महाराष्ट्रातील खंडोबा मंदिरांचा माहिती सह सचित्र दर्शन
पाली सातारे शेगुड निमगाव नळदुर्ग अणदूर माळेगाव चंदनपुरी नेवासा मलवडी बीड धामणी रेवडी
# खंडोबाची प्रमुख बारा स्थाने मानली जातात जेजुरी, पाली, नळदुर्ग, देवरगुड्डा, मृणमैलार, आदिमैलार या स्थाना शिवाय इतर स्थाना विषयी लोकमतानुसार देशपरत्वे भेद आढळतात. या नकाशात अशा लोकमतानुसार प्रमुख मानल्या जाणार्या सर्वच स्थानांचा समावेश केलेला आहे
पाली
श्री क्षेत्र पाली ही खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाह बद्ध झाले. जनश्रुती नुसार म्हाळसा नेवासे येथील तिम्माशेठ वाण्याची कन्या. साक्षात पार्वतीनेच त्याची घरी जन्म घेतला, शंकराचे दृष्टांता प्रमाणे त्याने म्हाळसेचा व खंडोबाचा विवाह पाली येथे लावून दिला.म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती असल्याचे मानले जाते. तारळी नदीच्या काठी वसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुलेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा येथे साजरा होतो. मुळात या गावाचे नाव राजापूर, येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती ती खंडोबाची निस्सीम भक्त होती तिचे भक्ती मुळेच खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रगट झाले असे मानले जाते, या पालाईचे नावा मुळेच या गावाचे नाव बदलून पाल / पाली असे झाले.
पाली हे गाव सातारा जिल्ह्यात सातारा शहरा पासून तीस किमी अंतरावर आहे सातारा – कराड मार्गावरील अतीत व काशीळ या गावावरून येथे जाता येते गाडी रस्ता थेट मंदिराचे दक्षिण द्वारात पोहोचतो,
हे दक्षिणद्वार यमाजी शिवदेव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण मंदिराचे बाह्य कोटात पोहोचतो .दक्षिणद्वाराचे पुर्व बाजूस नगारखाना असून शेजारीच हत्तीखाना आहे. येथील हत्ती वरून देवाचे लग्न वेळेस मिरवणूक निघते.येथील बाह्य आवार दगडी आहे.
या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते,
या दक्षिण द्वारातून आत गेले की लगेच पुर्व बाजूस एक गणेश प्रतिमा आहे. तर द्वाराचे पश्चिम ओवरीत हनुमान प्रतिमा आहे. ओवारीच्या एका खांबावर गणेश खंडो व महीपत खंडो पारगावकर यांचा ईस १७७२ चा शिलालेख आहे, हे बांधकाम या काळी झाले असे दिसते.
मंदिराचा संपूर्ण कोट चहुबाजूंनी ओवऱ्यानी युक्त असून त्याची उंची सुमारे २० फुट आहे कोटाची पुर्व पश्चिम लांबी सुमारे १४० फुट व दक्षिण उत्तर लांबी ८० फुट आहे .कोटास दक्षिण, पुर्व, उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव. घोरपडे, इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे.
कोटाचे पुर्व बाजूस दरवाजा आहे हा जुना मुख्य दरवाजा या दरवाजाचे बाह्य बाजूस दक्षिणेकडे एका चोथऱ्या वर पादुका आहेत. पुर्व दरवाज्या अलीकडे अलीकडे खंडोबाचे अश्वारूढ शिल्प बसवले आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की
उत्तर बाजूस एका मेघडम्बरीत पश्चिमाभिमुख नंदी प्रतिमा दिसते
या नंदी मंडपीच्या पुढे शेजारी एक खंडोबाचे मंदिर आहे, यती मूर्ती बैठी व चतुर्मुख आहे .
या पुढे दिसतो तो पूर्वाभिमुख मंदिराचा सोळाखांबी मंडप या मंडपाचे सर्व खांब पितळी पत्र्याने मढवलेले आहेत, त्यावर काही चित्रे काढलेली आहेत, येथी फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख आहे .
