आंध्रप्रदेश व तेलंगाणा मल्लना మల్లన్న (खंडोबा) मंदिरांचे माहितीसह सचित्र दर्शन.
कोम्मीरवेली इनावोळू नैन्नीकी ओदेला मल्लीकुदरला गुर्रेकुंटा
# खंडोबाची प्रमुख बारा स्थाने मानली जातात जेजुरी, पाली, नळदुर्ग, देवरगुड्डा, मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी लोकमतानुसार देशपरत्वे भेद आढळतात. या नकाशात अशा लोकमतानुसार प्रमुख मानल्या जाणार्या सर्वच स्थानांचा समावेश केलेला आहे
कोम्मीरवेली
खंडोबा आंध्र तेलंगाना प्रदेश्यात मल्लना, मल्लीकार्जुन स्वामी, या नावाने ओळखला जातो. आंध्रप्रदेशात मल्लनाची असंख्य मंदिरे आहेत. या मधील प्रसिद्ध असणारे मंदिर म्हणजेच कोम्मीरवेली येथील मल्लना मंदिर. कोम्मीरवेली हे ग्राम नाम कुमारस्वामी म्हणजेच स्कंध याचे नावा वरून पडले आहे अशी जनश्रुती आहे.
हे मंदिर तेलंगानातील वारंगल जिल्ह्यातील चेरीयाल तालुक्यात असुन हेद्राबाद पासुन सुमारे १०० किमी आहे. हेद्राबाद – सिद्धपेठ रस्त्यावरील कुकनुरपल्ली गावाचे पुढे दूददा चौक या ठिकाणावरून चेरीयाल कडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे १० किमी अंतरावर कोम्मीरवेली कडे जाणारे रस्त्यावर कमान लागते या कमानीतून पुढे ७ किमी अंतरावर कोम्मीरवेली गाव आहे. गाडी रस्ता मंदिरा जवळ पोहोचतो.
मंदिराचे आवाराचे पश्चिमद्वार भव्य असुन या महाद्वारावर गोपूर आहे. या द्वारातून आपण मंदिराचे आवारात पोहोचतो.
आवारात एका टेकडीस खेटून तीनमजली भव्य मंदिर आहे. येथील मुळस्थान एक छोट्या उंचीच्या टेकडीच्या कपारीत असुन या टेकडीला व कपारीस समावून पुढील बाजुस हे बांधकाम केले आहे.
मंदिराचे पश्चिमाभिमुख दरवाजाने प्रवेश केल्यावर आपण पायरी मार्ग चढून मुख्य मंदिराचे प्रवेश द्वारात जातो.
प्रवेशद्वारा पुढील गर्भगृह म्हणजे एक मोठी कपार आहे. या कपारीत समोर त्रिलिंग असुन मागे मल्लनाची चतुर्भज मुर्ती आहे. याचे आसना खाली तीन नरमुंड असुन ती मल्लनाने पृथ्वीवर हळद आणताना आडव्या आलेल्या दैत्याचा चिरडून वध केला होता त्यांची आहेत असे सांगतात. मल्लनाचे दोन्ही बाजुस बलज्जामेड्म्मा { लिंगायत स्त्री ] व गोल्लाकेताम्मा [ धनगर स्त्री ] या त्यांच्या दोन पत्नीच्या मुर्ती आहेत. मल्लना चा भक्त पापय्या ने या कपारीत जुने काळी तप केले होते त्याचे विनंती वरून देव येथे लिंग रूपाने प्रगटले अशी जनश्रुती आहे. पूर्वी हा परिसर निर्मनुष्य होता त्या मुळे रोज पुजा होत नसे फक्त उगादी पासुन दोन महिने उत्सवास लोक येत असत. उत्सवा नंतरच्या काळात एकदा या लिंगावर वारूळ तयार झाले. तेव्हा पापय्याचे वारसांनी त्या वारुळाची मल्लाना मुर्ती बनवली तीच ही मुर्ती आहे अशी लोकश्रद्धा आहे. हे मंदिर पंधराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या कपारीच्या बाहेर दक्षिण बाजुस रेणुकाचार्याचे मंदिर आहे.
