जेजुरी परिसरातील विविध मंदिरे, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांचे माहिती सह सचित्र दर्शन
साकुर्डे पांडेश्वर भुलेश्वर नाझरे वाल्हे मोरगाव सासवड पुरंदर वज्रगड सोनोरी शिवरी नारायणपूर केतकावळे वीर कानिफनाथ हरेश्वर चतुर्मुख पिंगोरी कोळविहिरे हरणी सोमेश्वर गुळुंचे टेकवडी आंबळे जवळार्जुन
शंकरेश्वर / रामेश्वर / बोंबलेश्वर ( साकुर्डे )
जेजुरीच्या पश्चिमेस ७ किमी अंतरावर असणाऱ्या साकुर्डे गावाचे दक्षिणेस असणाऱ्या डोंगर रांगा मधील दरीच्या परिसरास देवदरा या नावाने ओळखले जाते याच ठिकाणी ही मंदिरे आहेंत येथे गाडी रस्त्याने पोहचता येते. दरीच्या सुरवातीच्या टेकडीवर गणपती व बहिरव नाथाची छोटी मंदिरे आहेंत.पुढील दरीत शंकरेश्वराचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे या मंदिराचे मंडपाचे अवशेष दिसतात मंडपात नंदी असून गर्भगृह खोल आहे गर्भगृहात शंकरेश्वराचे लिंग आहे. मणि मल्लदेत्याचे छळास कंटाळून आलेल्या ऋषींनी याच ठिकाणी आश्रय घेतला होता व शंकरांनी कडेपठारी मार्तंड अवतार धारण केलेवर ऋषींचे विनंती वरून ते येथे आले होते अशी जनश्रुती आहे. या मंदिराचे पूर्वेस एक जलकुंड आहे यास तापशमन तीर्थ म्हणतात. ऋषींनी जेथे शंकरांचे पाय धुतले त्या ठिकाणी ते निर्माण झाल्याचे सांगतात. येथेच शेजारी बोंबलेश्वराचे शिवलिंग आहे. या ठिकाणी गणपतीने शंखनाद केल्याने यास बोंबलेश्वर असे म्हणतात. या लिंगाचे दर्शनाने पृथ्वी प्रदक्षणेचे पुण्य मिळते असे मानले जाते. येथील दक्षिणे कडील दरीत रामेश्वराची छोटीशी घुमटी व एक शिवलिंगाकृती विहीर आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांनी येथे वास्तव्य केले होते असे मानतात. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे वास्तव्य या ठिकाणी होते.
पांडेश्वर
जेजुरी पासून ८ किमी अंतरावरील पांडेश्वर या गावी कऱ्हा नदी काठी हे मंदिर आहे, जनश्रुती नुसार हे मंदिर पांडवानी बांधले म्हणून ते पांडवेश्वर काळाचे ओघात ते पांडेश्वर झाले . या मंदिराचे नावावरून हे गाव पांडेश्वर झाले कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह, अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरीने युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा व चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गिलाव्याचे काम ईस ११९६ मध्ये झालेचे येथील मंदिरातील गिलाव्यावरील लेखातून समजते. गर्भगृहात एका भव्य आसनावर एक भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवानी हे लिंग स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील कळसाचे व परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपतीची घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपाद आहेंत या मुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हटले जाते, येथेच पांडवानी पितृश्राद्ध केल्याचे ही सांगतात मुख मंदिरा मागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेच पार्वतीची ही प्रतिमा आहे. मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच
भुलेश्वर
जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील माळशिरस गावा पासून जवळच असणारे हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगा मधील भेलन डोंगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या डोंगरावर आहे. इतिहासा मध्ये ” किल्ले दौलत मंगल ” अशी याची ओळख आहे ईस १६३४ मध्ये मुरार जोगदेव यांनी येथे किल्ल्याचे काम केल्याचे संदर्भ सापडतात येथे गाडी रस्त्याने थेट मंदिरापर्यंत जाता येते, एका भव्य चौथर्यावर भव्य भुलेश्वराचे मंदिर आहे,मंदिरापुढील मंडप व नगारखाना ईस १७४० मध्ये पेशव्यांनी बांधला आहे. मंदिराची तटबंदीची बाह्य बाजू अठराव्या शतकातील वाटते. मंडपातून जिन्याने वर चढून गेले की मुख्य मंदिराचा आवार लागतो येथील शिल्पकलेचे सौन्दर्य मंत्र मुग्ध करणारे आहे. जनश्रुती हे मंदिर पांडवानी एका रात्री मध्ये बांधल्याचे सांगते पण या मंदिराचे काम ईस १२५० चे दरम्यान चोलवंशीय राजांनी केल्याचे जाणकार सांगतात, नंदी मंडप, चौरस मंडप, अंतराळ, नक्षत्राकृती गर्भगृह अशी या पूर्वाभिमुख मंदिराची रचना आहे, नंदीमंडपाचे स्तंभ व वरील भाग कलाकुसरीने युक्त असून यक्ष, प्राणी, देवताचे मूर्ती येथे दिसतात चौरस मंडपास तीनही बाजूने प्रवेशद्वार असून यांचेवर सुबक नक्षीकाम केलेले आहे प्रवेशद्वाराचे बाजूस युद्धशिल्प , गजशिल्प आहेंत. मंडपाचे आतील बाजुस छतावर यक्षमूर्ती, कीर्तिमुख,समुद्र मंथन, कोरलेले आहे. पुढे अंतराळ लागतो गर्भगृहाचे प्रवेशद्वार कलाकुसरीने युक्त आहे गर्भगृहात शिवलिंग आहे शिवलिंगामध्ये खोलात स्वयंभू रूपातील लिंग आहेत, मंदिराचे सभोवतालीच्या मंडपात अनेक देवकोष्ट आहेंत मुख्य मंदिराचे बाह्यअंगावर अनेक सोष्टव पूर्ण शिल्प दिसतात ही आज खंडित अवस्थेत आहेत तरीही त्यातील सौन्दर्य अप्रतिम आहे नर्तिका, दर्पणधारिणी, देवता अशी अनेक शिल्प यात आहेत. मंदिरावरील नक्षीकाम अवर्णनीय आहे. बाह्यमंडपाचे वरील बाजुस मातृका शिल्पपट आहेंत यात एंद्री,वाराही,महेश्वरी.विनायकी, वेष्णवी, अश्या अनेक मातृका दिसतात.मंदिर परिसरात सातवाहनकालीन पाण्याची टाकी आहेत, येथील अनाम शिल्पकारांची कला पाहण्यासाठी एकदा तरी आवर्जून येथे भेट दिली पाहिजेच.
