मराठी सण, उत्सव, परंपरा

मराठी संस्कृती मधील वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध मराठी सणांचा परिचय, वेगवेगळ्या मराठी लोककला, कलाकार, उपासक व मराठी मातीतील खेळ यांचा परिचय,

मराठी सण

गुढी पाडवा  चैत्रगौर रामनवमी  हनुमान जयंती  अक्षय तृतीया  वट पौर्णिमा  आषाढी एकादशी  गुरुपौर्णिमा  दिपअमावास्या  नागपंचमी  जिवती नाग नरसोबा  श्रीयाळ षष्टी  मंगळागौर  कानबाई  भराडीगौर  शितळा सप्तमी  नारळी पौर्णिमा  गोकुळ अष्टमी  बैलपोळा  पिठोरीअमावास्या  हरतालिका  गणेश चतुर्थी  ऋषीपंचमी  गौरी  अनंतचतुर्दशी  भुलाबाई  महालय  नवरात्र  भोंडला  ईणाई  दसरा ढेलू  कोजागिरी  दिवाळी  तुळसीविवाह  आवळी भोजन  कार्तिकी एकादशी  त्रिपुरी पौर्णिमा  चंपाषष्ठी  दत्तजयंती  वेळअमावास्या  धनुर्मास  भोगी  मकरसंक्रांत  बोरनहान  रथसप्तमी  महाशिवरात्र  होळी  रंगपंचमी  अधिकमास



मराठी सण

 


गुढी पाडवा

मानव हा एक निसर्गाचा भाग आदिम काळी मानवाचा विकास होऊ लागला. आणि आपल्या गरजा पुर्ण करणाऱ्या निसर्गाच्या अदभुत शक्तींना त्यांनी देव मानले. डोंगर, सूर्य, चंद्र, वारा, पाऊस या निसर्गातील घटकांचे त्याने पुजन सुरु केले कधी तो संतुष्ट व्हावा तर कधी तो कोपु नये म्हणून, सूर्य उदय व अस्त व पुन्हा पुन्हा हाच नेम, चंद्राच्या कला त्याने पहिल्या व उन्हाळा, पावसाला, हिवाळा हे पुन्हा पुन्हा येणारे ऋतू चक्र ही त्याने अनुभवले व या बदलांचे आधारे त्याने कालगणना करण्याचा प्रयत्न सुरु केला, विशिष्ट नैसर्गिक परस्थिती निर्माण होण्या अगोदरचे बदल त्याने समजून घेतले आणि त्याची चाहूल लागताच तो आनंद उत्सव ही साजरा करू लागला
हिवाळा संपतो आणि वसंताची चाहूल त्याला समजू लागली, वृक्ष आपली जुनी पाने गाळतात व नवीन धारण करू लागतात, पक्षी गुंजन करू लागतात, फुले बहरतात हा चक्रा प्रमाणे पुन्हा येणारा निसर्ग सोहळा त्याने अनुभवला, जीर्ण संपून जाते व नवीन जीवन जन्म घेते. जन्म व मृत्यू चे जीवन चक्र तो पाहताच होता, सृष्टी जीर्ण टाकते आणि नवीन धारण करते, हा ऋतूचा सोहळा त्याने सृष्टी चक्राची सुरवात मानली, या कालखंडातील पौर्णिमा, व अमावस्या नंतरचा दिवस त्याने या चक्राची सुरवात मानली,उत्तर भारतात पौर्णिमेनंतर तर दक्षिण भारतात अमावस्या नंतर ही सुरवात मानली गेली. व या नव जीवनाचे स्वागत तो उत्सवा मधून करू लागला यातूनच होळी, रंग पंचमी, गुडीपाडवा सारख्या सणाचा जन्म झाला, गुढी पुजन ही खरतर प्रतीकात्मक निसर्ग पुजा, वस्त्र लावून तयार केलेल्या काठ्या आपल्याला सर्वच लोक दैवतांचे जत्रेत भक्ती भावाने नाचविल्या जातात, या काठ्या मध्ये त्या देवताचे अस्तित्व मानले जाते, साडी व वस्त्र बांधुन त्यावर कलश लावून तयार केलेली गुढी धरणी मातेच रूपच. अगदी गणपती मध्ये येणाऱ्या गौराई ला देखील काही ठिकाणी कलशाचे मुखवटे करून त्यावर चेहरे काढले जातात. नवीन वस्त्र परिधान केलेली लिंब व आंब्याच्या मोहरानी व गाठी व फुलांचा हार यांनी सजलेली गुढी त्या काळातील धरतीच प्रतिक रूपच.

satvahan

इसवी सनाचा आरंभ होत असताना महाराष्ट्रातील पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाचे साम्राज्य विस्तारात होते. आजच्या मराठीचे बालरूप हळू हळू वाढत होते. त्यावेळी महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. त्याचे साम्राज्याचे वर्णन त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. असे केले जात होते. ज्ञान, कला, साहित्य या सर्वात राज्याची प्रगती होती, स्थैर्य, सुबत्ता लाभलेल्या सातवाहन राज्यांनी नवऋतूच्या या लोकरुढीला कालगणनेची जोड दिली आणि ईस ७८ मध्ये शालिवाहन शकाचे रूपाने मराठी कालगणना सुरु झाली. व चैत्र पाडवा (गुढी पाडवा) मराठी कालगणनेचा नववर्ष प्रारंभ दिन झाला. सातवाहन राज्यांचे राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे. कर्नाटक आंध्रप्रदेश मध्ये युगादी अथवा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गुडी पाडवा उत्साहाने साजरा केला जातो. नवीन कार्य आरंभ करण्यासाठी हा शुभ मुहुर्त मानला जातो, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सूर्योदयाला आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावले जाते, घराबाहेर अंगणात मोठी रांगोळी काढली जाते, दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट गुढी उभारण्यासाठी मांडला जातो बांबूची काठी घेतली जाते. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालुन तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्य लावतात. तिच्या टोकाला साडी वस्त्र व त्यावर एक कलश लिंबाचा व आंब्याचा मोहर असलेला पाला बांधला जातो. त्यावर फुलांची माळ व साखरेची गाठी बांधली जाते, व गुढी उभारून तिची पुजा केली जाते. गुढीला लिंबाचा कोवळा मोहर व गुळ यांचा नेवेद्य दाखविला जातो. गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी केली जाते. घरात पुरणपोळी केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी हळदकुंकू लावून तिची पूजा करून तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.
साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. या दिवशी मुलांनाही इळवणी घालण्याचा प्रघात काही ठिकाणी दिसतो . इळवणी म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या कोमट पाण्याने मुलांना अंघोळी घातल्या जातात
गुढीपाड्व्या विषयी काही धार्मिक कथा ही प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्‍या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. रामाने वनवासा नंतर अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. व तेव्हा पासुन ही प्रथा पडल्याचे ही सांगितले जाते.
————————————————-
*

चैत्र गौर

 

chitragour

चैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव ,चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो, पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते, शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते, खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासा साठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून . चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते, काही भागात अन्नपुर्णे ची पुजा केली जाते, गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते ,आरशीतही कलात्मकता प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे गौरीसाठी खास मखर केलेलं असते ,पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते.

 Chaitrangan rangoli

गौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्याना चैत्रागण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे.
या दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार, या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात. या दिवसान मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.
————————————
*

रामनवमी

ram navami
चैत्र शुद्ध नवमी म्हणजे राम नवमी हा श्री रामाचा हा जन्म दिवस. राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस कथाकीर्तन रामायण पारायण, असे कार्यक्रम आयोजित करतात. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. या दिवशी मध्यान्ही रामजन्माचा सोहळा होतो. कुंची घातलेला एक नारळ किवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. श्रीरामाचा पाळणा म्हटला जातो. मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला जातो.
——–
*

हनुमान जयंती

hanuman jayanti
चैत्र पौर्णिमा हा हनुमानाचा जन्म दिन मानला जातो. या विषयी मतांतरे असुन हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे ही मानले जाते तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा या दिवशी बाल हनुमान सूर्याला धरायला गेला होता, तो हा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात मात्र या दिवशी हनुमान जयंती साजरी होते, या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म सोहळा साजरा केला जातो, या सोहळ्या नंतर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. व महाप्रसाद वाटला जातो.
——–
*

अक्षय तृतीया

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. हा साडेतीन शुभ मुहूर्ता पैकी एक मानला जातो, अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा, वर्ष भर कालगणने मध्ये तिथींचा क्षय होत असतो पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथीचा कधीच क्षय होत नाही म्हणून ही अक्षय तृतीया,या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला, दानधर्म केला, मोल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या अक्षय राहतात अशी समाज धरणा आहे, त्यामुळे या दिवस महत्व पुर्ण मानला जातो. हा दिवस अखातीज या नावानेही प्रसिद्ध आहे, खान्देशात ‘आखाजी’ म्हणून हा सण ओळखला जातो.ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय्य. देव आणि पितरांना उद्देशून जी काही कर्मं केली जातात ती अविनाशी असतात. म्हणजेच ती अक्षय्य असतात. या दिवशी केलेलं दान, हवन कधीही क्षयाला जात नाही असे मानले जाते .

akshya trutiya
या दिवशी पितरांना उद्देशून अपिंडक श्राद्ध करण्याची प्रथा असल्याने हा दिवस अर्धा मुहूर्त मानतात. आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत. श्राद्ध केल्याने अल्पांशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येतं असं मानलं जातं. आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत. म्हणूनच या दिवशी अपिंडक श्राद्ध व तिलतर्पण केले जाते .
या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती वास करतात असे मानले जाते ,आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते . या दिवशी मातीचे दोन घागरी येवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केला जातो. काही लोक पाण्याने भरलेल्या कलशांचे पुजन करतात या दोन कलशाना कर्हा व केली असे म्हणतात ही आपल्या पूर्वज माता पित्यांचे प्रतीके मानून त्यांचे पुजन केले जाते त्याचे पुढे कैरी ठेवली जाते व खीर व इतर पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले.
खान्देशात या दिवशी पितरांना गोडधोड जेवण दिलं जातं. खापरावरील मांडे, आमरस, भात, काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी असते, नवी लाल घागर आणि त्यावर डांगर (खरबूज) ठेवून पूजा घातली जाते. सासुरवाशीणीना या सणाला आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात घराघरात व झाडाला हिंदोळा बांधून तरुण मुली, स्त्रिया झोके घेताना दिसतात. ग्रामीण भागात अहिराणी बोलीतील लोकगीतं गायली जातात.
आखाजीच्या सणामुळे हातमजुरी करणारे मजूर कामाची सुट्टी घेऊन पत्ते खेळतात. त्यात विविध प्रकार पैसे लावून खेळले जातात. या पत्त्यांच्या खेळात हजारो रूपयांनी उलाढाल होते . आखाजीच्या चार दिवस अगोदर आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस पत्त्यांचा अड्डा सुरू असतो. अनेक जण पत्त्यांच्या खेळात हरतात तर अनेक जण जिंकतात.

vivah
हा दिवसच अक्षय मानला जात असल्याने या दिवशी लग्न केल्यास वैवाहिक जीवन समृद्धीचे जाते असे मानतात या दिवशी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, उड़ीसा, बंगाल व महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह संपन्न होतात,
अक्षय तृतीये विषयी अनेक कथा प्रचलित असुन

ganga avtaran
गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानतात,

vyas ganpati
महर्षी व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून घेऊन याच दिवशी महाकाव्य महाभारत लिखाणास प्रारंभ केला,
वनवासातील पांडवांना श्रीकृष्णानी अन्न देणारे अक्षय पात्र दिले असेही मानले जाते,
श्री कृष्णाचा बालमित्र सुदामा पोहे घेऊन कृष्णाचे भेटीस आला व रिक्त हाताने आपल्या घरी परतला तो त्याचे घराचे रुपांतर एका महालात झाले होते अशी कथा ही या दिवसा विषयी प्रचलित आहे,
परशुरामाचा जन्म या दिवशी झाल्याचे मानले जाते. एक व्यापारी होता. तो नेमाने दानधर्म करायचा.त्याला कालांतराने दारिद्य आलं. एकदा त्याने ऐकलं तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दान-पुण्य अक्षय्य होतं. तो दिवस आल्यावर त्याने दान केलं. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने यज्ञ केलं, वैभव भोगलं. परंतु त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही.
या दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धी साठी याचः दिवशी शंकराचे व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धन देवता व कुबेर देवांचा खजिनदार झाला असे मानतात,
या दिवशी अन्नपुर्णेचा जन्म झालाचे मानतात,
खरेतर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्याचा , दानधर्म करून अक्षय पुण्य मिळविण्याचा, व अक्षय समृद्धी मिळविण्याचा दिवस, विविध धार्मिक कर्म, नवीन कार्याचा शुभारंभ व धन व संपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो, या दिवशी मिळालेले सर्वकाही अक्षय राहते या साठी हीच या मागची लोकभावना
—————————————–
*

