खंडोबाची राजधानी जेजुरीगड, याचे मार्गावरील मंदिर, परिसरातील विविध देवता यांचे माहिती सह सचित्र दर्शन
विरभद्र उमाजी नाईक बाणाई मंदिर हेगडीप्रधान मंदिर यशवंतराव गडकोट दर्शन मल्ल बगाड मुख्यमंदिर गडकोटातील देवता वसईच्या घंटा खंडा
जेजुरी गड जेजुरीनगरी मध्ये 18°16’20″N 74°9’37″E वर वसलेला आहे. गड समुद्र सपाटी पासून ८०२ मीटर उंचीवर व गडाचे पायथ्यापासून ६८ मीटर उंच आहे. कोणत्याही मार्गाने आले की प्रथम जेजुरी गडाचे दर्शन होते
गडाचे उत्तर दिशेला पायथ्यालाच जेजुरी गाव वसलेले असून गावापासून गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे. गडास सुमारे ३८५ पायरी असून या पायरी साठी ९ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख ९ लाख पायरी म्हणून केला जातो गावा मधून येणारे तीनही रस्ते उत्तरेकडील पायरी मार्गाचे पायथ्यापाशी पोहचतात या तीन रस्त्या मधील उत्तरेकडून येणारा मार्ग प्रमुख असून त्यास महाद्वार मार्ग म्हणतात पूर्वी या रस्त्याचा उलेख नजर पेठ असा केला जात होता उत्तरेकडून महाद्वारात जात असलेल्या पायरी मार्गावर १४ वेशी असून त्यामधील २ भग्न अवस्थेत आहेंत याच मार्गावर सुमारे ३५० दिपमाळा आहेंत
महाद्वार मार्गावरून येवून पहिली वेस ओलाडली कि आपण नंदी चौकात पोहचतो हुतात्मा स्मारका कडून येणारा पूर्वेचारस्ता व चिंचचीबागे कडून येणारा पश्चीमेचारस्ता याच चौकात येवून मिळतात यथे एका दगडी मेघडम्बरीत नंदी प्रतिमा आहे येथूनच पायरीला प्रारंभ होतो जुन्याकाळी संपूर्ण महाद्वार रस्ताही पायरीचा होता असे लोक सांगतात आज मात्र येथील समोरच्या वेशी मधेच पहिली पायरी लागते.
येथून महाद्वारापर्यंत जाणारे मार्गावरील पायरी,दिपमाळा,वेशी इस १५११ ते १७८५ पर्यंत निर्माण झाल्याचे यामधील काही वास्तु वरील शिलालेख वरून समजते. हा मार्ग या कालखंडा अगोदर पासून व नंतरही अनेक सामान्य अनाम भक्ताच्या सहयोगा मधून उभा राहिला हे मात्र निश्चीत.
*
पुढील तुटकी वेस ओलांडून पुढे आले कि समोर एक उत्तरभिमुख देवडी दिसते. ती विरभद्राची. विरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणी मधील देव, तो शंकरांचा अवतार मानला जातो. खंडोबाचे मनिमल्लासुरा बरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व देत्यशेल् यांनी केलेली चक्राव्युह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवणारे विरभद्राची यथे स्थापना केलेली आहे. येथील चढण चढून गेल्यावर आपण एका वेशीत पोहचतो.
वेशीतून पुढे गेले कि येथून दोन रस्ते फुटतात, या दोन्ही रस्त्यांचे मध्ये थोड्या अंतरावर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे
*
इंग्रजी सत्ते विरोधात बंड करणारा हा आद्य क्रांतिकारक याच परिसरातला. ईस १७९१ मध्ये उमाजीचा जन्म भिवडी येथे झाला. जेजुरीच्या कडेपठरावर खंडोबाची आन घेउन उमाजी टोळीचा नायक झाला. स्वतंत्र राज्य निर्माण करून पुरंदरवर पिवळे निशाण फडकावण्याचे त्याचे स्वप्न होते. इस १८३० मध्ये त्यांनी स्वयंघोषित राज्य स्थापून ब्रिटीश सरकार विरुद्ध प्रतीसरकारची स्थापना केली, इस १८३० मध्ये त्यांनी इंग्रज सत्ते विरुद्ध जाहीरनामा काढला व इंग्रजांना जर्जर केले, अखेर उमाजी इंग्रजांना इस १८३२ मध्ये सापडला. इंग्रजांनी या देशातून चालते व्हावे हि अंतिम इच्छा व्यक्त करत उमाजी खंडोबाचा गजर करत फासावर गेला. अलीकडे उमाजीचे हे स्मारक उभारले आहे.