नागेश्वर ( नाझरे )
जेजुरी पासून ९ किमी अंतरावर असलेल्या नाझरे गावी कऱ्हा नदी काठी हे पूर्वाभिमुख मंदिर नदीच्या पुर्व तटावर आहे. अलीकडे या मंदिराचे जिर्नोधारातून त्याला आधुनिक रूप मिळाले आहे, या ठिकाणी नाग तप करत होता व त्याने स्थापन केलेले शिवलींगम्हणून ते नागेश्वर मंदिराचे मागील बाजूस कऱ्हा नदी मध्ये सुंदर धबधबा आहे. नदीवरील मल्हार सागर धरण भरून वाहू लागल्यावर हा धबधबा पडू लागतो या धबधब्यामुळे नदीत तयार झालेल्या डोहास नागतीर्थ असे म्हणतात
महर्षी वाल्मिकी समाधी ( वाल्हे )
जेजुरी पासून १२ किमी अंतरावर वाल्हे या गावी हे समाधी मंदिर एका ओढ्या काठी आहे. पुरातनकाळी वाल्ह्या कोळी या ठिकाणी राहून वाटमारी करीत असे त्याचे नावा वरून या भागास वाल्हे असे नाव पडले. गावाचे उतरेस एका उंच डोंगरावर सात उंच खडक दिसतात हे वाल्ह्या कोळी याचे सात रांजण असल्याची जनश्रुती आहे. या वाल्ह्या कोळयास वाटमारी करताना नारदांचा अनुग्रह झाला व त्याचा वाल्मिकी झाला याच वाल्मिकीने पुढे रामायण हे महाकाव्य लिहिले व ते महर्षी वाल्मिकी ऋषी झाले अश्या या महर्षी वाल्मिकीचे हे समाधी स्थळ. येथे भाद्रपद शुद्ध पंचमीस म्हणजे ऋषी पंचमीला मोठी यात्रा भरते
मयूरेश्वर ( मोरगाव )
जेजुरी पासून मोरगाव १७ किमी अंतरावर आहे. अष्टविनायकातील प्रथम गणपती म्हणजे मोरगावचा मयूरेश्वर होय. ब्रम्हा, विष्णू , महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी या गणरायाची स्थापना केले असे मानले जाते. त्रेतायुगात पृथ्वीवर सिंदुरासूर राक्षसाने सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा पार्वतीने मातीचा गणपती करून त्याची आराधना सुरु केली व भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीने जन्म घेतला त्या नंतर गणपतीने मोरावर स्वार होऊन सिंदुरासूर राक्षसाचा वध केला त्याचे मयूर वाहनामुळे त्याला मयूरेश्वर हे नाव मिळाले. येथील मयूरेश्वर मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात झाली असल्याचे सांगितले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे दहा दिवस मोरगाव येथे यात्रा असते, या दिवसात भाविकांना गर्भगृहात प्रवेश मिळतो.
सासवड
सासवड जेजुरी पासुन १७ किमी अंतरावर असुन पुरंदर तालुकाचे मुख्यालय आहे, या शहराला सांस्कृतिक, ऐतिहासिक , धार्मिक वारसा लाभलेला आहे. संत नामदेवांनी सोपानदेव समाधी वर लिहिलेल्या अभंगात या गावाचा उल्लेख सवंत्सर असा केलेला आहे. जुन्याकाळी या ठिकाणी सहा वाड्या होत्या वरखेडवाडी, सरडी, सदतेहे, सवंत्सर, दाणे पिपळगाव, सनवडी या वाड्याचे स्वरूप एकत्र होऊन या पासुन सासवड हे गाव अस्तित्वात आले असे मानले जाते, ही नगरी कर्हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर उत्तर बाजुस वसली आहे. या गावास शिवकाळात संपूर्ण कोट होता, मोगली आक्रमणांच्या काळात त्याची नासधूस झाली, छत्रपती शाहूमहाराज यांचे काळात या कोटाचा उपयोग दमाजी थोरात यांनी पुरंदर किल्ल्यास शह देण्यासाठी केला, या बंडाचा बीमोड झाल्यानंतर या कोटाचा उपयोग पुरंदर किल्ल्यास शह देण्यास पुन्हा होऊ नये या साठी हा कोट मुद्यामच जमीनदोस्त करुन नामशेष करुन टाकला गेला . पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचाही वाडा या ठिकाणी होता, काळाचे ओघात तो नष्ट झाला. सासवड मध्ये श्री संगमेश्वर , वटेश्वर , सिध्देश्वर, कर्हामाई ही मंदिरे सरदार पुरंदरे, कुंजीर यांचे वाडे संत सोपानदेव महाराज, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ , सरसेनापती वीर बाजी पासलकर, गोदाजीराजे जगताप यांची समाधी स्थाने आहेत हे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांचे जन्मगांव महात्मा गांधीचे शिष्य शंकरराव देव, प्रेमलता कंटक यांनी स्थापना केलेला कस्तुरबा आश्रम अशी अनेक प्रेक्षणीय, ऐतिहासिक,धार्मिक ठिकाणे येथे आहेत.
संत सोपान देव संजीवन समाधी मंदिर
येथील चरणावती नदी काठी हे मंदिर आहे, मंदिरास पुर्वाभिमुख भव्य कोट असुन पायऱ्या चढून कोटात प्रवेश करता येतो, समोरच पूर्वाभिमुख पुरातन शिव मंदिर असुन
या मंदिराचे मागील बाजुस संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर आहे, पूर्वाभिमुख मंदिराची रचना वीणामंडप, मंडप व गर्भ गृह अशी आहे,
वीणामंडप लाकडी असुन या वर पत्र्याचे छत आहे, मंडपाचे लाकडी खांब नक्षीने युक्त आहेत, या मंडपात हनुमानाची प्रतिमा आहे, येथे अखंड वीणा वादन केले जाते, या मंडपातून मंदिराची मुख्य दगडी मंडपात जाता येते.
या मंडपात गर्भगृहाचे दरवाज्याचे दोन्ही बाजुस देवड्या असुन दक्षिणे कडील देवडीत राम लक्ष्मन सीता यांचे मुर्ती असुन उत्तरे कडील देवडीत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्ती आहेत,
मंदिराचे गर्भ गृहात संत सोपानदेवांची संजीवन समाधी असुन समाधी मागील कोनाड्यात कृष्ण मुर्ती आहे.
संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली,
समाधी मंदिराचे मागील बाजुस दत्त मंदिर आहे.
