जेजुरीतील ऐत्यहासिक घटनांचा व लोककला सांस्कृतिक परंपरा यांचा माहितीसह सचित्र इतिहास,
जेजुरी सांस्कृतिक
शाहीर सगनभाऊ रोशन सातारकर लिला गांधी
इतिहासातील जेजुरी
सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनीची तपोभुमी दक्षिणे मध्ये मणि मल्ल राक्षसांचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळा पासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.
शंकरांनी या भूमीवर मार्तंड भेंरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली. मार्तंड भेंरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरात नांदतच होते.
येथेही राजधानी ठिकाणी मार्तंड भेंरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिरांचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्री ची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले.
येथे अनाम भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असेलेल्या यक्षमूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला ईस १२४६ चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख
गडाचे पूर्वेचा लोक वस्तीचा भाग जुनी जेजुरी म्हणून ओळखला जातो.पण पायरी मार्ग, कमानी यांचा विचारकरता येथील पायथ्याचे पहिल्या कमानीवर ईस १५११ चा शिलालेख आहे या वरून उत्तरे कडील लोकवस्ती या पूर्वीपासून प्रमुख लोकवस्ती म्हणून अस्तित्वात होते हे निश्चीत.
ईस १५११ मधेच चेंतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे.एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती हे निश्चीत.
प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीच महात्म्य शब्दबद्ध करण्याच काम याच काळात ईस १५४० च्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने “जयाद्री महात्म्य ” या ग्रंथाचे माधमातून केले. ईस १६०८ मध्ये येथील लवथळेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम झालेचें तेथील शिलालेखा वरून समजते.
ईस १६३७ मध्ये राघो मंबाजी या सरदारांनी जेजुरी गडाचे जिर्नोधाराचे काम केले व सदर बांधली.
ईस १६५१ – ५२ चें दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्या मध्ये वादविवाद सुरु झाले व ते जिजाऊ साहेबाकडे कडे निवाड्या साठी गेले जिजाऊनी निवाडा देऊन वाद मिटवले, पुढे ईस १६५३ मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला.
ईस १६५४ मध्ये पुरंदर मिळवल्या नंतर शिवरायांनी जेजुरीस भेट दिली व एक राजवाडा ही बांधला असे वर्णन चिटणीसांचे बखरीत आहे.
याच बखरीत शहाजी महाराजांनी शिवरायाचे स्वराज उभे राहावे म्हणून जेजुरीच्या खंडोबास नवस केला होता व नवसपुर्ती साठी कर्नाटकी कलाकारांकडून सोन्याचे मूर्ती बनवून घेऊन अर्पण केल्या व याच वेळी शहाजी शिवाजी यांची भेट झालेचे बखरकार लिहितो.
ईस १७०२ चें एका मुघल बातमीपत्रात जेजुरीचा उल्लेख येतो यात येथील मातीच्या घराचे व गड पायथ्याला असणारे मोठ्या विहिरीचे वर्णन आहे हे चिलावती कुंडाचे असावे.
ईस १७०९ दरम्यान थोरल्या शाहू महाराजांनी जेजुरीस भेट दिली व मल्हार तीर्थाचे जिर्नोधाराचे काम केले. ईस १७११ ते २७ चें दरम्यान तंजावर येथील भोसल्यांनी जेजुरीस भेट दिली व मंदिरास खंडोबा म्हाळसा यांचे मूर्ती अर्पण केल्या
ईस १७३४ ते १७४० मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांनी पेशवे तलाव व तलावाचे भिंती मधील बल्लाळेश्वर मंदिराचे निर्माण केले.
मल्हारराव होळकर हे आपल्या कर्तुत्वाने सरदार झाले. आपले हे यश खंडोबाचे कृपेने आहे अशी त्यांची श्रद्धा होती या श्रद्धेतून त्यांनी ईस १७३५ मध्ये जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले,
मराठ्यांनी पोर्तीगीजावर वसईला मोठा विजय ईस १७३९ मध्ये मिळवला त्या विजयाची स्मृती चिन्हे म्हणून चिमाजी अप्पा व होळकरांनी लुटीतील दोन पोर्तुगीज घंटा येथे खंडोबा चरणी अर्पण केल्या.
सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या धाकट्या पत्नी आजारी पडल्या त्यांनी जेजुरी भेटीची आस धरली आणि जेजुरीस आल्या जेजुरी येथील मुक्कामात त्या निधन पावल्या माहुली संगम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईस १७५० मध्ये मंदिरातील हक्काचे वादातील वीराचे कैफीयती मध्ये वीराचे ते पिंडरीत पहार मारून त्या रक्ताचा टिळा देवास लावीत असल्याचे प्रथेचा उल्लेख आहे
पानसे हे सोनोरीचे सरदार घराणे त्यांचा कुलस्वामी खंडोबा या परिवारातील महिपतराव व रामराव पानसे यांनी नवसपूर्ती साठी देवास ईस १७५० दरम्यान खंडा अर्पण केला
मल्हारराव होळकरांचे मृत्यू नंतरही त्यांनी सुरु केलेले जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरु ठेवले ते व होळकर तलावाचे काम ईस १७७० पूर्ण झाले.
सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म झाला व त्याची नवस पुर्ती साठी नाना फडणविसानी खंडोबाचे मूर्तींचा एक जोड येथील खंडोबा मंदिरात ईस १७७४ मध्ये अर्पण केला. ईस १७८५ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी जेजुरीस भेट दिल्याचे संदर्भ मिळतात. ईस १७९० मध्ये चैत्र पोर्णिमे दिवशी एका दुर्घटनेत गडावर ३०० लोक मरण पावल्याचे एका तत्कालीन बातमीपत्रा मधून समजते
ईस १७९० मधेच विजयादशमी दिवशी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिराचे काम तुकोजी होळकरांनी पूर्ण केले
ईस १७९४ मध्ये करवीरचे शंकराचार्यानी जेजुरी मंदिरास एक हत्ती दान केल्याचा संदर्भ मिळतो या वरून जेजुरीस हत्ती वाहण्याची प्रथा होती असे दिसते.
या कालावधीत कोकणातील सोनकोळी जमाती मधील कानू व कमळोजी या दोघा मध्ये जेजुरीच्या खंडोबाचा खरा भगत कोण या वरून वाद निर्माण झाले. हा वाद पेशवे दरबारात गेलेवर हा निवाडा देवाचा असल्याने देवानेच निवाडा द्यावा म्हणून जेजुरीस पाठविण्यात आले व निवाड्या प्रमाणे कनोजी भगतास दरबारातून सनद देण्यात आली
ईस १७९७ मध्ये तुकोजी होळकर यांचा मृत्यू झाला. शिंद्यांनी होळकरांना कबज्यात घेण्याचा प्रयत्न केला. या मधून यशवंतराव होळकर यांनी जेजुरीस आश्रय घेतला.व इंदूरला गेले पुढे पेशव्यांनी यशवंतराव होळकरचें भाऊ विठोजी होळकरांना पुण्यात हत्तीच्या पायी देऊन मारले, या सूडाने यशवंतराव जेजुरीस आले व ईस १८०२ मध्ये जेजुरीतून कूच करून पुण्यावर हल्ला केला पेशवे पुणे सोडून पळाले व यशवंतराव होळकरांनी शनिवार वाडा ताब्यात घेतला
खंडोबा वरील दुसरया ग्रंथाची निर्मिती ईस १८२४ मध्ये गंगाधर कमलाकर यांनी कडेपठारी ” मार्तंड विजय” हा ग्रंथ लिहून पूर्ण केली
इंग्रज देशावर राज्य करू लागल्यावर त्यांची विरुद्ध अनेक बंड उभी राहिली त्यातले पहिले बंद उमाजी नाईक यांचे याच परिसरातले. उमाजी नाईक यांनी इंग्रजांचा भांबुरड्या चा खजिना लुटल्यावर तातील काही भाग खंडोबास अर्पण केला. याच उमाजीची इंग्रज शिपाया बरोबर जेजुरीतील डोंगरात ईस १८२६ मध्ये झटापट झाली त्या मध्ये अनेक इंग्रज शिपाई मारले गेले.
ईस १८४४ मध्ये इग्रज अधिकारी आलेक्झाडर न्याश याने जेजुरीस भेट दिली होती त्या वेळेस त्याने होळकर तलावाचे काठावरून जेजुरी गडाचे रेखाचित्र काढले होते, हे जेजुरी गडाचे उपलब्ध चित्रा मधील जुने चित्र आहे.
इस १८५५ ते १८६२ दरम्यान जॉन्सन विल्मम याने काढलेले, सेन्ट्रल युनिवर्सिटी डल्लास, येथील ग्रंथालयातील असलेले हे जेजुरीगडाचे छायाचित्र, आज पर्यंतच्या ज्ञात छायाचित्रा मधील हे सर्वात जुने छायाचित्र आहे.
ईस १८५०-५१ चें दरम्यान तथकथित औरंगजेबाने देवास वाहिलेला सव्वालाखाचा भुंगा चोरीस गेला असा उल्लेख ग्याझेटियर मध्ये मध्ये मिळतो .
