सुवर्णनगरी जेजुरी

॥ जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
jejuri net welcome

जय मल्हार !!
श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले.
या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते.
महाराष्ट्रात खंडोबा कर्नाटकात मैंलार, आंध्रप्रदेश मध्ये मल्लाना, नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवताच्या भक्तीत राजापासून रंका पर्यंत, रावापासून अंतजा पर्यंत सर्वजण लीन झाले. अंतजाचा श्रद्धेय असलेल्या या देवताने सर्व जाती-धर्म, उच्च-निच्च, भाषा-प्रदेश यांच्या भिंती तोडून सर्वाना आपल्या भक्तीत सामावून घेतले असा हा खरा लोकदेव.
खंडोबा हे शोर्याची स्पुर्ती देणारी देवता यांच्या स्पुर्तीतून अनेक शूरवीर जन्माला आले. स्वराज संस्थापक छत्रपती शिवरायांनी आपली तलवार रणात शत्रूच्या रक्तात प्रथम भिजवली ती याच क्र्र्हेपठारचे परिसरात. सरदार मल्हारराव होळकर यानी स्वराज्याचा ध्वज उत्तरेत फडकवला, तो या खंडेरायाच्या श्रद्धेच्या बळावरच आणि स्वातंत्र्यासाठी पहिले बंड उमाजी नाईकाने उभे केले तेही याच क्र्र्हेपठार परिसरात.
अनेंक राजघराणी, सरदार, सामान्य गोरगरीब भक्त यांच्या श्रद्धेतून या परिसरात शेकडो वर्ष अनेंक वास्तु, मंदिरे, लोकाभिमुख सुविधा देणारे तलाव, बाग, धर्मशाळा, पुष्करणी अशा अनेक कलाकृती निर्माण झाल्या अनेकांचे पुनर्निर्माण हि झाले यातील होळकरांचे योगदान बहुआयामी होते.मराठी कलेचा,संस्कृतीचा व वेभवाचा वारसा लाभलेल्या या वास्तु त्या मधूनच उभ्या राहिल्या या निर्मिती मध्ये कला होती श्रद्धा होती आणि भाविकांच्या साठी सुविधा निर्माण करण्याची दृष्टी होती. अनेक लोककला जनश्रुती आणि लोकपरंपरांची हि एतिह्यासिक नगरी इतिहासा बरोबरच निसर्गाने या भूमीवर आपला वरदहस्त ठेवला अनेक प्राणी, पक्षी वनस्पती यांची जैवविविधता लाभलेला हा परिसर अनेक लोककला व कलाकारांना या भुमीने जन्म दिला. त्यांनी आपल्या कलागुणांनी रसिकांची मने जिंकली .
जेजुरी बरोबरच येथील आसपासचा परिसर देखील असाच समृद्ध वारसा सांगणारा मंदिरे, किल्ले, यांनी नटलेला आणि इतिहासाचा साक्षीदार असणारा. खंडोबा, दक्षिण भारताचा लोकदेव त्याच्या भक्तांना जेजुरी प्रमाणेच त्याच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश भर पसरलेल्या मंदिरांचे ही आकर्षण या सर्व विषयांना समावून घेऊन त्याची अभ्यास पूर्ण माहिती देणारे या महाजाला वरील हे आद्य संकेतस्थळ येथील माहिती विविध विभागाचे माध्यमातून देण्यात आलेली आहे

जेजुरीगड

 jejurigad

खंडोबाची राजधानी मानला जाणारा जेजुरीगड याचे मार्गावरील विविध देवता त्यांचे ग्रांथिक व जनश्रुतीची माहिती या मार्गाचा बांधकाम काळ त्याचे कर्ते यांच्या माहिती सह जेजुरी गड व मंदिर परिसरातील देवदेवता यांची ग्रांथिक माहिती निर्मितीकाल, निर्माते यांच्या माहिती सह मंदिर व गड कोट परिसराचे सचित्र दर्शन

कडेपठार

 kadepathar

खंडोबाचे अवतार स्थान मानले जाणारे कडेपठार मंदिराचे दोन्ही मार्गावरील देवता त्यांचे ग्रांथिक व जनश्रुती मधील संधर्भ या सह पायरीमार्ग व मंदिर यांचे सचित्र दर्शन