समाधी मंदिराचे उत्तर बाजुस एका चिंचेच्या वृक्षा खाली एक दगडी चोथारा असुन या ठिकाणा हून संत सोपान देवांनी आपल्या समाधीत समाधिस्त होण्यासाठी प्रवेश केला
या मंदिरात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत येथे यात्रा भरते,
आषाढी वारी साठी संत सोपानदेवांचा पालखी सोहळा येथून प्रस्थान करतो
संगमेश्वर मंदिर
कऱ्हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर संगमाचे पश्चिम तटावर बांधलेले हे पूर्वाभिमुख शिवमंदिर नदी संगमावर असलेला हा संगमेश्वर, नदी संगमावर बांधलेल्या भव्य दगडी घटावर हे देखणे मंदिर आहे मंदिराचे उत्तर पुर्व बाजुस असलेल्या लोखंडी पुला वरून मंदिराचे घाटावर जाता येते. हे पेशवेकालीन मंदिर त्याकाळच्या मंदिर निर्माण कलेचे एक आदर्श उदहरण आहे, घाटावरील विशाल दगडी पायरी मार्गाने या मंदिराचे आवारात पोहचता येते मुखमंडप, मंडप, गर्भगृह अशी पुर्वभिमुख दगडी मंदिराची रचना असुन मुखमंडप ३० दगडी खांबांवर आधारलेला आहे, याच मंडपात एक सुंदर दगडी नंदी प्रतिमा आहे.
मंदिराचा मंडप सुबक दगडी बांधणीचा आहे, मंडपात डाव्या बाजुस गणपती व दक्षिण बाजूस मारुतीची मूर्ती आहे मंडपास उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार आहेत, मंडपाचे मध्यभागी कासव कोरलेले आहे. येथील खांबावर जय विजय यांचे प्रतिमा आहेत. मंडपातील गर्भगृहाचा दरवाजा कलाकुसरीने नटलेला आहे.
गर्भगृहाचे प्रवेशदारातून गर्भ गृहात गेल्यावर समोरच संगमेश्वरचे शिवलिंगा चे दर्शन होते.
मंदिराचे बाह्य अंग दगडावरील नक्षीकामाने नटलेले आहे. मंदिराचे दक्षिण बाजुच्या घाटावर खडकेश्वर मंदीर व आणखी काही छोटी मंदिरे आहेत. मंदिराचे मागील दक्षिण व उत्तर बाजुस दोन शिव मंदिरे आहेत. दक्षिण बाजुस वृंदावन व काही बांधकाम आहे.
या मंदिरा समोरील पुलावरून या मंदिराचे विलोभनीय दर्शन होते. त्रिपुरी पौर्णिमा व दीपावलीत येथे रात्री दिपोस्तव साजरा होतो.
कर्हामाई मंदिर
संगमेश्वर मंदिराचे पुर्व बाजुस कऱ्हा नदीचे उत्तर बाजुस हे मंदिर आहे पुरंदरची जीवन रेखा असलेल्या कर्हा नदीचे हे प्रतीकात्मक मंदिर मंदिराचे आवाराचे बांधकाम एका वाड्या प्रमाणे देऊळ वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस असुन , या दरवाज्यातून आत गेल्यावर प्रशस्त आवार लागते यात पश्चिम बाजुस लाकडी मंडप असुन मंडपात पश्चिम बाजुस एका चोथर्यावर रका देवडीत कर्हामाईची मुर्ती आहे, वनवासात असताना पांडवानी पांडेश्वर येथे शिवलिंग स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची व चरणावती नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. चरणावती नदी येथील संगमावर कऱ्हा नदीस मिळते व येथून पुढे वाहते
पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ समाधी
कर्हामाई मंदिराचे दक्षिण बाजुस कर्हा तीरावर ही समाधी असुन समाधी परिसरात छोटासा बगीचा आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे मुळचे कोकणातील त्यांचा जन्म अंदाजे ईस १६६० मधील , १६८९ पासुन ते स्वराजाचे सेवेत होते, छत्रपती राजाराम जिंजीवरून परत आल्यावर बाळाजी पुण्याचे सर सुभेदार झाले, त्यावेळे पासुन त्यांचे वास्तव्य सासवडला होते, सासवड येथे त्यांनी वाडा बांधला होता राजारामाचे मृत्यु नंतर राणी ताराबाई व धनाजी जाधव यांचे नेतृत्वा खाली ते कार्यरत होते. औरंगजेबाचे मृत्यू नंतर शाहू महाराज मोघलांचे कैदेतून मुक्त झाले. धनाजी जाधव शाहुना मिळाले त्यांचे बरोबर बाळाजी शाहुना मिळाले. बाळाजीनी अनेक मराठा सरदाराना शाहून कडे वळवून त्यांची शक्ती वाढवली. व ते शाहूंचे विश्वासू झाले. कर्तबगार बाळाजी वर विश्वास टाकून शाहूराजांनी त्यांना १७ नोव्हे १७१३ रोजी ” पेशवे” ( पंतप्रधान ) पद दिले. बंडखोरी मोडून शाहूंचा अंमल प्रस्थापित करणे, कान्होजी आंग्रे ना शाहू गोटात आणणे, शाहूंच्या परिवाराची मोगलान कडून सुटका, स्वराजाच्या सनदा आणणे अशी अनेक कामे त्यांनी केली मराठा सरदारांची एकी करून त्यांनी सत्ता विस्ताराचा पाया रोवला. २ एप्रिल १७२० मध्ये सासवड येथे त्यांचे निधन झाले.
गोदाजीराजे जगताप समाधी
संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख छोटीशी घुमटी आहे , ही गोदाजीराजे जगताप यांची समाधी, गोदाजी जगताप हे छत्रपती शिवाजीचे बालमित्र स्वराज उभारणीत त्यांनी शिवरायांना मोलाची साथ दिली, तोरण्याचा विजय व स्वराज्याचे पुरंदर किल्ल्या वरून लढलेले स्वराजाचे पहिले समर यात त्यांचे योगदान होते गोदाजीचा संपूर्ण इतिहास आजही प्रकाशात आलेला नाही. ईस १६४९ मध्ये स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर वरून लढली गेली, विजापूरचे सैन्य शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पुरंदर कडे निघाले , या सैन्याने खळद बेलसर जवळ छावणी टाकली होती फतेखानाने पुरंदर साठी नेट लावला होता, बाळाजी हैबत याने शिरवळचा कोट जिंकून पुरंदरला शह दिला होता. शिवाजी महाराजांनी कावजी मल्हार यास शिरवळ चे कामगिरीवर पाठवले यात गोद्जी सोबत होते व ही मोहीम फत्ते झाली. पुरंदर वरील सैन्याने बेलसर मधील छावणीवर अचानक छापा मारला. त्यामुळे मुसेखानाचे सैन्य पुरंदरवर चालून आले. येथील लढाईत मुसेखान व गोदाजी जगताप यांची गाठ पडली, तुबळ लढाईत गोदाजीने मुसेखानाला उभे चिरले हे पाहून विजापूर सैन्य पळून गेले. या गोदाजीचे पराक्रमाचा उल्लेख इतिहासात आढळतो गोदाजीचा मृत्यु केव्हा झाला हे आज तरी माहित नाही, या पराक्रमी वीराची ही समाधी
वीर बाजी पासलकर समाधी
सासवड शहरातील नेहरू चौकात ही समाधी आहे. बाजी हे मावळातील वजनदार योद्धे त्यांनी मावळातून स्वराज स्थापणे साठी मोठी रसद उभी केली, ईस १६४९ मध्ये फतेखानाचे छावणीवर खळद बेलसर परिसरात अचानक हल्ला केला. या वेळी च्या लढाईत बाजींना वीरमरण आले स्वराजाच्या यज्ञकुंडात आत्मआहुती देणारे बाजी पासलकर हे जेष्ट नामाकीत होत.