मंडपाचे पश्चिमेस मुख मंडप असून या मंडपात दक्षिण बाजूस गणेश प्रतिमा आहे. तर उत्तर बाजूस एक छोटा दरवाजा आहे. मध्यभागी गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. येथील फरशीवर पडलोजी आबा बिन बावसेठी करदोई असा लेख आहे.
गर्भगृहाच्या दरवाज्याचे उंबऱ्यावर एक स्त्री मुखवटा असून हा पालाई गवळणीचा आहे हिच्या मुळेच देव येथे आले तिचे हे स्मारक
गर्भगृहात योनी असून त्या मध्ये खंडोबा व म्हाळसा यांची द्वीलिंग आहेत. या लिंगा पुढे तिवई च्या आधारे गादीवर मुखवटे ठेऊन सजावट केलेली दिसते या योनी मागे महिरप ठेवलेली आहे. तिचे पाठी मागे एक पितळी घोडेस्वाराची पत्नीसह मूर्ती आहे ही खंडोबा म्हाळसा यांची असावी पण ती हेगाडीची असल्याचे सांगतात.
योनीच्या दक्षिण बाजूस उत्तराभिमुख देवळीत बानाईची मूर्ती स्थापन केलेली आहे.
मुख्य मंदिराचे मंडप व गाभाऱ्यावर शिखरे असून गर्भगृहाचे शिखर व मंदिराची उंची सुमारे ५० फुट आहे, या मंदिराच्या बांधकाम शैली वरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिरास खेटून एक मंडपी असून त्या मध्ये पंचलिंगाची स्थापना केलेली आहे.
कोटाचे आत मध्ये नेरुत्या बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून आत मध्ये एक उभ्या पुरुष्याची प्रतिमा आहे हिचे उजव्या अंगास अडोजी बिन कृष्णाजी सावंत असा लेख आहे. ही प्रतिमा ह्या व्यक्तीने स्थापन केली असावी.
मंदिराच्या पाठभिंतीस एक पश्चिमाभिमुख मेघडम्बरी असून त्या मध्ये भवानीची स्थापना केलेली आहे. हिला सिद्धवासिनी असेही म्हणतात.
मुख्य मंदिराचे वायव्य बाजूस कोटाचे आतील बाजूस एक पूर्वाभिमुख देवडी असून ती मध्ये ओंकारेश्वर शिवलिंग आहे. या मागे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत.
मुख्य मंदिराचे उत्तर बाजूस दरवाजा असून तो आकाराने लहान आहे या दरवाज्यातून बाहेरील बाजूस एक वापी आहे
.
उत्तरतटाचे पुर्व बाजूस तटाला खेटून हवालदाराची स्थापना केलेली आहे
मंदिराचे कोटा पासून थोड्या अंतरावरून तारळी नदी वाहते यात्रा उत्सवाचे वेळी नदीचा परिसर दुकाने यात्रेकरू व वाघ्या मुरुळीच्या गायन वादनाने दुमदुमून जातो.
खंडोबा म्हाळसा विवाह यात्रा
पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो, तारळी नदी व पालीचा परिसर भक्तांचे गर्दीने भरून जातो अनेक वऱ्हाडी लग्नासाठी पालीस येतात मध्यान्हा दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरा मधून विवाह साठी प्रस्थान होते हत्ती वरून देव लग्नासाठी पाली गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाराचे उधळनीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हळदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचे लोभस दृष केवळ अवर्णनीय. गावाचे पेठेतून मिरवून हा सोहळा तारळी नदी पार करून जावू लागतो मावळतीकडे झुकलेला सूर्य आणि सुवर्णमय झालेला समुह केवळ सुवर्णच
नदीच्य पलीकडे कायम स्वरूपी दगडी बाहुले लग्नासाठी उभारण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यावर मंडप उभारण्यात येतो या मंडपात मिरवणूक पोहचते आणि खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न होतो रात्री देवाची वरात निघते ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहचते. लग्नाचे पाचव्या दिवशी पाखाळनी करण्यात येते. या वेळेस भरणारी यात्रा सुमारे १५ दिवस चालते .
