जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर मंदिर, होळकर तलाव, बल्लाळेश्वर, लवथळेश्वर मंदिर,जानाई मंदिर, मल्हारतीर्थ, जननी तीर्थ, लवतीर्थ, पेशवे तलाव इत्यादी प्रेक्षणीय स्थळे यांचे माहिती सह सचित्र दर्शन
छत्री मंदिर होळकर तलाव जानाई मंदिर गायमुख लवथळेश्वर पेशवे तलाव बल्लाळेश्वर मल्हार तीर्थ कऱ्हा नदी वाघेश्वरी जानाई दरा
स्थानिक दैवते
जेजुरी पर्यटन मार्गदर्शक
*
मल्हारगौतमेश्वर छत्री मंदिर
जेजुरीगडाचे पायथ्याशी पश्चिमेस असणारे मल्हारगौतमेश्वर मंदिर. छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर मराठी मंदिर निर्माण कलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मंदिरा समोरील एका पाषाणातील नंदी कलाकुसरीने युक्त व अवर्णनिय आहे. होळकर राज्य सत्तेचे संस्थापक मल्हारराव होळकरांचे हे स्मारक.
पुण्या जवळील वाफगाव येथील धनगर खंडूजी चोगुला होळ येथे स्थायिक झाले होते. त्यांचे पुत्र मल्हारराव यांचा जन्म इस. १६९३ मधे झाला. गावाचे नावावरून ते होळकर झाले. वडिलांचे मृत्यू मुळे त्यांचे बालपण खानदेशात मामा भोजराज बारगळ यांचे कडे गेले. मामाची मुलगी गौतमीबाई बरोबर त्यांचा विवाह झाला.
पहिल्या बाजीरावा बरोबर उत्तरेकडील मराठी साम्राज्य विस्तारात सहभागी होऊन मल्हाररावांनी आपली मुत्सदेगिरी व युद्ध क्षमता सिद्ध केली. माळवा, बुंदेलखंड, भागातील मोहिमा मधील पराक्रमाने त्यांना माळव्याची सुभेदारी मिळाली. बादशहाचे अमलदार, स्थानिक संस्थानिक आणि राजपूत अशा तिन्ही प्रतीस्पर्ध्यावर धाक बसवत. राज्य विस्तार करून त्यांनी इंदोर येथे आपले स्थान मजबूत केले
आपले हे यश जेजुरीच्या खंडोबाचे आशीर्वादाने आहे अशी त्यांची श्रद्धा होती. या श्रद्धेतून त्यांनी जेजुरीच्या पुनर्निर्मानाची कामे सुरु केली. गौतमीबाई, बनाबाई, द्वारकाबाई यातील मल्हाररावाची प्रथम पत्नी गौतमीबाई सन.१७६१ मध्ये मरण पावली. मुलगा खंडेराय याचा मृत्यू, पानिपत मधील मराठ्याचा पराभव असे आघातही मल्हाररावांनी पचवले. पानिपतच्या पराभवानंतर पाचवर्षात जबरदस्त तडाखे देत उत्तरेत पुन्हा मराठी साम्राज्य स्थापन करण्याचे काम मल्हाररावांनी केले. वयाच्या साठी नंतरही मोहिमावर असणारे मल्हारराव मोहिमेवरच असताना २० मे १७६६ मध्ये अनंतात विलीन झाले.
मल्हाररावांचे मृत्यू नंतर या मल्हारराव व गौतमीबाई यांच्या मल्हारगौतमेश्वर स्मारकाचे काम तुकोजी होळकरांनी सुरु केले. या स्मारकाचे उत्तरबाजूचे मल्हाररावाची पत्नी द्वारकाबाईचे स्मारक घुमटीचे काम इस. १७७२ व बनाबाईचे घुमटीचे काम इस.१७७३ मध्ये पूर्ण झाले. या स्मारकाचे संपूर्ण काम इस. १७९० मध्ये तुकोजी होळकरानी पूर्ण केले.