चांगा वटेश्वर मंदिर
संगमेश्वर मंदिराचे दक्षिण दिशेस सासवड – नारायणपूर रस्त्याचे थोडेसे बाजुला कऱ्हा काठावर असणारे हे सुंदर दगडी मंदिर, जुन्याकाळी हे मंदिर नीलकंठ या नावाने ओळखले जात होते, या परिसरात मोठे पुरातन अनेक वटवृक्ष आहेत या कारणाने या मंदिरास वटेश्वर हे नाव पुढे मिळाले असावे , जुन्याकाळी हा परिसर सिद्धसाधकांची तपोभूमी होता १४०० वर्ष जगले अशी जनश्रुती असलेले सिद्धयोगी चांगदेव यांनी येथे वास केल्याचे मानले जाते, चांगदेव लहान असताना त्यांचे आई-वडील लहानपणी निवर्तल्याने त्यांचे बालपण वटेश्वराचे सानिध्यात गेले, त्यांनी येथे तपाचरण केली या मुळे हे मंदिर चांगा वटेश्वर मंदिर या नावाने ही प्रसिद्ध आहे.
कऱ्हा नदी वरील छोटा पूल पार करून पायऱ्या चढून मंदिरचे कोटाचे प्रवेशद्वारात पोहचता येते, मंदिराचा कोट दगडी बांधकामाचा आहे ,
मंदिराचे प्राकारात वटेश्वराचे पूर्वाभिमुख दगडी मंदिर आहे मंदिराची रचना मुखमंडप, मंडप, गर्भगृह, अशी आहे मुख मंडपात प्रवेश करण्यासाठी पूर्वा, उत्तर, दक्षिण बाजुंनी पायऱ्या आहेत, मंडपाचे दगडी खांबानवर विविध पुष्प, प्राणी, नर्तिका, युगल यांची शिल्प कोरलेली आहेत. या मंडपा मध्ये सुंदर कलाकुसरीने नटलेली मोठी नंदी प्रतिमा आहे या मंडपातील पश्चिम द्वारातून मंदिराचे मंडपात जाता येते
मंदिराचा मंडप सहा खांबावर आधारलेला असुन या खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे या मंडपास ही उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार आहेत. या मंडपाचे पुढे पश्चिमेस अंतराळ असुन पुढे गर्भगृह लागते, गर्भागृहाचे दरवाजा कोरीव कामाने नटलेला आहे
गर्भ गृहाचे दरवाज्यातून आत गेल्यावर समोर वटेश्वराचे शिवलिंग आहे , शिवलिंग मागे पश्चिम बाजुस एका कोनाड्यात संगमरवरी गणपतीची मुर्ती आहे.
मंदिराचे सभोवताली ओवऱ्या असुन कऱ्हा तीरावर घाट बांधलेला आहे, पेशवे काळात सखाराम बापू बोकील यांनी हा घाट बांधला व मंदिराचा जिर्णोधार केल्याचे सांगितले जाते ,
सिद्धेश्वर मंदिर
सासवड पासुन २ किमी अंतरावर कऱ्हा नदीस पुरंदर किल्ला केदारेश्वर येथून वाहणारा केदारगंगा ओढा जिथे मिळतो, त्या संगमा जवळ हे पूर्वाभिमुख मंदिर नदीच्या पश्चिम काठावर आहे, सासवड पाणी पुरवठ्याचे पंपिंग स्टेशन जवळून असणाऱ्या लोखंडी पुलावरून कऱ्हा नदी ओलांडून या मंदिराकडे जाता येते, मंदिरा समोर कऱ्हा नदी काठी छोटासा घाट असुन मंदिरासमोर एका मेघडंबरी मध्ये नंदी प्रतिमा आहे येथील अवशेषा वरून जुन्याकाळी या मंदिरास कोट असावा असे वाटते,
पूर्वाभिमुख दगडी मंदिराची रचना मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे, नंदी पुढील पुर्वद्वारा शिवाय मंडपास उत्तर व दक्षिण बाजूनेही प्रवेशद्वार आहेत मंडपात पश्चिम बाजुस गर्भगृहाचे प्रवेशद्वाराचे शेजारील भिंतीत दोन देवड्या असुन दक्षिण बाजूचे देवडीत गणेश प्रतिमा आहे तर उत्तर बाजूचे देवडीत विष्णू प्रतिमा आहे, मंडपाचे पुढे छोटेसे अंतराळ असे त्यापुढे नक्षीकामाने नटलेले गर्भगृहाचे प्रवेश द्वार आहे
गर्भगृहाचे प्रवेश द्वारातून पायरी उतरून गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात मध्यभागी सिद्धेश्वराचे शिवलिंग असुन लिंगा मागील पश्चिम बाजुस कोनाड्यात पार्वतीची मुर्ती आहे
या मंदिराचे बांधकामावरून हे पेशवे कालीन असावे असे वाटते, नितांत सुंदर रमणीय शांत परिसर असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच.
पुरंदरे वाडा
पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ याचे दिवाण अबजीपंत पुरंदरे यांनी हा वाडा ईस १७१० मध्ये बांधला, याच वाड्याचे बाधकाम करणाऱ्या कलाकारांनी पुढे ईस १७३० मध्ये पुण्याचे शनिवार वाड्याचे बांधकाम केले. या वाड्याची तटबंदी सुमारे ८० फूट उंचीची असुन प्रवेशद्वार सुमारे २० फूट उंचीचे आहे, वाड्यामधील लाकडी बांधकाम अजून उभे आहे, सासवड मधील बाळाजी विश्वनाथ पेशवे, अनेकांचे वाडे नष्ट झाले असुन पुरंदरे वाडा आपल्या गतस्मृती सांभाळत आजही उभा आहे.