वट पौर्णिमा

vatpornima

जेष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा, या दिवशी स्त्रिया वट वृक्षाची पूजा करतात. वटवृक्ष हा ‘मोरेसी’ कुळातला वृक्ष. वटवृक्षाची प्रत्येक पारंबी जमिनीपर्यंत जाऊन मूळ वृक्षाला आधार देते. वृक्षाचा विस्तार करते. बाह्य़ परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी वटवृक्ष आपले अस्तित्व टिकवतो. वाढतो. बहरतो. भारतीय समाज हा निसर्ग पूजक निसर्गामधील शक्तींना त्याने देव मानले, या तून नदी, डोंगर, विविध प्राणी, पक्षी, वृक्ष यांची त्याने पुजा सुरु केली, या पुजनातून त्या गोष्टींच्या अंगी असणारी विशेष क्षमता आपल्या अंगी यावी ही धरणा, यातूनच वट वृक्षाची पुजा सुरु झाली, अनेक ऋषी ना या वटवृक्षा खाली ज्ञान प्राप्त झाल्याचे आपण मानतो. वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी-द्रोण बनवले जातात. पारंब्यापासून दोर बनवले जातात. वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी-द्रोण बनवले जातात. आयुर्वेदात या वृक्षाचे अनेक औषधी गुण वर्णन केले आहेत. मोठी सावली देणारा अनेक पक्षांना निवारा देणारा हा महावृक्ष मानवी जीवनातही महत्व पुर्ण होता, वटवृक्ष मोठा झाल्यावर त्याच्या पारुंब्या जमिनीत जाऊन त्यांचे नवीन खोडात रुपांतर होते , वटवृक्ष वादळामध्ये उन्मळून पडत नाहीत. कोणत्याही परस्थितीत आपले अस्तित्व कायम ठेवणारा हा अमर वृक्ष या वृक्षा पासुन मानवी मनाने मागितले त्याचे अमरत्व. प्राचीन काळी मानवी जीवन संघर्षाचे होते टोळ्यांमध्ये होणाऱ्या लडाय्या, सत्ते साठीचा संघर्ष यातून पुरुष जीवन मृत्युच्या छायेत वावरणारे. वट वृक्षा प्रमाणे आपले विवाहिक जीवन अमर असावे ही त्या काळच्या स्त्री मनाची भावना, उन्हाळ्याच्या प्रतिकूल परीस्थितीत ही बहरणाऱ्या वट वृक्षाला फळे येऊन तो या काळी बहरात येतो, अश्या या बहरलेल्या वृक्षाला पूर्णचंद्र दर्शन होणाऱ्या दिवशी अमरत्वाचं दान मागून मागून त्याची पुजा करणे ही या मागची भावना. प्रत्येक प्रथेला कालांतराने कहाणीची जोड लाभते त्याच पद्धतीने या प्रथे विषयी रूढ झालेल्या लोक कथेला महाभारताच्या वनपर्वात ‘ सावित्री ‘ उपआख्यानाची जोड लाभली व ही पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा झाली,

Savitri_and_Satyavan

सावित्री, मद्रदेशाचा राजा अश्वपती याची कन्या. सावित्रीने पती म्हणून सत्यवानाची निवड केली होती. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध होते. त्यांचे राज्य शत्रूने घेतले होते. त्यामुळे सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला होता. ‘सत्यवान अल्पायुषी आहे, लग्नानंतर बरोबर एक वषाने त्याचा मृत्यू होणार आहे’ हे नारदमुनींकडून कळल्यानंतरही सावित्रीचा सत्यवानाशीच विवाह करण्याचा निश्चय पक्का होता. ‘काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह’, हा तिचा सकंल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.
सावित्रीला वनात राहून तिथल्या औषधी वनस्पती, कंदमुळे यांची चांगलीच जाण झाली होती. वनवासातील गोड सहवासात वर्ष संपत आले, सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच म्हणून तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्राथर्ना केली, त्रिरात व्रत केले. एके दिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. सिमधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वडाचे फांद्यांवर चढला. फांदीवर कुर्‍हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. ते पाहून सावित्रीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ‘बाळ, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वगार्त येता येणार नाही; मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर’. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, “मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल मला आदर आहे पण तू पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्य पुरवीन”. मग सावित्रीने आपल्या सासर्‍याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागितले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीवार्द यमाजवळ मागितला.सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले.पती‍शिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, “पुत्रवती भव”असा आशीवार्द देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. अशी ही दंतकथा आहे
आज मात्र आपण ज्या वट वृक्षाला अमरत्व मागत होतो, आणि ज्या वटवृक्षा खाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले, तोच वटवृक्ष आपल्याला त्याच्या प्राणाचे दान मागतो आहे, मानवी हव्यासाने प्रचंड वृक्ष तोडीने तो आता गावातून, शहरातून हद्दपार होतो आहे, त्याच्या तोडलेल्या फांद्यांना फेऱ्या मारून कोणते अमरत्व मिळणार आहे. आज गरज आहे वट पौर्णिमे दिवशी एक तरी वडाचे झाड लावून त्याचे पोषण करण्याची आज पर्यंत आपण त्याला जीवन मागितले ते त्याने आपल्या कडून कोणतीही अपेक्षा न ठेवता दिले , अगदी आपण त्याला संपून टाके पर्यंत. आज आपण त्याला जीवन दिले पाहिजे ते आपल्याच भविष्या साठी वृक्ष संपले तर आपण जगणार आहोत का ?
——————
*

आषाढी एकादशी

ashadhi ekadashi
आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते, या दिवसा पासुन भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही “शयनी’ एकादशी असे समजले जाते. या दिवशी चातुर्मास प्रारंभ होतो, तो कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. हे चार महिने विष्णु निद्रा घेतात असे मानले जाते.
या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून विविध संतांचे पालख्यासह लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लोक या दिवशी उपवास धरतात.
——-
*

गुरु पौर्णिमा

 guru pornima
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो, महर्षी व्यासांचा हा जन्म दिवस होय, इसवी सन पुर्व ३००० पूर्वी महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झाला. व्यास हे ऋषी पराशर व सत्यवती यांचे पुत्र, व्यासांचे मुळ नाव ‘ कृष्णद्वैपायन ‘ असे होते त्याचा जन्म यमुनेच्या दिव्प परदेशात झाला व त्यांचा वर्ण कृष्णवर्ण होता या वरून त्यांना हे नाव प्राप्त झाले. लहानपणीच त्यांनी तपचर्या करण्याची इच्छा प्रगट केली, पुढे हिमालयात बद्रीनाथ येथे त्यांनी वास्तव्य केले. प्राचीन वेदांचे संकलन करून त्यांनी त्याचे प्रमुख ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार विभागात रुपांतर केले. पुढे व्यासांनी १८ पुराणे व महाभारत सारख्या महाकाव्यांची निर्मिती केली. व आपल्या चार वेगवेगळ्या शिष्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याचे ज्ञानदान केले. या परंपरेतून पुढे अनेक उपनिषेद याची निर्मिती झाली. अनेंक विद्या शाखांची निर्मिती झाली, यातून मोठ्या साहित्याची व ज्ञानार्जन करणारे आश्रमाची निर्मिती झाले. व या गुरुकुलातून गुरु शिष्य परंपरा जन्मास आली. व भारतीय शिक्षण परंपरेचा जन्म झाला. व्यासांनी वेदांच्या अभ्यास शाखांचे विस्ताराचे काम केले या मुळे त्यांना वेद व्यास हे नाम प्राप्त झाले. ज्या स्थानावरून ज्ञान विस्ताराचे व दानाचे कार्य केले जाते त्यास व्यासपीठ हे नाव मिळाले. ज्ञानदान करणारा ज्या अधिकार स्थानावरून हे कार्य करतो ते व्यासांचे पीठ मानले जाते. व ते कार्य करणारा व्यासांचा अंश मानला जातो, त्या मुळे महर्षी व्यासांचा हा जन्मदिन ज्ञानदान करणाऱ्या गुरु च्या पूजनाने गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रमातील गुरुकुल पद्धतीत याच दिवशी नवीन विध्यार्थी दाखल होत व ज्ञानार्जन केलेले विध्यार्थी आश्रमातून बाहेर पडत. हा दिवस नवीन विध्यार्थीचा अनुग्रह घेण्याचा व जुन्यांचा आपल्या गुरुंना गुरु दक्षणा देण्याचा हा सोहळा गुरुपुजनाने साजरा होत असे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जनक मानले जाणाऱ्या व्यासांचा हा जन्म दिन गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रम व गुरुकुल पद्धती आता लोप पावली आहे. संगीता सारख्या क्षेत्रातच आता गुरु शिष्य परंपरा टिकून आहे, गुरु पौर्णिमेचा हा उत्सव त्याचे मुळ संकल्पने पासुन दूर चालला आहे.
———————-
*

दिप अमावस्या

Divyachi amavasya
आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरूद तिला प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना, गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करूणा भक्तात. या देवताना नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे.
ही अमावस्या विविध नावानी ओळखली जाते ‘दिवली अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे. काही ठिकाणी दीप पूजना वेळी हे वाचण्याची प्रथा आहे

आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला..आपल्या वरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवांत करावी, ते स्वतः स्वतः लावावे, खडी-साखरेनं त्यांच्या ज्योति साराव्या , दिव्यांच्या अंवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्या प्रमाणं ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येतं होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रुप धरुन झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडळेली हकिकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय..? मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू ? मी ह्या गांवाच्या राजाच्या घरचा दिवा . त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खालला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत घेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो..! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवुन घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सा~या घरांत मुखत्यारी दिली.ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दिपक पावला आणि तिच्या वरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच यातील संदेश.
अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे ‘गटारी अमावस्या ‘ आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मंग या सर्वाचे शोकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. आधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच.