मंदिराचे गर्भगृहात एका शिवलिंगा मागे कट्यावर मल्हारराव व त्यांचे पत्नीच्या संगमरवरी मूर्ती असून त्या मधील एक भग्न झाल्याने बाजूला मागे कोनाड्यात ठेवली आहे. मंदिरा समोरील नंदी मागे जुन्या काळी कुस्तीचा आखाडा होता. होळी पौर्णिमेचे दुसरे दिवशी धुळवडीला येथे कुस्त्याचे स्पर्धा होत असत.
*
होळकर तलाव
जेजुरीच्या पश्चिमेस असणारा आयताकृती तलाव म्हणजेच होळकर तलाव. १८ एकर क्षेत्र व्यापणारा हा जलाशय कडेपठार पायथ्याचा विझाळा व गडाचे पश्चिम बाजूने येणारे ओढ्यावर होळकरांनी इस. १७७० मध्ये बांधला . संपूर्ण दगडी बांधकाम असणारे तलावाचे चहुबाजूंनी चिंचेची झाडे लावून चिंचबनाची निर्मिती करण्यात आली होती. जेजुरीत कुलधर्म कुलाचार साठी येणारे भाविकासाठी पाण्याची व सावलीची केलेली हि व्यवस्था. सावली बरोबरच चिंचेच्या उत्पनातून या परिसराचे व्यवस्थापन व्हावे हि दूरदृष्टी या मध्ये होती. या तलावाचे पुर्व तटामधून दट्याच्या साह्याने गोमुख व हौदाना पाणी सोडण्याची व्यवस्था केलेली आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी यावे यासाठी कवडखिंड परिसरातील उत्तरेचे ओढे दगडी बांधाचे माध्यमातून या तलावात येणारे ओढ्यांना जोडण्यात आले होते. इस. १८११ मध्ये या तलावाचे नेरुत्य दिशेस कुंभारकरवाडी जवळ लवथळ ओढ्यावर एक मोठा बंधारा बांधून अडवलेले पाणी कालव्याद्वारे झडपेने नियंत्रित करून होळकर तलावात आणले जात होते. या कालव्यास आडव्या येणाऱ्या गोपी ओढ्यावर दगडी जलसेतू बांधून कालवा पुढे आणलेला आहे. तलावाचे निर्मिती बरोबरच त्याचे पाणलोट क्षेत्राचे कलेले जल व्यवस्थापन उलेखनीय.
*
जानाई देवी / बल्लाळेश्वर / जननीतीर्थ
होळकर तलावाचे पूर्वेस जानाई देवीचे मंदिर असून पूर्वाभिमुख मंदिराची रचना मंडप व गर्भगृह असून गर्भगृहात जानाईची उभी मूर्ती आहे. हिला जननी असेही म्हणतात. मंदिरास कोट असून कोटाचे उत्तरेस पुष्करणी आहे, तिला जननीतीर्थ म्हणतात, तिचे मधोमध पण उत्तर बाजूस पुढे काढलेले मंडपात बल्लाळेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे.जननी तीर्थात पूर्वेकडील रस्त्याने व जानाई मंदिराचे उत्तरेकडील कोटाचे दरवाज्यातून जाता येते.
खंडोबा+बाणाई विवाहानंतर क्रोधीत म्हाळसा येथे येऊन तप करू लागली. व गंगा हि येथे आली. दिवसभर म्हाळसा येथे तप करून रात्री अन्नपूर्णा रूपाने जेजुरी गडावर वास करीत होती. गणपती व नारद शोध घेंत येथे पोहचल्यावर म्हाळसा जलरूप होऊन गंगेत विलीन झाली. पण नारदांनी तिला ओळखले. गंगा व म्हाळसा दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जथे तप केले तेथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाणास जननी तीर्थ नाव दिले.
प्रयाग क्षेत्री स्नानाने जे पुण्य मिळते ते येथील स्नानाने प्राप्त होते. असे ग्रांथिक संदर्भ आहेत.
जुन्याकाळी या मंदिरा जवळ गावातील लोक फाल्गुन अमावश्येस जमून एका वाफ्यात सर्व प्रकारची बियाणे टाकून पाणी शिंपित असत, दुसऱ्या दिवशी चेंत्र पाडव्यास येवून कोणती बियाणे तरारली आहेत यावरून या वर्षी कोणते पिक चांगले येणार आहे हे ठरवीत असत. यास गुढ्या काढणे असे म्हणत.
