कर्नाटक मधील मैलार ಮೈಲಾರಲಿಂಗ (खंडोबा) मंदिरांचे माहितीसह सचित्र दर्शन.
मृणमैलार देवरगुड्ड आदिमैलार मंगसुळी मैलापुर
# खंडोबाची प्रमुख बारा स्थाने मानली जातात जेजुरी, पाली, नळदुर्ग, देवरगुड्डा, मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी लोकमतानुसार देशपरत्वे भेद आढळतात. या नकाशात अशा लोकमतानुसार प्रमुख मानल्या जाणार्या सर्वच स्थानांचा समावेश केलेला आहे
मृणमैलार
खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो. हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी लोक श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात. हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य युद्ध भुमि आहे व याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात.
हे मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंतल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे गाडी मार्ग थेट मंदिराचे पूर्वाभिमुख महाद्वारात पोहोचतो या महाद्वारावर उंच गोपूर आहे.
गोपुराचे दरवाज्यातून आत गेले की पारावर शिवलिंग आहे
व दक्षिण बाजुस उत्तराभिमुख देवडीत वीरभद्र व दुर्गा यांच्या मुर्ती आहेत.
पुढे पूर्वाभिमुख मंदिरा समोर एक उंच दीप स्तंब असुन मुख्य मंदिराची चोघई मंडप, नवरंग मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी रचना आहे , चोघई पंचखणी मंडपाच्या आतल्या घईत दोन्ही बाजुस चबुतरे असुन यावर देवाचे घोडे पालख्या इत्यादी वस्तू ठेवलेल्या असतात.
यांच्या पुढे पश्चिम बाजुस नवरंग मंडप असुन त्याचे पुढे अंतराळ आहे, अंतराळाचे पुढे गर्भगृह लागते.
पूर्वाभिमुख गर्भगृहात खालील बाजुस जमिनीवर सयोनी लिंग असुन ते हलणारे आहे, यास धातूचे मुखवट्याने झाकलेले असते. या लिंगाचे मागील बाजुस उत्सव मुर्ती असुन त्याचे वर भिंतीतील मोठ्या कोनाड्यात मैलाराची [ खंडोबाची ] बैठी चतुर्भुज मुर्ती आहे या मूर्तीच्या मांडी खाली मणि व मल्ला याची मुंड आहेत. ही मुर्ती काळी असुन पाषाणाची वाटते पण ही मातीची असुन तिला तेल लावल्याने ती काळी दिसते असे सांगितले जाते. मंदिर परिसरात एक फेब्रुवारी १०४७ चा शिलालेख आहे
प्रशस्थ आवार असलेल्या या मंदिराचे पश्चिम बाजुस आवारात एक पूर्वाभिमुख सोपी आहे. येथे झोपाळ्यावर गादी असुन ही कपिल मुनी यांची गादी असल्याचे व या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते असे सांगतात.
मुख्य मंदिराचे पश्चिम बाजुस उत्तरे कडे एक चौथरा असुन त्यावर एक लिंग, नाग, व खड्गधारी भग्न शिल्प आहे येथे यात्रा मधे पवडाचा कार्यक्रम होतो.
या चौथऱ्याचे उत्तर बाजुस देवडी असुन यात योगनारायण व सप्तमातृका व उभा भैरव यांच्या मुर्ती आहेत
.मुख्य मंदिराचे उत्तरेस आवारात पूर्वाभिमुख गंगी माळव [ म्हाळसा ] हिचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
गर्भगृहात खाली लिंग असुन याचे मागे गंगी माळव [ म्हाळसा ] हिची चतुर्भुज बैठी मुर्ती आहे. व कोपऱ्यात उत्सव मुर्ती आहे.
मंदिराचे कोटाचे उत्तरेस काही अंतरावर पूर्वेस पूर्वाभिमुख हेगाप्पाचे [हेगडी प्रधान ] याचे मंदिर असुन सदर गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
गर्भगृहात चतुर्भुज हेगडीची मुर्ती आहे.