गावामध्ये एक पुष्करणी असुन भाविक येथे स्नान करतात
येथे एक दगडी रथ असुन मल्लांना या रथातुन येथे आल्याचे लोक सांगतात
मंदिरामागील टेकडीवर रेणुकेचे मंदिर आहे.
येथून १ किमी वरील पोचमपल्ली गावात कोढपंचम्मा हिचे स्थान आहे.
यात्रा उत्सव – माघ कृष्ण १३ महाशिवरात्र रोजी यात्रा भरते.
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसास उगादी म्हणतात हा नववर्षाचा पहिला दिवस याचे अगोदर ८ दिवस भक्त विस्तवावरून चालतात. उगादी पासुन मोठी यात्रा भरते.
इनावोळू
तेलंगानातील प्रमुख मल्लांना मंदिरातील प्रशस्त आवार व संपूर्ण दगडी बांधकामातील हे एक भव्य मंदिर चालुक्य, काकतीय या राज सत्ताशी ऐतहासिक नाते सांगणारे हे मंदिर ,मुळ चालुक्य राज्यांनी बांधलेल्या या मंदिराची पुन;निर्मिती काकतीय मंत्री अय्यना देव याने अकराव्या शतकात केले, त्याचे नावा वरून या मंदिरास अय्यना वरोळू हे नाव मिळाले पुढे काळाचे ओघात ते इनावोळू झाले.
आंध्रप्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील वर्धनपेठ तालुक्यात वारंगल पासुन १२ किमी अंतरावर इनावोळू आहे. या गावात रेल्वे स्टेशन आहे , रस्ते मार्गाने मंदिराचे दारात पोहचता येते.
पूर्वाभिमुख मंदिराचे आवारा समोर भव्य काकतीय तोरण असुन हे काकतीय शिल्प कलेचे प्रतिक चिन्ह मानले जाते. वारंगल किल्ल्याचे तोरणा प्रमाणे हे तोरण आहे. मंदिराचे दक्षिण बाजुस ही तोरण असुन उत्तर बाजुस तोरणाचे अवशेष पडलेले आहेत.
या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर दिसतो तो भव्य दगडी मंडप या मंडपास त्याचे चारही बाजुने प्रवेशमार्ग आहेत. मंडपा वरील छत काही ठिकाणी कोसळले आहे.
मंडपा मधून पश्चिम बाजुस दिसतो तो मंदिराचे भव्य प्रकारचा दगडी दरवाजा, मंदिराचे प्राकारास तीन बाजुंनी प्रवेशद्वार असुन संपूर्ण प्राकार दगडी बांधकामाचे आहे.
मंदिराचे प्राकारात गेल्यावर आतील भव्य मंदिर दिसते मुख्य मंदिराचे समोर स्तंभ व नंदी मंडप आहे.
नंदी मंडप दगडी असुन मंडपात नंदी ची कलाकुसरीने युक्त प्रतिमा आहे. या मंडपा शेजारीच एक शिलालेख स्तंभ आहे. नंदी मंडप मंदिराचे मुख्य मंडपास आधी जोडलेला असावा, सध्या मधील काही भाग नष्ट झालेला असावा.
मुख्य मंदिराचा मंडप भव्य असुन त्यास तिन्ही बाजुने प्रवेशद्वार आहेत, हा मंडप खालील बाजुने बंदिस्त असुन वरील निमा भाग खुला आहे, आतील बाजुने ओटे काढलेले आहेत. मंडप मंदिर १०८ खांबावर आधारलेले आहे.
पुर्व दक्षिण व उत्तर बाजुने मंडपातून मंदिराचे मुख मंडपाचे प्रवेशद्वारात जाता येते या प्रवेशद्वाराचे उत्तर बाजुस ओट्यावर देवाची पितळी उत्सव वाहने ठेवलेली आहेत.
मंडपातील पुर्व बाजुच्या अंतराळा नंतर मंदिराचे मुख मंडपाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार दिसते.
मंदिराचा मुख मंडप दगडी खांबावर आधारलेला असुन मंडपाचे नैरुत्य कोपऱ्यात देवाचे उत्सव उत्सव मुर्तीचे धातूचे जोड आसनावर ठेवण्यात आले आहेत .
गर्भगृहाचे बाहेर दक्षिण बाजुस गणपतीची दगडी प्रतिमा आहे.
