कोम्मीरवेली
खंडोबा आंध्र तेलंगाना प्रदेश्यात मल्लना, मल्लीकार्जुन स्वामी, या नावाने ओळखला जातो. आंध्रप्रदेशात मल्लनाची असंख्य मंदिरे आहेत. या मधील प्रसिद्ध असणारे मंदिर म्हणजेच कोम्मीरवेली येथील मल्लना मंदिर. कोम्मीरवेली हे ग्राम नाम कुमारस्वामी म्हणजेच स्कंध याचे नावा वरून पडले आहे अशी जनश्रुती आहे.
हे मंदिर तेलंगानातील वारंगल जिल्ह्यातील चेरीयाल तालुक्यात असुन हेद्राबाद पासुन सुमारे १०० किमी आहे. हेद्राबाद – सिद्धपेठ रस्त्यावरील कुकनुरपल्ली गावाचे पुढे दूददा चौक या ठिकाणावरून चेरीयाल कडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे १० किमी अंतरावर कोम्मीरवेली कडे जाणारे रस्त्यावर कमान लागते या कमानीतून पुढे ७ किमी अंतरावर कोम्मीरवेली गाव आहे. गाडी रस्ता मंदिरा जवळ पोहोचतो.
मंदिराचे आवाराचे पश्चिमद्वार भव्य असुन या महाद्वारावर गोपूर आहे. या द्वारातून आपण मंदिराचे आवारात पोहोचतो.
आवारात एका टेकडीस खेटून तीनमजली भव्य मंदिर आहे. येथील मुळस्थान एक छोट्या उंचीच्या टेकडीच्या कपारीत असुन या टेकडीला व कपारीस समावून पुढील बाजुस हे बांधकाम केले आहे.
मंदिराचे पश्चिमाभिमुख दरवाजाने प्रवेश केल्यावर आपण पायरी मार्ग चढून मुख्य मंदिराचे प्रवेश द्वारात जातो.
प्रवेशद्वारा पुढील गर्भगृह म्हणजे एक मोठी कपार आहे. या कपारीत समोर त्रिलिंग असुन मागे मल्लनाची चतुर्भज मुर्ती आहे. याचे आसना खाली तीन नरमुंड असुन ती मल्लनाने पृथ्वीवर हळद आणताना आडव्या आलेल्या दैत्याचा चिरडून वध केला होता त्यांची आहेत असे सांगतात. मल्लनाचे दोन्ही बाजुस बलज्जामेड्म्मा { लिंगायत स्त्री ] व गोल्लाकेताम्मा [ धनगर स्त्री ] या त्यांच्या दोन पत्नीच्या मुर्ती आहेत. मल्लना चा भक्त पापय्या ने या कपारीत जुने काळी तप केले होते त्याचे विनंती वरून देव येथे लिंग रूपाने प्रगटले अशी जनश्रुती आहे. पूर्वी हा परिसर निर्मनुष्य होता त्या मुळे रोज पुजा होत नसे फक्त उगादी पासुन दोन महिने उत्सवास लोक येत असत. उत्सवा नंतरच्या काळात एकदा या लिंगावर वारूळ तयार झाले. तेव्हा पापय्याचे वारसांनी त्या वारुळाची मल्लाना मुर्ती बनवली तीच ही मुर्ती आहे अशी लोकश्रद्धा आहे. हे मंदिर पंधराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या कपारीच्या बाहेर दक्षिण बाजुस रेणुकाचार्याचे मंदिर आहे.
गावामध्ये एक पुष्करणी असुन भाविक येथे स्नान करतात
येथे एक दगडी रथ असुन मल्लांना या रथातुन येथे आल्याचे लोक सांगतात
मंदिरामागील टेकडीवर रेणुकेचे मंदिर आहे.
येथून १ किमी वरील पोचमपल्ली गावात कोढपंचम्मा हिचे स्थान आहे.
यात्रा उत्सव – माघ कृष्ण १३ महाशिवरात्र रोजी यात्रा भरते.
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसास उगादी म्हणतात हा नववर्षाचा पहिला दिवस याचे अगोदर ८ दिवस भक्त विस्तवावरून चालतात. उगादी पासुन मोठी यात्रा भरते.