डाव्या बाजूची वेस ओलांडून पुढे आले वर या वेशीला खेटूनच डाव्या बाजूला एक चवथरा असून त्यावर पादुका आहेत. याच ठिकाणी शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज या पिता पुत्राची भेट झाली असे मानले जाते. चिटनिसाची बखर (इस १८१० ) शिवदिग्विजय (इस १८१८ )मध्ये या भेटीचा उलेख आहे. राजाशिवाजी मध्ये सरदेसाई यांनी इस १६५३ मध्ये व राधा माधव विलास चम्पू मध्ये राजवाडे यांनी इस १६४९ मध्ये हि भेट कल्पिली आहे, तर इस १६६२ मध्ये शहाजी महाराजांनी जेजुरीस भेट दिल्याचे ग्रान्ड डफ लिहितो. पण या भेटीच्या काळा संदर्भात निश्चीत पुरावा उपलब्द नाही.
उमाजी पुतळ्या जवळील उजव्या बाजूची 2 वेस ओलांडून पुढे गेले कि समोर उजव्या बाजूला बाणाईचे मंदिर दिसते.
*
मंदिराची रचना सदर आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराचे समोर अनेंक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. बाणाई हि खंडोबाची दुसरी बायको हि धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे हि मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसरया विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईला निम्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मध्यरात्री नंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत अशी जनश्रुती आहे.
*
बाणाई मंदिरा जवळील डाव्या बाजूच्या पायरीने चढले कि हेगडी प्रधानाचे मंदिर लागते. उमाजी पुतळ्याचे जवळून डाव्या बाजूच्या रस्त्यानेहि येथे पोहचता येते. हेगडीप्रधान हा गंगा जमनी शब्द असून कन्नड मध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच होतो. मार्तंड मल्लासुर युद्धात विष्णूनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते. त्यामुळे हेगडीप्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडीप्रधानाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जनश्रुती नुसार हेगडीप्रधान हा बाणाईचा भाऊ होता व बाणाई विवाहा नंतर तो खंडोबाचा प्रधान बनल्याचे सांगतात. या मंदिरात हेगडी च्या दोन मूर्ती आहेंत.
हेगडीप्रधान मंदिरा पुढील २ वेस ओलांडून गेले कि काही अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख गणपतीचे देवूळ लागते खंडोबा मल्लासुर युद्धात मल्ल सेनापती उल्कामुख यास पराभूत करून त्याचा वध करणारे गणेशाची हि स्थापना.
शेजारील वेशी मधून पुढे गेले कि मागे विभक्त झालेले येथे एकत्र येवून मिळतात.येथूनच पुढे महाद्वार दिसू लागते समोर भव्य असलेली पण अपूर्ण बांधकाम राहिलेली वेस दिसते या वेशीचे डाव्या बाजूला दक्षिणाभिमुख मेघडम्बरी दिसते यात नंदी प्रतिमा आहे
*
डावीकडे समोर दिसते कोटाचे भव्य प्रवेशद्वार या महाद्वाराचे पश्चिम बाजूस कोटाचे तळबाजूस यशवंतराव ची स्थापना केलेली आहे. मोगल सेनेने मंदिरावर हल्ला केला तेव्हा येथील झरोक्यातून भुंगे सुटले व त्यांनी मोगल सेनेवर हल्ला केला, मोगलसेनेची दाणादाण उडाली तेव्हा बादशाहने देवास सवालाखाचा भुंगा वाहिला अशी जनश्रुती आहे. मंदिराचे रक्षणासाठी एका व्यक्तीने येथे आत्मबलिदान केले व त्यामुळेच मंदिर राहिले. म्हणून हा यशवंतराव असेहि काही लोक सांगतात.
*
जेजुरीगड दर्शन.
मंदिराचे सभोतालचा कोट अष्टकोनी असून पूर्व, उत्तर, पश्चिम दिशांनी प्रवेशद्वार आहेंत. कोटास पूर्व व उत्तर दिशांना बारद्वारी आहे. संपूर्ण कोटावर सज्जा आहे. कोटाचे आतील बाजूंनी ६३ ओवरी आहेत. कोटाचे वेगवेगळ्या भागाची कामे विविध कालखंडात झालेली आहेंत, प्रथम कोट कधी बांधला या विषयी काहीच माहिती उपलभ्ध नाही. इस १६३७ चे दरम्यान राघो मंबाजी यांनी कोटाचे जिर्नोधाराचे काम केले होते. इस १७३५ नंतर सरदार मल्हारराव होळकरांनी या कोटाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले, यातील काही भाग इस १७४२ मध्ये पूर्ण झाला. मल्हाररावांनी सुरु केलेले काम सरदार तुकोजी होळकरांनी मल्हाररावां नंतर हि सुरु ठेवले व हे काम इस १७७० मध्ये तुकोजी होळकरांनी पूर्ण केले, हे येथील शिलालेखावरून समजते. आजचा दिसणारा हा भव्य मजबूत कोट होळकरांचे योगदानातून उभा राहिला. होळकरांच्या उत्कर्षा बरोबर जेजुरीच्या सौंदर्यात वाढ होत गेली हे निश्चीत.