या गावा बाहेर मरडी वर एका मेघदंबरीत त्रिशूल शिल्प आहे या ठिकाणी रथसप्तमीचे दिवशी देव येथे कुर्बात्या चे भेटीस येवून येथे ११ दिवस राहतात
कुर्बात्या ही मैलाराचे उपवस्त्र असल्याचे सांगितले जाते.
यात्रा व उत्सव
प्रत्येक रविवारी पालखी सोहळा असतो.
वैशाख शुद्ध प्रतिपदेस यात्रा सुरु होते द्वादशीस मैलार – माळव विवाह सोहळा होतो. पौर्णिमेस रथउत्सव व वद्य प्रतिपदेस रंग खेळला जातो. या दिवसात गर्दी असते.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी रोज रात्री पालखी सोहळा विजयादशमीस सीमोउलंघन अश्विन वद्य सप्तमीस देव घोड्यावर कुर्बात्याचे भेटीस जातात. या दिवशी पवाडाचे कार्यक्रम होतात.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी षडरात्र उत्सव षष्टीस भंडार पुजा.
पौष महिन्यात धनुर्मास रथसप्तमीस देव कुर्बात्याव चे भेटीस मरडी वर जातात. तेथे ११ दिवस मुक्काम १२ व्या दिवशी हेग्गाप्पा कडे येतात.
माघ पौर्णिमा ते तृतीये पर्यंत मोठी यात्रा या वेळी लंगर तोडला जातो.
देवरगुड्डा
देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा झाले. खंडोबाने ज्या मणि मल्ल राक्षसांचा वध केला त्या राक्षसांचे राजधानीचे हे गाव त्यांचे मृत्यू समयीचे विनंती वरून देवाने त्यांचे प्रेतासन करून येथे वास केला अशी जनश्रुती आहे. टेकडीवर वसलेले हे गाव सुंदर आहे
देवरगुड्डा कर्नाटक राज्यात असुन राष्ट्रीय महामार्ग ९ वर धारवाड कडून बंगलोर कडे जाताना मोतीबेनुर गावाचे पुढे ९ किमी अंतरावर रस्त्याचे पुर्व बाजुस देवरगुड्डा कडे जाण्यासाठी कमान दिसते येथून ८ किमी अंतरावर देवरगुड्डा आहे राणीबेनुर – गुंतल रस्त्यावर देवरगुड्डा असल्याने या मार्गावरून ही येथे पोहचता येते.
देवरगुड्डा गाव वसलेल्या टेकडीची उंची सुमारे २०० फुट आहे टेकडीच्या पायथ्या पासुन सुमारे १२५ पायऱ्या चढून मंदिरा पर्यंत पोहचता येते. गाडी मार्ग मंदिरा पर्यंत पोहचल्याने ह्या मार्गाचा वापर कमी झाला आहे.
रस्त्याने जाताना एक शिवद्वार दिसते
आणि तेथून पुढे अप्पान दोल मंडपा जवळ पोहोचतो
येथून दक्षिणेस समोर मंदिराचे प्रकारचे उत्तरद्वार दिसते
उत्तर द्वाराचे पश्चिम बाजुस थोड्या अंतरावर पूर्वाभिमुख हेगडीचे मंदिर आहे
मंदिराचे आवाराचे उत्तर भिंतीस कालीचे मंदिर आहे येथील मुर्ती बैठी व चतुर्भुज आहे
उत्तर दरवाजा वर नगारखाना असुन दरवाजाचे अंगास मारुती व भैरवाच्या कोनाड्यात मुर्ती आहेंत या प्रवेशद्वारातून आपण मंदिराचे प्राकारात प्रवेशतो
प्राकारात मुख्य मंदिरा समोर एक नाग प्रतिमा असुन टिळा हुरूप नाग्गाप्पा म्हणतात याचे व मुख्य मंदिराचे मध्ये एक दीपस्तंभ आहे. हुरूप नाग्गाप्पास रोग बरे होण्यासाठी येथे मीठ वाहिले जाते.