———————
*

नागपंचमी

nagpanchmi
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी नागांची पुजा केली जाते, भारतीय संस्कृती ही मुळत: निसर्ग प्रधान, येथील वृक्ष, प्राणी, निसर्गाच्या विविध रूपांना देव मानून पुजा केली जाते, जगभरात नागपूजा विविध देशा मधून आढळते. भारतात नाग पुजा प्राचीन काळा पासुन आढळते., देव देवता नाग रूपाने प्रगटतात असे मानले जाते. भगवान शंकरांनी आणि त्यांच्या पुत्राने म्हणजे गणपतीने तर सर्पांना आपल्या अंगाखांद्यावर आभूषणे म्हणून स्थान दिले आहे. शिवकवचस्तोत्रात शिवशंकराला नागेंद्रकुंडल, नागेंद्रहार, नागेंद्रवलय इत्यादी विशेषणांनी संबोधिले आहे. नागेश असे महादेवाचे एक नाव आहे. कश्यप आणि कद्रु यांचे अनंत, वासुकी, तक्षक, कर्केटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिप हे आठ पुत्र अष्टनाग म्हणूनच प्रसिध्द आहेत. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर पेलली आहे असे मानतो. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नामक सर्पाचा दोरीप्रमाणे उपयोग केला होता. तर भगवान विष्णू हे तर शेषाच्या शय्येवर चार महिने गाढ झोप घेतात. अश्या प्रकारे वेगवेगळ्या देवतांचा संबंध नागाशी जोडला जातो, कुळाचा मूळपुरुष नागरुपात वावरुन कुळाचे रक्षण करतो, तसेच गुप्तधनाची राखणही नाग करतो असे ही मानले जाते. नाग, नांगर हे पुरुष तत्वाचे प्रतिक मानले जातात. सर्प हा शेतकर्यांचा मित्र मानला जातो, शेतीचे नुकसान करणारे उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य त्यामुळे उंदरांचा अपोआप बंदोबस्त होतो,
आषाढात पावसाची रिपरिप सुरु असते, या पावसाने सगळीकडे हिरवेगार झालेले असते, शेतात पिके डोलू लागलेली असतात, आणि ऊन पावसाचा लपंडाव करीत श्रावण येतो, आपल्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी सर्प उन्हात येवू लागतात आणि त्यांचे नियमित दर्शन होऊ लागते. यांच्या दंशाचे भीतीने किवां त्याचे उपयोगिते मुळे मानवाने त्यांचे पुजन सुरु केले. नागांबद्दलचे मानवाचे भीतीयुक्त प्रेम दर्शविणारे नागपूजनाचे विविध प्रकार आढळतात त्यातील नागपंचमी आपल्या कडे साजरी होते, नागपंचमीला नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नागांच्या आकृत्या काढतात. तर काही मंदिरा मधील नाग प्रतिमांचे पुजन करतात, तर काही वारुळाचे पुजन करतात. हळदकुंकू वाहून पूजा केल्या नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. काही लोक कथा मधून नाग हा भाऊ महिला त्याचे पुजन करतात असे मानतात, याच भावनेने गावागावात महिला एकत्र येवून हा सण साजरा करतात. मेहंदी, झोके, फुगडी, फेर धरून हा उत्सव साजरा होतो. जुन्याकाळी घरात अडकून पडलेल्या महिलांना मुक्त आनंद लुटण्याचा हा सण.
या सणा विषयी अनेक लोक कथा प्रचलित आहेत. सत्येश्‍वरी ची त्यातीलच एक कहाणी,
सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. शोकाकुल सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिला आनंदी करण्यासाठी अलंकार देऊन नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. नागराजाने तिला सदैव पाठीशी राहण्याचे वचन दिले ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या दिवशी महिला भावाचा उपवास धरतात, व नवी वस्त्रे घालून हातावर मेहंदी काढतात असे ही लोककथा सांगते.
श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता असे मानतात.
तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बतीस शिराळे येथे जिवंत नागांची पुजा करण्याची प्रथा आहे, या विषयी एक कथा सांगितली जाते, नवनाथ पैकी गोरक्षनाथ यांनी येथील एका घरासमोर उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली त्या वेळी त्या घरातील महिला मातीच्या नागाची पूजा करीत होती. त्यामुळे गोरक्षनाथ महाराज यांनी त्या महिलेला तुला उशीर का होतो? असे विचारले असता महिलेने नाग पंचमी असल्याने नाग पूजा करीत होते असे सांगितले त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करणार का? असे विचारले महिलेने होकार दिला लगेच गोरक्ष महाराजांनी मातीचा नाग जिवंत केला. तेव्हापासून या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे.
शेतकर्याचे मित्र असलेला नाग खरे तर सर्व मानव जातीचा मित्र आहे , त्याच्या विषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवीच, नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, तरी त्याचे नावाने दुध मागणे सुरु केले, दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. अश्या प्रकारे नागाची हत्या करून नागपंचमी साजरी करण्या पेक्षा त्यांच्या प्रतिमांची पुजा करणेच योग्य,
*

नाग नरसोबा

jivati nag narsoba
श्रावण महिन्यात महाराष्ट्रात सुवासिनी नाग बरोबर, नरसिह, जिवती, बुध व ब्रह्स्पती याची ही पुजा करतात. तसेच मारुतीला दिवे लावण्याचा प्रघातही दिसतो. सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी करतात. पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.
नरसिह, व हनुमान हे मुळचे यक्ष देव हे शक्तीचे प्रतिक मानले जातात याच्या कडून आपल्या मुलाबाळांना शक्ती मिळावी व दृष्ट प्रवृत्ती पासुन त्यांचे संरक्षण व्हावे ही या मागची भावना, बुध व ब्रह्स्पती ह्या बुद्धीच्या देवता बुद्धिमान शक्तिमान असे आपले बाळ व्हावे व या सर्वांनी त्याचे संरक्षण करावे या साठी याच्या प्रतिमांचे पुजन करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा, व मारुतीला पीठाचे दिवे घेऊन जातात,चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात, यातील जिवती पुजा व नाग पुजे विषयी एक कहाणी ही प्रचलित आहे
एक नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं मानवी वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. शेतकरी विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. शेतकर्याने तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला.

———————-
*

श्रीयाळ षष्टी

shriyal

श्रावण शुद्ध षष्टी ही श्रीयाळ षष्टी म्हणून ओळखली जाते, महाराष्ट्र व कर्नाटकात या दिवशी श्रीयाळ शेठचा शेणामातीचा राजवाडा व त्याची प्रतिमा स्थापन करून साडेतीन घटके नंतर त्याचे विसर्जन केले जाते,
ईस १३९६ ते १४०८ चे दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटक चे परिसरात मोठा दुष्काळ पडला होता, हा दुष्काळ ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ म्हणून ओळखला जातो. या वेळी या परिसरावर बिदरचा बादशहा राज्य करीत होता, सुमारे बारा वर्ष पुरसा पाऊस पडला नाही, हजारो लोक घरदार सोडून चालले होते, लहान मुले, वृद्ध, गुरे मृत्यूमुखी पडत होती सगळी कडे हाहाकार माजला होता आणि बादशहा आपल्या विलासात मग्न होता. या काळी श्रीयाळ शेठचा व्यापार देशभर चालत असे, धन संपत्ती व धान्याने त्याची कोठारे भरलेली होती, सभोवतालची परस्थिती पाहून श्रीयाळ शेट गहिवरला. त्याने लमाणांचे तांडे बाहेर पाठविले व दुसऱ्या भागातून धान्य चारा खरेदी करून आणला व दवंडी पिटून तो लोकांना मोफत अन्न धान्य वाटू लागला. संकट काळी मदतीला धावलेल्या श्रीयाळ शेटचा लोक जयजयकार करू लागले. लोक अपबृहुशाने श्रीयाळ शेटला शिराळशेट म्हणू लागले, आपल्या राज्यात लोक दुसऱ्याचा जयजयकार करत असल्याचे बादशाहाला समजले त्याने श्रीयाळ शेटला बंदी बनवून दरबारात आणले. बादशहाने त्याला या कृत्याचा जाब विचारला श्रीयाळ शेठ ने नम्रपणे आपण जे करायला हवे ते मी केले तर चुक झाली का ? असे विचारले सगळा दरबार स्तब्ध झाला. बादशाहाला आपली चुक समजली, व त्याने आपली भूमिका बदलून मी तुझा सन्मान करू इच्छितो तुला क्या हवे ते माग असे शेट ला सांगितले. माळा आता मागण्यासाठी काहीही नाही, पण आपल्या सारखे राजे होण्याची सिहासनावर बसण्याची माझी इच्छा आहे. बादशहाने त्याला सिहासनावर बसविण्याची तयारी दर्शविली पण फक्त साडेतीन घटके साठी, शेटने या साडेतीन घटकेत मी घेतलेले निर्णय पुन्हा फिरविणार नाही याचे वचन बादशहा कडून घेतले व श्रीयाळ शेट राजा झाला. सिहासनावर बसताच त्याने राज्यातील धान्य कोठारे लोकांसाठी खुली केली, गावोगाव विहिरी खोदा, तलाव बांधा, धर्मशाळा बांधा, असे हुकुम दिले, जनतेला अन्न धान्य देऊन त्यांचाच गावात त्यांचेच साठी कामे सुरु केली, प्रजा सुखी करणारे लोकाभिमुख निर्णय साडेतीन घटकेत घेऊन त्याने प्रजा सुखी करण्याचे निर्णय घेतले. श्रीयाळ शेठ सिहासनावर बसले व त्यांनी हे हुकुम दिले तो दिवस श्रावण शुद्ध षष्टीचा होता. म्हणून या दानशूर व्यापारी व साडेतीन घटकेचा लोककल्याणकारी राजा चे या राज्य कारभाराची स्मृती म्हणून हा श्रीयाळ षष्टीचा उत्सव साजरा केला जातो. ही स्मृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
———————-
*

मंगळागौरी

 mangalagur

श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे, लग्नानंतर पुढील पाच ते सात वर्ष श्रावणात हे व्रत नवविवाहिता करतात, पहिली मंगळागौर साधारणपणे माहेरी साजरी केली जाते. श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. सुवासिनी पहाटे उठून अंघोळ करून मंगळागौरीच्या पूजनाची तयारी करतात, श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. सोळा प्रकारची फुले, तांदूळ, चण्याची डाळ, जिरे सारखे सोळा दाणे, सोळा प्रकारची पत्री व पाच बिल्वदले, हळदमिश्रीत कणकेचे सोळा दिवे आणि सोळा प्रकारचे कणकेचेच देवीला अर्पण करण्यासाठी तयार केले जातात शेणाने सारवलेल्या जागेत रांगोळी घालतात. चारी बाजुस खुंट बांधून मखर पाना फुलांनी सुशोभित करतात. आत पाण्याने भरलेला तांब्या ठेवतात. मखरात शिव, गणपती, अन्नपूर्णेच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन करून तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते ,ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. मूर्तींना कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून तयार केलेले दागिने घातले जातात. अंग पूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा करून नमस्कार करतात. शेजारील वशेळ्या सुवासिनींना आमंत्रित केले जाते. त्यांच्या पायाला भिजलेली हळद लावुन, डोळ्यांत काजळ घालतात. वाण म्हणून भिजलेले वाटाणे, तांदळाचे पदार्थ विषम संख्येने भेट देतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. जेवणातील पदार्थांत मीठ पूर्ण वर्जित करून जेवणावेळी मौनव्रत परंपरेने पळाले जाते. संध्याकाळी हळदीकुंकू, तिन्ही सांजेला धुपारती केली जाते. मंगळागौरीची रात्र पारंपरिक फुगड्यांच्या असंख्य प्रकारांनी जागविली जाते. आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. म्हणली जाणारी ही गाणी माहेरचे वर्णन करणारी व सासरला टोमणे मारणारी असतात. रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात. अन्नपूर्णा ,गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वती तिचे सारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, हीच या व्रता मागची भावना.
——————-
*

रानबाई, कानबाई

 

 kanbai

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. या उत्सवाच्या आधी घराला रंगरंगोटी केली जाते, घरातील भांडी कपडे स्वच्छ केले जातात उत्सवाचे दिवशी घरातल्या देव्हार्‍यात किवा त्याचे जवळ नव्या साड्यांच्या आडोशात आंब्याच्या पानांची तोरणे व फुलांच्या माळांनी देव्हारा सजवला जातो. केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन त्यात नारळ ठेवतात त्यालाच नथ, डोळे बसवतात कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र घालतात वेणी लावुन ओढणी लावली जाते. कानुबाईला पिवळा, लाल अथवा गुलाबी पीतांबर नेसवला जातो. अश्या स्थापन करतात काही ठिकाणी कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. त्यांची पुजा केली जाते. पुजेत देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं. मग आरती, नैवेद्य दाखवतात नैवेद्यात हरभरा डाळीचा सर्वाधिक वापर असतो, खापरावरील रोट, पुरण पोळी, खीर, आमटी लाल भोपळ्याची भाजी यांचा समावेश असतो. रात्रभर कानुबाई समोर लहानांपासून मोठ्यांपर्यंत जागून देवीची आराधना करतात. महिला-पुरुष फुगड्या खेळतात. स्त्रिया अहिराणी व मराठी भाषेतील गीत गाऊन रात्रभर जागरण करतात. डफ वाजवून नृत्य करतात, यात डुबली नावाच्या वाद्याला विशेष महत्व असत.दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणतात. सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. आरती करुन अंगणात कानबाईचा चौरंग नेऊन ठेवतात. वाद्यांचे गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. इतर स्त्रिया औक्षण करतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. पुढे मुली फुगड्या खेळतात. नदीवर पोहचल्यावर पुन्हा एकदा आरती केली जाते. पूजेतील वस्तूंचे विसर्जन करून नारळ चौरंगावर ठेऊन पुन्हा वाजत गाजत घरी आणतात.
या उत्सवासाठी नोकरी निमित्त बाहेर गेलेले कुटूबिय आवर्जून घरी परततात. खानदेशातील हा महत्व पुर्ण सण मानला जातो.
—–
*