पुरंदर किल्ला
जेजुरी पासून ३३ किमी अंतरावर असणारा पुरंदर किल्ला स्वराज्याचे प्रमुख शिलेदारा पेंकी एक, हा किल्ला समुद्र सपाटी पासुन १३८५ मीटर उंचीवर असून. ईस अकराव्या शतका पासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे संदर्भ मिळतात, यादव, निजाम, बहामनी,यांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या. पहिल्या आदिलशहा कडे असणारा हा किल्ला येथील किल्लेदाराचे मृत्यु ने निर्माण झालेल्या वारसांचे वादात मध्यस्ती करून त्यांना आपल्या सेवेत सामावत शिवरायांनी या किल्ला स्वराज्यात आणला. स्वराज्याचे सुरवातीचे मनसुभे याच गडावर घडले. दिलेरखानाने पुरंदरला दिलेल्या वेढ्यात त्याचे अमिष नाकारून स्वराज्यासाठी आपली आहुती देणाऱ्या मुरारबाजी च्या रणयज्ञाचा हा साक्षीदार शौर्याची स्पुर्ती जागवित उभा आहे,
गाडी मार्ग थेट किल्ल्याचे प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचलेला आहे . नारायण पेठ या पायथ्याच्या गावातून पायवाटेने ही सर दरवाज्या मधून किल्यावर पोहचता येते. पुरंदरच्या पुरंदर माचीवर हे दोन्ही रस्ते पोहचतात. किल्याचे सर दरवाज्या कडील तटबंदी काहीशी सुस्थितीत असुन दक्षिण बाजुच्या महाकाळ माची व बावची माची यांची तटबंदी काळाचे ओघात नष्ट झाली आहे.
पुरंदर माचीवर पश्चिमेस पद्मावती तलाव व पूर्वेस राजळे तलाव आहेत
याच माचीवर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला असुन
बहिरव खिंडी जवळ शिवरायाचा पुतळा आहे याच भगत पूर्वी बहिरव दरवाजा होता.
माचीवर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे हा किल्ल्याचा अधिपती देव या मंदिरास छोटासा कोट असुन मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे मंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात पुरंदरेश्वर शिवलिंग व मागील बाजुस पार्वतीची मुर्ती आहे. या मंदिरा शेजारी बांधीव सुंदर आड आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला होता.
या मंदिराचे पश्चिमेस रामेश्वराचे पेशवे कालीन मंदिर आहे. किल्ल्यास जुन्याकाळी पाच दरवाजे असल्याचे सांगतात पण आज फक्त सर दरवाज्याच अस्तित्वात आहे.
पुरंदरेश्वर मंदिराचे शेजारील चढणीच्या पायवाटेने व काही पायऱ्या चढून बालेकिल्याचे बिन्नी दरवाज्यात पोहचता येते. या दरवाज्याचे बाहेरील बाजुस हनुमान व लक्ष्मिआई याची स्थापना केलेली आहे. या दरवाज्या पुढे दोन दरवाजे लागतात . बिन्नी दरवाज्यातून कंदकड्यावर पोहोचतो या कड्यावर पाण्याचे टाके असुन जवळच विरुद्ध बाजुस तटाला चोर दरवाजा आहे.
बिन्नी दरवाज्यापुढे काही पायऱ्या चढल्यावर गणेश दरवाजा आहे. याचे डावे बाजुस कोनाड्यात गणेश मुर्ती आहे
याचे पुढे एक उत्तराभिमुख दरवाजा लागतो यास निशाण दरवाज्या म्हणतात याचे शेजारी निशाण बुरुज असुन त्यावर निशाण लावण्याचे जागा आहे.
येथील तटबंदी ला शेंद्र्या बुरुज असुन ईस १३८० दरम्यान या बुरुजाचे काम करताना सारखे ढासळत होते .तेव्हा बिदरचा बादशहा महमूद याचे आदेशाने नाथनाक व देवकाई या नवविवाहित दाम्पत्यास जिवंत गाडून हा बुरुज उभारण्यात आला. आजही हा बुरुंज ही करून कहाणी सांगत उभा आहे.
याच्यापुढे साखरी तलाव असुन पुढे हत्ती च्या मस्तका प्रमाणे प्रमाणे बांधलेला तिहेरी हत्ती बुरुज आहे त्याचे नैरुत्य दिशेस कोकण्या बुरुज आहे.
केदार टेकडीचे दक्षिण बाजुस केदार दरवाज्या आहे केदार दरवाज्या व बिन्नी दरवाज्या याचे मध्ये सरळ असलेली तटबंदी आता नष्ट झाली आहे . केदार दरवाजा हा संकट काळी रसद पुरविणारा व बचावासाठी उपयोगी दरवाजा
निशाण दरवाजा ओलांडून आत गेले की समोर दिसणाऱ्या टेकडीस राजगादी म्हणतात या टेकडी वर काही पाण्याची टाकी, व अनेक जुन्या इमारतींचे भग्न अवशेष असुन या ठिकाणी पूर्वी अनेक महत्वाचे वाडे होते . केदार टेकडी कडील उत्तरावर दारूगोळ्याचे कोठाराचे भग्न अवशेष आहेत.
राजगादीचे पश्चिमेस केदार टेकडीची चढण काही अंतरावर सुरु होते.मंदिराचे टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ७० बांधीव पायरीचा मार्ग आहे. केदार टेकडी किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. येथील अतिशय छोट्या पठारावर केदारेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे तिचे पुढील बाजुस चोथरे व एक दीपमाळ आहे. गर्भगृहात केदारेश्वराचे शिवलिंग असुन मागील बाजुस इंद्र मुर्ती आहे. या किल्ल्याचे पुरंदर हे नाव इंद्राचेच एक नाव आहे. या मंदिरापासून केदारगंगा उगम पावते व सासवड जवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ कर्हा नदीस मिळते.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले.
या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.
ईस १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.
ईस १३८० बहामनी राज्या कडून किल्ला दुरुस्ती शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी
ईस १४८६ अहमदनगर निजामशाही चे किल्ल्यावर राज्य
ईस १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला.
ईस १६२९ किल्ला आदिलशाही कडे
ईस १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू, त्याचे मुलां मधील वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर, स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच,
ईस १६४८ पहिली लढाई याच किल्या वरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला,
१४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
५ सप्टे १६ राणी सईबाई यांचे निधन, कापूरहोळ च्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजीना वाढविले.
ईस १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.
३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा
१४ एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.
एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडे चे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६, महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.
१३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह किल्ला मोघलांचे ताब्यात
८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.
ईस १६८९ किल्ला मोघला कडे औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले
ईस १६९१ किल्ला स्वराज्यात परत
ईस १७०५ किल्ला मोघला कडे
ईस १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मोघलांकडून परत मिळवला
ईस १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य
ईस १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.
ईस १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.
ईस १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकर्याचे बंड मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारीनी हल्ला गडावर कब्जा.
ईस १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४ सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा कारभार गडावरून.
ईस १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात
ईस १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली, तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.
