढला. पण बल्लाळ मात्र ध्यान लावून बसला होता. ते पाहून कल्याणने बल्लाळला मारले. पण त्याचे ध्यान तुटले नाही. ते पाहून कल्याण अधिक चिडला व त्याने बल्लाळाला झाडाला बांधले. पण बल्लाळ मात्र गणेशाचा जप करत होता. बल्लाळाला बांधून कल्याण घरी निघून गेला तरी त्याचा जप चालुच होता. थोडयावेळाने त्याचे डोळे उघडले. तेव्हा त्याला दिसले गणपतीचे मंदिर मोडले आहे. तो म्हणाला ज्याने तुझी अवस्था केली आहे तो आंधळा, मुका व बहिरा होईल. त्याच्या शरीरातुन दुर्गंधी बाहेर पडेल. ते बोलुन पुन्हा तो श्री गणेशाची पुजा करायला लागला. त्याच्या भक्तीला प्रसन्न होवून गणेशाने त्याला दर्शन दिले, तेव्हा श्री गणेश म्हणाले तुला काही मागायचे असेल तर मागुन घे. हे एकुण बल्लाळ म्हणाला मला वर देणा असेल तर ऐवढाच द्यावा की आपल्या ठिकाणी माझी भक्ती कायम राहावी. व आपण या ठिकाणी कायम वास्तव्य करुन भक्ताची सर्व संकटे दुर करवीत गणेशाने मी येथे वास करेल. व माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून प्रसिध्द होईल असा वर दिला. भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते षष्टी व माघ शुद्ध प्रतिपदा ते षष्टीया कालावधीत येथे प्रमुख उत्सव होतो.

*

गणेश आरती, मंत्र, स्तोत्र

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झलके माळ मुक्ता फळांची
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ ध्रु ॥
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
चंदनाची उटी कुंमकुमकेशरा
हिरेजडित मुकूट शोभतो बरा
रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ १ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूतीँ
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जय देव जय देव ॥ २ ॥

गणपती अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्॥१॥
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि॥२॥
अव त्वं मां। अव वक्तारं।
अव श्रोतारं। अव दातारं।
अव धातारं। अवानुचानमव शिष्यं।
अव पश्चात्तात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्।
अव चोर्ध्वात्तात। अवाधरात्तात।
सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥३॥
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥४॥
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारि वाक्पदानि॥५॥
त्वं गुणत्रयातीत:। त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मुलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तवं
रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्॥६॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋध्दं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरुपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्चान्त्यरुपं। बिन्दुरुत्तररुपं।
नाद: संधानं। स हिता संधि:।
सैषा गणेशविद्या:। गणक ऋषि:।
निचृद्वायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:॥७॥
एकदंताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात्॥८॥
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:॥९॥
नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रमथपतये। नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:॥१०॥

फलश्रुति

एतदथर्वशीर्षं योऽधिते।
स ब्रह्मभूयाय कल्पते।
स सर्वत: सुखममेधते।
स सर्वविघ्नैर्नबाध्यते।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते॥
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।
सायंप्रात: प्रयुंजानो अपापो भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।
धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।
यो यदि मोहाद्दास्यति।
स पापीयान् भवति।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते
तं तमनेन साधयेत्॥११॥
अनेन गणपतिमभिषिंचति।
स वाग्मी भवति।
चतुर्थ्यामनश्नन् जपति।
स विद्यावान् भवति।
इत्यथर्वणवाक्यं।
ब्रह्माद्यावरणं विद्यात्।
न बिभेति कदाचनेति॥१२॥
यो दूर्वांकुरैर्यजति।
स वैश्रवणोपमो भवति।
यो लार्जैर्यजति स यशोवान् भवति।
स मेधावान् भवति।
यो मोदकसहस्त्रेण यजति।
स वाञ्छितफलमवाप्नोति।
य: साज्यसमिभ्दिर्यजति।
स सर्वं लभते स सर्वं लभते॥१३॥
अष्टौ ब्राह्मणान् समम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति।
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्ता सिध्दमंत्रो भवति।
महाविघ्नात्प्रमुच्यते।
महादोषात्प्रमुच्यते।
महापापात् प्रमुच्यते।
स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति।
य एवं वेद इत्युपनिषद्॥१४॥