भराडी गौर

 bharadi gour

विदर्भात श्रावणाचे पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या गौरीची स्थापना केली जाते. व श्रावणाचे चोथ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी हिचे विसर्जन केले जाते. स्थापने दिवशी मुली नदीवर अथवा तलावावर जातात व तेथील वाळूचे सोबत आणलेल्या परड्यावर शिवलिंग बनवितात व गाणी म्हणत वाजतगाजत ते घरी आणतात.त्याची स्थापना करून त्याची पुजा करतात. हे शिवलिंग फक्त फुलांनी सजवितात. नंतर झिम्मा, झोके, फुगडी हे खेळ खेळतात. गीते म्हणत रोज जागविली जाते. रोज नवी फुलांची सजावट केली जाते. विसर्जना दिवशी हे शिवलिंग पालखीत घालून जलाशया कडे मिरवणुकीने नेतात. मिरवणुकीत मुली टाळ्या वाजवून गाणी म्हणतात, फुगडी खेळतात, उखाणे घेतात. या गौरीचे विसर्जन झाल्यावर सामुहिक भोजनाचे आयोजन केले जाते.
——–
*

शितळा सप्तमी

shitala saptami

श्रावण महिन्याच्या शुद्ध सप्तमीला ‘शितळा सप्तमी’ असे म्हणतात. या दिवशी शितळादेवीची पूजा करतात या दिवशी घरातील चूल, शेगडी, इत्यादी स्वयंपाक-साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरात चूल इत्यादी पेटवत नाहीत. कारण त्या दिवशी शितळा माता घरात चुलीजवळ वावरत असते, अशी समजूत आहे. आदल्याच दिवशी पुर्‍या, दशम्या, मुगाची सुकी डाळ, पंचामृत, भात, असे पदार्थ करून ठेवले जातात. दुसर्‍या दिवशी नैवेद्य दाखवून हा प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी शिळे अन्न ग्रहण करण्याची प्रथा असल्याने हिला शिळा सप्तमी असेही म्हणले जाते. या दिवशी सात कुमारिकांना भोजन दिले जाते. आपल्या नित्याच्या कार्यात ज्या गोष्टी उपयोगी पडतात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
शितळा ही मातृका देवता आहे. मातृकांचा वास हा जलाशया काठी मानला जातो. या दिवशी जलाशयांची पुजा करण्याची प्रथा काही भागात आहे. त्यांची पूजा केल्याने लहान मुलांना कसलाही रोग होत नाही. सौभाग्यप्राप्ती, दारिद्य्रनाश व संतानप्राप्ती होते अशी लोक धारणा आहे.
——
*

नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा

rakhi pornima

श्रावण महिन्याती पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. प्रामुख्याने हा सण समुद्रकाठी राहणारे कोळी बांधव साजरा करतात. वर्षाऋतूत समुद्र खवळलेला असतो व सागरी प्राण्यांच्या प्रजननासाठी उत्तम कालावधी असतो. या काळात समुद्रात नद्यांद्वारे मोठी खनिजे वाहत असल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे कोळी बांधव मासेमारी साठी आपली बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत तसेंच जहाजे सुद्धा नागरून ठेवतात. श्रावणातील पौर्णिमेनंतर पावसाचा जोर ओसरतो व खवळलेला समुद्र शांत होतो, या पौर्णिमेनंतर कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. समुद्र शांत व्हावा त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, यासाठी समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे, कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, इत्यादि कार्यकम साजरे होतात, नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मनोकामना असते. रक्षा बंधनाचे या सणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत, `पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.’ म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे मानतात. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. असे ही मानले जाते.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. हिंदू या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. यास श्रावणी म्हणतात
—–
*

गोकुळाष्टमी, दहीहंडी

krishna janma (Copy) (Copy)

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म मथुरेत कंसाच्या तुरुंगात वसुदेव देवकीच्या पोटी झाला. म्हणून हा दिवस कृष्णजयंती, वसुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला हा दिवस जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात गावागावामधून विठ्ठल मंदिरात श्रावण वद्य प्रतिपदे पासुन हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते, भजन, कीर्तन, प्रवचन या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड वीणा वादन केले जाते. वद्य अष्टमीस रात्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन केले जाते. रात्री देवळात फुलांनी पाळणा सजविण्यात येतो. पाळण्यात कृष्णाची मूर्ती ठेवतात. सर्व मंडळी जमून पूजाअर्चा करतात. पाळणा म्हणतात. कृष्णाला आवडणाऱ्या दूध साखर, दहीपोहे, लोणी साखर यांचा नैवेद्य दाखवतात. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. नवमीला गोपाळकाल्याचे वेळी महाप्रसाद होऊन हा उत्सव संपन्न होतो. भाविक लोक घराघरांतूनही श्रीकृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात. बऱ्याच लोकांचा दिवसभराचा उपवास असतो. अनेकांकडे हा कुलाचार म्हणून साजरा केला जातो.

dahi handi
गोकुळाष्टमीच्या दुसरे दिवशी दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा होतो, श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, ताक अतिशय प्रिय होते , लहानपणी गोकुळामध्ये घरांमधुन उंच शिंक्यांवर ठेवलेले, दही, दूध, लोणी, कृष्ण व त्याचे सहकारी उतरंड करून हे चोरून खात, कृष्णाचे या बाललीलेची आठवण म्हणुन हा उत्सव साजरा करतात. दूध, दही, लोणी, ताक यांचे मिश्रण एका मातीच्या मडक्‍यात भरून ती दहीहंडी उंचावर बांधली जाते. ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा आला रे आऽऽला, चे सुरात सर्व गोविंदाची टोळी एकावर एक मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. या धार्मिक परंपरेचे स्वरूप आता बदलले आहे.

——–
*

बैलपोळा, बेंदूर

bailpola
आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा व अमावस्येला प्रदेशपरत्वे बैल पोळा सण साजरा केला जातो. हा सण काही भागात बेंदूर म्हणून साजरा करतात. आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या बैल या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
पोळ्याचे आदल्या दिवशी खांदा मळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते तर काही ठिकाणी तेल लावले जाते त्याला खांदमळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. बैलांशी निगडीत वस्तू नवीन आणून बैलांवर चढवतात. शिंग तासून रंग देतात. नविन वेसन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घंटा, घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून .बैलांना सुद्धा रंग देण्याची प्रथा आहे. पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. दिवस भर बैलांना कणकेचे गोळे, तेल, सरकी इत्यादी देऊन त्यांना आराम देण्यात येतो. संध्याकाळी सर्वप्रथम शेती अवजारांची पूजा करण्यात येते. सजविलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, बैलांना गावच्या मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून गुळ- खोबरं वाटण्यात येते. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. मिरवून आणलेल्या बैलांचे ओवाळून स्वागत केले जाते. या दिवशी बैलाचे लग्न लावतात. बैलांचे लग्न लावताना चाहूर चाहूर चांगभला, पाऊस आला घरला चला असे म्हणतात. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बैलांना “ठोम्बरा” व पुरणपोळी खायला देतात.
ज्यांचे कडे शेती व बैल नाहीत ते बैलाची मातीची प्रतिमा घरी आणून तिची पुजा करतात. व शेतीत राबून अन्न निर्माण करणाऱ्या या प्राण्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
काही ठिकाणी या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी गावातले सगळे लोकं मिरवणुकीने आपापले बैल घेऊन एकत्र जमतात आणि मग गावाचा प्रमुख “पोळा फोडतात”. त्यानंतर प्रत्येक बैल घरी उत्सवासाठी जातात.
——-
*

पिठोरी अमावस्या

pithori amavasya
श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ’दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी चौसष्ठ योगिनींची पूजा करतात, यांना मातृका असेही म्हटले जाते. या मातृका चौसष्ट योनी, व चौसष्ट कला यांच्या माता मानल्या जातात. ग्राम्य भाषेत यांना आसरा, मावलाया असेही म्हंटले जाते ,त्या अर्थाने हा मातृ पुजनाचा दिवस.
हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी दिवसभर उपास करुन सायंकाळी आंघोळ करुन ही पुजा करतात चौरंगावरील कलशावर तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट सुपार्‍या चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. काही ठिकाणी पिठाच्या मूर्ती करतात तर काही ठिकाणी त्यांचे कागदी चित्र वापरतात. पिठोरीची कहाणी वाचली जाते, या दिवशी नैवेद्याला खीरपुरीचे ,पुरणपोळीचे जेवण करतात. पूजा करुन झाल्यावर आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री अतिथी कोण असे विचारते, तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात. व भोजन करतात सौभाग्य, मुलामुलींचे आयुरारोग्य, सुखसंपत्ती साठी प्रार्थना करतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळे पिठाचे पदार्थ बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असावे.
पिठोरी विषयी एक कहाणी प्रचलित असुन विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला अपत्य होत पण ती लगेच मृत्युमुखी पडत.या मुळे तिचे पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले.पुढे ती पुन्हा घरी आली.विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी अपत्य प्राप्त झाली, अश्या आशयाची ही कहाणी आहे. ज्या चौसष्ठ मातृका मुळे ही सृष्टी निर्माण झाली असे आपण मानतो त्या या सृष्टीच्या माता विषयी कृतज्ञता व्यक्त हा मातृदिन होय.
——
*

हरतालिका व्रत

hartalika
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. पार्वतीने शंकर पती मिळावा या साठी हे व्रत केल्याचे मानले जाते. कुमारिका, महिला हे व्रतकरतात.या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत., तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. देवघरा जवळ चौरंग ठेवतात. त्याला केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित करतात. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करतात शेजारी पार्वतीची मातीची मुर्ती ठेवतात. या पद्धतीने पुजेची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. निरांजन दाखविला जातो. कुमारिकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तसेच विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून भाद्रपद शुक्‍ल तृतीयेस हरतालिका व्रत करण्यात येते.
——–
*

गणेश चतुर्थी

ganesh chaturthi
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, या दिवशी गणेश उत्सवाची सुरवात होते. घराघरात पार्थिव गणेश मूर्तींची वाजतगाजत आणून स्थापना केली जाते. घरामधुन साजर्या होणार्या उत्सवास ईस १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले, या उत्सवाचे आता लोकत्सवात रुपांतर झाले आहे. हा दिवस गणपतीचा जन्म दिवस मानतात. वेगवेगळ्या अवतारानुसार त्याच्या मुख्य तीन जयंत्या मानतात. त्यातील हा एक दिवस. एकदा पार्वती स्नान करत होती, तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनविले आणि प्रवेशद्वारावर उभे करून त्याला सांगितलं कि कुणालाही महालात प्रवेश करायची अनुमती देऊ नकोस. नंतर ती स्नान करायला महालात निघून गेली, थोड्याच वेळाने भगवान शंकर आले, त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा शंकरांनी गणपतीचे मुख धडावेगळे केले कारण त्यांना माहित नव्हता कि हा आपलच मुलगा आहे , जेव्हा हि बातमी पार्वतीला माहित पडली तेव्हा ती क्रोधीत आणि दुखी झाली. तेव्हा शिव नि तिचे सांत्वन केले आणि आपल्या गणाना आदेश दिला, कि तुम्ही पृथ्वीतलावर जा आणि जो कुणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल, त्याचे शीर घेऊन या, तेव्हा गणाना हत्ती सापडला. तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले, व गणपती गजमुख झाला. पार्थिव गणेशाची स्थापना हे जुन्याकाळी व्रत होते पुढे त्याला सणाचे स्वरूप प्राप्त झाले. गणेश उत्सवाची समाप्ती भाद्रपद वद्य चतुर्दशीला होते, पण अनेक परिवारात दीड दिवसांचा ५ दिवसांचे, १० दिवसांचे, गणपती असतात.
——–
*