भव्य असे उत्तराभिमुख महाद्वार होळकरांनी कोटाचा जिर्णोधार करताना उभे केले. या महाद्वारातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेंत . या देवड्याचे पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते ते जुने महाद्वार, याच्या पुढे हि दोन्ही बाजूस देवड्या आहेंत. पुढील पायरी चढून गेले कि आपण देवूळवाड्यात प्रवेश करतो.
*
महाद्वारातून प्राकारात पोहचल्यावर कोटाचे पूर्व बाजूने पुढे एका दीपमाळे शेजारी पूर्वकोटाला टेकून उभी केलेली शेंदूर चर्चित मल्ल प्रतिमा दिसते. मल्लासुर हा दक्षिणेतील राक्षसराजा, मणिपूर नामक त्याची राजधानी , तो एश्वर्य संपन्न पराक्रमी शूर योद्धा होता. आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवानाही पराभूत केले होते, या यशा मुळे तो उन्मत जाहला व गोरगरीब लोकांनाही त्रास देवू लागला. मानिचुल पर्वता जवळील ऋषी आश्रमांना त्याने लक्ष्य केले व ऋषींचा छळ सुरु केला, पिडीत ऋषीनचे विनंती वरून शंकरांनी मार्तंड भेरवाचा अवतार धारण करून मल्लाचा भाऊ मणि व मल्लाशी युद्ध केले. आपल्या युद्ध कौशल्याने त्याने मार्तंड भेरवास मोहित केले. शेवटी मार्तंड भेरवाने त्यांचा वध केला. अंतिम समयी मल्लाने मागितलेल्या वरदाना मुळे त्याला देवत्व मिळाले.
*
मल्ल प्रतीमेचे समोरच दगडी बांधकामाचे अष्टकोनी बगाड आहे. या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत, इंग्रजी U आकाराचा हा गळ पाठीच्या कण्याच्या दोन्ही मांसल बाजू मध्ये अडकवला जात व त्याचे आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवले जात असे, नवसपूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्या मधील इश्वरी सामर्थ दाखवण्यासाठी. गळ टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांचे कडे भक्तिभावाने पहात. देवासाठी आपण जेवढे जास्त यातना भोगतो तेवढे आपण देवा जवळ जातो अशीही लोकभावना होती. इस १८५६ मध्ये इंग्रजानी बगाडावर बंदी घातली आणि हि प्रथा बंद झाली.
बगाडाचे पश्चिमबाजूस मागे दिपमाळाचे मध्ये मुख्यमंदिराचे समोर एका मेघडंबरीत नंदी प्रतिमा आहे या नंदी मागून थेट गर्भगृहातील मार्तंडाचे मुखदर्शन होते. मुख्यमंदिर व नंदी यांचे मध्ये पितळी पत्र्याने मढवलेले सुमारे २० फुट व्यासाचे कासव आहे याचा उपयोग देवाचे रंगभोगासाठी केला जातो
*
मुख्य पूर्वाभिमुख मंदिराची रचना सदर, मंडप,गर्भगृह अशी असून सदरेस तीन कमानी आहेंत. या सदरेचे आणि मंडपाचे काम राघो मंबाजी यांनी इस. १६३५ ते ३७ चे दरम्यान केल्याचे तेथील शिलालेख वरून दिसते. सदरेवर मंडपात जाण्यासाठी चांदीचे पत्र्याने मढवलेला दरवाजा असून या दरवाजातून आपण मंडपात जातो.
मंडपात उत्तर व दक्षिण बाजूस दोन घोडे आहेत. उत्तरेकडील घोड्यावर खंडोबा स्वार झालेले आहेंत. याच घोड्या जवळ बाहेर पडण्यासाठी उत्तराभिमुख दरवाजा आहे. गर्भागृहाचे प्रवेशद्वाराचे उत्तरबाजूस एक यक्ष प्रतिमा असून तिचे पायथ्याला इस.१२४६ चा शिलालेख आहे. त्यावरून गर्भगृहाचे काम त्या अगोदरचे आहे हे निश्चीत.