मुख्य मंदिर पूर्वाभिमुख असुन पाचखणी मंडप, तिघई मंडप, नवरंग मंडप, अंतराळ, व गर्भगृह अशी रचना आहे. पाचखणी मंडप बंदिस्थ असुन त्यास पुर्व, उत्तर, दक्षिण, कडून प्रवेशद्वारे आहेत नवरंग मंडपास उत्तर बाजुस बाहेरच्या अंगास देवड्या आहेत.
मंडपात प्रवेश केला की तेथे देवाचे मोठे जोडे दिसतात हे जोडे घालून देव रात्री फिरतात अशी जनश्रुती आहे पुढे दोन बाजूचे दोन चौथर्यावर देवाची पालखी व उत्सव वाहने ठेवलेली दिसतात
पुढील नवरंग मंदिराचे मधील खांब कातीव असुन मंडपात दक्षिण व उत्तर बाजुस पश्चिम भिंतीस अनुक्रमे स्कंदलिंग व गणेश प्रतिमा आहेत
गर्भगृहात पश्चिम भिंतीत पूर्वाभिमुख देवळीत बैठी चतुर्भुज मैलाराची [ खंडोबाची ] चतुर्भुज मुर्ती असुन टिळा धातूचे मुखवटा व कपड्यांनी सजवलेली असते. या मुर्ती मागे धातूची प्रभावळ आहे. या मुर्ती पुढे अंतरगृहात सयोनी मैलार लिंग असुन यास धातूचे कवच व मुखवटा घातलेला असतो.
मुख्य मंदिराचे उत्तर बाजुस मागे माळव [ म्हाळसा ] हिचे मंदिर पूर्वाभिमुख असुन सदर सोपा व गर्भगृह असे भाग आहेत
गर्भगृहात माळव [ म्हाळसा ] ची चतुर्भुज बैठी मुर्ती असुन तिचे समोर लिंग आहे
या मंदिराचे मागील बाजुस प्राकाराचे वायव्य कोपऱ्यात पूर्वाभिमुख तुप्पद माळव [ धृतमारी ] चे मंदिर आहे सदर व गर्भगृह अशी या मंदिराची रचना असुन गर्भगृहात तुप्पद माळव [ धृतमारी ] ची चतुर्भुज बैठी मुर्ती आहे
मुख्य मंदिराचे आवाराचे उत्तर दरवाजा मधून सरळ उत्तरे कडे जाणारा रस्ता मरडी कडे जातो या रस्त्यावरील चौक ओलांडल्यावर उत्तरेकडे पश्चिमबाजुस पूर्वाभिमुख मंदिर दिसते ते कुरबती माळव हिचे कुर्बतय म्हणजे धनगर ही मैलाराची द्वितीय पत्नी अथवा उपवस्त्र असल्याचे मानले जाते. सदर, मंडप, गर्भगृह अशी या मंदिराची रचना असुन गर्भगृहात तिची दगडी प्रतिमा आहे.
पुढे काही अंतरावर मर्दी दिसते मरडी दिसते मरडीचा अर्थ स्मशान असा होतो या ठिकाणी मणि मल्ल यांचे अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते. येथे एका चोथर्यावर दोन खांबावर आधारलेला त्रिशूल आहे व दुसरया चोथर्यावर एक दगडी त्रिशूल उभा आहे ही दोन मणि मल्ल यांची स्मारके असावीत काही उत्सवात देव पालखीत येथे येतात
मुख्य मंदिराचे प्राकाराचे नेरुतेस टेकडीचे पायथ्याशी एक मंदिर आहे हे रणदंबेचे हिने मणि मल्ल बरोबरील युद्धात राक्षसांचे रक्त प्राशन केले होते अशी जनश्रुती आहे एका चौथऱ्या वर हे पूर्वाभिमुख मंदिर असुन पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना असुन मंडपात एका दगडावर पादुका असुन गर्भगृहात डोंगराचे खडकात कोरलेली तिची बैठी प्रतिमा आहे सेजारी पुढे दोन नाग शिल्प आहेत पायथ्याचे गाडी मार्गाने या मंदिरा पर्यंत जाता येते.