ऋषी पंचमी

rishi panchami
भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी पंचमी म्हणून साजरी करतात. ऋषी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, या दिवशी महिला उपवास धरतात. ऋषी स्थानी जावून स्नान करून ऋषी पुजन करतात, या दिवशी बैलाचे कष्टा शिवाय तयार झालेले अन्न ग्रहण करतात. जुन्याकाळी महिला ऋषी प्रमाणे आपल्या परसबागेत भाजी पाला, फळ झाडे लावून त्या भाज्या व फळे खात, ऋषी विषयीची कृतज्ञता त्यांचे दिनचर्ये प्रमाणे एक दिवस अनुभवणे हीच या मागची भावना
——
*

गौराई, गौरी, महालक्ष्मी

gourai
गणपती चे आगमना नंतर भाद्रपद शुद्ध षष्टी ला सायंकाळी या गौरींचे आगमन होते, सायंकाळी महिला गाणी गात नदीकाठी जातात.तेथे गौरीना अंघोळ घालतात व पुजा करून त्यांना घरी आणतात, चालीरीती प्रमाणे याची रूपे वेगवेगळी असतात कोणाकडे यांचे धातूंचे मुखवटे असतात तर काही कडे मातीचे. काही भागात त्यांना घराबाहेरील तुलसी वृंदावना पासुन घेऊन येतात. तोरणांनी व रांगोळ्यांनी घार सजविले जाते, मोठ्या आदराने तिला घरात आणले जाते. घरात उतरंड तयार करून त्यावर मुखवटा ठेवतात, व साडी नेसवून गवराई उभी करतात. अलंकाराने सजवितात काही घरात ती बसलेली असते, काही परिवारा मध्ये तीच्या सोबत तिची सखी असते. साड्या व विविध सजावटीचे साहित्याने गौर सजविली जाते, पहिल्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. तीच्या समोर विविध पदार्थ, फळे याची रेलचेल असते. रात्रभर झिम्मा, फुगड्या, फेर, उखाणे यांनी गौर जागवितात.
दुसर्या दिवशी विविध पदार्थ नैवेद्य साठी करतात. तिची पुजा केली जाते, सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, आजूबाजूचे महिलांना बोल वितात.रात्रभर गौर जागवितात.
तिसर्या दिवशी त्यांना सुतवतात. हा दिवस गौरीना निरोप देण्याचा. दही भाताची शिदोरी देऊन गौरी विसर्जन केली जाते.
——
*

अनंत चतुर्दशी

anant chaturdashi
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. घराघरात बसलेल्या गणेश उत्सवातील गणेश मूर्तींना विसर्जन करून निरोप देण्याच दिवस. या दिवशी या मूर्तींचे विधिवत पुजन व आरती करून त्यांना वाजत गाजत विसर्जनासाठी जलाशयावर नेले जाते. व त्यांचे आरती करून विसर्जन केले जाते.
या दिवशी काही परिवारात अनंत म्हणजे विष्णू याची देखील पूजा करतात यालाच अनंताचे व्रत म्हणतात. या व्रतात पाण्याने तांब्याचे कलश चौरंगावर मांडून त्यास दोन वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा नाग तयार करून ठेवतात. वरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. या पुजेत १४गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याची पूजा करतात. यास अनंत म्हणतात; अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर अनंत घरातील पुरुष व अनंती त्याच्या पत्नीने उजव्या हातात बांधतात. या व्रतात १४ या संखेला महत्व आहे त्या मुळे पूजेतील सर्व पुजा वस्तू १४ संखेत घेतात. या दिवशी एक दाम्पत्य जेवायला बोलवितात. व ओटी भरतात. सुख-शांती, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी हे व्रत करतात असा समज आहे. कित्येक परिवारात पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
——
*

भुलाबाई

bhulabai
वर्‍हाड खान्देशात साजरा होणारा हा उत्सव भाद्रपदातील पौर्णिमा ते अश्‍विनी पौर्णिमा असा महिनाभर चालतो. भाद्रपदातल्या पौर्णिमेपासून भुलाबाईच्या उत्सवाला प्रारंभ होतो. भाद्रपद पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भुलाबाई बसविण्याची जागा स्वच्छ करून ठेवली जाते . नंतर ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर लावून तेथे सुंदर आरास केली जाते. पौर्णिमे दिवशी सकाळी भुलजा-भुलाबाई याच्या मातीच्या मुर्ती आणली जातात. भुलाबाई नऊवारी साडी नेसलेली आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेला असतो. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती. भिल्लरुप घेऊन राहणाऱ्या शंकराला भिल्लीणीचा वेश घेऊन भुलवायला पार्वती आली म्हणून ती भुलाबाई व तीला भुलणारा शंकर भुलोबा अशी या नावा मागील कथा. या मुर्तीना पिवळे वस्त्र परिधान करतात. त्यांच्या मधोमध गोंडस बाळ व त्यांचे शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे. त्यांचे समोर रांगोळ्या काढल्या जातात. रोज सायंकाळी भुलाबाई-भुलोबाभोवती पोरीबाळी-लेकुरवाळी सर्वजण जमा होतात आणि फेर धरून भुलाबाईची गाणी गायली जातात. या मधे विविध देवतांचे वर्णन असते

पहिली ग भुलाबाई देवा देवा साजे
घातिला मंडपा खेळ खेळ खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वणी वणी अवसानं
अवसनेचं पाणी तस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याने वैरिला भात
जेविला कंथ लोकिला रांध
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
भुलाबाई झोके अवस्नर फुगे
भाउ भाउ केकती माया फुले झळकती
झळकतीचं एकच पान दुरुन भुलाबाई नमस्कार

मुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन अशी विविध गाणी म्हणतात. भुलाबाईचे गाणे संपले की खिरापत वाटली जातो, ही खिरापत लपवून ठेवली जाते आणि मुलींनी ते पदार्थ ओळखायचे आणि ओळखला गेला की मग त्या खिरापतीचे वाटप होते.
कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा शेवटचा दिवस या दिवशी रात्री भुलाबाई अंगणात पाटावर ठेवून रांगोळी काढून त्यापुढे ३० खिरापती ठेवतात, यात विविध पदार्थ असतात. हे प्रसाद म्हणून वाटतात. मध्यरात्री नंतर गाणी म्हणायची , टिपऱ्या खेळायच्या. नंतर चांदण्यात कोजागिरीचे दूध प्यायचे. कोजागिरी जागवून भुलाबाईची महिनाभर चालणारा उत्सव संपन्न होतो.
——
*

पितृपंधरवडा, महालय

pitra
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले जाते त्यांची स्मृती म्हणून त्या दिवसाच्या मध्यान्ह काळी श्राद्ध केले जाते, त्यांचे प्रतिमेची पुजा करून आमंत्रितांना भोजन दिले जाते. अन्नदान केले जाते. या दिवसामधील पंचमीला भरणी श्राद्धचा दिवस मानतात. नवमी ही अविधवा नवमी या दिवशी सर्व स्त्रियांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे.
अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात या दिवशी तिथी माहित नसलेल्या सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. पुर्वज्यांची स्मृती म्हणुन समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करण्याची प्रथा ही काही लोक या दिवसात पाळतात. आपल्या सभोतालीच्या चराचराची कृतज्ञता व्यक्त करणारा आपला समाज या दिवसात आपल्या पुर्वजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
—–
*

नवरात्र

navratra
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात, नऊ दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.
——
*

भोंडला / हादगा

bhondla
अश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र घट स्थापना होते. या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करतो. पावसाचा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो, अचानक ढग दाटून येतात व मोठ्याने आवाज करु लागतात. धोधो पाऊस कोसळतो आणि शांत होतो, हस्त म्हणजे हत्ती, त्याचे नक्षत्रा मधील हा पाऊस म्हणून याला ‘हत्तीचा पाउस’ म्हणतात. रब्बीच्या हंगामातील पिकं अधिक जोमाने तरारून वर यावीत म्हणून त्यांना अभ्यंगस्नान घालणाऱ्या हस्तनक्षत्राची ही पूजा. अंगणात लाकडी पाट ठेवायचा. त्यावर रांगोळीने हत्ती काढायचा किवां त्याची मुर्ती ठेवायची. या दिवसात मिळणाऱ्या फळं, फुलं आणि धान्यांनी हत्तीची रोज पूजा करायची. परिसरातील सगळ्या बायका-मुलींनी एकत्र येऊन रोज त्याच्याभोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी गायची. रोज वेगवेगळ्या प्रकारची खिरापत वाटायची आणि आज खिरापत कसली असेल, ही उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवायची. अगदी शेवटी या प्रसादाचं हासत-खेळत वाटप करायचं,
—–
*

इनाई देवी

saraswathi - enai
अश्विन शुद्ध नवमी या दिवशी इनाई देवीची स्थापना होते. या दिवशी मध्यान्ही गावचा कोतवाल पत्नी सह जोडीने शेतात मध्ये जातात त्या ठिकाणी जमिनीची पुजा करून टिळा दही भाताचा नैवेद्य दाखवून तेथील पाटीभर माती वाजत व गाणी म्हणत घरी आणतात. या माती पासुन सरस्वती ची मुर्ती तयार करतात,त्यावेळेस असणाऱ्या नक्षत्रा प्रमाणे घोडा, हत्ती अशी तिची वाहने बनवितात. तिची स्थापना करून तिची पुजा करतात. विविध फुले, पाने, फळे यांनी सजवितात. रात्रभर इनाई देवीची गाणी म्हणून रात्र जागवितात. दुसरया दिवशी सकाळी दसऱ्याला इनाई ची मिरवणूक काढली जाते. ती गावाचे मारुतीला नेली जाते. तेथून ती गावच्या चावडीवर विसावते. जुन्याकाळी या ठिकाणी रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती. दुसरया दिवशी इनाई वाजत पुन्हा शेतात नेली जाते तिथे खड्डा खणून त्यात तिचे विसर्जन केली जाते. ही उत्सव प्रथा आता पुर्णपणे बंद झाल्याचे दिसते
——
*

