आदिमैलार
[ खानापूर ]
आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ‘ मल्हारी महात्म्य ‘ याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते
आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे या प्रवेशद्वारा मधून प्रवेश केल्यावर आपण आवारातील सज्ज्यावर पोहोचतो
मंदिराचे आवारास चारही बाजुने दरवाजे असुन सभोवताली ओवऱ्या काढलेल्या आहेंत पुर्वाद्वारातील फरसबंदी वरून मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी पायऱ्या आहेंत
यातील दक्षिण बाजूचे पायर्यांनी उतरताना भिंतीत एक उत्तराभिमुख देवळी असुन यात एक मल्ल प्रतिमा व इतर भग्न मूर्तींचे अवशेष आहेंत.
तर फरसबंदी खालील पश्चिमाभिमुख ओवरीत नागप्रतिमा, नंदिप्रतीमा, व उत्सवाचे हत्ती घोडे आहेंत.
मुख्य मंदिरास १६ खांबी उघडा दगडी मंडप असुन या मंडपाचे पश्चिम बाजुस पुवाभिमुख बंदिस्त गूढ मंडप आहे. त्याचे पश्चिमेस गाभारा व उत्तरेस एक खोली आहे.
गर्भगृह पूर्वाभिमुख असुन गर्भगृहात एका चोथर्यावर देवाचे पादुका असुन त्याचे मागे द्विलिंग आहे द्विलींगा पाठीमागे एका आसनावर खंडोबाची चतुर्भुज बैठी मुर्ती आहे याच्या आसनावर खाली घोडा व कुत्रा यांच्या प्रतिमा कोरलेल्या असुन आसनामागे नंदी प्रतिमा आहे दोनी बाजुस हात जोडून उभ्या असलेल्या म्हाळसा बाणाई यांच्या प्रतिमा आहेत. येथेच शेजारी धातूच्या उत्सव मुर्ती आहेत. येथील दगडी मुर्ती अलेकडील असाव्यात कारण ईस १९६० दरम्यानचे एका वर्णनात येथे खंडोबाची उभी व अश्वरूढ मुर्ती असल्याचा उल्लेख आहे, येथे मंदिर परिसरात शिलालेख आढळत नाहीत
मुख्य मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मागील कोपऱ्यात काही घुमट्या असुन तेथे शिवलिंग आहेत व दक्षिण बाजुस एक चोसोपी आहे यात्रेकरू यात्रेत उतरण्या साठी त्यांचा उपयोग करतात
मंदिराच्या कोटाचे वायव्य बाजुस दोन पुष्करणी आहेत यातील पूर्वेकडील पुष्करणीस चारही बाजुने पायऱ्या असुन भाविक येथे स्नान करतात.
या पुष्कर्णीचे पश्चिम बाजुस एक मोठा तलाव असुन त्याचे पश्चिमेस पूर्वाभिमुख ओवऱ्या आहेत या ओवऱ्याचे दक्षिणेस एका मस्जिदचे अवशेष आहेत
मुख्य मंदिराचे आवाराचे नेरुत्येस काही अंतरावर पूर्वाभिमुख कोट दिसतो याचे पुर्वद्वारा वर नगारखाना आहे या मंदिरास ज्योतिर्लिंग किंवा मुळमंदिर म्हणतात
याचे पुर्वद्वारातून प्रवेश केला की उत्तर बाजुस एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा दिसते या मेघदंबरीचे पश्चिमेस पूर्वाभिमुख मंदिर आहे शिखरयुक्त मंदिराची रचना मंडप गर्भगृह अशी आहे.
गर्भगृहात एक सयोनी लिंग असुन या लिंगास मुळलिंग म्हणतात हे खंडोबाचे स्वयंभू लिंग असुन खंडोबा प्रथम येथेच होता व खंडोबाचे मुळ स्थान असल्याचे सांगतात.
मुख्य मंदिराचे पुर्वबाजूस काही अंतरावर एक चोथरा असुन त्या चोथर्यावर पत्र्याचे विस्तीर्ण शेड आहे
त्या मध्ये एका शिखर युक्त घुमटीत पादुका व एक उभी देवीची मुर्ती आहे हिस तुप्पद माळव असे म्हणतात यातील मुर्ती आणि पादुका नवीन असुन जुन्या शेजारी बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत.
या मंदिरा पासुन काही अंतरावर माणिकप्रभू व शनीमंदिर असुन त्याच्या पुढे एका घळईत गुप्तलिंग मंदिर असुन येथून शेजारून पाणी वाहते येथे एक गोमुख आहे येथील वातावरण रमणीय वाटते.
यात्रा उत्सव
दसरा- देव पालखीत बसून छबिना निघतो हनुमान मंदिरा पासुन तो परततो
मार्गशीर्ष-
हा महिना भर यात्रा भरते या महिन्यात शुद्ध ६ ते १० पर्यंत मुख्य उत्सव असतो रोज खास पुजा बांधल्या जाऊन देवास हळद लावून बाशिंग बांधले जाते दशमी दिवशी लाकडी नदी वरून देवाची मिरवणूक मुळलिंग मंदिरा पर्यंत निघते या महिन्यात येणारे सर्व रविवारी देवाची लाकडी हत्ती वरून मुळलिंग मंदिरा पर्यंत मिरवणूक निघते. महिनाभर विविध वस्तू व गुरांचा बाजार भरतो अमावस्याचा महिन्यात शेवटचा दिवस सर्वाधिक गर्दीचा असतो