गर्भगृहात एका चोरासाकृती मेघदंबरी मध्ये आयताकृती योनीमध्ये खंडोबा, म्हाळसा यांची लिंगे आहेंत. खंडोबा लिंगाचे नेर्युत्य बाजूस योनिबाहेर बाणाईचे लिंग आहे. या लिंगाचे मागील बाजूस खंडोबा-म्हाळसा यांचे मूर्तीचे पाच जोड आहेत, यातील तीन जोड मागे असून मधला जोड इस. १९३२ मध्ये सातारचे भोसलेंनी अर्पण केलेला आहे. दक्षिणेकडील जोड इस.१७७४ मध्ये नाना फडणवीस यांनी सवाई माधवराव पेशवेचे जन्माचे नवसपूर्तीसाठी पेशवे तर्फे अर्पण केलेले आहे. उत्तरेकडील जोड तंजावरचे भोसलेनी शरभोजीचे काळात इस.१७११ ते २७ चे दरम्यान अर्पण केलेला आहे. या मूर्तीचे पाठीमागे देवळीत कट्यावर मार्तंड भेरवाची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. यांचे आसनाखाली दोन मणि आणि मल्ल यांची मुंड व एक घोडा कोरलेला आहे. मनीचे अंतिम इच्छेनुसार त्याचा घोडा व मणि व मल्ल या दोघाचे अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव आसन म्हणून खंडोबाने स्वीकारले आहे. त्याचे हे अंकन केलेले आहे.मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्याचे पत्नी आहेंत. गर्भगृहात दक्षिण व उत्तर बाजूस छोट्या खोल्या असून दक्षिणेचे खोलीत देवाचे शेजघर आहे. उत्तर खोलीत तळघरात खंडोबाचे गुप्तलिंग आहे.
*
मुख्य मंदिराचे पाठभिंतीत एका कोनाड्या मध्ये कार्तिकस्वामीची स्थापना केलेली आहे. खंडोबा मणि मल्ल युद्धात खड्गद्रष्ट या असुराचा वध करणारे कार्तिकस्वामीची केलेली हि स्थापना
मुख्य मंदिराचे पाठी मागील बाजूस तुळजाभवानीचे छोटे मंदिर आहे. हि मूर्ती बसलेली व चतुर्भुज आहे. मूलत: हि रेणुकाच असल्याचे मानतात.
या मंदिराचे मागील बाजूस पंचलिंग मंदिर आहे. सदर व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. या मंदिराचे काम विठ्ठल शिवदेव यांनी इस.१७५६ मध्ये केले. मूलत: शंकर हि देवता पंचमुख असल्याचे मानले जाते, त्याचीच हि स्थापना. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार,व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते.
शेजारीच दक्षिणेस भुलेश्वराचे मंदिर आहे. बाणाईचे दर्शनाने भूललेले खंडोबा बानूचे भेटी साठी अधीर झाले व गुप्त होऊन तिचे शोधासाठी गेले. असा हा भूललेला ईश्वर भुलेश्वर नाही काय.
दक्षिणकोटाचे ओवारी मध्ये साक्षविनायकाचे स्थान आहे. पार्वतीने आपली दासी जया हिस शंकराचे पुढील अवतारात, शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते. त्यास गणपती साक्ष होता पुढे खंडोबा अवतारात बाणाईचे रुपात शंकराने जयेस वरले. पण म्हाळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रगट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण म्हाळसाने हि साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटलेवर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्ताची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तो हा साक्षविनायक. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शना शिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते.
पुढील ओवरीत एका कोनाडेत द्वीलिंग असून मागे एक झरोका आहे, येथून कडेपठार कडे जाणारी वाट दिसते, ज्या भाविकांना कडेपठारी दर्शनासाठी जाने शक्य होत नाही त्या भाविकासाठी दर्शनाची केलेली हि व्यवस्था. इथे शेजारीच बाजूला द्वीलिंग व नंदी आहे. या लिंगास काशीविश्वेश्वर म्हणतात.
पुढील ओवरीत उमाजी नाईकाचे तालीम होती असे सांगतात. पुढे पश्चिमद्वार लागते, येथून कडेपठारी जाता येते.
या दरवाजाचे उत्तर बाजूचे ओवरीत एक प्रचंड शिला दिसते हि धृतमारी. मणि मल्ला चे अत्याचाराची वर्णने ऐकून क्रोधीत झालेल्या शंकरांनी आपली जटा आपटली व त्या मधून भयानक महामारी बाहेर आली. व युद्धाचे वेळेस राक्षसाचे रक्ताचे थेंबा मधून नवीन राक्षस निर्माण होऊ लागले तेव्हा या महामारीने राक्षस सेना भक्षण केली. शेवटी तिला ऋषींनी तुपाने शांत केले, ती हि धृतमारी. शंकराचे जटे मधून बाहेर आल्याने ती गंगेचा अवतार असलेचे हि मानले जाते.