यात्रा उत्सव
वैशाख शुद्ध १४स देव मंदिराचे आवारात लाकडी आसनावर बसविले जातात व एका कुंडात रंग करून पुरुष एकामेकांचे अंगावर रंग टाकून रंगोत्सव साजरा करतात.
जेष्ट पौर्णिमेस रात्री पालखी सोहळा असतो .
अश्विन शुद्ध प्रतिपदे पासुन दसऱ्या पर्यंत नवरात्र उत्सव संपन्न होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदे पासुन टे वद्य नवमी रोज रात्री पालखी सोहळा असतो दसऱ्याचे दिवशी पवाडाचा कार्यक्रम असतो या दिवशी कंचवीर पिंडरीत पहारमारून घेणे, हातावर खिळेमारून त्यावर ज्योती पेटवुन आरती करणे इत्यादी पवाडाचे प्रकार करतात
अश्विन वद्य नवमीस देव पालखीतून मरडीवर जातात. व कुरबती माळव चे भेटीस जाऊन येतात. नवमीस वग्गया उंच धनुष्यावर चढून भविष कथन करतात
मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी खंडोबाचे षडरात्र उत्सव साजरा होतो, मार्गशीर्ष पौर्णिमेस यात्रा भरते
आदिमैलार
[ खानापूर ]
आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ‘ मल्हारी महात्म्य ‘ याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते
आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे या प्रवेशद्वारा मधून प्रवेश केल्यावर आपण आवारातील सज्ज्यावर पोहोचतो
मंदिराचे आवारास चारही बाजुने दरवाजे असुन सभोवताली ओवऱ्या काढलेल्या आहेंत पुर्वाद्वारातील फरसबंदी वरून मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी पायऱ्या आहेंत
यातील दक्षिण बाजूचे पायर्यांनी उतरताना भिंतीत एक उत्तराभिमुख देवळी असुन यात एक मल्ल प्रतिमा व इतर भग्न मूर्तींचे अवशेष आहेंत.
तर फरसबंदी खालील पश्चिमाभिमुख ओवरीत नागप्रतिमा, नंदिप्रतीमा, व उत्सवाचे हत्ती घोडे आहेंत.
मुख्य मंदिरास १६ खांबी उघडा दगडी मंडप असुन या मंडपाचे पश्चिम बाजुस पुवाभिमुख बंदिस्त गूढ मंडप आहे. त्याचे पश्चिमेस गाभारा व उत्तरेस एक खोली आहे.
गर्भगृह पूर्वाभिमुख असुन गर्भगृहात एका चोथर्यावर देवाचे पादुका असुन त्याचे मागे द्विलिंग आहे द्विलींगा पाठीमागे एका आसनावर खंडोबाची चतुर्भुज बैठी मुर्ती आहे याच्या आसनावर खाली घोडा व कुत्रा यांच्या प्रतिमा कोरलेल्या असुन आसनामागे नंदी प्रतिमा आहे दोनी बाजुस हात जोडून उभ्या असलेल्या म्हाळसा बाणाई यांच्या प्रतिमा आहेत. येथेच शेजारी धातूच्या उत्सव मुर्ती आहेत. येथील दगडी मुर्ती अलेकडील असाव्यात कारण ईस १९६० दरम्यानचे एका वर्णनात येथे खंडोबाची उभी व अश्वरूढ मुर्ती असल्याचा उल्लेख आहे, येथे मंदिर परिसरात शिलालेख आढळत नाहीत
मुख्य मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मागील कोपऱ्यात काही घुमट्या असुन तेथे शिवलिंग आहेत व दक्षिण बाजुस एक चोसोपी आहे यात्रेकरू यात्रेत उतरण्या साठी त्यांचा उपयोग करतात
मंदिराच्या कोटाचे वायव्य बाजुस दोन पुष्करणी आहेत यातील पूर्वेकडील पुष्करणीस चारही बाजुने पायऱ्या असुन भाविक येथे स्नान करतात.