जेजुरी उत्सव

jejuri utsav
गड व कडेपठार मंदिरात होणारी भूपाळी, धूपआरती, शेजआरती हे दैनंदिन कार्यक्रम यांचे चित्रफिती द्वारे दर्शन, येथे वर्षभर होणाऱ्या चैत्र पौर्णिमा, सोमवती, गणपुजा, दसरा, चंपाषष्टी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, या उत्सवाची सचित्र माहिती व चित्रफिती द्वारे दर्शन, नाग पंचमी, श्रीयाळषष्टी, छबिना, त्रिपुरी पौर्णिमा, जानाई देवी उत्सव या वर्षभर साजरे होणारे स्थानिक उत्सवांचे सचित्र व चित्रफिती द्वारे दर्शन व माहिती

जेजुरी प्रेक्षणीय

 jejuri prekshyaniya
जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर मंदिर, होळकर तलाव, बल्लाळेश्वर, लवथळेश्वर मंदिर,जानाई मंदिर, मल्हारतीर्थ, जननी तीर्थ,लव तीर्थ, पेशवे तलाव इत्यादी प्रेक्षणीय स्थळे यांचे संधर्भासह सचित्र दर्शन

जेजुरी ऐतिहासिक

 jejuri ahityasik
जेजुरीतील ऐत्यहासिक घटनांचा माहितीसह सचित्र इतिहास, जेजुरीचे भूमीतील शीघ्रकवी सगनभाऊ, लावणी सम्राज्ञी रोशन सातारकर, चित्रअभिनेत्री लीला गांधी सारख्या येथील नामवंत कलाकारांचा जीवन परिचय व येथील लोककलेची सांस्कृतिक परंपरा याची माहिती

जेजुरी पर्यावरण

 jejuri paryavaran
जेजुरीचे भौगोलिक स्थान, हवामान, यांची नकाशे आलेख या द्वारे सचित्र माहिती जेजुरी परिसरातील जैवविविधता यांची सचित्र माहिती

जेजुरी परिसर

 jejuri parisar
जेजुरी परिसरातील शंकरेश्वर, रामेश्वर [ साकुर्डे ] , पांडेश्वर, भुलेश्वर, नागेश्वर [ नाझरे], वाल्मिकी ऋषी समाधी [ वाल्हे ], मयुरेश्वर [ मोरगाव],संत सोपानदेव समाधी, संगमेश्वर, सिद्धेश्वर [ सासवड ], जवळार्जुन , चतुर्मुख [ गराडे ], महादेव [ हरणी ], वाल्मिकी तपोभूमी [ कोळविहीरे], वाघेश्वरी [ पिंगोरी], हरेश्वर, यमाई [ शिवरी ], नारायणपूर, बालाजी [ केतकवळे ], म्हस्कोबा [वीर], सोमेश्वर [ करंजे ], कानिफनाथ, गुळुंचे, आंबळे, कुमजाई, किल्ले पुरंदर, वज्रगड, मल्हारगड [ सोनोरी], या विविध मंदिरे, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांचे संधर्भासह सचित्र दर्शन

महाराष्ट्र खंडोबा

 maharashtra khandoba
महाराष्ट्रात खंडोबा मल्हारी, म्हाळसाकांत, या नावाने हि ओळखला जातो. महाराष्ट्र खंडोबाच्या असंख्य मंदिरांनी भरलेला आहे. त्याचे भक्ती मार्गाचे कोणीही मोठे प्रसारक झाले नाहीत. तरीही यांचा भक्ती संप्रदाय बहरत राहिला तो येथील जनसामान्यांचे भक्तीतून, असा हा खरा लोकदेव. खंडोबाची अनेक मंदिरे लहान मोठे उत्सव आणि यात्रानी गजबजलेली आहेंत. यातील मोठ्या यात्रा भरणारी व खंडोबाच्या चरित्राशी निगडीत असणारी मंदिरे प्रमुख मानली जातात. महाराष्ट्रातील जेजुरी व्यतिरिक्त पाली, सातारे, शेगूड, निमगाव-दावडी, माळेगाव, नळदुर्ग, अणदूर, चंदनपुरी, नेवासा, याच बरोबर इतर खंडोबा मंदिरांचा हा सचित्र परिचय.

कर्नाटक खंडोबा

karnatak khandoba
कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार, मैलारलिंग या नावाने ओळखला जातो, या देवाचे भक्त त्याचे दुसरया प्रांतातील रूपा पासून अपरिचित होते, तरीही त्यांचे भक्ती मार्गातील अनेंक दुव्यात साम्य कायम राहिले. कर्नाटक मधील मंगसुळी, देवरगुड्डा, मृणमैलार, आदिमैलार, मैलापुर व कर्नाटकातीलत विविध खंडोबा मंदिरांचे माहितीसह सचित्र दर्शन.