*
गायमुख, चिलावती कुंड
होळकर तलावाचे पुर्व बाजूस जेजुरी गावामध्ये गायमुख या नावाने एक पुष्करणी प्रसिद्ध होती. हिचे मुळ नाव चिलावती कुंड. या पुष्करणीत संगमरवरी र्गोमुखातून पाणी पडत असे म्हणून हिला गायमुख म्हणत. जुन्याकाळी जेजुरी मधील हा एकमेव मोठा जलस्त्रोत असावा. इस. १७०२ च्या एका बातमीपत्रात याचा उलेख आढळतो. या ठिकाणा विषयी सप्तमातृका संधर्भात ज्या दंतकथा सांगितल्या जातात त्यावरून कधीकाळी येथे देवराई असावी असे वाटते. अनेंक ओढ्याचे संगमावरील या विहिरीस होळकर तलावाचे उभारणी नंतर दुरुस्ती करून गोमुखाचे स्वरूप मिळाले असावे. या पुष्करणी मधील तळघरात शिवमंदिर होते असा लोकप्रवाद आहे.
बहुकोनी असलेल्या या पुष्करणीस पश्चिम व उत्तर बाजूने प्रवेशद्वार होती. पुष्करणीत उतरण्यासाठी चहुबाजूंनी पायऱ्या होत्या दक्षिणबाजूस एक चोरसाकृती दगडी चबुतरा होता. यास चारही बाजूंनी संगमरवरी गोमुखे होती. या गोमुखातून पुष्करणीत पाणी पडत असे, होळकर तलावा मधील दट्याद्वारे ह्या पाण्याचे नियंत्रण केले जात होते. गोमुखाखाली लोक अंघोळ करीत.लोकांनी वापरलेले पाणी पाण्याची ठराविक उंची कायम ठेवत कुंडाचे पुर्वदिशेस उसास्यातून बाहेर पडत असे. व ओढ्यामधून शेतीसाठी जात असे. लोकसुविधे बरोबर पाण्याचे पुनवापराचा व जल व्यवस्थापनाचा हा उकृष्ट नमुना होता. इस.१९२६ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची स्मृती कायम रहावी म्हणून होळकराकडून याचा जिर्णोधार करण्यात आला होता. या आशयाचा शिलालेख उत्तरेकडील प्रवेशद्वाराचे उजव्याबाजूस होता. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची हि स्मृती छायाचित्रातच आपल्या स्मृती कायम ठेवीत आहे.
*
लवथळेश्वर मंदिर /लवतीर्थ
जेजुरी मध्ये पश्चिमेस पुणे रस्त्यावर लवथळेश्वर मंदिर आहे. पुरातनकाळी हा सर्व परिसर जंगलाचा होता. येथे लवऋषींचा आश्रम होता. लवऋषींनी आपल्या या तपोभूमीत शिवलिंगाची स्थापना केली आहे.म्हणून हे लवथळेश्वर शिवलिंग. हे मंदिर जमिनीचे पोटात उत्तराभिमुख आहे पण प्रवेशद्वारात जाण्या साठी पूर्वेकडून उतरावे लागते. मंडपात समोरच एक यज्ञंवेदी आहे हे लवऋषींचें तपाचे स्थान. याचे पश्चिमेकडे उत्तराभिमुख गर्भगृह असून आतमध्ये लवथळेश्वर शिवलिंग आहे. मंदिराचे पश्चिम बाजूस एक पुष्करणी असून मंदिराचे मंडपातील पश्चिमेकडील दरवाज्याने पुष्करणीत जाता येते.या पुष्करणीस लवतीर्थ असे म्हणतात. मणि मल्ल राक्षसा कडून पिडीत झालेले ऋषी मणिचुलावरून आश्रयासाठी याच ठिकाणी आले होते. लवथवती विक्राळा हि शंकराची सर्वत्र प्रचलित आरती समर्थ रामदास स्वामीनी याच ठिकाणी रचली अशी जनश्रुती आहे. मंदिर परिसरात एक इस.१६०८ चा शिलालेख असून तो येथील दुरुस्ती संदर्भातील आहे. मंदिर परिसरात गणपती, लज्जागौरी, श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आहेंत.