दसरा

dasra

बरसणारा पाऊस थंडावत जातो दिवस भरल्या गर्भवती सारखी सृष्टी सतेज हरीतकांती मय झालेली असते आकाश निळाईने दाटून जाते हिरव्यागार धरेवर पडणारे ऊन साऱ्या सृष्टीला लोभस वाणे बनवते या पार्श्वभुमीवर नवरात्राचे रूपाने आदिमाया शक्तीचे आगमन होते खरेतर ही निसर्गाची धरतीची पुजा नवरात्रात देवीचे तीन रूपे पुजली जातात कुमार रूपातील सरस्वती गृहिणी रूपातील लक्ष्मी व कर्ती सवरती दुर्गा ही जशी ज्ञान समृद्धी शक्तीची प्रतिक रूपे तशीच निसर्गाचे जीवनातील प्रवासाची ही प्रतीके याच रूपातील आपण पुजा करतो या नवरात्राची सांगता होते ती विजयादशमीने
दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो हा भारताच्या कानाकोपर्यात साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती भिन्न पणते साजरा करण्यातील श्रद्धा मात्र सारखीच शमी पुजन, अपराजिता पुजन, शस्त्र पुजन, पाटीपुजन सीमोलंघन सोने लुटणे अश्या विविध अंगाने दसरा साजरा होतो प्रत्येक परंपरेमागे कथा मात्र निश्चीत आहे
प्राचीन काळी रघु राजाने मोठा पराक्रम करून समुद्र वलयांकित पृथ्वी जिंकून घेतली या नंतर त्याने विश्वजित यज्ञाचे आयोजन केले आपल्या पराक्रमाने मिळवलेले सर्व दान करून टाकणे हा यज्ञा मागचा उद्देश रघु राजाने आपले सर्वस्व दान केल्यावर त्याचे कडे एक कोत्सं नावाचा याचक आला व त्याने आपल्या गुरूला गुरु दक्षिणा देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या राजाकडे काहीच शिल्लक नव्हते हे पाहून हा याचक राजास आशीर्वाद देऊन परत निघाला पण राजाने त्याला थांबवले व पराक्रमाने धन मिळविण्यासाठी त्याने स्वर्गावर स्वारी केली या स्वारीने भयभीत झालेल्या देवांनी स्वर्गातून पृथ्वीवर सुवर्णमुद्राचा वर्षाव केला तो शमी च्या झाडावर पडला याचक कोत्स याने आपल्या संकल्पित दान एवढ्याच मुद्रा घेतल्या उरलेल्या मुद्रा रघु राजाने आपल्या प्रजेस लुटावयास लावल्या हा दिवस अश्विन शुद्ध दशमीचा होता ही सोनेरी स्मृती विजयादशमी दिवशी शमी वरील सोने लुटण्याचे प्रथेने सुरु झाली
रामायणा मध्ये दसऱ्या दिवशी रामाने रावणाचा वध केला असे सांगितले जाते
अज्ञात वासात जाताना पांडवानी आपले शस्त्रे शमी चे झाडावर लपवून ठेवली होती व अज्ञातवास संपल्यावर दसऱ्या दिवशीच त्याने आपली शस्त्रे शमी वृक्षावरून काढून पुन्हा धारण केली व कौरवांवर मोठा विजय मिळवला
या मुळे दसऱ्याला अपराजिता देवीची पुजा करण्याची प्रथा चालत आली आहे या देवीचा वास शमी वृक्षांचे मुळाचे मातीत असतो असे मानले जाते हिच्या या दिवशीच्या पूजनाने हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात विजय मिळतो असे मानले जाते
दसऱ्याला शस्त्र पुजानाचीही परंपरा आहे अनेक कारागीर या दिवशी आपल्या उपकरणांचे पुजन करतात
या दिवशी सरस्वतीचे पुजन करून म्हणजेच पाटीचे पुजन करून अध्ययनास सुरवात करणे शुभ मानले जाते
प्राचीन काळी महिषासुर नावाचा दैत्य फार माजला होता त्याचे दहशतीने देवही भयभीत झाले होते शेवटी ब्रम्हा विष्णू व महेश यांनी आपल्या शक्तीच्या अंशा पासुन सुसज्ज अशी शक्ती देवी निर्माण केली व ती महिषासुराचे विनाशाला पाठविली या शक्ती देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी पर्यंत युद्ध करून महिषासुराचा वध केला या विजयाचा आनंद उत्सव म्हणजे दसरा
महालक्ष्मी देवीने ही कोल्हासुरा वर याच दिवशी विजय मिळवला
अनेक राजे आपल्या मोहिमा या दिवशी सुरु करीत आपल्या राज्याचे सीमोलंघन करून त्यांचा साम्राज्य विस्तार करीत असत तर लोक कलाकार आपल्या तमाशा संगीतबारी सारख्या कलासंचाचे दौर्यांना सुरवात करीत असत
शोर्य, समृद्धी, ज्ञान या सर्वांचा प्रारंभ या दिवशी केला तर आपणास निश्चत यश मिळणार ही लोकभावना, समृद्धीने नटलेल्या निसर्गाला साक्षी ठेऊन समृद्धी विजयाकडे वाटचाल सुरु करण्याचा संदेश देणारा हा सण म्हणूनच लोकमन म्हणते
‘ दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा ‘
—–
*

ढेलू

dhelu
विदर्भ मराठवाड्याचे काही भागात अश्विन शुद्ध दशमी (दसरा) ते कोजागिरी पौर्णिमा या दिवसात मुली साजरा करतात. दसऱ्याला शेतातील अथवा नदीतील माती आणून त्याचा पुतळा बनवितात. एका घरात स्थापना करून त्याची पुजा करतात. रात्री गाणी म्हणतात लोकां कडून शिधा गोळा करतात. कोजागिरी दिवशी गोळा झालेल्या शिध्याचा भंडारा करतात. व ढेलूचे विसर्जन करतात.
—-
*

कोजागिरी

moon rise jejuri
पाऊस संपतो सगळी धरती हिरव्या वनराई ने नटलेली असते रानात डोंगरात अनेक फुलांनी विविध रंगानी उधळण केलेली आहे आणि फुलपाखरांचे विहाराने आणि पक्ष्यांचे किलबिलाटाने डोंगर दर्या गुंजत असतात निळ्याभोर आकाशात कुठे कुठे ढग विहरत असतात शेतामध्ये पिके डुलत असतात अवघी धरती संपन्तेने नटलेले आहे या अशा वातावरणात समोर दिसणाऱ्या सुखी भविष्या मुळे मानवी मन डोलत असते अश्यातच कोजागिरी पुनवेची रात्र समृद्धीचा दुग्धशर्करा योग घेऊन आपल्या दारी येते या रात्री साक्षात लक्ष्मी आकाशात विहार कर्ते व पाहते की कोण जागे आहे ‘कोण जागृती’ म्हणजेच कोजागिरी या रात्री लक्ष्मी आनंदाने बागडणार्या निर्मल मनाच्या निर्मल घरात वास्तव्य कर्ते म्हणून कोजागिरी दिवशी ती आपल्या घरात यावी म्हणून सर्व लोक तिच्या स्वागतासाठी जागृत राहतात. हा दिवस नवान्न पौर्णिमा म्हणून ही ओळखला जातो. या दिवशी रात्री घराचे अंगणात गोवर्यांवर दुध तापविण्यास ठेवतात, विविध खेळणी रात्र जागवितात, दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहतात चंद्राचे पुजा करून दुध सर्वाना वाटतात.
——-
*

दिपावली

dipavali
अश्विन वद्य एकादशी पासुन दीपावलीला सुरवात होते. रात्रीच्या अंधाराला चीरवून स्वताचे प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मंगलाचे प्रतिक मानला जातो. याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोस्तव, निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धी च्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हो सोहळा. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढुन पणत्या लावतात घरांचे दारात आकाशदिवे लावतात, प्राचीन साहित्यात या रात्रीचा वर्णन यक्षरात्र असे आहे. दिव्यांचा हा सोहळा दिवाळी संपे पर्यंत रोज सुरु राहतो.

वसुबारस

vasu baras
अश्विन वद्य द्वितीयेचा दिवस हा गाय गुरांची बारस म्हणून ओळखतात, या दिवशी महिला उपवास धरतात, सायंकाळी गोठ्यातील गाई वासरे म्हशी इत्यादी गुरांना सजविले जाते व त्यांची पुजा केली जाते, गोड धोड खायला देतात, या दिवशी बाजरीची भाकरी व गवारीची भजी असा नैवेद्य असतो. ज्या परिवारात गुरे नसतील ते दुसरीकडे जाऊन गुरांची पुजा करतात, तर काही ठिकाणी त्यांचे प्रतिमांची पुजा केली जाते. आपल्याला दुध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्या प्रती कृतज्ञता वक्ता करणारा हा दिवस.

धनत्रयोदशी

dhantrayodashi
या दिवशी धन सोने यांची सायंकाळी पुजा करतात, या दिवशी धन्यांना विशेष महत्व असते, या दिवशी त्यांची पुजा केली जाते. या दिवशी यम दीपदान केले जाते. एकदा यमदूतांनी अपमृत्यूने एखाद्याचे प्राण घेताना खूप दुख होते असे यमास सांगितले, तेव्हा या दिवशी जो माळा दीप लावेल त्याला अपमृत्यू येणार नाही असे वचन दिले, म्हणून या दिवशी यमास दक्षिण दिशेस दिव्यांचे तोंड करून दीपदान करतात. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

नरक चतुर्दशी

narakasur vadh
श्री कृष्णाने या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध केला, व प्रजेला त्याचे त्रासातून मुक्त केले. म्हणून हा दिवस साजरा करतात. या दिवशी पहाटे उठून अभ्यग स्नान करतात या दिवसा पासुन अभ्यग स्नानास सुरवात होते.

लक्ष्मी पुजन

laxmi pujan
अश्विन अमावस्या दिवशी घरोघर लक्ष्मीपुजन होते. सायंकाळी धान्य, धन, सोने यांचे पुजन करतात. चोरंगावर कलश, लक्ष्मी प्रतिमा मांडून त्यांचे विधिवत पुजन करतात, व्यापारी वहीपूजन करतात, लोकांना पानसुपारी साठी बोलवितात. महिला घरात कुंकवाचे कमळाचे चित्र काढून त्याची पुजा करतात, या दिवशी केरसुणीची पुजा केली जाते, फटके व हवाई दारूकाम यांची आतिषबाजी होते. दिवाळीतील हा दिवस मोठ्या दिमाखात साजरा होतो

बली प्रतिपदा

baliraja
कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी विक्रम सवस्तर या कालगणनेच्या नव वर्षाचा प्रारंभ होतो, हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, काही व्यापारी या दिवशी वही पुजन करतात. या दिवशी बली राज्याची रांगोळीने चित्र काढतात. व त्यांची पुजा करतात व इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताचे बांधावर खड्डा करून पुरतात, या दिवशी गोवर्धनाची ही पुजा करतात. काही ठिकाणी बळीची अश्वरूढ प्रतिमा करून त्याची पुजा केली जाते. असा हा प्रतापी लोक कल्याणकारी राजा बळीचे पूजनाचा दिवस.

भाऊ बीज

bahubij
कार्तिक शुद्ध दितीय म्हणजे भाऊबीज या दिवसाला यम दिव्तीया असे ही म्हणतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. या दिवशी यमाने आपली बहिण यमी हिचे घरी जाऊन टिळा ओवाळणी घातली असे मानले जाते. दीपावलीचा हा शेवटचा दिवस.
दीपावलीत लहान मुले घरात मातीचे किल्ले करतात. या वर शिवाजी महाराज, मावळे यांच्या मातीच्या मुर्ती बसवून त्या काळातील देखावा उभा करतात. जुन्याकाळी ग्रामीण भागात दिवाळीत अंगणात गोप गवळणी याच्या मातीच्या प्रतिमा करीत, व त्यांचे मध्यभागी बळीची मुर्ती तयार करीत. व देखावा उभा करून त्याची पुजा करण्याची प्रथा होती, काळाचे ओघात या प्रथेचे शिवाजीचे किल्ल्यांचे रुपात रुपांतर झाले आहे.
——-
*

तुलसी विवाह

tulsi vivah
कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाह करतात पण मुख्यत: तो व्दादशीला केला जातो. श्रीकृष्ण व तुळशी यांचा हा विधिवत विवाह सोहळा असतो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. भोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्‍या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारतात. तिला सौभाग्यलेणे, साज, वस्त्र देऊन सजवतात. तुळस आणि विवाहासमयी एका बाजूस श्रीकृष्‍ण तर दुसर्‍या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्‍ये अंतरपाट धरला जातो. सर्वांना अक्षता वाटल्‍या जातात. मंगलाष्‍टके म्‍हटली जातात व श्रीकृष्‍ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. या दिवसापासून लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते.
तुळशीच्या जन्म विषयी व लग्ना विषयी अनेक कथा आहेत त्यातील ही एक लोककथा तुळशी ही पूर्वजन्मी श्रीकृष्णाची प्रिय सखी होती. ती श्री कृष्णा सोबत असताना राधेने तीला पाहीले व तु माणूस म्हणून जन्म घेशील असा शाप दिला, या मुळे कृष्णाला वाईट वाटले व मानव जन्मात ही तुला माझी प्राप्ती होईल असे वचन दिले. पुढे तिने एका गरीब परिवारात जन्म घेतला ती खूप काळी होती. हिला वर मिळत नाही म्हणून तीच्या पित्याने तीला घरातून हाकलून दिले. व ती पंढरीस पांडुरंगाचे सवेत राहिली. पुढे ती जीवनाला कंटाळली व भुमीत गडप झाली ती गडप होतानाच विठ्ठलाला आपले पुर्व अवतारातील वचन आठवले, त्यांनी तिचे केस धरून वर ओढले तर तुळशीचे रोपवर आले. तेव्हा आपले वचन पुर्ण करण्यासाठी या झाडाशी लग्न करून पुर्ण केले. म्हणून कार्तिक द्वादशी पासुन तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा सुरु झाली. असे मानतात.
——–
*