या पुष्कर्णीचे पश्चिम बाजुस एक मोठा तलाव असुन त्याचे पश्चिमेस पूर्वाभिमुख ओवऱ्या आहेत या ओवऱ्याचे दक्षिणेस एका मस्जिदचे अवशेष आहेत
मुख्य मंदिराचे आवाराचे नेरुत्येस काही अंतरावर पूर्वाभिमुख कोट दिसतो याचे पुर्वद्वारा वर नगारखाना आहे या मंदिरास ज्योतिर्लिंग किंवा मुळमंदिर म्हणतात
याचे पुर्वद्वारातून प्रवेश केला की उत्तर बाजुस एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा दिसते या मेघदंबरीचे पश्चिमेस पूर्वाभिमुख मंदिर आहे शिखरयुक्त मंदिराची रचना मंडप गर्भगृह अशी आहे.
गर्भगृहात एक सयोनी लिंग असुन या लिंगास मुळलिंग म्हणतात हे खंडोबाचे स्वयंभू लिंग असुन खंडोबा प्रथम येथेच होता व खंडोबाचे मुळ स्थान असल्याचे सांगतात.
मुख्य मंदिराचे पुर्वबाजूस काही अंतरावर एक चोथरा असुन त्या चोथर्यावर पत्र्याचे विस्तीर्ण शेड आहे
त्या मध्ये एका शिखर युक्त घुमटीत पादुका व एक उभी देवीची मुर्ती आहे हिस तुप्पद माळव असे म्हणतात यातील मुर्ती आणि पादुका नवीन असुन जुन्या शेजारी बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत.
या मंदिरा पासुन काही अंतरावर माणिकप्रभू व शनीमंदिर असुन त्याच्या पुढे एका घळईत गुप्तलिंग मंदिर असुन येथून शेजारून पाणी वाहते येथे एक गोमुख आहे येथील वातावरण रमणीय वाटते.
यात्रा उत्सव
दसरा- देव पालखीत बसून छबिना निघतो हनुमान मंदिरा पासुन तो परततो
मार्गशीर्ष-
हा महिना भर यात्रा भरते या महिन्यात शुद्ध ६ ते १० पर्यंत मुख्य उत्सव असतो रोज खास पुजा बांधल्या जाऊन देवास हळद लावून बाशिंग बांधले जाते दशमी दिवशी लाकडी नदी वरून देवाची मिरवणूक मुळलिंग मंदिरा पर्यंत निघते या महिन्यात येणारे सर्व रविवारी देवाची लाकडी हत्ती वरून मुळलिंग मंदिरा पर्यंत मिरवणूक निघते. महिनाभर विविध वस्तू व गुरांचा बाजार भरतो अमावस्याचा महिन्यात शेवटचा दिवस सर्वाधिक गर्दीचा असतो
मंगसूळी
मंगसुळी हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावाचे जहागीरदार देसाई यांच्या भक्तीने ईस १७५७ ते १५८० चे काळात देव नळदुर्ग वरून येथे चैत्र शुद्ध दशमीस येथे मंदार वृक्षाखाली प्रगट झाल्याचे जनश्रुती आहे
मंगसुळी गाव कर्नाटक राज्या मधील बेळगाव जिल्यातील अथणी या तालुक्यात आहे. मंगसुळी पासुन खंडोबा मंदिर २ किमी अंतरावर आहे
गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत जाता येते विस्तीर्ण माळरानावर एका कोटात हे मंदिर आहे या कोटास चहुबाजुंनी आतून ओवऱ्या काढण्यात आलेल्या आहेत
मंदिराचे कोटाचे पुर्व द्वारासमोर एक पश्चिमाभिमुख देवडी असुन त्यात हनुमानाची प्रतिमा आहे
कोटाचे पुर्व प्रवेशद्वार तीनमजली असुन त्या मध्ये नगारखाना आहे या दरवाज्यातून समोर मंदिर दिसते
खंडोबाचे पूर्वाभिमुख मंदिरास तीन कमानी सदर असुन सदरे वरून आत नवरंग मंडप आहे.