येथे मंदिरा समोर बागड घेण्याची प्रथा अस्तित्वात होती ईस १८५६ मध्ये या बागडावर इंग्रजांनी बंदी घातली आणि ही प्रथा बंद झाली
प्रसिद्ध चित्रकार श्रीमती सारा जेन लेयार्ड यांनी इस १८६२ मध्ये जेजुरीस भेट दिली होती त्या वेळेस त्यांनी जेजुरी गडाचे पेशवे तलावाचे बाजूने काढलेले जलरंगातील चित्र
ईस १८६८ मध्ये यात्रेचे व्यवस्थापना साठी जेजुरी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली पुढे गावामध्ये पेट्रोमेक्स बत्या व रॉकेलचें दिव्यांचे माध्यमातून दिवाबत्तीची सोय झाली.
उमाजी नाईक यांची प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीकारी तयार झाले. त्या मधील हरी मकाजी नाईक हा एक होय. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कळंबी हे त्याचे गाव अनेक सावकारांना लुटून गोरगरीब जनतेला त्यांच्या कर्जातून त्याने मुक्ती दिली. मार्च १८७९ मध्ये तो इंग्रजांना सापडला त्याला जेजुरी येथे ४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून फाशी देण्यात आले त्यास फाशी दिलेला परिसर आजही फाशीचा माळ म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र शासनाने त्याचे जेजुरीत स्मारक उभारले आहे.
ईस १८८५ चें दरम्यान न्यारोगेज रेल्वे लाइनच्या माध्यमातून जेजुरीस रेल्वे सुरु झाली.
पुण्याचे नेटिव इश्तीटूटने ईस १९०३ आधी पासूनच जेजुरी मध्ये मराठी शाळा सुरु केल्या होत्या.
ईस १९०८ मध्ये जेजुरीत सोमवंशीय महार समाजाचे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाजात मुरुळी सोडण्याची प्रथा वाढत असलेची विषयावर चर्चा झाली व समाजातील लोकांनी मुरुळी सोडू नये असा ठराव करण्यात आला. या चळवळी तून पुढे एका मुरुळीचा विवाह संपन्न झाला
जेजुरीतील शाळे मध्ये ईस १९२५ मध्ये इंग्रजी वर्ग सुरु करण्यात आले.
ईस १९३२ मध्ये सातारचे भोसल्यांनी जेजुरी मंदिरात मूर्ती जोड अर्पण केला.
ईस १९३९ मध्ये होळकर तलावा वरून गावासाठी पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली. व नळाद्वारे जेजुरीस पाणी पुरवठा सुरु झाला.
ईस १९४४ मध्ये स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत असताना काही कार्यकर्त्यांना चळवळी साठी निधी उभा करण्यासाठी अफलातून कल्पना सुचली व त्यांनी जेजुरी मंदिरावर दरोडा टाकून देवाचा जामदारखाना लुटला पुढे ही चोरी सापडली
ईस १९४८ मध्ये महात्मा गांधीचे मृत्यू नंतर त्यांचे अस्थी कलश अनेक ठिकाणी पाठविण्यात आले या मधील एक कलश जेजुरीत आणून गडाचे पायथ्याशी समाधी बांधण्यात आली.
ईस १९५२ मध्ये जेजुरीत जनता शिक्षण संस्थेची स्थापना झाली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी हायस्कूल हे जेजुरीतील प्रथम हायस्कूल सुरु झाले.
६ डिसे १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाल्यावर जेजुरी गडाचे पायथ्याशी त्यांची स्मृती म्हणून त्यांचे अस्थी स्मारक उभारण्यात आले
ईस १९६२ मध्ये जेजुरी मध्ये विधुत पुरवठा सुरु झाला. आणि जेजुरी विजेच्या प्रकाशाने उजळून निघाली
ईस १९७३ मध्ये कर्हा नदीवर मल्हार सागर धरण बांधण्यात आले. व पुढे या धरणावरून जेजुरीस पाणी पुरवठा योजना सुरु झाली.