आवळी भोजन

avali bhojan
दिवाळी संपल्यावर आवळी भोजन चालते, कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमे पर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजना पूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्घ्य देऊन झाडाची पूजा करतात. झाडाच्या ४ बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्या संबधी श्लोक किंवा गाणी म्हणुन सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. उखाणे घेतात, विविध खेळ खेळतात.
——-
*

कार्तिक एकादशी

kartiki
कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी, या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे ही म्हणतात. या दिवशी चातुर्मास समाप्ती होते. श्री विष्णु चातुर्मासा तील आपली निद्रा पुर्ण करून या दिवशी जागे होतात. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वारकरी या दिवशी उपवास धरतात.
——
*

त्रिपुरी पौर्णिमा

tripuri
कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. शिव व विष्णू यांची या मध्यरात्री भेट होते असे मानतात म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. हा दिवस दीपोत्सवाने साजरा करतात, या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. मंदिरामध्ये दिपमाळा पेटविल्या जातात व पणत्या लावुन उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. शंकराची पुजा करतात नंतर पितळेच्या दीपपात्रात अठरा धाग्यांनी बनविलेल्या ७५० वाती तुपात भिजवून त्यांनी देवाची आरती करतात. या वातीस त्रिपुरवात म्हणतात. ही वात जाळणे हे एक व्रत आहे. या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुरांचा नाश केला. त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.
——–
*

षडरात्र घट,चंपाषष्टी

champashashti
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी या सहा दिवसाचे कालावधीत ज्यांचे कुलदेवत खंडोबा आहे. अश्या घरामधील देवघरात घट स्थापना केली जाते, देवघरा समोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे ताम्हन ठवले जाते. या ताम्हनात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने नागवेलीची पाच पाने बांधली जातात व कलशाचे तोंडाला आता मधून पाच पाने ठेवली जातात कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पुजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घट स्थापणे पासून घट उठे पर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात, व रोज पुलांची माळ घाटावर सोडतात. शुद्ध पंचमीस सायंकाळी बाजरीच्या पीठाचे पाच दिवे व दोन मुटके पत्रात घेऊन देवास ओवाळतात व ते पात्र देव घरा समोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात. षष्टी दिवशी देवाची पुजा केली जाते व भरीत ( वांगे व कांदा यांची भाजी ) कांद्याची पात, रोडगा (बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी, पात, दुध घालून केलेली दामटी ) यांचा नेवेध्य दाखवतात व पुरण पोळीचा ही नेवेध्य दाखवतात तसेच पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेल्या पाच दिव्यांनी व दोन मुटक्यांनी देवास ओवाळतात व तळी उचली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नेवेध्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात
——-
*

दत्त जयंती

datta janma
मार्गशीर्ष पौर्णिमा हा दत्तजयंतीचा दिवस या दिवशी दत्त मंदिरातून जन्म सोहळ्याचे आयोजन करतात. कथाकीर्तन व मूर्तीला विविध शृंगार केले जातात, सायंकाळी कुंची घातलेला एक नारळ किवा मुर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. पाळणा म्हटला जातो. प्रसाद म्हणून महाप्रसाद देतात. घरामधून या दिवशी उपवास धरतात सायंकाळी दत्त मुर्ती अथवा प्रतिमेची पुजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. दत्त अवतार व जन्म विषयी कथा प्रचलित आहे. महर्षी नारद भगवान शंकराची पत्नी उमा, विष्णूची पत्नी रमा आणि ब्रह्मादेवाची पत्नी सावित्री यांना अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिच्या सतीत्वा विषयी आपल्या पत्नींना खूप गौरवपर सांगितले. त्यामुळे या तिघींच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. या तिघींनी अनसूयेचे सत्त्वहरण करण्याचे ठरविले. तिघींनी आपल्या पतींना अत्री ऋषींच्या आश्रमात नसताना अतिथिवेषात तिच्याकडे पाठविले. अनसूया एकटीच घरी होती.अनसूयेने तिघांचे स्वागत केले आणि त्यांना भोजनाची विनंती केली. त्या अतिथींनी तिला सांगितले की, तूर जर विवस्त्र होऊन भोजन वाढीत असशील तरच आम्ही भोजनाचा स्वीकार करू. अतिथींना विन्मुख होऊन पाठवणे योग्य नव्हे, ही गोष्ट अनसूयेला माहीत होती. तिने पतिस्मरण केले आणि या तिन्ही अतिथींवर तीर्थ शिंपडले. त्याच क्षणी त्या तिघांची बालके झाली. मग अनसूयेने त्यांना भोजन वाढले. मातृत्वाच्या वात्सल्याने तिन्ही बालके संतुष्ट झाली. इकडे ब्रह्मा, विष्णू व महेश परत आले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी काळजीत पडल्या. अखेर पतीच्या शोधार्थ त्या अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांना चमत्कार पहावयास मिळाला. सतीत्वाच्या तेजामुळे अनसूयेने त्यांच्या पतींची तीन बालके बनविली होती. त्यांनी अनसूयेची क्षमा मागितली. अनसूयेने त्यांचे ब्रह्मा, विष्णू, महेशात रूपांतर केले. अनसूया सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण झाली होती. देवांनी अनसूयेच्या उदरी तिच्या इच्छेप्रमाणे जन्म घेण्याचे मान्य केले. अनसूयेला एक बाळ झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे अंश ते हे दत्तात्रय. प्रकटले.
——
*

वेळ अमावस्या

vel amavashya
मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या, ही दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द येळ्ळ अमावस्या म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश वेळ अमावस्या. या दिवशी शेतीत उत्पादित होणाऱ्या सर्व बाबींची पूजा केली जाते या सोहळ्याला सकाळीच सुरवात होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक रंगविलेल्या माठा मध्ये अंबिल भरून घेतले जाते, ज्वारी व बाजरीचे उंडे, पुरण पोळी, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भाजी यांचा नैवेद्य केला जातो. व हे सगळे घेऊन सर्व परिवार शेतावर जातो. घरातील प्रमुख व्यक्ती डोक्यावर घोंगडी घेते व त्यावर अम्बिलाचा माठ घेऊन शेताला वेढा मारते, यावेळी मुलर पुढे ताटली वाजवितात तर एक व्यक्ती सोबत आणलेल्या नैवेद्य काला करून शेतात शिंपडते, सर्वजण तोंडातून ‘हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला’, असे म्हणतात शेवटी एका झाडा खाली येतात.तेथे खड्डा खणतात माठाची पुजा करतात. व सर्व पदार्थ प्रसाद म्हणून वनभोजनाचा आस्वाद घेतात ,या सणादिवशी ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शेवटी माठ खड्यात पुरला जातो. त्यावर पाच खडे ठेऊन पंच महाभूत म्हणून त्यांचे पुजन केले जाते काही ठिकाणी शेतात कोप करून त्यात मातीने प्रतिमा तयार केली जाते व त्याची पूजा होते.
बहारात आलेली तूर.. घाटय़ात येऊ लागलेला हरभरा.. हवेच्या तालावर नाचणारा गहू.. पोटऱ्यात आलेली ज्वारी अन् चोहीकडे हिरवेगार आणि प्रसन्न निसर्ग वातावरण! अशा वातावरणात शेतकरी ऊन, वारा, पाऊस या मोठय़ा शक्तीसमोर नतमस्तक होतो, आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्ग देवतेचीच ही पुजा.
—–
*

धुंधुर मास / धर्नुमास

dhundur mas
सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशित प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धर्नमास म्हणून ओळखला जातो. यास धुंधुर मास असेही म्हणतात. हा काळ थंडीचा असतो वातावरणातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गुळाच्या पोळ्या मुगाची खिचडी तिळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू वांग्याचे भरीत लोणी इत्यादी उष्णतावर्धक पदार्थांचा नैवेद्य करून देवतेस दाखवावयाचा व सूर्योदय बरोबर अशा पदार्थांवर ताव मारायचा असा हा उत्सव असतो. गावाजवळील निसर्गरम्य वातावरणात आपल्या मित्र मंडळीना वनभोजनाची तयारी करून एकेदिवशी सकाळी एकत्र बोलवायचे व गप्पांचा फड जमवत थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांचा आस्वाद घेण्याची पहाटेच्या वनभोजनाची ही प्रथा आता अस्तंगत होत आहे.
——
*

भोगी

bhogi
‘मकर संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सकाळी आंघोळीचे पाण्यात स्नान करते वेळी तीळ टाकतात. सर्व जण या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. सूर्याची पूजा करतात, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी याची एकत्रित केलेली भाजी करतात या भाजीस खेंगाट असे म्हणतात. यांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवून तीला जेवणानंतर विडा व दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे. तसे शक्य नसल्यास तीला शिधा दिला जातो या प्रथेस भोगी देणे असे म्हणतात.
——
*

मकर संक्रांत

makar sankranti
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे याला ‘संक्रमण’ म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. या दिवशी सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो, या दिवशी तीळगुळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी प्रथा आहे आहे. तिळगुळ देताना ‘तीळगुळ घ्या गोड बोला’.असे म्हणतात. मकरसंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो. सुवासिनी ह्या दिवशी प्रथम देवाला सुगडाचा वसा देतात. लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती देवाला वाहतात याला सुगडाचा वसा देणे अथवा ओवसणे असे म्हणतात. या नंतर सुवासिनींना एकामेकीना ओवसतात. नवविवाहित मुलींना हलव्याचे दागिने घालतात. सायंकाळी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. ओवसणे चा कार्यक्रम होतो नंतर त्यांना तिळगुळाच्या वडया किवा तिळाचा हलवा देतात. चमचे, वाट्या, निरांजन,डब्या, पुस्तके, वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला आवा लुटणे किवा संक्रात लुटणे असे म्हणतात. संक्रांति पासुन सुरु झालेला हा सण सोहळा रथसप्तमीपर्यंत चालतो.
या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तरायणामध्ये आपल्या देशात अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. व दिवस हळू-हळू वाढू लागतो, ही वाढ तिळा तिळाने होते असे मानले जाते, म्हणून या दिवशी तिळा प्रमाणे आपल्यातील स्नेह वाढवा व गुळा प्रमाणे त्यात गोडवा असावा या साठी एकामेकांना तिळगुळ देऊन ‘तीळगुळ घ्या गोड बोला’ असे म्हणतात.
——
*

बोरनहाण

bornahan
हे मकर संक्रांति ते रथसप्तमी पर्यंत करतात, हा लहानमुलांचा कौतुक सोहळा असतो. एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे ‘बोरनहाण’ केले जाते. त्यांना त्यांना हलव्याचे दागिने घालून नटविले जाते. पाटावर बसवून महिला त्याचे औक्षण करतात. व सर्वजण बोरे, ऊस, हरभरे चुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून त्यांनी बाळास अंघोळ घालतात. यालाच बोरनहाण असे म्हणतात.
——
*

रथसप्तमी

rath saptami
माघ शुध्द सप्तमीला रथसप्तमी म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदे पासुन महिला उपवास धरतात. रोज सकाळी सुर्यौद्या बरोबर महिला उगवत्या सूर्याची पुजा करतात. रथसप्तमी पर्यंत उपवास धरतात. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यावर एक पाट
ठेऊन पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात. व त्याची पुजा करतात पूजेत तांबडे गंध, तांबडी फुलें यांचा समावेश असतो, नैवेद्याकरिता खीर करतात. त्यानंतर अंगणांत गोवर्‍या पेटवून त्याच्यावर मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे दूध उतू जाईपर्यंत ठेवतात.
——
*