सातारे
सातारे खंडोबा साठी प्रसिद्ध असणारे औरंगाबाद जवळील गाव येथील रेल्वे स्टेशन पासुन ५ किमी असणारा गाव औरंगाबादचे शहर विस्ताराने त्याचाच एक भाग बनत आहे. औरंगाबादचे रिंग रोडला पुणे, पैठण, बीड कडून येणारे मार्ग मिळतात त्या परिसरातील एम आई टी कॉलेज चे जवळून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने सातारे येथे पोहचता येते.
येथील खंडोबा मंदिर एका डोंगराचे पायथ्याशी आहे गाडी मार्गाने मंदिराचे पुर्व व पश्चिम दरवाज्या मध्ये पोहचता येते. मंदिर एका उंच कट्यावर बांधलेले आहे आवाराचा पुर्व दरवाजा मोठा असुन सुमारे १५ पायऱ्या चढून दरवाज्यातून आवारात जाता येते दरवाज्यावर नगारखाना आहे
पुर्व दरवाज्यातून आवारात प्रवेश केल्यावर उत्तर बाजुस एक दीपमाळ आहे त्याचे पुढे पूर्वाभिमुख मंदिराच्या मंडपाचा चौथरा दिसतो तीन पायऱ्या चढून चौथऱ्यावर जाता येते. चौथऱ्यावर चारही बाजुच्या भिंतीचा तळ व मंडपाचे खांबांचे १९ तळ या चौथऱ्यावर दिसतात, या चौथऱ्यावर येण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडून पायऱ्या आहेत भग्न मंडपाचे हेच अवशेष शिल्लक आहेत
मंडपाचे पुढे उत्तर व दक्षिण बाजुस प्रत्येकी एक खोली काढलेला सोफा आहे या खोल्याचे दगडी कलाकुसरीने युक्त पुढे काढलेल्या दोन देवळ्या आहेत उत्तरे कडील देवळीत गणपती व दक्षिणे कडील देवळीत मारुती यांच्या प्रतिमा आहेत.
मधील सोप्याची तुळई दोन खांबांनी आधारलेली असुन गर्भगृहाचे दरवाजाचे वरील भागात दशावतार व उत्तरबाजुस कृष्ण गवळणी व दक्षिणबाजुस सूर्य याची शिल्पे आहेत. पूर्वाभिमुख दरवाज्यावर मुर्ती, वेलपत्ती काढलेल्या आहेत हे काम अतिशय सुबक आहे या काम मधील व्यक्ती रूपा वरून हे काम पेशवाई कालीन आहे असे दिसते.
गर्भगृहात प्रवेश केल्यावर समोर पश्चिमेस पूर्वाभिमुख तीखणी मेघदम्बरी असुन ती उंचावर आहे मध्यभागीचे मेघदम्बरी धातूची म्हाळसेसह घोड्यावर विराजमान खंडोबाची झालेली उत्सव मुर्ती आहे. या मुर्ती मागे एक शेंदूर चर्चित डोळे बसविलेला खंडोबाचा तांदळा आहे
गर्भगृहाचे नेरुत्य कोपऱ्यात एक अश्वारूढ शेंदूर चर्चित घोडेस्वार असुन त्याचे शेजारी सुमारे ८ फुट उंचीचा दुधारी खंडा आहे
गर्भगृहाचे वयाव कोपऱ्यात अश्वारूढ खंडोबा म्हाळसा यांची प्रतिमा आहे त्याचे पश्चिमबाजुस लिंग व तांदळे आहेत.
जुन्याकाळी खंडोबाचे वास्तव्य मंदिरामागे दिसणारे डोंगरावर होते, सातारे येथील जहागीरदार दर्शनासाठी तेथे रोज जात ते वृद्ध झाल्यावर त्यांचे भक्तीने देव या ठिकाणी गोकुळ अष्टमी चे दिवशी आले अशी जनश्रुती आहे.
मंदिराचा गाभारा बाहेरून तारकाकृती करण्यात आलेला आहे त्या वरील नक्षीकाम सुंदर आहे गर्भगृहास दक्षिण बाजूनेही दरवाजा आहे मंदिराचे काम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे.
