मलवडी
मलवडी हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुकयात माणगंगा नदीकाठी दहिवडी पासुन १२ किमी अंतरावर वसलेले आहे.
जुन्याकाळी या ठिकाणी धनगर वस्ती होती, ती मल्लेवाडी म्हणून ओळखली जात असे. ईस १४०० चे सुमारास सरदार घाडगे यांनी येथे गाव वसवले व मल्लेवाडीचे नाव मलवडी रूढ झाले. जुन्याकाळी संपुर्ण गावाला असणारा नगरकोट आता ढासळला आहे.
गाडी रस्ता थेट मंदिराचे महाद्वारात पोहोचतो, पुर्व महाद्वार हे जुने मुख्य महाद्वार असुन या महाद्वारा समोर बागाडाचा चौथरा आहे, मंदिराचे प्राकार मोठे असुन त्यास चहूबाजूस ४ दरवाजे आहेत, भव्य अशा पुर्व महाद्वारातून मंदिराचे कोटात प्रवेश केल्यावर उत्तर बाजुस अबड-धोबड चौथरा असुन यास विसावा म्हणतात. उत्सव काळी देवाचा छबिना येथे विसावतो.
पुढे पृवाभिमुख मुख्यमंदिर असुन मंदिरा समोरील दगडी मेघडंबरीत घोड्याची मुर्ती आहे. जुन्याकाळी येथे नंदीची मुर्ती असल्याचे सांगतात. हि मेघडंबरी आता मंदिराचे लाकडी मंडपात सामावली आहे. या पुढे लागतो तो लाकडी मंडप हा मंडप त्याचे कामावरून पेशवेकालीन असावा. लाकडी मंडपाचे पुढे मूळ मंदिराचा दगडी मंडप लागतो, या मंदिराचे बांधकाम सरदार घाडगे यांनी केल्याचे सांगितले जाते.
या मंडपात सुरवातीस अश्वारूढ खंडोबाची मुर्ती आहे. गर्भगृहाचे दरवाज्याचे उत्तर बाजुस देवाचा पलंग आहे.
गर्भागृहाचे दरवाज्याचे दक्षिण बाजुस एका चौथर्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मुर्ती असुन त्यांचे समोर लिंग आहेत. मंदिर निर्मिती नंतर मंदिरात बसविलेल्या या मूळमुर्ती प्रथम या गर्भगृहात होत्या. परकीय हल्ल्या पासून या मुर्ती सुरक्षित राहाव्यात म्हणून परकीय आक्रमणा वेळी या गर्भगृहातुन हलवून लपवून ठेवल्या होत्या, पुढे कालांतराने एका कोल्हाटी समाज्याचे माणसास या मुर्ती सापडल्या तो पर्यंत गर्भगृहात नवीन मुर्ती बसविण्यात आल्या होत्या म्हणुन येथे या मुर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या.
पूर्वाभिमुख गर्भगृहाचे दरवाज्याचे समोर वास्तू बांधकाम शास्त्राचा भंग करणारा एक खांब उभा आहे. कधी काळी मंडपास निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी या बसविण्यात आलेला असावा. आता मात्र हा पितळी पत्र्याने मढविण्यात आलेला आहे. यावर लोखंडी लंगर अडकविण्यात आले आहेत हे उत्सवाचे वेळी वापरण्यात येतात.
गर्भगृहात मधोमध एका उंच चौथर्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या पूर्वाभिमुख दगडी मुर्ती आहेत. गर्भगृहातील मूळ मुर्ती जुन्याकाळी परकीय आक्रमणा वेळी लपविण्यात आल्या होत्या, त्या नंतर लवकर सापडल्या नाहीत, त्या मुळे गर्भगृह रिकामे राहु नये या साठी ग्रामस्थांनी या मुर्ती स्थापन केल्या.
मुळ मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजुने खेटूनच तरटीचे झाड आहे. या झाडास खेटून एक पूर्वाभिमुख छोटी घुमटी आहे. या घुमटीत उत्तर बाजुस तरटीचे झाडाचे खोडा जवळ दक्षिणाभिमुख खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मुर्ती आहेत. हे येथील खंडोबाचे आद्यस्थान होय. येथे मार्गशीर्ष शुध्द एकादशीस देव प्रगट झाल्याची आख्यायिका आहे.
येथील एक धनगर नळदुर्ग येथील खंडोबाचा निस्सीम भक्त होता, तो येथे खंडोबाची अहोरात्र भक्ती करीत होता. खंडोबाने त्याला तुझे भक्तीने येथे वास्तव्यास येत आहे व तुझे घरातील तरटीचे घुसळखांबास पालवी फुटेल तिथे माझे वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला, व त्या प्रमाणे देव येथे आले. व वास्तव्य केले, तेच तरटीचे झाड अजूनही उभे आहे अशी जनश्रुती आहे.
या घुमटी मध्ये पूर्वाभिमुख खंडोबा व कालभैरव यांच्या मुर्ती आहेत.
या घुमटीचे दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख दुसरी घुमटी असून मंडप व गर्भगृह अशी तिची रचना आहे. मंडपात नंदी व गर्भगृहात शिवलिंग आहे.
मंदिराचे उत्तरबाजुस एक चौथरा व खांब असुन तेथे उत्सवाचे वेळी लंगर तोडला जातो.
मंदिराचे प्राकाराचे बाहेर दक्षिण बाजुस पश्चिम दिशेस पुर्वाभिमुख दत्त मंदिर असुन येथे दत्त पादुका आहेत व मागील कोनाड्यातील चौथर्यावर विष्णुची मुर्ती आहे.
उत्सव
मार्गशिर्ष शुध्द पंचमीस येथे खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा असतो, षष्टीस कुलाचार केले जातात. मार्गशीर्ष एकादशी हा येथील उत्सवाचा प्रमुख दिवस होय, या दिवशी दुपारी रथ उत्सव व पालखी नगर प्रदक्षिणा करतात, या वेळी काही मानाच्या काठ्या ही येतात, मध्य रात्री पालखी सोहळा मंदिरा मधुन प्रस्थान करुन गावात फिरतो हा सोहळा द्वादशीस सकाळी मंदिरात पोहोचतो. तेथे वाघ्या लंगर तोडतो व यात्रा उत्सव संपन्न होतो.
————————————————————————