महाशिवरात्र

shivratra
माघ कृष्ण चतूर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सृष्टी मिर्मिती वेळी शंकरांनी रात्री शंकरांनी रुद्र अवतार धारण केल्याचे मानले जाते, या दिवशी सर्व शिव मंदिरे भाविकांनी गजबजून जातात, लोक उपवास धरतात शंकरास पुजा करून बेल अर्पण करतात या दिवशी कवठाचे फळ महत्व पुर्ण मानतात ते या दिवशी फराळात घेतलेच जाते. महिला या रात्री शिवासमोर शिववात लावतात . ही वात अखंड सुतापासून केलेली ७५० पदरांची असते. महाशिवरात्री विषयी एक कथा प्रचलित आहे. विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता .एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी शिकारी एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे लिंग होते व ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली. शिकारी बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व ती त्याला म्हणाली अरे शिकाऱ्या जरा थांब! मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांना भेटून येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. शिकाऱ्याला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी शिकाऱ्या कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळे त्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व शिकाऱ्याला हरिणीला बछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले. तेव्हा पासुन या दिवशी रात्री जागरण करून शिवपूजा प्रघात पडल्याचे मानले जाते.
—–
*

होळी, धुलीवंदन

holi

मराठी वर्षाचे सरते शेवटी येणारे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण यातील फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, या रात्री लाकडे गोवर्या यांचे दहन करून बोंब ठोकून होळी साजरी केली जाते. हा सण संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो. होळी विषयी अनेक कथा प्रचलित आहेत

हिरण्यकशपू नावाचा एक राक्षस होता, तो स्वताला देव समजत असे संपूर्ण राजभर सर्वांनी त्याची पुजा करण्याची त्याने सक्ती केली होती, पण त्याचाच पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्ती करू लागला, क्रोधीत हिरण्यकशपू ने त्याचा अंत करावायचे ठरविले, हिरण्यकशपूची बहिण होलिका हिला अग्नी पासुन संरक्षित राहण्याचे वरदान होते , यांचा उपयोग करून त्याने अग्नी पेटवुन होलिकेला प्रल्हादास मांडीवर घेऊन अग्नीत बसावयास लावले, अग्नीत प्रल्हादाचे दहन करावे हा त्याचा हेतू होता. पण प्रल्हाद सुखरूप राहिला व होलिका दहन झाली आपल्या शक्तीचा दुरुपयोग केल्याने ती दहन पावली, वाईट विचारावर सद्गुणांनी विजय मिळविला म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरु झाली असे मानतात
होळी विषयी कृष्णाची कथा प्रचलित असुन कृष्णास लहानपणी पुतना नावाचे राक्षसनीने आपले विषारी स्तनपान देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण कृष्णाने तिचे शोषण करून तिचा वध केला नंतर लोकांनी तिचे दहन केले तेव्हा पासुन होळीची प्रथा पडल्याचे ही मानले जाते

होळी विषयी शंकरांची कथा असुन शंकर आपल्या तपाचरणांत गढून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनांत कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणाऱ्या या मदनाला शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला, या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटविली जाते. असे मानले जाते ,

आदिवासी मध्ये एक वेगळी कथा असुन एका राजाचे कन्येचे एका कलाकारावर प्रेम बसले, तिचा त्याचे बरोबर विवाहाचा विचार होता पण राज्याचा विरोध होता. तिने अग्नी पेटवून त्यात प्रवेश केला पण ती सुखरूप राहिली, राज्यास आपली चुक उमगली व त्याने त्याचा विवाह लावून दिला असे मानले जाते त्यामुळे होळी दिवशी होळीच्या सभोवताली जमून आदिवासी युवक युवती आपला विवाह जमवितात असा प्रघात काही आदिवासी मध्ये रूढ आहे
होळीस शिमगा हे नावही रूढ आहे , जुन्या काळी एक राक्षस मुलांना व लोकांना त्रास देत असे त्याला पळून लावण्यासाठी आग पेटवून लोक बोंब ठोकत असत त्यामुळे या सणास शिमगा असे नाव पडले
अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याच हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते, वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो, या सृष्टी बरोबर आपणही वाईटाचा त्याग करून नवीन स्वीकारण्याचा मानवी मनाचा हा प्रयत्न होळी चे दिवसात शिमगा करतात वाटेल ते बोलण्यापासुन शिवीगाळी पर्यंत सर्वच या दिवसात खेळकर पाने स्वीकारले जात असे. वर्षभरात एकमेका विषयी झालेले राग द्वेश या शिमग्याचे रूपाने व्यक्त करून आपल्या मनाचे घुसमटीतून मुक्त व्हायचे. वाद विवाद क्रोध याची होळी करून आनंदी जीवनाची सुरवात करण्याचा संदेश देणारा हा सण
काही ठिकाणी हा दिवस आपल्या पुर्वजाचे स्मृतींना उजाळा देत साजरा होतो त्याची स्मृती म्हणून वाजतगाजत वीर काढले जातात

होळी साठी वाळलेली लाकडं, गोव-या जमा करतात . होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते. मध्यभागी एरडांची फांदी व उस लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. सुंदर होळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळी होळी छानशी रचून तयार करतात. महाराष्ट्रात एकही घर असे नसेल की ज्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी नसेल. साधारण सात वाजता होळी पेटवली जाते. महिला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. दहन करताना ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणाबाजी केली जाते. होळीभोवती मुलांचा आरडाओरड बराच वेळ असतो. वाद्य वाजवून सर्वजण बोंब ठोकतात. रात्रभर होळी जळत असते. होळीच्या दुस-या दिवशी ‘धुलीवंदन’ येते. उरलेल्या निखार्‍यांवर दूध, दही घालून शांत करतात. होलिकेचे भस्म कपाळाला लावतात. सकाळी धुगधुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात. एकमेकांच्या अंगावर उडवतात व भरपूर मस्ती करतात. होळीची राख घरात समृध्दी आणते घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. धुळीवंदन म्हणजे आपणाला भरभरून देणाऱ्या धारिणी मातेला केलेले वंदनच,
———
*

रंगपंचमी

rangapanchami
धुळवडी नंतर फाल्गुन वद्य पंचमी येते ती रंगपंचमी निसर्गात विविध फुले फुलेली असतात वसंताची चाहूल लागलेली असते निसर्ग रंगांची मुक्त उधळण करीत असतो याच रंगा पासुन प्रेरणा घेऊन आपणही रंग खेळतो. इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या आयुष्यात असतात, रंगपंचमीचे रंग वेगवेगळे संदेश देतात हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे., लाल रंग शक्ती देतो, नारंगी रंग त्याग सांगतो, पिवळा रंग वैभव देतो तर निळा रंग शांती देतो. सफेद रंग सत्याचा मार्ग सांगतो तर काळा रंग अशुभही मानला जातो. या रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांमधील शत्रुत्व सोडून देऊन रंगांची उधळण करतात. जणू परत मैत्रीचे नाते नव्याने निर्माण होणार असते. रंगपंचमीमुळे आपण रंग मनासोक्त उधळतो. प्रेमाचे प्रतीक नि प्रेम वाढावे म्हणून ही रंगपंचमी खेळल्याने मनही शुध्द व पवित्र होते कारण नको असलेल्या गोष्टींचे होळी मधे आपोआपच दहन होते. होलिकोत्सव साजरा करून वाईटाचे दहन करून . आपणास जीवन देणाऱ्या धरतीस धुळीवंदन करून , निसर्गाने भेद भेद न करता देहभान विसरूण केलेली रंगाची उधळण, यांचा नव निर्मितीचा संदेश देणारे हे उत्सव खरेतर आपल्या जीवनाचे व निसर्ग याचे नाते सांगणारे .
——
*

अधिक महिना

adhik mas
मराठी सण उत्सव हे कालगणना शालिवाहन शक प्रमाणे साजरे होतात . या कालगणने प्रमाणे वर्षाचे बारा महीने असुन ही कालगणना चंद्रावर आधारित आहे, अमावस्या दिवशी महिना संपतो व दुसरया दिवशी नवीन महिना सुरु होतो. यास चंद्र मास म्हणतात प्रत्येक चांद्रमासाचा कालावधी समान असत नाही, तो कमी जास्त होतो. चांद्रमास हा सरासरी साडे एकोणतीस (२९.५) दिवसांचा असतो. या मुळे चंद्राच्या १२ महिन्यांचे वर्ष म्हणजेच शालिवाहन शकाचे वर्ष ३५४ दिवसांचेच भरते. परंतु पृथ्वीस सूर्य भोवती एक प्रदक्षणा पुर्ण करण्यास ३६५ दिवसाचा कालावधी लागतो. आपले दिवस रात्र आणि ऋतु हे पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहेत. उन्हाळा, पाऊसकाळ, थंडी, हे सुर्यावर आधारित आहे. चांद्रवर्ष व सुर्यवर्ष यांचे मध्ये सुमारे १० दिवसाचा फरक आहे. चंद्रावर आधारित संपूर्ण कालगणना केल्यास सण आणि महिने यांचा संबध राहील परंतु त्या दोघांची ऋतूशी असलेली सांगड हळुहळू सुटत जाईल. चंद्रावर आधारित नव्या वर्षाची सुरुवात मागे मागे सरकेल. व चैत्र महिना कधी थंडीत तर श्रावण महिना उन्हाळ्यातही येईल. ऋतुं आणि महिने यांची सांगड घालण्यासाठी चांद्रवर्षाचा कालावधी वाढविणे गरजेचे आहे. पौर्णिमा व अमावस्या याचा कालावधी निश्चित असल्याने सौर वर्ष अथवा इंग्रजी वर्ष प्रमाणे महिन्याचे दिवस ठरवून हे नियंत्रण करता येत नाही. या साठी एक चांद्रमहिना जादा घेतल्याशिवाय ते शक्‍य नाही. हा जास्तीचा चांद्रमहिना म्हणजे अधिक महिना होय.
खगोलतज्ज्ञांनी काही संकेत तयार करून सूर्य-चंद्राचे निसर्गतःच निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन अधिक महिन्याची व्यवस्था केलेली आहे. याप्रमाणे प्रत्येक चांद्रमहिन्याचे नाव सूर्याच्या राशीसंक्रमणाशी निगडीत केले. सूर्याचे विशिष्ट राशीतील वास्तव्य म्हणजे विशिष्ट ऋतु, अशी परिस्थिती असल्यामुळे चांद्रमहिन्याचा संबंध सूर्याच्या विशिष्ट राशीतील वास्तव्याशी जोडला की महिने व ऋतु यांचाही मेळ साधला जावा हा या मागील उदेश. साधारण परिस्थितीत सूर्य संक्रमण आणि अमावस्या एक आड एक घडत राहाते आणि संकेताप्रमाणे महिन्यांचे चक्र चालू राहते. परंतु चांद्रमहिना कमी कालावधीचा असल्यामुळे अमावस्या हळुहळू सूर्यसंक्रमणाच्या तारखेकडे सरकते, लागोपाठच्या दोन अमावस्यांमध्ये सूर्याचे संक्रमण म्हणजे राशीबद्दल घडून आला नाही तर तो अधिक ठरतो; आणि त्यामुळे या सूर्यसंक्रमण न झालेल्या महिन्याला क्रमाने येणाऱ्या पुढच्या महिन्याचे नाव देता येत नाही. परिणामी दोन महिने एकच नाव धारण करतात आणि एक महिना आपोआपच जादा होऊन चांद्रवर्ष १३ महिन्यांचे होते. व अधिक महिना येतो.
चंद्र व सुर्य यांचे कालगणनेचा मेळ साधण्यासाठी अश्या पद्धतीने आलेला हा महिना विष्णूचा समजला जातो. म्हणून याला “पुरुषोत्तम मास” असे ही म्हणतात, या महिन्यात केलेली धर्मकृत्ये, दान, जप इत्यादी अधिक पुण्यप्रद आहेत असे समजले जाते. या महिन्यात जावयाला तेहेत्तीस अनारसे किंवा बत्ताशे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची पूर्वापार रुढी आहे. जावयाला विष्णूच्या जागी मानून त्याचा आदर केला जातो.
मराठी महिन्यातील श्रावण, ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने बऱ्याचदा अधिक म्हणून येतात .फाल्गुन ते अश्‍विन हे महिने अधिक येण्याची शक्‍यता जास्त असते. कार्तिक हा महिनाही अधिक होऊ शकतो, मार्गशीर्ष आणि पौष, माघ हे महिने अधिक होत नाहीत.
——————

Comments are closed.