*
बाजीराव पेशवे तलाव /बल्लाळेश्वर
जेजुरीगड व गावाचे आग्नेयस एक वर्तुळाकृती जलाशय असून त्यास बाजीराव पेशवे तलाव म्हणतात. ३७ एकर क्षेत्र व्यापलेला हा जलाशय थोरले बाजीराव पेशवे यांनी इस १७३४ ते १७४० दरम्यान बांधला. रमणा परिसर व गडाचे पश्चिमेकडील भागातील पाणी या तलावात येते.
*
या तलावाचे पुर्वबाजूचे तटबंदी मध्ये बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजेच एक पिंडीचें आकाराची पुष्करणी आहे. हिच्या पश्चिम भागात शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तलावाचे तटबंदी मधील पायरीचे रस्त्याने थेट मंदिरात व मंदिरावरील सज्जा मधेही जाता येते. मुख्य प्रवेश पूर्वेकडून असून पुष्करणी मध्ये जाताना प्रथम नंदी दिसतो या नंदी वर दगडी मंडप असावा असे तेथील खुणावरून दिसते. नंदीचे जवळूनच पुष्करणीच्या पश्चिम भागातील तीन कमानी मंडपातील शिवलिंग दिसते, पायऱ्या उतरून खाली गेले. कि पुष्करणीच्या तटाकडील रस्त्याने शिवलींगा जवळ जाता येते. शिवलींगा खालील पुढील बाजूने गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते या आवाजाने येथील धीरगंभीरता अधिक जाणवते. तलावातील पाणी तटबंदीतून आत उतरणाऱ्या जिन्या मधील दट्यानी नियंत्रित केले जाते. व गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते. पुष्करणीच्या पुर्वभागातील दक्षिणामुख कोनाड्या मधून पाणी पुढे शेतीला सोडण्याची व्यवस्था येथे केले आहे. मंदिर स्थापत्याचा एक विशेष अविष्कार या मंदिर उभारणीत दिसतो.
*
मल्हार तीर्थ
जेजुरीच्या आग्नेयस एमआयडिसी रस्त्यावर पुर्व बाजुस एका छोट्या मंदिरा पूर्वेस मल्हार तीर्थ आहे. सुमारे १०० फुट लांबी रुंदीची हि पुष्करणी दगडी बांधकामातील असून छत्रपती शाहू महाराजांनी इस. १७०९ चे दरम्यान या पुष्कर्णीचे काम केले. या चोरसाकृती पुष्करणीस हरी बापुजी यांनी चहुबाजूंनी पत्र्याचे छत असलेले सोपे बांधले होते. या पुष्करणीस पश्चिमबाजू कडून प्रवेशद्वार होते. गोमुखी पद्धतीच्या या प्रवेशद्वारा मुळे उत्तरेकडून प्रवेश करून वळून पश्चिम दिशेने आत जाता येत होते. सोप्या मध्ये स्नानासाठी आलेल्या भविकांना वस्तू ठेवण्याकरिता देवळी, खुंट्या, व कपडे बदलण्यासाठी खोल्याची व्यवस्था होती. असे येथील अवशेषा वरून दिसते. मल्हारतीर्थ जेजुरीतील पवित्रतीर्थ मानले जाते. “मार्तंड विजय” ग्रंथात अनेक धार्मिक विधी साठी हे पवित्रस्थळ सांगितले आहे. या तीर्थाचे पश्चिमबाजूस एक छोटे शिवमंदिर आहे. नेरुत्येस लक्ष्मितिर्थ नामक विहीर आहे. एकेकाळी भाविकांनी गजबजलेली व वंदनीय असणारी हि पुष्करणी आज दुरवस्थेत आपले अंतिम क्षण मोजत आहे.
*
कऱ्हा नदी / मल्हार सागर
जेजुरीच्या उत्तरेकडून सुमारे २.५ किमी. अंतरावरून कऱ्हा नदी वाहते. या नदीवर जेजुरी चे ईशान्येस इस. १९७३ मध्ये नाझरे गावाजवळ धरण बांधण्यात आले, या धरणा मुळे निर्माण झालेल्या जलाशयास मल्हारसागर असे म्हणतात.