९ ऑग १९८१ महाराष्ट्र शासनाचे वतीने राज्यभर हुतात्मा स्मारके उभारण्यात आली, या मधे जेजुरी येथे हुतात्मा हरी मकाजी नाईक यांचे स्मारक उभारण्यात आले हरी मकाजी नाईक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कळंबी येथील होते, जेजुरी येथे ४ एप्रिल १८७९ रोजी वडाच्या झाडाला लटकावून इंग्रजांनी त्यांना फाशी दिले होते
*
सांस्कृतिक जेजुरी
जेजुरी खंडेरायाची नगरी शोर्याची देवता असणाऱ्या खंडेरायाने अनेक योद्ध्यांना स्पुर्ती दिली आणि त्यांनी रण मैदाने गाजवली. वाघ्या मुरुळी सारख्या विविध जाती पंथातून अर्पण झालेल्या उपासकांनी आपल्या खंडेरायाच्या उपासने विविध गीते, नृत्ये यांचा अविष्कार केला. आपले सर्वस्व असणाऱ्या खंडेरायाचे चरित्र लोक समोर मांडण्यासाठी जागरणा सारख्या विधीनाट्याचा जन्म यातूनच झाला. कोणतीही साहित्य, कला यांचा पारंपारिक वारसा नसलेल्या आपल्या भक्तीच्या जागरातून येथे लोक कलेचा माळा फुलविला या मधूनच महाराष्ट्रातील अनेक लोक कलांचा जन्म झाला हे निश्चीत
ह्या भूमीतल्या अनेक लोक कलाकारांनी मराठीच सांस्कृतिक वैभव वाढविले, अवघ्या महाराष्ट्रच मन रीजवले, त्याचे कानही तृप्त केले. आणि मराठी मन ठेका धरून नाचवीले अश्याच काही जेजुरीतील कलावंताचा हा परिचय
*
शाहीर सगनभाऊ जेजुरीकर
मराठी शाहिरी परंपरेतील प्रसिद्ध शाहिरामधील सगनभाऊ हा शेवटचा शाहीर मानला जातो, मुळचा जेजुरी मधील असणाऱ्या सगनभाऊ चा जन्म ईस १७७८ मध्ये झाला. सगन धर्माने मुस्लीम व व्यवसायाने धार लावणारा शिकलगार होता, सगनभाऊ च्या समकालीन शाहिरांना पंडिती, वरदी, फंदी आश्या शाहिरी परंपरा होत्या अशी कोणतीही परंपरा नसलेल्या सगनभाऊनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यानच्या दरबारात त्यांच्या बरोबरीचे स्थान आपल्या काव्य प्रतिभेच्या बळावर मिळविले होते. त्या काळातील लोकमानसाला रुचेल, आवडेल व त्यांना सहज समजेल अश्या सामान्य भाषेत त्यांनी रचना लिहिल्या कल्पने पेक्षा वास्तववादी रचना लिहिण्याकडे त्यांचा कल होता. मराठमोळे जीवन जगणाऱ्या सगनभाऊना आपण मराठमोळे असल्याचा अभिमान होता. सध्या सरळ भाषेतही किती अर्थ व जोम आणता येतो हे सगनभाऊच्या रचना मधून दिसते त्यांच्या या लिखाणात ग्रामीण जीवनाचे संधर्भ सहजतेने दिसतात. अनेक शृंगारिक लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. मुळचे जेजुरीकर असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची भूपाळी लिहिली आहे या भूपाळीत जेजुरीचे निसर्ग वर्णन ही आहे. ही भूपाळी आज श्रद्धा विषय बनलेली आहे, आजही ही भूपाळी रोज सकाळी येथील मंदिरा मध्ये गायली जाते अश्या या थोर शाहिराचा मृत्यू ईस १८५० मध्ये झाला. सगनभाऊ या नाम मुद्रेतील भाऊ हा सगन चा सहयोगी गायक होता व तो जेजुरी जवळचे कोथळे येथील होता असे सांगितले जाते. भाऊ विषयी या पेक्षा अधिक माहिती उपलब्ध नाही
*
रोशन सातारकर
लावणी गायिका रोशन सातारकर या जेजुरीच्याच. ईस १९३५ च्या दरम्यान त्यांचा जन्म झाला, वयाच्या सातव्या वर्षा पासून लावणी गाऊन त्यांनी भाऊ भक्कम व बहिण सावित्रा यांच्या बरोबर आपल्या कला जीवनाला सुरुवात केली याचं मुळ नाव रुक्मिणी लावणी रोशन करणाऱ्या रुक्मिणी बाईना ‘ रोशन ‘ ही उपाधी मिळाली आणि त्याच नाव रोशन झाले ते कायमचेच त्यांनी आपल्या गात्या गळ्याने महाराष्ट्रभर लावणीचा मळा फुलविला. कपाळ भर भंडार, तोंडात पान डोक्यावर पदर घेऊन टाळ्यांच्या कडकडातच त्या रंगमंचावर प्रवेश करीत. लावणीचा पारंपारिक शृंगार प्रधान बाज