नवरंग मंडपाचे पश्चिम बाजुस पूर्वाभिमुख गर्भगृह असुन गर्भगृहात मधोमध एक भिंत असुन त्या भिंतीला खाली दोन मोठ्या कमानी असुन त्यातील दक्षिण कमानीत खंडोबाचे लिंग आहे या लिंगावर खंडोबाचा नागफणी युक्त मुखवटा चढविलेला आहे उत्तर कमानीत म्हाळसा बाणाई यांची लिंग असुन या लिंगावर देवीचा मुखवटा चढविलेला आहे दक्षिण कमानीच्या दोन्ही बाजुस उत्सव मुर्ती आहेत
खंडोबा मंदिराला खेटूनच उत्तर बाजुस हेगडी प्रधानाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे तीन कमानी सदर व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे
मंदिरात हेगडी प्रधानाची चतुर्भुज दगडी प्रतिमा आहे
हेगडे प्रधान मंदिरा समोर दिपमाळा व नंदी प्रतिमा आहे. कोटाचे आग्नेय कोपऱ्यात एका पारावर विष्णू प्रतिमा आहे व वायव्य कोपऱ्यात तीर्थाची विहीर आहे .
यात्रा उत्सव
चैत्र शुद्ध दशमी – हा देव प्रगट झाल्याचा दिन समजला जातो या दिवशी रात्री १२ चे पुढे चार निशानाचे काठ्यासह पालखी सोहळा निघतो पहाटे वाघ्या लंगर तोडतो आणि सोहळा संपतो,
नवरात्र – अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घट स्थापना होते प्रतिपदा ते शुद्ध सप्तमी रोज सकाळी देवाची पालखी निघते. अष्टमीस लोक दिवसभर साखर वाटतात रात्री पालखी निघते वाघ्या मुरुळ्या चा कार्यक्रम होतो. नवमीस घट विसर्जन होतो दसऱ्या दिवशी सायंकाळी पालखी सोहळा आपटा पुजन व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो. द्वादशीस भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो.
षडरात्र – मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी खंडोबाचे घट स्थापना होते.
माघ पौर्णिमा – पालखी सोहळा असतो पालखी मंगसुळी गावात जाऊन मंदिरात परतते
मैलापुर
कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार व मैलारलिंग या नावाने ओळखला जातो. कर्नाटक मधील प्रमुख मैलार मंदिरा मधील हे एक प्रमुख मंदिर. या मंदिरा वरूनच या गावाचे नाव मैलापुर असे पडले आहे. मैलाराचे वास्तवाचे गाव पूर म्हणजेच मैलापुर.
मैलापुर कर्नाटक राज्यातील यादगीर शहरा पासुन १८ किमी अंतरावर आहे.हे समुद्र सपाटी पासुन ४१५ मी उंचीवर आहे. या गावाचे समीप असणारी मंदिराची टेकडी गावापासून ३५ मी उंचीवर आहे.
गाडीरस्ता मंदिराचे पायथ्या पर्यंत पोहोचतो.
गावात पोहचताना प्रथम मंदिराची स्वागत कमान लागते
या कमानीतून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर मंदिराचा पायरी मार्ग सुरु होतो.या मार्गाचे कडेला अनेक नाग शिल्प कोरलेली आढळतात. मंदिराचा हा पायरी मार्ग सुमारे २०० पायऱ्यांचा आहे.
पायरी मार्गावरून जाताना मार्गाचे पुर्व बाजुस पश्चिमाभिमुख शिळा असुन हा भद्रेश्वर असल्याचे सांगितले जाते.