कऱ्हा नदी पुर्ववाहिनी असून ती पुरंदर तालुक्यातील चतुर्रमुख येथून उगम पावते. ब्रह्मदेव आपल्या पापशालना साठी चतुर्रमुख येथे तपचर्या करीत होते, तेव्हा पांडव वनवासात असताना पांडेश्वर येथे त्यांनी यज्ञ आरंभला होता. या यज्ञेचे निमंत्रण देण्यासाठी अर्जुन चतुर्रमुख येथे ब्रह्मदेवा कडे गेला. तेथे अर्जुनाचे हातून ब्रह्मदेवाचा गंगाजलाने भरलेला कमंडलू सांडला. या पाण्याचे प्रवाहातून कऱ्हा व चरणावती या नद्या उगम पावल्या असे मानले जाते.
प्रथम पश्चिमवाहिनी असलेली कऱ्हा काही अंतराने पुर्ववाहिनी होते. चरणावती सासवड येथे कऱ्हानदीस येऊन मिळते. कऱ्हा पुढे बारामती तालुक्यात सोनगाव येथे नीरा नदीस मिळते.
कऱ्हानदीवर धालेवाडी गावाचे उत्तरेस नदीच्या तीरावर रंभाई विसाव्या जवळ जेजुरी गडावरून खंडोबा स्नानासाठी सोमवती अमावस्याचे पर्वकाळी जातात. या ठिकाणी एक डोह होता. त्यास पापशमन तीर्थ म्हणले जात होते. मल्हारसागरा मुळे त्या डोहाचे अस्तित्व संपले असून संपूर्ण मल्हारसागरच आता पापशमन तीर्थ झाला आहे.
जेजुरीत येणारे भाविक कऱ्हास्नान महत्वाचे मानतात. नवरात्र, षडरात्र, श्रावण महिना मध्ये भाविक कऱ्हास्नान करून कावड घेवून नियमाने मंदिरात जातात. देवाचे स्नानासाठी रोज कऱ्हानदीचे कावडीचे पाणी वापरले जाते. मल्हारसागर आज या परिसरातील अनेक गावांचा जीवनजलस्त्रोत आहे. येथील सकाळ, सायंकाळ विलोभनीय.
*
वाघेश्वरी
कडेपठार पंचलिंग मंदिराच्य मागील खोल दरीत दूरवर दिसते ते वाघेश्वरी चे मंदिर येथे कडेपठारचे मागील बाजूने उतरून किवा विझाळा चे पश्चिमे कडील कवडदरी मधून चढून खेसोबाचे स्थानापासून कवडखिंडी मधून उत्तरून जाता येते.
*
जानाई दरी
कडेपठारचे दरीत जानाईचे पुर्वभिमुख मंदिर आहे. कडेपठारचे उत्तरे कडील गंगाधर कड्यावरून उतरून दरीत जातायेते. या रस्त्याने उतरताना काही अंतराने पूर्वे कडे रस्ता फुटतो या रस्त्याला एक गुहा आहे. पेशवे तलावा जवळून रमणा परिसरातील डोंगर चढून या दरीत उतरून जाता येते. दरीत एक गोमुख हि आहे. मंदिराचे जवळ विहीर असून तिला जननी तीर्थ म्हणतात.