छोट्याश्या अंतराळातून पुढे मंदिराचे गर्भगृहाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार दिसते.
गर्भगृहात भव्य चतुर्भुज मल्लना मुर्ती असुन तिचे डावे बाजुस बल्लजा मेडमा व उजवे बाजुस गोल्ला केतम्मा यांच्या मुर्ती आहेत. मल्लना चे पाया शेजारी दैत्य शिरे आहेत. या सर्व मुर्ती वारुळाचे माती पासुन निर्माण झाल्याचे सागतात.या मूर्तींना रंग देण्यात आले आहेत. या मूर्तींचे पुढे सयोनी लिंग आहे.
मुख्य मंदिराचे बाजुने मंडपाने युक्त असा दगडी प्रदक्षिणा मार्ग आहे .
मंदिराचे प्राकारातून मंदिराचे भव्यतेचे दर्शन होते. मंदिरावरील काळास मुर्ती कलेने युक्त असुन त्यावर रंगकाम केलेले आहे.
यात्रा
या मंदिरात प्रमुख यात्रा मकर संक्रांतीस सुरु होते व तेलगु नवीनवर्ष उगादी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा असे सुमारे ३ महिन्याचे कालावधीत भरते. या दिवसात लोक कल्याणम, तोरणम, बोणम, वाहनपुजा, अश्या कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी करतात.
नैन्निकी
दक्षिण भारतात खंडोबा हे लोक दैवत मैलार, मल्लाना या नावानी पुजले जाते, आंध्र व कर्नाटक यांचे सीमा प्रदेशातील हे स्थान माल मलेश्वरस्वामी या नावाने पुजले जाते. येथील मंदिर टेकडीवर असल्याने हे ठिकाण देवरगुट्टा या नावानेही ओळखले जाते. नैन्निकी चा हा परिसर पूर्णत; जंगलांनी वेढलेला आहे.
नैन्निकी हे छोटेसे गाव आंध्र प्रदेश मधील कर्नुल जिल्ह्यातील अलूर शहरा पासुन १० किमी अंतरावर आहे. नैन्निकी जवळील मंदिराचे टेकडीचा परिसर देवरगुट्टा देवाची टेकडी या नावाने ओळखला जातो. या टेकडीचा पायथा समुद्र सपाटी पासुन ५६० मी उंचीवर असुन टेकडी समुद्र सपाटी पासुन ६५० मी उंचीवर आहे. अलूर – होलागुंदा रस्त्यावर अलूर पासुन ५ किमी अंतरावर या टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा फुटतो.
रस्तामार्ग थेट मंदिराचे टेकडीचे पायथ्याशी पोहचतो, तेथून मंदिराचा पायरीमार्ग सुरु होतो. पायरी मार्गाचे सुरवातीला पश्चिम बाजुस एका झाडाखाली चोथर्यावर दगडी नाग शिल्प आहेत. व शेजारी मागील बाजुस एक दगडी मंडप आहे.
रस्त्याचे पुर्व बाजुस दगडी मंडप असुन त्याचे कपाळपट्टीवर सुंदर शिल्प आहेत हा मंडप तिन्ही बाजुने बंदिस्त असुन पश्चिम बाजुने खुला आहे. मंडपात मध्यभागी मागील बाजुस दगडी चोथरा आहे.
टेकडीच्या पायरी मार्गास सुमारे ६५० पायऱ्या असुन टेकडीची उंची सुमारे ९० मी आहे.
पायरी मार्गावर काही अंतरावर मार्गाचे पुर्व बाजुस पूर्वाभिमुख घुमटी असुन या घुमटीत गणपतीची सुंदर दगडी प्रतिमा आहे.
पुढे टेकडीची चढण चढून गेल्यावर रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वाभिमुख घुमटी आहे या घुमटीत हेग्गप्पा ची दगडी प्रतिमा आहे.
येथू पुढे गेल्यावर रस्त्याचे वळणावर पुर्व बाजुस एक पूर्वाभिमुख छोटीशी घुमटी लागते या घुमटीचा आतील भाग वारुळाने व्यापलेला असुन या घुमटीत वारुळाची पुजा केली जाते.