आंध्र, तेलंगणा खंडोबा

andhra telangana khandoba
आंध्रप्रदेश व तेलंगाणा मध्ये खंडोबा मल्लना, मलीकार्जुन या नावाने ओळखला जातो. या देवाचे भक्त त्याचे दुसरया प्रांतातील रूपा पासून आजही अपरिचित आहेत, मराठी जनतेला अपरिचित राहिलेल्या आंध्रप्रदेश व तेलंगाणा मधील कोम्मीरवेल्ली, इनावोळू, नैन्निकी, ओदेला, मल्लीकुदरला, गुर्रेकुंटा व आंध्रप्रदेश व तेलंगाणा मधील विविध खंडोबा मंदिरांचे माहितीसह सचित्र दर्शन.

खंडोबा धार्मिक

 khandoba dharmik
खंडोबाच्या देवता परिवारात पुजल्या जाणाऱ्या हेगडी प्रधान, म्हाळसा, बाणाई, घोडा, कुत्रा, या परिवार देवताची सचित्र माहिती, उपासनेत व देवघरात पुजली जाणारी टाक, मुर्ती, ही पुजा प्रतीके व दिवटी, गाठा, शिक्का, घोळ, कोटंबा, भंडारी, लंगर, घाटी या प्रतीकांची सचित्र माहिती, वाघ्या मुरुळी हे उपासक, व तळी भंडार, जागरण, चंपाषष्टी घट, या कुलधर्म कुलाचाराची व विविध पूजा विधी, आरती, मंत्र, श्लोक याची सचित्र व चित्रफिती द्वारे माहिती.

खंडोबा साहित्य, कला

khandoba sahitya kala
खंडोबा विषयक मल्हारी महात्म्य, जयाद्री महात्म्य, मार्तंड विजय, या विविध ग्रंथांचा परिचय, श्री मार्तंड भैरव अवतार सचित्र कथासार, विविध लोकगीते व वाघ्या मुरुळी या उपासकांचे वाणी तून घडणारे खंडोबा जेजुरी चे दर्शन, व संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, रामदास स्वामी इत्यादी संतांचे आरती, भारुड, अभंग या लिखाणातून होणारे खंडोबा दर्शन प्रातिनिधिक रचना सह सचित्र माहिती. चित्र, मुर्ती, रांगोळी, अश्या विविध कला माध्यमातून विविध कलाकारांनी घडविलेले खंडोबा दर्शन.

महाराष्ट्र दैवते

 maharashtra daivate
अवघा महाराष्ट्र विविध दैवतांचे मंदिरांनी व्यापलेला आहे, गणपती विविध मंदिरे, अष्टविनायक, आदिशक्तीची साडेतीन पीठे, बारा ज्योतिर्लिंग पैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रा मध्ये आहेत, अश्या विविध देवी दैवतांचा मंदिरे, आरती, मंत्र, श्लोक या सह सचित्र परिचय.

मराठी सण, परंपरा

marathi san paranpara
मराठी नववर्षाचा प्रारंभ गुढीपाडवा ते होळी पर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी सणांचा परिचय, वेगवेगळ्या मराठी लोककला, कलाकार, उपासक व मराठी मातीतील खेळ यांचा परिचय,

असंख्य छायाचित्रे, चित्रे, चित्रफिती मधून होणारे हे जेजुरी आणि खंडोबाचे सर्वागीण दर्शन
असंख्य छायाचित्रे, चित्रे, चित्रफिती मधून होणारे हे सर्वागीण दर्शन खंडोबाचे भक्त, उपासक, अभ्यासक व पर्यटक विविध दैवतांचे भक्त, उपासक, अभ्यासक, लोककला अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही, हे संकेतस्थळ अधिक समृद्ध करण्याचा नियमित प्रयत्न असेलच या साठी आपल्या पतिक्रिया मार्गदर्शक असतीलच
धन्यवाद !
येळकोट येळकोट जय मल्हार !!!!!!!!!!!!!
गणेश टाक
अध्यक्ष – श्री मार्तंड अध्यासन
(खंडोबा विषयक अभ्यास व प्रसार मंच )
चैत्र शुद्ध प्रतिपदा [ गुडी पाडवा ] शके १९३२
मंगळवार दि. १६ मार्च २०१०