*
स्थानिक देवतां
महाराष्ट्राचे कानाकोपर्यातील प्रत्येक गाव तेथील अनेक स्थानिक देवतांनी व्यापलेले आहे, जेजुरी कुलदैवत खंडेरायाची भुमी असली तरीही याला अपवाद नाही, मारुती, वेताळ, म्हसोबा, अश्या अनेक देवतांचे वास्तव्य या भुमी मध्ये आहे, या दैवतांचा हा परिचय
मारुती
मारुती हा रुद्र अवतार मानला जातो, लंका दहन करणारा हा हनुमान सर्व प्रकारचे अरिष्टा पासुन गावचे संरक्षण करतो असे मानले जाते, प्रत्येक गावाचे वेशीवर हनुमान मंदिराची स्थापना केलेली असते. स्वतंत्र मंदिरा मधील हनुमान हा वीर हनुमान व राम मंदिरातील हनुमान हा दास हनुमान होय, जेजुरी मध्ये दहा ठिकाणी हनुमान स्थापना केलेली असुन दक्षिणमुखी हनुमान हा गावचे प्रमुख हनुमान मंदिर मानले जाते, जेजुरी गड पायरी मार्गावरील हनुमान समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केल्याचे मानले जाते, तर गावचे स्मशान भुमी मधील हनुमान रोकडोबा या नावाने ओळखला जातो, शनिवार हा मारुतीचा पवित्र वार मानला जातो. श्रावण महिन्यातील शनिवार संपत्शनिवार मानला जातो, चैत्र पौर्णिमा हा त्याचा जयंती दिवस हा दिवसांना मारुतीचे उत्सव साजरे केले जातात,
भवानी
जेजुरी रेल्वे स्टेशन रोड परिसरात भवानीचे तांदळा स्वरूपातील स्थान आहे, भवानीचे मुळ स्थान तुळजापूर मानले जाते, या ठिकाणा वरून खंडोबा भेटी साठी आलेल्या भवानीने येथे निवास केल्याचे या ठिकाणा विषयी दंत कथा आहे.
लक्ष्मिआई
काळूबाई
कडेपठार रस्त्यावर हे काळूबाईचे स्थान असुन रस्त्याचे कडेला झाडाखाली तांदळा आहे. या ठिकाणी जुन्या काळी पिंपरणी च्या झाडांची दाटी होती, हा परिसर नांदुरकी म्हणून ओळखला जात होता. खंडोबा चे दर्शनासाठी आलेल्या मांढरदेव येथील काळूबाईने येथे वास केल्याची दंतकथा या ठिकाणा विषयी सांगितली जाते. येथे जवळच ओढ्या काठी मंडलाई देवीचे ही स्थान आहे.
कृष्णाई
जेजुरी गडाचे पायथ्याला घडशी आळी मध्ये कृष्णाई मंदिर असुन ही घडशी समाजाची देवता मानली जाते, माघ महिन्यात या देवीचा उत्सव सप्ताह बसवून साजरा केला जातो
मरीआई
मंगाई
जेजुरी गडाचे डोंगराचे पुर्व बाजूचे कड्या मध्ये उत्तरेस या देवतेची एका कोनाड्यात मुर्ती आहे.
दत्तमंदिर
जेजुरी मध्ये पाच दत्त मंदिरे असुन येथे दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. कडेपठार येथील दत्त मंदिर जुने असुन, होळकर वाड्या मधील दत्त मंदिरात एकमुखी दत्त म्हणून विष्णू मुर्ती पुजली जाते.
विठ्ठलमंदिर
जेजुरीत दोन वित्तील मंदिरे असुन होळकर वाड्या समोरील मंदिर होळकरांनी स्थापन केले आहे, दुसरे मंदिर पोलीस स्टेशन समोर असुन येथे धर्मशाळा आहे
वेताळ
वेताळ हा भूतांचा राजा मानला जातो, तो भूत नसून देवता असल्याचे मानले जाते, वेताळ शुभकारक असुन तो गावचे संरक्षण करतो अशी लोकश्रद्धा आहे, शिवगणा मध्ये वेताळाचे स्थान प्रमुख मानतात. जेजुरी मध्ये सात ठिकाणी वेताळाचे स्थापना दिसते. झाडाखाली एका शेंदूर व चुन्याने रंगविलेल्या उंच शिलेच्या रुपात वेताळाची स्थाने दिसतात, याचे सभोवताली शेंदूर लावलेले याचे सैनिक असतात , गावचे संरक्षणा साठी होळी, व विविध सणांना याचे पुजन केले जाते,
म्हसोबा
हा भूतांचा सेनापती मानला जातो, दगडाला शेंदूर लावून याचे स्थापना केलेली असते, खरेतर ही विशेष व्यक्तींची स्मारके गावासाठी परिवारासाठी बलिदान करणाऱ्या अथवा समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची स्मृती म्हणून याचे स्थापना करून आदराने पुजा केली जात असे , जेजुरी मध्ये अनेक म्हसोबा असुन ओकार्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा, अशी वेगवेगळी नावेही आहेत, शेताचे बांधावर अनेक तर गवत सुमारे तीस ठिकाणी म्हसोबांची स्थाने होती, काळाचे ओघात यातील अनेक म्हसोबा हद्दपार झाले आहेत, परिसरात काही म्हसोबाना खापराची मंदिरे बनविलेली दिसतात, होळी हा यांचे पूजनाचा महत्वाचा दिवस मानला जातो.