बाजूला ठेवीत त्यांनी स्त्रीयांची सुख दुखें मांडणाऱ्या लावण्या सदर केल्या. तमाशाच्या रंगमंच्या वरील लावणी त्यांनी देवघरा पर्यंत नेली . नागपूरला तर महिलांनी हट्ट करून त्यांना खास महिलांसाठी कार्यक्रम करायला लावला व साडी चोळी बांगड्या देऊन त्यांचा सत्कारही केला, त्यांना साथ लाभली ती विश्वनाथ मोरे यांचा संगीताची, या जोडीने एच एम व्ही रेकॉर्ड कंपनीचा एक काळ गाजविला, ‘ येऊ कशी तशी मी नांदायला ‘ ‘ माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू ‘ ‘ वारा हलता झुलता वारा ‘ ‘ उदया जाईन मी माझ्या गावा ‘ या बरोबर ‘ डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस ‘ ही रॉक च्या जातकुळीची लावणी ही त्यांनी लोकप्रिय केली. विदर्भातील काही ठिकाणी त्याची लोकप्रियता एवढी होती की त्यांना बुरखा घालून संरक्षणात कार्यक्रम स्थळी जावे लागे. त्यांची लावणी आचार्य अत्रे यांनी खास बैठकीचें आयोजन करून ऐकलि तर लता मंगेशकर यांना देखील त्यांची लावणी श्रवणाचा मोह आवरला नाही त्यांनी घरी बोलाऊन त्याची लावणी ऐकून त्यांचे कौतुक केले. वयाच्या ७० व्या पर्यंत लावणीची सेवा करणाऱ्या रोशन बाईना जेजुरीच्या खंडेरायाचे अक्षय वरदान लाभले होते, या भूमीत खंडोबाचे पदा बरोबर लावणीही फुलते दसऱ्याचे नवरात्रात रोशनबाई रोज सायंकाळी जेजुरीगड चढून खंडोबा समोर लावणीच्या रूपाने आपली हजेरी लावायच्या त्यांचा हा नेम शेवटा पर्यंत कधी चुकला नाही, आपल्या आवाजाचा लावण्या मधील अजरामर ठेवा कायम ठेवत त्यांनी बुधवार २१ सप्टेबर २००५ रोजी जेजुरी नगरीत चिरनिद्रा घेतली
*
लिला गांधी
या जेजुरीच्याच त्यांची आई गायिका होती. लिला गांधी यांना नृत्याची असलेली आवड लक्ष्यात घेऊन त्यांनी लिला गांधीना गुरु गोविंद निकम यांचे कडे कथक नृत्याचे प्रशिक्षण सुरु केले. या शिक्षणा नंतर छोट्या मोठ्या कार्यक्रमातून त्यांनी नृत्य करण्यास सुरवात केली अशाच एका कार्यक्रमात अलबेला फेम मास्टर भगवान यांनी त्यांचे नृत्य पाहीले व त्यांना रंगीला चित्रपटात संधी दिली, ईस १९५१ पासून त्यांची चित्रपट नृत्याची सुरवात झाली. चित्रपटात लावणीचा मुजरा त्यांनी प्रथम आणला अनंत माने यांनी त्यांना प्रथम नृत्य दिग्दर्शनाची संधी ‘ प्रीती संगम ‘ या चित्रपटात दिली या चित्रपटात त्यांनी भूमिकाही साकारली आणि त्यांचा चित्रपट अभिनयाचा प्रवास सुरु झाला. लिला गांधी यांच्या नृत्य दिग्दर्शन असणारा ‘ सांगते ऐका ‘ या चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम केले. याच चित्रपटात त्यांनी ‘ सांगा या वेडीला’ या गीतावर नृत्य केले. या चित्रपटा पासून त्यांची चित्रपट कारकीर्द बहरली ‘ केला इशारा जाता जाता ‘ मध्ये त्यांनी प्रथम त्यांनी नायिकेची भूमिका साकारली, या नंतर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटातून भूमिका साकारल्या चित्रपटा बरोबर त्यांनी रंगभूमीवरही आपली नृत्य सादर केली . ‘ सोळावे वर्ष धोक्याचे ‘ ‘ कथा अकलेच्या कांद्याची ‘ अशी मराठी नाटके ‘ महाकवी कालिदास ‘ ह्या संस्कृत नाटकातून व काही गुजराती नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. ईस १९६७ नंतर त्यांनी चित्रपटातून चरित्र भूमिका साकारल्या ‘ चोरावर मोर ‘ ‘ संत गोरा कुंभार ‘ या चित्रपटात त्यांनी खलनायिका साकारली. ईस १९७९ मध्ये त्यांनी रंगभूमी वरील काम थांबवले, ईस १९८३ नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रातूनही निवृत्ती घेतली. त्यांच्या भूमिका आणि नृत्य चिरस्मरणीय राहतील