पाली
श्री क्षेत्र पाली ही खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाह बद्ध झाले. जनश्रुती नुसार म्हाळसा नेवासे येथील तिम्माशेठ वाण्याची कन्या. साक्षात पार्वतीनेच त्याची घरी जन्म घेतला, शंकराचे दृष्टांता प्रमाणे त्याने म्हाळसेचा व खंडोबाचा विवाह पाली येथे लावून दिला.म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती असल्याचे मानले जाते. तारळी नदीच्या काठी वसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुलेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा येथे साजरा होतो. मुळात या गावाचे नाव राजापूर, येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती ती खंडोबाची निस्सीम भक्त होती तिचे भक्ती मुळेच खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रगट झाले असे मानले जाते, या पालाईचे नावा मुळेच या गावाचे नाव बदलून पाल / पाली असे झाले.
पाली हे गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरा पासून तीस किमी अंतरावर आहे सातारा – कराड मार्गावरील अतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते गाडी रस्ता थेट मंदिराचे दक्षिण द्वारात पोहोचतो,
हे दक्षिणद्वार यमाजी शिवदेव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण मंदिराचे बाह्य कोटात पोहोचतो .दक्षिणद्वाराचे पुर्व बाजूस नगारखाना असून शेजारीच हत्तीखाना आहे. येथील हत्ती वरून देवाचे लग्न वेळेस मिरवणूक निघते.येथील बाह्य आवार दगडी आहे.
या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते,
या दक्षिण द्वारातून आत गेले की लगेच पुर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे. तर द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे. ओवारीच्या एका खांबावर गणेश खंडो व महीपत खंडो पारगावकर यांचा ईस १७७२ चा शिलालेख आहे, हे बांधकाम या काळी झाले असे दिसते.
मंदिराचा संपूर्ण कोट चहुबाजूंनी ओवऱ्यानी युक्त असून त्याची उंची सुमारे २० फुट आहे कोटाची पुर्व पश्चिम लांबी सुमारे १४० फुट व दक्षिण उत्तर लांबी ८० फुट आहे .कोटास दक्षिण, पुर्व, उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव. घोरपडे, इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे.
कोटाचे पुर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा या दरवाजाचे बाह्य बाजूस दक्षिणेकडे एका चोथऱ्या वर पादुका आहेत. पुर्व दरवाज्या अलीकडे अलीकडे खंडोबाचे अश्वारूढ शिल्प बसवले आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की
उत्तर बाजूस एका मेघडम्बरीत पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा दिसते
या नंदी मंडपीच्या पुढे शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे, यती मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे .
या पुढे दिसतो तो पूर्वाभिमुख मंदिराचा सोळाखांबी मंडप या मंडपाचे सर्व खांब पितळी पत्र्याने मढवलेले आहेत, त्यावर काही चित्रे काढलेली आहेत, येथी फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख आहे .
मंडपाचे पश्चिमेस मुख मंडप असून या मंडपात दक्षिण बाजूस गणेश प्रतिमा आहे. तर उत्तर बाजूस एक छोटा दरवाजा आहे. मध्यभागी गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. येथील फरशीवर पडलोजी आबा बिन बावसेठी करदोई असा लेख आहे.
गर्भगृहाच्या दरवाज्याचे उंबऱ्यावर एक स्त्री मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्या मुळेच देव येथे आले तिचे हे स्मारक
गर्भगृहात योनी असून त्या मध्ये खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेत. या लिंगा पुढे तिवई च्या आधारे गादीवर मुखवटे ठेऊन सजावट केलेली दिसते या योनी मागे महिरप ठेवलेली आहे. तिचे पाठी मागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हेगाडीची असल्याचे सांगतात.
योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बानाईची मूर्ती स्थापन केलेली आहे.
मुख्य मंदिराचे मंडप व गाभाऱ्यावर शिखरे असून गर्भगृहाचे शिखर व मंदिराची उंची सुमारे ५० फुट आहे, या मंदिराच्या बांधकाम शैली वरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिरास खेटून एक मंडपी असून त्या मध्ये पंचलिंगाची स्थापना केलेली आहे.
कोटाचे आत मध्ये नेरुत्या बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून आत मध्ये एक उभ्या पुरुष्याची प्रतिमा आहे हिचे उजव्या अंगास अडोजी बिन कृष्णाजी सावंत असा लेख आहे. ही प्रतिमा ह्या व्यक्तीने स्थापन केली असावी.
मंदिराच्या पाठभिंतीस एक पश्चिमाभिमुख मेघडम्बरी असून त्या मध्ये भवानीची स्थापना केलेली आहे. हिला सिद्धवासिनी असेही म्हणतात.
मुख्य मंदिराचे वायव्य बाजूस कोटाचे आतील बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून ती मध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे. या मागे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत.
मुख्य मंदिराचे उत्तर बाजूस दरवाजा असून तो आकाराने लहान आहे या दरवाज्यातून बाहेरील बाजूस एक वापी आहे
.
उत्तरतटाचे पुर्व बाजूस तटाला खेटून हवालदाराची स्थापना केलेली आहे
मंदिराचे कोटा पासून थोड्या अंतरावरून तारळी नदी वाहते यात्रा उत्सवाचे वेळी नदीचा परिसर दुकाने यात्रेकरू व वाघ्या मुरुळीच्या गायन वादनाने दुमदुमून जातो.
खंडोबा म्हाळसा विवाह यात्रा
पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो, तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरा मधून विवाह साठी प्रस्थान होते हत्ती वरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळनीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस दृष केवळ अवर्णनीय. गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारळी नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समुह केवळ सुवर्णच
नदीच्य पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते. लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळनी करण्यात येते. या वेळेस भरणारी यात्रा सुमारे १५ दिवस चालते .