मुंजोबा
मुंज झाल्यावर सोडमुंज होण्यापूर्वी मृत पावलेल्या व्यक्ती चे स्मारक म्हणजे मुंजा. मुंजा विहिरीत अथवा पिंपळाचे झाडावर वास करतो असे मानले जाते, जेजुरीत सात ठिकाणी या मुंजाची स्थाने असुन काही लोक यांचे पुजा करतात.
खैसोबा
वेताळ वर्गातील देवता मानली जाते, जेजुरी मधील कवडदरा परिसरात शेंदूर चर्चित खैसोबाचे स्थान असुन आषाढ महिन्यात याची जत्रा केली जाते
चिंद्यादेवी
साधारण गावचे शिवेवर आढळणारी ही देवता एका कोनाड्यात दगडास शेंदूर लावून हिची स्थापना केलेली आहे. ही काटेरी झुडपां खाली असुन हे झुडूप विविध रंगाचे वस्त्रांचे तुकड्यांनी सजलेले असते. या मुळेच हिला चिंद्यादेवी म्हणतात. या देवतेस आपल्या वस्त्राचा तुकडा अर्पण केल्याने आपणास अनेक वेळा नवीन वस्त्र धारण करण्याची संधी मिळते म्हणजेच संकटा पासुन संरक्षण होऊन दीर्घायुष लाभते अशी समाज धारणा आहे. प्रवासास जाताना तिला वस्त्र अर्पण केल्याने आपण सुरक्षित परततो असे मानले जाते, या मुळे तिला वस्त्र वाहून झाडावर अडकवली जातात. जेजुरीचे शिवे वरील हिची काही स्थाने नष्ट झाली असली तरी midc परिसरातील तिचे स्थान टिकून आहे.
नाग
आदिम काळा पासुन नागपूजा केली जाते, नाग देवतांचे प्रतिनिधित्व करतो असे मानतात, त्यामुळे शंकरांचे गळ्यात नाग, गणपतीच्या पोटावर नाग विराजमान दिसतो, तर विष्णू नागावर निद्रा करताना दिसतात, नाग संहार करता व संरक्षक ही मानला जातो, या श्रद्धे तून नाग प्रतिमांची स्थपना केली जाते. जेजुरी मध्ये ६ ठिकाणी नाग प्रतिमा असुन ३ ठिकाणी त्यांचे स्वतंत्र स्थापना केलेली आहे, कडेपठार, जेजुरीगडा वरील नाग प्रतिमांच्या पूजना साठी तेथील खंडोबा मंदिरातून नागपंचमी दिवशी म्हाळसा- बाणाईचे ताट काढले जाते तर गावातील नाग मंदिरात नाग पंचमी उत्सव साजरा केला जातो
आसरा
सातीआसरा, आसरा, मावलाया, या नावाने प्रचलित देवता प्रत्येक जलाशय व जल प्रवाहाचे ठिकाणी यांचा वास असल्याचे मानले जाते, या देवता या जलाशयाचे व परिसरातील वनराई च्या संरक्षक देवता मानल्या जातात. सात संख्येत असणाऱ्या या देवताना सप्तमातृका ही म्हटले जाते, ओढा, जलाशय यांचे काठावर दगडांना शेंदूर लावून यांचे स्थान मानले जाते जेजुरीत होळकर तलाव, गायमुख, पेशवे तलाव, व ओढ्यांचे काठी या स्थान मानतात, बालकांचे व स्व:संरक्षणार्थ यांची पुजा केली जाते, विशेष दिवस व आषाढ महिन्यात यांचे पुजन केले जाते.