१९ एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण
ईस १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली
वज्रगड
वज्रगड अथवा रुद्रमाळ हा पुरंदरचा जुळा किल्ला हा समुद्र सपाटी पासून १३४८ मीटर उंचीवर आहे पुरंदर व वज्रगड यांचे मध्ये भैरव खिंड आहे. पुरंदरच्या माचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील रस्त्याने वज्रगडावर पोहचता येते, पायथ्याचे भिवडी गावा जवळील रडतोंडीच्या घाटाने पाउल वाटेने येथे पोहचता येते.
दोन्ही रस्त्याने चढून आल्यावर खडकात खोदलेल्या व बाजुला तट असलेल्या पायरी मार्गाने
वज्रगडाचे महाद्वारात पोहचता येते. महाद्वारा पुढे अजून एक दरवाजा लागतो.
या दरवाज्यातून आत गेल्यावर खडकाचे प्रचंड सुळके दिसतात या उंच कातळांचा उपयोग प्रस्तरारोहण प्रशिक्षणा साठी केला जातो. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्याचे घेर्यास तटबंदी असुन टिळा ५ बुरुज आहेत.
तटबंदी मधील एका भग्न छोट्या दरवाजा तून उतरून किल्ल्याचे माचीवर जाता येते.
या माचीवर एक तीन भागात खोदलेले तळे असुन
याचे काठावर मारुती मंदिर असुन
रुद्रेश्वर शिव मंदिर आहे या रुद्रेश्वरा वरून या किल्ल्या रुद्रमाळ हे नाव मिळाले. हा या किल्ल्याचा अधिपती देव, पुरंदर हे इंद्राचे नाव आहे व इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून पुरंदर शेजारी असलेला किल्ला म्हणून त्याला वज्रगड हे नावही प्राप्त झाले आहे. या मंदिरांचे पुढे काही अंतरावर पडलेले अवशेष आहेत या ठिकाणी काही काळ आद्यक्रांतिवीर उमाजी नाइक यांचे वास्तव्य होते. किल्ल्याचे वायव्ये कडील बुरजास जोडणारी एक डोंगराची उतरणारी डोंगराची सोंड आहे.या सोंडेच्या वरील तिसर्या टप्प्यावर उत्तानदेवाचे स्थान आहे. सोंडेच्या पायथ्याला कपिलेश्वर शिवस्थान आहे या वरून या सोंडेस कपिलधार असे म्हणतात.
वज्रगडाचे बांधकामा विषयी निश्चीत माहिती उपलब्ध नाही. पण शिवपूर्व काळापासून त्याचे उल्लेख आढळतात ईस १६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला व पुरंदर मिळविण्यासाठी त्याने प्रथम वज्रगड घेण्याचा प्रयत्न सुरु केला. वज्रगडाचे कपिलधारे वरून सेन्यासह तीन तोफा चढविण्यास सुरवात केली, गडा वरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या. वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु, व बाबाजी बुवाजी प्रभु. यांनी गड राखण्यासाठी निकराची झुंज दिली ३० मार्च १६६५ ते १४ एप्रिल १६६५ त्यांनी किल्ला ३०० मावळ्यांचे साह्याने लढविला. तोफांचे मार्याने किल्ल्याचा वायव्य बुरुंज ढासळला, व वज्रगड मोघ्लांचे ताब्यात गेला.
पुरंदर व वज्रगडा वरील पुष्प वैभव
राम रावण यांच्या लंके मधील युद्धात मुर्चित पडलेल्या लक्ष्मणाला सावध करण्यासाठी लागणारी संजीवनी वनस्पती साठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेला या पर्वतातील भाग म्हणजे हा इंद्रनील पर्वत, इंद्रनील म्हणजेच पुरंदर असे वर्णन संत नामदेवांनी केलेले आहे. पुरंदर – वज्रगड येथील ओषधी वनस्पती व पुष्प वैभवासाठी प्रसिद्ध आहे.
पुरंदरचे भोगोलिक स्थान त्याची उंची, माती ,पावसाचे प्रमाण यामुळे हवामानाची वेगळी देण या पर्वतास लाभली आहे , पुरंदर वज्रगडाचे डोंगर माथे पावसाळ्या मध्ये गवताने झाकलेले असतात, या डोंगर माथ्यावर मोठो झाडे झुडपे वाढू शकत नाहीत त्यामुळे जास्त पावसात मोठ्या उंचीवर वाढणाऱ्या खुरट्या वनस्पतींची जैवविविधता येथे आढळते. सह्याद्री मधील कळसुबाई, हिमालयातील काही भाग व अफगाणीस्तान, दक्षिणेतील अण्णामलाई येथील भागात आढळणाऱ्या काही वनस्पती येथे आढळतात. तर काही दुर्मिळ वनस्पती याच किल्ल्यावर आढळतात
ईस १९४५ मध्ये इंग्रज प्रशिक्षक फादर संतापो यांनी आपल्या पुरंदर येथील वास्तव्यात येथील वनस्पती व फुलांचा अभ्यास केला त्यांनी आपल्या ‘फ्लोरा ऑफ पुरंदर’ या पुस्तकात येथील सुमारे ६०० वन्य वनस्पतींची नोंद केली आहे. पावसाला सुरु झाल्यावर येथील पुष्प वैभव आकारू लागते ऑगष्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात हा परिसर आपल्या पुष्प वैभवाने नटू लागतो. प्रत्येक महिन्यात वेगळेच पुष्प वैभव जन्म घेते, अगदी मार्च महिन्यात सुद्धा येथील काही फुले फुलतात. या पुष्प वैभवाची ही छोटीशी झलक
मल्हारगड
जेजुरी पासून २३ किमी असणारा हा किल्ला किल्ल्याचे पायथ्याशी असणारे सोनोरी गावा मुळे सोनोरीचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. पेशव्यांचे तोपखाना प्रमुख पानसेचे सोनोरी हे इनाम गाव या गावात त्यांचा भुईकोट किल्ला आहे. याच पानसे परिवारातील भिवराव व कृष्णाजी पानसे यांनी ईस १७५७ ते ६० चे दरम्यान हा किल्ला बांधला व आपले कुलदेवत असणारे खंडोबाचे नावावरून या गडास मल्हारगड असे नाव दिले. ऐतिहासात बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. गडावर बांधकाम सुस्थितीत असून खंडोबा व महादेव यांची छोटी मंदिरे आहेत खंडोबा मंदिरात खंडोबाची अश्वरूढ दगडी मूर्ती आहे
यमाई देवी ( शिवरी )
जेजुरी पासुन ७ किमी असलेले शिवरी गावाचे फाट्या वर हे यमाई देवीचे मंदिर आहे, एका बंदिस्थ प्राकारात पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे.गर्भ गृहात देवीचा तांदळा व महिषासुर मर्दिनी यमाईची मूर्ती आहे, सातारा जिल्ह्यामधील औध येथील यमाई एका भक्ताचे भक्तीने येथे आल्याचे सांगितले जाते.