पायरी मार्गाने पुढे गेल्यावर दगडी बांधकामातील मुख मंदिराचे प्रवेशद्वार लागते. या द्वारावर विविध मुर्ती कोरलेल्या आहेत. व त्याचे आतील बाजुस देवड्या आहेत.
दरवाज्याचे पुढे दगडी मंडप लागतो. दगडी खांबाचे या मंडपात येण्यासाठी दक्षिण बाजुने ही रस्ता आहे.
याचे पुढे लागते ती दगडी कपार या कपारीत मंदिराचे गर्भगृहाचे पूर्वाभिमुख दरवाजा दिसतो.
मंदिराचे गर्भगृह म्हणजे एक प्रशस्त मोठी दगडी कपार आहे.
या कपारीत पश्चिम बाजुस एका चोथर्यावर मल्लेश्वर ( खंडोबा ) माळव्वा यांच्या चतुर्भुज दगडी प्रतिमा असुन त्यांचे हातात खड्ग त्रिशूल डमरू व पानपात्र आहे.
मंडपाचे दक्षिण प्रवेशाचे बाजुला थोडासा सपाटीचा भाग असुन येथे धातूचा मोठा त्रिशूल उभा केलेला असुन त्यावर दिवे पेटविण्यासाठी पणत्या लावलेल्या आहेत.
येथील पश्चिम बाजुस पुढे विशाल दगडाचे पायथ्याशी एक पूर्वाभिमुख छोटी घुमटी आहे
या घुमटीत चतुर्भुज गंगा माळव्वाची दगडी मुर्ती आहे.
टेकडी वरून मंदिराचे टेकडीचे पायथ्याचा व बाजूचा परिसर दिसतो. मंदिराचे पायथ्याला रस्त्याचे बाजुला पंचलिंग, बसव, इत्यादी देव देवतांची मंदिरे आहेत.
यात्रा उत्सव
ओदेला
तेलंगानातील मल्लाना मंदिरा मधील एक प्रमुख मंदिर, या मंदिरास चालुक्य काळा पासुन चा इतिहास असल्याचे सांगितले जाते. अलीकडे या मंदिराचे पुन:निर्माण करण्यात आल्याने या मंदिरा मध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत व त्याचे मुळरूप बदलून गेले आहे. येथील विवध प्रथांमधून व कुलधर्म कुलाचाराचे परंपरा मधून त्याचे मुळ जुने स्वरूप आजही जिवंत आहे.
तेलंगानातील करीमनगर जिल्ह्यातील ओदेला हे तालुक्याचे ठिकाण आहे, करीमनगर पासुन ओदेला ४० किमी अंतरावर असुन येथे रेल्वे स्टेशन आहे. येथल मल्लाना मंदिर ओदेला गावापासून २ किमी अंतरावर आहे.
रस्ते मार्गाने थेट मंदिराचे प्रांगणात पोहचता येते, येथील मंदिराचे आवाराचे प्रवेशद्वारातून मंदिराचे मुख्य प्राकारात जाता येते.
मुख प्रवेशद्वार समोर एक भव्य नंदी प्रतिमा आहे
या पुढे मुख्य मंदिराचे प्राकाराचे प्रवेशद्वार दिसते पूर्वाभिमुख द्वारावर गोपूर बांधण्यात आले आहे.
मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी असुन दगडी मंडप चहुबाजुंनी लोखंडी जाळ्यांनी बंदिस्थ केलेला आहे
मंडपात एका देवडीत चोथार्यावर देवीच्या दोन मुर्ती स्थापन केलेल्या आहेत
मंदिराचे मंडपाचे पुढे अंतराळ असुन पुढे गर्भगृह आहे
गर्भगृहात मल्लानाचे स्वयंभू लिंग असुन त्यावर पितळी मेघदंबरी आहे. लिंगास एक छेद असुन एक शेतकरी नांगरत असताना त्याची नांगरास हे लिंग लागले व त्याला या स्वयंभू लिंगाचे दर्शन झाले, त्याचे नांगराने हा पडलेला छेद असल्याचे सांगितले जाते.
मुख्य मंदिरा शेजारी राम मंदिर आहे. या मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे.
राम मंदिराचे आवारात दास हनुमानाची दगडी प्रतिमा आहे.
