होळकर तलावाचे पूर्वेस जानाई देवीचे मंदिर असून पूर्वाभिमुख मंदिराची रचना मंडप व गर्भगृह असून गर्भगृहात जानाईची उभी मूर्ती आहे. हिला जननी असेही म्हणतात. मंदिरास कोट असून कोटाचे उत्तरेस पुष्करणी आहे, तिला जननीतीर्थ म्हणतात, तिचे मधोमध पण उत्तर बाजूस पुढे काढलेले मंडपात जननीश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे.जननी तीर्थात पूर्वेकडील रस्त्याने व जानाई मंदिराचे उत्तरेकडील कोटाचे दरवाज्यातून जाता येते.
कैलासावर शंकर पार्वती निवास करत असताना. जया नावाची दासी पार्वतीची जिवलग सखी होती. गंगा व पार्वती यांच्या विवादात ती सख्य घडवून आणत असे. तेव्हा संतुष्ट मनाने पार्वतीने शंकरांचा मार्तंडमैरव अवतार होईल. त्यावेळी तू त्याची भार्या होशील असा तीला वर दिला. शंकरांना हे समजल्यावर त्यांनी या वराचा तुलाच त्रास होईल असे सांगितले. पार्वती आपण दिलेल्या वरा वर ठाम राहिली. शेवटी शंकर पार्वतीने गणपतीस बोलावून जये समक्ष या वराचा लेख लिहीण्यास संगितले. पार्वतीने हा लेख नाकारला तर तु यास साक्ष असेल असे गणपतीस सांगितले.
पुढे मार्तंड भैरव ( खंडोबा ) अवतारात पार्वती ने म्हाळसा रूपात अवतार घेतला. व ती मार्तंड भैरवांशी विवाह बध्द झाली. व जया बाणाई रुपाने आली.
मार्तंड भैरवांनी पार्वतीने दिलेल्या वरा प्रमाणे जयेशी अर्थात बाणाई शी विवाह केला व तीला जेजुरी गडावर घेवुन आले, मार्तंड भैरवां सोबत बाणाईला पाहुन ती क्रोधीत झाली. पार्वतीस आपण जयेस दिलेल्या वराचे म्हाळसा अवतारात विस्मरण झाले. गणपतीने आपल्या साक्षीने झालेला लेख तीला दाखवला पण तीने नाकारला. व गणपतीची निंदा केली त्यामुळे गणपती तेथुन निघून गेला. मार्तंड भैरव बाणाई सह गुप्त झाले.
त्यानंतर म्हाळसा जेजुरी गडाचे पायथ्याशी तप करु लागली. दिवसभर म्हाळसा येथे तप करून रात्री अन्नपूर्णा रूपाने जेजुरी गडावर वास करीत होती. म्हाळसेच्या तपाचे ठिकाणी गंगा ही आली.
पुढे नारद जेजुरी गडावर आले तेव्हा गडावर कोणीच दिसले नाही. तेव्हा नंदीला मार्तंड भैरव कोठे आहेत हे विचारले, नंदीने गुप्त ठिकाणी नारद मुनींची मार्तंड भैरवांशी भेट घडवून दिली.
नारदांनी सर्व वृतांत समजून घेतला व गणपती कडे गेले. गणपतीची समजुत काढुन ते दोघे म्हाळसेचा शोध घेवु लागले. तेव्हा गडावरील म्हाळसेच्या विजया दासी कडुन त्यांना म्हाळसा गडाखाली तप करत असल्याचे समजले.
नारद, गणपती तपाचे ठिकाणी येत असल्याचे पाहुन म्हाळसा गंगेत लुप्त झाली, नारदांनी त्यांना ओळखले व मुळ रुपात येण्याची विनंती केली, शेवटी दोघीनी मुळ रुप धारण केले. नारदांनी म्हाळसेची समजुत घातली व जेजुरी गडावर घेवुन निघाले. गंगा व म्हाळसा दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जेथे तप केले तेथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाणास जननी तीर्थ नाव दिले. व तेथे जननीश्वर शिवलिंगाची स्थापना केली. म्हाळसा रुपी आदिशक्ती जननी चे काळाचे ओघात जानाई, जानुबाई असे नामकरण झाले.
जनश्रुती नुसार नारदांनी व गणपतीने जननी व जननी तिर्थांची स्थापना केली तो दिवस फाल्गुन शुक्ल अष्टमी मानला जातो. या तिथीना पंरपरेनुसार आजही वार्षिक उत्सव साजरा होता
प्रयाग क्षेत्रीच्या स्नानाने जे पुण्य मिळते ते येथील जननी तिर्थांचे स्नानाने प्राप्त होते. असे ग्रांथिक संदर्भ आहेत.
जुन्याकाळी या मंदिरा जवळ गावातील लोक फाल्गुन अमावश्येस जमून एका वाफ्यात सर्व प्रकारची बियाणे टाकून पाणी शिंपित असत, दुसऱ्या दिवशी चैत्र पाडव्यास येवून कोणती बियाणे तरारली आहेत यावरून या वर्षी कोणते पिक चांगले येणार आहे हे ठरवीत असत. यास गुढ्या काढणे असे म्हणत. गुढीपाडव्यास पंचाग वाचनाचा कार्यक्रम होत असे.
जानाई देवी आरती
जय देवी जयदेवी जय जय जानाई
आरती ओवाळीतो तुजला जगजननी ॥ धृ ॥
पुर्वाभिमुख तू उभी मंदिरी
दुःख भक्तांचे तुच निवारी
जयाद्री नगरी तप तु केलेसी
अन्नपुर्णा रुपे जेजुरगडी राहशी ॥ १ ॥
म्हाळसा देवी तु अदिशक्ती
नारद गजानन संगे तुजला शोधती
गंगे सोबत जेथें लुप्त तू होशी
जननी तिर्थ तेथे नारद स्थापिती ॥ २॥
स्नान जे करिती जननी तिर्थाचे
पुण्य लाभती तयांसी प्रयाग स्नानाचे
ग्रामदैवत माते तू जेजुरी चे
कृपादृष्टी राहो हे मागणे भक्तांचे ॥ ३ ॥