नारायणेश्वर (नारायणपूर)
जेजुरी पासून ३० किमी वर पुरंदर किल्ल्याचे पायथ्याशी असणारे गाव पूर्वी पुरंदर किल्ल्याची बाजारपेठ होते, या ठिकाणी सुमारे अकराव्या शतकातील हे नारायणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दगडी कालाकुसरीने युक्त असणारे हे मंदिर एका उधवस्त दगडी प्राकारात असून मंदिरातील दगडी खांब कोरीव असून गर्भगृहाचा दरवाजा नक्षीकामाने युक्त आहे. गर्भगृहात शिवलिंगाचे योनी मध्ये खोलात लिंग आहेत. मंदिराचे जवळ इंद्रायणी कुडा आहे.
मंदिराचे जवळ अलीकडे बांधलेले एक मुखी दत्ताचे मंदिर असून येथे गुरुवारी व दत्तजयंती सोहळ्यास मोठी यात्रा भरते.
प्रती बालाजी मंदिर (केतकवळे)
जेजुरी पासून ३५ किमी अंतरावरील केतकवळे गावी अलीकडे राव यांचे धर्मादाय संस्थेने हे मंदिर उभारले आहे तिरुपती बालाजी मंदिराची ही देखणी प्रतिकृती असून तिरुपती मंदिरा प्रमाणेच येथील धार्मिक दिनक्रम असतो , रात्रीच्या वेळी रोषनाईने उजळलेले मंदिर अतिशय सुंदर दिसते
श्रीनाथ म्हस्कोबा (वीर)
जेजुरी पासून ४५ किमी अंतरावर असणारे वीर गावी हे मंदिर आहे. एका दगडी बांधकाम असणारे भव्य प्राकारात हे भव्य मंदिर आहे पूर्वाभिमुख मंदिराची सदर, मंडप , गर्भगृह अशी रचना असून गर्भगृहात श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत या वारुळा पासून तयार झालेची लोकश्रद्धा आहे. श्रीनाथ हे काशी अथवा सोनारी चे काळबहिरव असून ते कमळोजी नामक भक्तामुळे या ठिकाणी वास्त्यव्यास आल्याचे सांगितले जाते हा देव स्मशान भूमीत प्रगट झालेने यास म्हस्कोबा असेही म्हणतात. माघ पौर्णिमा ते वद्य दशमी पर्यंत येथे दहा दिवस यात्रा भरते. माघ पौर्णिमेस रात्री बारा वाजता पालख्यांची मिरवणूक निघते व पहाटे २.३० ला देवाचे लग्न लागते. वद्य पंचमी पासून भाकणूक ( भविष्य वाणी) सुरु होते,वद्य दशमीस दुपारनंतर गुलालाचा रंग करून भाविकावर शिपला जातो याला मारामारी म्हणतात. प्रसाद घेऊन या यात्रे चा समारोप होतो.
कानिफनाथ (बोपगाव)
जेजुरी पासून २५ किमी अंतरावरील बोपगाव पासून ५ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून ९६० मीटर उंचीवर असणारे टेकडीवर हे कानिफनाथ मंदिर आहे. गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते.पूर्वाभिमुख असणाऱ्या मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंदिरातून गर्भगृहात जाण्यासाठी एक लहान कोनाडा असून या कोनाड्यातून झोपून सरपटत गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात कानिफनाथांची समाधी आहे. कानिफनाथ हे नवनाथा मधील एक नाथ यांचा जन्म हत्तीच्या कानातून जाहला म्हणून यांना कानिफनाथ असे म्हणतात अशी जनश्रुती आहे.
चतुर्मुख ( गराडे)
जेजुरी पासून २९ किमी असलेल्या गराडे गावाचे दरेवाडी जवळ २ किमी अंतरावरील एका टेकडीच्या मध्यावर हे मंदिर आहे. या टेकडीची समुद्र सपाटी पासून उंची १०२० मीटर असून छोट्या पूर्वाभिमुख मंदिरास नव्याने मंडप बांधला आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.हे ठिकाण ब्रम्हदेवांची तपोभूमी होती या ठिकाणी ब्रम्हदेव तप करत असताना पांडेश्वर येथे यज्ञ करीत असलेल्या पांडवानी गंगाजला साठी त्यांचा कमंडलू लवंडला व त्या जल प्रवाहा मधून कर्हा व चर्नावती या नद्या उगम पावल्याचे मानले जाते. मंदिराची उत्तर बाजूने चर्नावती व दक्षिण बाजूने कर्हा नदी उगम पावते. कर्हेचा स्पष्ट रुपात वाहणारा प्रवाह दरेवाडी येथून दिसू लागतो येथे काठावर कर्हामाई चे छोटे मंदिर आहे, गराडे गावात नदीवर छोटा घाट असून तेथे शिव मंदिरे आहेत यातील एका मंदिरास ही चतुर्मुख मंदिर म्हटले जाते
हरेश्वर
जेजुरी पासून २० किमी अंतरावर असणारे हे ठिकाण सासवड वीर रोडवर सासवड पासून ५ किमी अंतरावर पिंपळे गावाजवळ समुद्र सपाटी पासून ९३० मी उंचीवर असलेल्या टेकडीवर आहे . रस्त्यापासून मोठी चढण चढून टेकडीवर जावे लागते. टेकडीवर पूर्वाभिमुख शिवमंदिर असून टेकडीच्या दुसरया टोकावर दत्तमंदिर आहे दत्तमंदिरात एका छोट्या कोनाड्यातून जावे लागते. या टेकडीवरून पुरंदर वज्रगडा पासून पुरंदर तालुक्याचा जवळ जवळ सर्वच परिसर दृष्टीस पडतो. भटकंती करणाऱ्या भटक्या साठी सुंदर ठिकाण
वाघजाई ( पिंगोरी )
जेजुरी पासून १५ किमी अंतरावर असणारे पिंगोरी गावा मध्ये एका बंधिस्त प्राकारात लाकडी मंडप व गर्भगृह अशी रचना असणारे मंदिरात वाघावर आरूढ असलेले वाघजाई ची मूर्ती आहे हिला पिंगलाई असेही म्हणतात या मुळे या गावास पिंगोरी नाव मिळाल्याचे मानले जाते. या मंदिराची मागे थोडे बाजूला एक शिव मंदिर आहे. शिव मंदिराची समोर वाघजाई मंदिराचे बाजूस एक स्मारक छत्री असून त्यात प्रतिमा आहेत. ग्वालियर चे शिंदे घराणे मुळचे महाराष्ट्रातील या घराण्याची एक शाखा या ठिकाणी वास्तव्य करीत होती त्यांचे मधील कोणाची तरी ही छत्री असल्याचे ग्रामस्थ सांगतात गावा मध्ये त्यांचा एक वाडा ही आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यावरून ईस १८१२ मध्ये सदर दरवाज्याचे काम बापुजीराव विठ्ठल शिंदे पाटील यांनी वाघाई चरणी केल्याचे दिसते
कोळविहीरे
जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असणारे कोळविहीरे गाव हे रामायणकार वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी असल्याचे मानले जाते वाल्मिकी हे जातीने कोळी होते पूर्वाश्रमी ते या परिसरामध्ये वाल्याकोळी म्हणून वाटमारीचा धंदा करीत येथे असलेले एक विहीर वाल्या कोळ्याची म्हणून प्रसिद्ध होती या वरून या गावास कोळविहीरे असे नाव मिळाले. वाटमारी करताना वाल्या कोळ्यास नारादमुनीचा अनुग्रह मिळाला व त्याने तप आरंभले व वाल्याचा पुढे वाल्मिकी झाला. त्यांनी ज्या ठिकाणी तप केले त्या ठिकाणी दुर्मिळ असा पाडळी चा महावृक्ष आजही उभा असून तो तप करताना त्यांनी हाती घेतलेल्या काठी पासून निर्माण जाहला अशी जनश्रुती आहे
हरणी
जेजुरी पासून १८ किमी असलेल्या हरणी गावापासून २.५ किमी अंतरावरील डोंगरास महादेवाचा डोंगर म्हणून ओळखतात समुद्र सपाटी पासून ७४० मीटर उंच टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे गाडी रस्ता थेट मंदिरा पर्यंत पोहोचतो मंदिराची रचना दगडी मंडप व गर्भगृह अशी असून गर्भगृहात द्विलिंग असून ते शंकर व पार्वतीचे असल्याचे सांगतात, एका भक्ता मुळे देव शिखर शिगनापूर अथवा सोमेश्वर येथून या ठिकाणी आल्याचे सांगीतले जाते. या मंदिरा मागील टेकडीवर हरणाई देवी चे मंदिर आहे या ठिकाणची ही आद्य देवता हिचे नावावरून गावास हरणी नाव मिळाले.हरणाई मंदिराचे मागील बाजूस काही अंतरावर एक नाथ पंथीय समाधी असून ती कानिफनाथाची असल्याचे सांगितले जाते. चैत्र शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान येथे यात्रा भरते.
सोमेश्वर ( करंजे)
जेजुरी पासून २५ किमी अंतरावर असणारे हे मंदिर सोमायाचे करंजे म्हणून ओळखले जाते एका भव्य प्राकारात येथे सोमेश्वरचे दगडी मंदिर होते. याचे गर्भगृह कायम ठेऊन आत्ता या मंदिराला आधुनिक रूप प्राप्त झाले आहे . मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना असून गर्भगृहात सोमेश्वरचे शिवलिंग आहे. सती मालुबाई चे भक्तीने सोमनाथाचे पुजे करिता तिलानेण्या करिता रात्री विमान येत असे.एके दिवशी तीचा पती संशयाने पाठलाग करीत विमानाला धरून सोरटी सोमनाथला पोहचला व ती परतताना तेथेच राहिला. आणि तीच्या आयुष्याची परवड सुरु झाली तरी तिने भक्ती सोडली नाही. शेवटी देव तिचे भक्ती साठी येथे प्रगट झाले. व ती शिवतत्वात विलीन झाली अशी जनश्रुती आहे. संपूर्ण श्रावण महिना येथे यात्रा यात्रा असते श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते. या कालावधीत मालुबाईस दिलेल्या वचना प्रमाणे आजही देव सर्प रूपाने प्रगटतात अशी लोकश्रद्धा आहे
श्री ज्योतीलिंग ( गुळुंचे)
जेजुरी पासून २५ किमी अंतरावर गुळुंचे गावी असणारे हे मंदिर याची मंडप व गर्भगृह अशी रचना आहे गर्भगृहात शिवलिंग आहे. हे मंदिर येथे कार्तिक द्वादशीस भरणाऱ्या ‘ काटे बारस’ या यात्रे साठी विशेष प्रसिद्ध आहे या दिवशी बाभळीच्या काट्यांचे फांद्यांचे मोठे ढिगावर भाविक भक्त उघड्या अंगाने अंग झोकून उड्या मारतात
कुमजाई (टेकवडी)
जेजुरी पासून २१ किमी अंतरावर असलेल्या टेकवडी गावा पासून ५ किमी अंतरावर कुमजाई देवीचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात खोलात उतरून जावे लागते. खाली एक शिवलिंग असून मागील बाजुस खाली व वरील कोनाड्यात महिषासुर मर्दीनी कुमजाई च्या मूर्ती आहेंत. भुलेश्वराचे पत्नी कुमजाई येथे त्याचे वर रुसून येऊन राहिल्याचे जनश्रुती आहे . मंदिराची आजूबाजूस इतर देवतांचे घुमटी आहेंत
राजराजेश्वर मंदिर ( आंबळे )
जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील आंबळे गावात एका उधवस्त मोठ्या प्राकारात हे दगडी बांधकामातील पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून मंडप नक्षीकामाने युक्त आहे. कामावरून हे मंदिराचे काम पेशवाई काळातील आहे हे निश्चीत. गर्भगृहात शिवलिंग असून मागील बाजूस शंकर पार्वती यांची अलीगन मूर्ती आहे. मंदिरावरील कळसाचे काम विटांचे असून भग्न अवस्थेत आहे मंदिराचे मागे राम, कृष्ण, व तुळजाभवानी गणपती यांची मंदिरे आहेंत. गावा मध्ये अनेक पुरातन भव्य वाडे असून गावाचा गावकोस आजही काही प्रमाणात उभा आहे.
जवळार्जुन
जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असलेले गाव या कर्हा नदी काठी पुर्व तटावर पूर्वाभिमुख महादेवाचे मंदिर आहे .पांडेश्वर येथे यज्ञ करणाऱ्या पांडवानी गंगा जलासाठी चतुर्मुखा वरील ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडला त्यातून कर्हा निर्माण झाली. तपोभंगाने क्रोधीत ब्रम्हदेव अर्जुनाचा पाठलाग करू लागले. ब्रम्हदेव जवळ आले की अर्जुन आपल्या हातातील बेल अक्षता खाली टाकीत असे त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण होत असे त्याची पुजा करून ब्रम्हदेव अर्जुनाचा पाठलाग पुन्हा सुरु करीत या पद्धतीने कर्हा नदी काठी अनेक शिवलिंग निर्माण झालेची जनश्रुती आहे. या मधील हे एक शिवलिंग अर्जुन पांडेश्वरा जवळ आलेवर तयार जाहलेले शिवलिंग म्हणून हे जवळार्जुन शिवलिंग या वरूनच या गावास जवळार्जुन नाव मिळाले आहे