या नंतर काही अंतराने मार्गाचे पश्चिम बाजुस पुर्वाभिमुख शिळा दिसते ही वीरभद्र ची मांडणुका आहे असे सागतात.
मार्गावर पुढे दक्षिणाभिमुख मोठा दरवाजा लागतो या दरवाज्याचे आतील बाजुस देवड्या मध्ये देवाचे उत्सवाचे पालखी व इतर वस्तू ठेवलेल्या आहेत.
दरवाज्याचे मधून आत गेल्यावर रस्त्याचे पुर्व बाजुस पश्चिमाभिमुख घुमटी असुन या घुमटी मध्ये चोंडेश्वरी देवीची दगडी प्रतिमा आहे.
येथूनच पश्चिम बाजुस एक पायरी मार्ग लागतो, पुढील मंडपात दक्षिणाभिमुख दरवाजा असुन यातून आत गेल्यावर दगडाची कपार आहे
या देवाची उत्सव मुर्ती व मुखवट्यांचे काठ्या ठेवलेल्या आहेत. हे मंदिर तुरंगी बल्लम्मा अथवा बाणाईचे असल्याचे सांगतात. येथून पुन्हा मुळ मार्गावर यावे लागते.
पुढे रस्त्याचे कडेला दगडी खांबावर आधारलेला खुला मंडप लागतो मंडपात पश्चिम दक्षिण बाजुस छोटे मंदिर आहे.
या मंदिरात हेग्गाप्पा याची स्थापना केलेली आहे, या मंदिरास पुर्व व उत्तर बाजुने प्रवेशमार्ग आहे.
हेग्गप्पा मंदिराचे उत्तर दरवाज्याने बाहेर पडल्यावर मंडपातील पश्चिमेच्या पुर्वाभिमुख कोनाड्यात अक्कमहादेवी व गणपती यांच्या दगडी प्रतिमा आहेत.
येथून पूर्वेस समोरच गंगा माळव्वा चे मंदिर आहे. पश्चिमाभिमुख मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते.
मंदिराचे गर्भगृह दगडी कापरीचे असुन गर्भगृहात गंगा माळव्वा ची दगडी मुर्ती आहे.
माळव्वा मंदिराचे समोरील पश्चिम बाजूचे पायऱ्या चढून पुढे गेले की एक नवीन मंडप लागतो या मंडपाचे बाजुला मारुतीची मुर्ती आहे. मंडपाचे उत्तर बाजुस नंदी प्रतिमा आहे.
या मंडपात मुख्य मंदिराचा उत्तराभिमुख दरवाजा लागतो
या दरवाज्यातून पायऱ्या उतरून आपण एका प्रशाष्ट दगडी कपारीत जातो या कपारीत घोडा व इतर प्रतिमा एका चोथर्यावर असुन त्याचे मागे पुर्वाभिमुख मैलाराचे स्थान आहे याला धातूचे मुखवटा व वस्त्रांनी सजविले आहे. सुमारे ३००/४०० वर्षा पासूनचे हे मंदिर असल्याचे स्थानिक सांगतात.
मुख्य मंदिराचे उत्तर बाजुस थोड्या अंतरावर उंच दगडाचे कपारीचे पायथ्याला एका छोट्या घुमटीत अश्वारूढ देवाची प्रतिमा आहे. या मागील उंच शिळा या टेकडी वरील सर्वात उंच भाग आहे.
टेकडी वरील या उंच टोकावर देवाचा कळस असुन त्याचे शेजारी अग्नी पेटविण्यासाठी बांधीव जागा आहे. या मुळे या सुळक्यास दिवटी असे म्हणतात. धार्मिक कुलाचारात ही दिवटी पेटविण्याचा येथे प्रघात आहे .
मंदिराचे टेकडीचे ईशान्य बाजुस टेकडीचे पायथ्याशी जलाशय असुन येथील पायरी मार्गाने या जलाशयाकडे जाता येते.