जेजुरी पर्यटन मार्गदर्शन
जेजुरीत कसे पोहोचाल
रस्ते मार्ग
जेजुरी पुणे जिल्ह्यात असुन रस्ते मार्गांनी व्यवस्थित जोडलेले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा ठिकाणापासून चे जेजुरीचे अंतर किलो मीटर मध्ये
बस व्यवस्था
जेजुरी पुणे शहरा पासुन ४७ किमी अंतरावर असुन पुणे शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, या राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानका वरून तसेच बारामती, फलटण या स्थानका वरून जास्त प्रमाणात बस सुटतात, इतर ठिकाणा वरूनही जेजुरीस बस सुटतात,
रेल्वे व्यवस्था
पुणे – बंगलोर रेल्वे मार्गावर जेजुरी रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे ने ही जेजुरी येता येते जेजुरी रेल्वे स्थानक जेजुरीगावा पासुन २.५ किमी दूर असुन, येथुन जेजुरीस येणे साठी रिक्षा उपलब्ध असतात
जेजुरी रेल्वे वेळापत्रक
विमानतळ
जेजुरी जवळील सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव (पुणे) हे आहे. येथून जेजुरी ४९ किमी अंतरावर आहे
निवास व्यवस्था
घरगुती व्यवस्था – जेजुरीत कुलधर्म कुलाचारा साठी येणाऱ्या भाविकाची येथील पुजाऱ्याकडे घरगुती निवासाची व्यवस्था होते.
धर्मशाळा – जेजुरीत विविध संस्था मार्फत चालविल्या जाणाऱ्या धर्म शाळा आहेत.
भक्त निवास – जेजुरी देवस्थान चे भक्त निवास उपलब्ध आहे.
लॉज – वातानुकुलीत, डिलक्स, साध्या अश्या सर्व प्रकारातील लॉज जेजुरीत उपलब्ध आहेत
विशेष सुचना
* जेजुरी गडावरील मंदिराचे गर्भगृहात रविवार व यात्रा काळात प्रवेश बंद असतो
* जेजुरी गड व कडेपठार उंचीवर असल्याने जेष्ठ नागरीकासाठी येथे डोलीची व्यवस्था असुन , जेजुरी गडाचे पायथ्याला डोली उपलब्ध होतात, कडेपठारी जाण्यासाठी ही जेजुरीगड पायथ्याशी संपर्क साधावा.
पर्यटक,यात्रेकरू, व भाविक भक्तांना नम्र आवाहन
# जेजुरी व आसपासचा परिसर पर्यावरण समृद्ध व धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असुन याला हानी पोहचेल असे कोणतेही वर्तन करू नका.
# थर्माकोल व प्लास्टिक चे पत्रावळी व ग्लास यांचा वापर करू नका, पर्यावरण पुरक कागदी व पानांचे पत्रावळीचा वापर करा, वापरलेल्या या वस्तु योग्य पद्धतीने नष्ट करा.
# धार्मिक क्षेत्राचे व तेथील तीर्थांचे तलावाचे व नदीचे पावित्र्य जपा. त्याची कचराकुंडी करू नका.
# डोंगरातील मार्गावरून जाताना पेटती सिगारेट अथवा काडी रस्त्याचे कडेला टाकु नका, यामुळे डोंगरात वणवा लागुन निसर्गाची हानी होऊ शकते.
# मंदिरे व इतर ऐतिहासिक वास्तुवर रंगाने चुन्याने नावे लिहून त्या विद्रूप करू नका.
# आपण ज्या ठिकाणी देवकार्यास थांबला आहात तो परिसर स्वच्छ ठेवा.
# पाण्याचा योग्य व मर्यादित वापर करा.
# आपणा कडील वाद्य वाजविताना स्थळ व वेळ याचे भान ठेवा.
# झाडाखाली स्वयंपाक करताना आपण पेटविलेल्या चुली मुळे झाडाचे खोडाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. जेवणाचे पंगती नंतर खरकटे व पत्रावळी टाकून न देता योग्य पद्धतीने नष्ट करा. व जागा स्वच्छ करा
# कऱ्हा नदी ( मल्हार सागर) येथे स्नान करताना पाण्यामध्ये उतरू नका, हा परिसर धरणाचा फुगवटा असल्याने येथे खोल खड्डे व गाळ आहे, स्नान करताना योग्य ती खबरदारी घ्या