शेजारी ओवरीत विष्णूपाद आहेंत. त्याचे पुढे हनुमानाची स्थापना केलेली आहे.
येथून पुढील बारद्वारी मधून जेजुरीचे विहंगम दृष दिसते.
बारद्वारी मधेच राजदरबारा प्रमाणे असलेला मंडप लागतो. येथील दगडी काम अतिशय सुंदर आहे. याच ठिकाणी नवरात्र व षडरात्र उत्सवात घटास्थापणे वेळी उत्सवमूर्तीची स्थापना केली जाते. व पुढील भागाचा उपयोग देवाचे रंगभोगासाठी केला जातो. इथेच समोर नगारखाना आहे
मुख्यमंदिराचे मागील बाजूस उत्तरेकडे एका चोथरावर एका मेघदंबरीत शिळा दिसते ती अन्नपूर्णा. म्हाळसा बाणाईचे भांडण झालेवर खंडोबा बाणाई निघून गेले त्या वेळेस म्हाळसा दिवसा तपकरून रात्री अन्नपूर्णेच्या रूपाने जयाद्रीवर वास करू लागली ती हि अन्नपूर्णा. खंडोबा-बाणाई विवाहानंतर दोघे जेजुरीस आल्यावर क्रोधित झालेली म्हाळसा शिळा होऊन पडली असेही लोककथा मधून सांगितले जाते.
अन्नपूर्णेचे दक्षिणबाजूस तीन कमानीचे भांडारगृह आहे. उत्सवाचे वेळेस देव येथूनच प्रस्थान करतात व उत्सवाचा शेवट येथेच रोजमरा वाटून केला जातो. भाविक येथेच तळी-भंडाराचा विधी करतात. या भांडारगृहाचे बांधकाम इस. १७५६ मध्ये देवाजी चवधरी यांनी केले.
मुख्यमंदिराचे सदरेचे उत्तरबाजूस खाली एका उत्तराभिमुख देवडीत विनायकाची स्थापना केलेली आहे.
*
जेजुरी मंदिरात अनेंक घंटा असून त्या मध्ये दोन पोर्तुगीज घंटा आहेंत. त्या मधील एक घंटा मुख्यमंदिराच्या सदरे वर उत्तरेस असून.या घंटेचा व्यास ४८ सेमी. उंची ७० सेमी. व कडीची उंची १८ सेमी.आहे. या घंटेवर येशुमाता असा ल्याटिन भाषेतील लेख आहे. दुसरी घंटा महाद्वारा वरील कमानीत आहे या घंटेचा व्यास ५६ सेमी. उंची ६३ सेमी. व कडीची उंची १६ सेमी. आहे. या घंटेवर क्रॉस चे चिन्ह आहे. या घंटेचा उपयोग तास घंटा म्हणून केला जातो. या घंटा मराठ्यांनी इस. १७३९ मध्ये वसई वर मिळवलेल्या विजयाचे विजयचिन्ह म्हणून चिमाजीआप्पा व मल्हारराव होळकरांनी अर्पण केलेल्या आहेंत.
*
जेजुरी मंदिरात एक मोठी ४ फुट लांब ४ इंच रुंद व सुमारे २३ किलो वजनाची तलवार आहे. हि तलवार महीपत पानसे, रामराव पानसे या बंधूनी इस. १७५० नंतर देवास अर्पण केलेली आहे. या तलवारीचा उपयोग दसरा उत्सवाचे वेळेस दुसरे दिवशी खंडास्पर्धे साठी केला जातो.
मंदिराचे कोटावरील सज्जात जाण्यासाठी पाच जिने आहेंत. सज्जा वरून जेजुरी परिसराचे लोभस दर्शन होते.
कोटाचे ईशानेस डोगर उताराचे पुढे एका कपारीत फिरंगाई देवीचे मंदिर आहे. या परिसरात सटवाई, नागोबा इत्यादी देवांची ठिकाणे आहेंत.
—-
आठवणीतील जेजुरी. | Memorable Jejuri
सन १९५६ ते ६५ चे कालावधीत जेजुरी मध्ये अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण झाले, अशाच काही चित्रफिती च्या संकलनातून साकारलेले हे जेजुरीचे दर्शन. आपणास तत्कालीन जेजुरी गडावर घेवुन जाईल आणि खंडेरायाचे दर्शन ही घडवेल.