राम मंदिराचे गर्भगृहात राम लक्ष्मण सीता यांच्या मुर्ती आहेत.
यात्रा
शिवरात्री पासुन ते उगादी पर्यंत येथे प्रमुख यात्रा असते पट्टनम, बोनाम, कल्याण, अश्या विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम या कालावधीत संपन्न होतात.
मल्लीकुदरला
तेलंगानातील प्रमुख मल्लाना मंदिरा मधील एक मंदिर. मल्लीकुदरला गावाचे हद्दीत असणाणारे हे मंदिर गट्ट मल्लाना म्हणून ओळखले जाते. आंध्र कर्नाटक मध्ये अनेक मल्लाना मंदिरे दगडाचे कपारीत आहेत त्यातीलच हे एक मंदिर.
तेलंगानातील वारंगल या जिल्ह्या मधील हे मंदिर धर्मसागर तालुक्यात आहे. समुद्र सपाटी पासुन ३६० मी उंचीवर हे ठिकाण आहे. मल्लीकुदरला गावापासून हे मंदिर सुमारे २/३ किमी अंतरावर आहे .व मल्लीकुदरला वारंगल पासुन ३० किमी अंतरावर आहेत.
रस्ते मार्गाने मंदिराचे पायथ्याशी पोहचता येते. येथे डोगराचे कपारीत हे पूर्वाभिमुख मंदिर आहे.
मंदिराचे पायथ्याशी नंदी प्रतिमा आहे.
नंदी समोरच पायरी मार्गास सुरवात होते हा मार्ग आली कडेच निर्माण करण्यात आल्याचे दिसते.
सरळ पायरी मार्ग मंदिराचे मंडपात जातो हा मंडपही अलीकडेच बांधलेला आहे. या मंडपात पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा आहे.
मंडपातून गर्भ गृहात जाता येते, गर्भगृह एक दगडी कपार आहे.
गर्भगृहात उत्तर बाजुस मल्लाना व बलजा मेडम्मा यांच्या चतुर्भुज दगडी उत्सव मुर्ती आहेत.
पुढे कपारीत एका पूर्वाभिमुख चोथर्यावर मल्लाना बलजा मेडम्मा व गोल्ला केतम्मा यांच्या मुर्ती आहेत. यांचे पायथ्याशी दैत्य शिरे आहेत , या मुर्ती पुढे सयोनी लिंग असुन यातील लिंग स्वयंभू आहे.
मंदिराचे डोंगरावर जाण्यासाठी मंदिराचे बाजुने अवघड रस्ता असुन पुढे डोंगरावर मल्लनाचे स्थान अथवा जलाशय असल्याचे सांगतात.
गुर्रेकुंटा
तेलंगानातील वारंगल जिल्ह्यात मल्लनाची अनेक मंदिरे आहेत चालुक्य व काकतीय काळा मध्ये राज्यांनी आपल्या विजयासाठी अथवा विजयाची स्मृती म्हणून आपल्या या देवताची मंदिरांची उभारणी केल्याचे तेथील स्थनिक लोक आपल्या जनश्रुती मधून सांगतात. वारंगल किल्ल्या पासुन जवळच असणारे हे मंदिर गुर्रेकुंटा परिसरात आहे. हे मंदिर कट्ट मल्लाना या नावाने ओळखले जाते.
वारंगल शहरा पासुन अवघ्या ४ किमी अंतरावर सपाटीवर एका जलाशया काठी हे मंदिर आहे.
सध्या व छोट्या प्रकारचे आवारात हे मंदिर असुन , मंदिराचे समोर भाविकांसाठी पत्र्याचे छत असलेली एक ओसरी आहे
मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना असुन मंडपाची वरील भाग लोखंडी जाळ्यांनी बंद केलेला आहे
गर्भगृहात भव्य अशी मल्लाना, बलजा मेडम्मा व गोल्ला केतम्मा यांचे मुर्ती आहेत. त्यांचे पुढील बाजुस बाजुला ऋषी व गणपती यांचे मुर्ती आहेत.
मंदिरा पासुन काही अंतरावर तलावाचे काठी एक छोटेसे मंदिर असुन या मध्ये यल्लमा , परशुराम, नाग यांच्या मुर्ती आहेत.