————————–

श्रीगणपतीची अष्ठोत्तरशत नामावली

विघ्नेशाय नमः । विश्ववरदायानमः । विश्वचक्षुषे नमः । जगत्प्रभवे नमः । हिरण्यरुपाय नमः ।
सर्वात्मने नमः । ज्ञानरुपाय नमः । जगन्मयाय नमः । ऊर्ध्वरेतसे नमः । महाबाहवे नमः ।
अमेयाय नमः । अमितविक्रमाय नमः । वेदवेद्याय नमः । महाकालाय नमः । विद्यानिधेय नमः ।
अनामयाय नमः । सर्वज्ञाय नमः । सर्वगाय नमः । शांताय नमः । गजास्याय नमः ।
चित्तेश्वराय नमः । विगतज्वराय नमः । विश्वमूर्तये नमः । अमेयात्मने नमः । विश्वाधाराय नमः ।
सनातनाय नमः । सामगाय नमः । प्रियाय नमः । मंत्रिणे नमः । सत्वाधाराय नमः ।
सुराधीशाय नमः । समस्तसाक्षिणे नमः । निर्द्वंदाय नमः । निर्लोकाय नमः । अमोघविक्रमाय नमः ।
निर्मलाय नमः । पुण्याय नमः । कामदाय नमः । कांतिदाय नमः । कामरुपिणे नमः ।
कामपोषिजे नमः । कमलाक्षाय नमः । गजाननाय नमः । सुमुखाय नमः । शर्मदाय नमः ।
मूषकाधिपवाहनाय नमः । शुद्धाय नमः । दीर्ढतुंडाय नमः । श्रीपतये नमः । अनंताय नमः ।
मोहवर्जिताय नमः । वक्रतुंडाय नमः । शुर्पकर्णाय नमः । परमाय नमः । योगीशाय नमः ।
योगधेम्ने नमः । उमासुताय नमः । आपद्वंत्रे नमः । एकदंताय नमः । महाग्रीवाय नमः ।
शरण्याय नमः । सिद्धसेनाय नमः । सिद्धवेदाय नमः । करुणाय नमः। सिद्धाय नमः ।
भगवते नमः । अव्यग्राय नमः । विकटाय नमः । कपिलाय नमः । ढुंढीराजाय नमः ।
उग्राय नमः । भीमोदराय नमः । शुभाय नमः । गणाध्यक्षाय नमः । गणेशाय नमः ।
गणराध्याय नमः । गणनायकाय नमः । ज्योतिस्वरुपाय नमः । भूतात्मने नमः । धुम्रकेतवे नमः ।
अनुकूलाय नमः । कुमारगुरवे नमः । आनंदाय नमः । हेरंबाय नमः । वेदस्तुताय नमः ।
नागयज्ञोपवीतिने नमः । दुर्धर्षाय नमः । बालदूर्वांकुरप्रिताय नमः । भालचंद्राय नमः । विश्वधात्रे नमः ।
शिवपुत्राय नमः । विनायकाय नमः । लीलासेविताय नमः । पूर्णाय नमः । परमसुंदराय नमः ।
विध्नाधकाराय नमः । प्रथमपूजिताय नमः । दिव्यपादाब्जाय नमः । भक्तमंदराय नमः । शूरमहाय नमः ।
रत्नसिंहासनाय नमः । मणिकुंडमंडिताय नमः । भक्तकल्याणाय नमः । अमेयाय नमः । कल्याणगुरवे नमः सहस्त्रशीर्ष्णे नमः । महागणपतये नमः ।

याविभागातील काम सुरु आहे लवकरच पूर्णत्वाने भेटू


Comments are closed.