मंदिराचे शिखर सुंदर असुन त्या वरील गिलावा गेलेला आहे. त्या मुळे त्या वरील मुर्ती काम कसे होते हे समजत नाही, हे मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात तर ईस १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांचा जिर्णोधार केल्याचेही सागितले जाते. परंतु मंदिराचे अपूर्ण स्थिती मुळे बांधकाम अपूर्ण राहिले की उध्वस्त झाले हे समजत नाही.
मंदिराचे आवाराचे अग्न्येय कोपऱ्यात एक पार असुन त्यावर गणपती व मारुती यांच्या प्रतिमा आहेंत
दसरा नवरात्र, चंपाषष्टी षडरात्र , पौष पौर्णिमा, या दिवसा मध्ये येथे यात्रा भरते
शेगूड
शेगूड हे अहमदनगर सोलापूर जिल्ह्याचे सीमेवरील छोटेसे गाव येथील खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत या तालुका ठिकाणा पासुन १४ किमी अंतरावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुका ठिकाणा पासुन १५ किमी अंतरावर आहे. हे मंदिर कर्जत – करमाळा या रस्त्यावर रस्त्याचे कडेलाच आहे.
आपण थेट मंदिराचे कोटाचे दक्षिण दरवाज्यातच उतरतो हा दरवाजा लहान असल्याने त्यास खिडकी असेही म्हणतात
मंदिराचा पुर्वदरवाजा हा मुख्य दरवाज्या असुन तो भव्य आहे दगडी बांधकामातील दरवाज्यावर वीट कामाने नगारखाना बांधण्यात आलेला आहे, या दरवाज्याचे वरील बाजुस ईस १७७३ चा शिलालेख असुन मल्हारी शंकर, रायाजी महीपत, विठ्ठल महीपत पुंडे यांचा नामलेख आहे या वरून या दरवाज्याचे व मंदिराचे तटबंदीचे बांधकाम यांनी केले असावे.
मंदिराची तटबंदी दगडी बांधकामा मधील असुन कोटाची लांबी सुमारे १४८ व रुंदी १२० फुट असावी कोटास आतील बाजुने चहुबाजुला ओवारी आहेत कोटावर सज्जा असुन पुर्वदरवाजा जवळून नगारखाना व सज्ज्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. कोटास चारही दिशांना दरवाजे असुन दक्षिण व उत्तरेचा दरवाज्या लहान असलेने स्थानिक लोक यास खिडकी असे म्हणतात
पुर्व दरवाज्यातून प्रवेश केला की या दरवाज्या समोरच आडवी एक पश्चिमाभिमुख लांब देवडी असुन त्यात काही प्रतिमा आहेत हे देवडी शिंपी समाज्यातील लोकांची असल्याचे सांगितले जाते. या देवडीवर एक शिलालेख होता पंतो आत्ता नष्ट झाला आहे.
या देवडीचे पुढे पश्चिमेकडे नंदी असुन येथील मेघदंबरीत पादुका असुन त्यातील एक पादुका शिल्प चार मेंढ्याचे शिरावर विराजमान आहे. शेजारी दिपमाळा आहे
.
मुख्य मंदिराचे समोरच जमिनीच्या दगडी फरशीवर हात जोडून लोटांगण घातलेल्या अवस्तेतील एक पुरुष प्रतिमा कोरलेली आहे ती नगर जिल्ह्यातील चर्मकार समाज्यातील एका पुरुष्याची असल्याचे सांगितले जाते, जुन्याकाळी मंदिराचे काम सुरु असताना काळास स्थिर राहत नव्हता त्या वेळी देव येथे राहावा या साठी सदर व्यक्तीने आपल्या पोटातील आतडे काढून त्याची वाट लावली तेव्हा काळास स्थिर झाला व देव तेथे राहिला देवा साठी बलिदान देणाऱ्या चर्मकाराचे हे स्मारक असल्याची जनश्रुती आहे
समोरच पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराची रचना मंडप गर्भगृह अशी आहे. आज या ठिकाणी नव्याने उभा राहिलेला मंडप देसतो या मंडपाचे अगोदर दगडी खांबावर आधारलेला मंडप होता तो कॉक्रिट चे नवनिर्माण करताना काढून टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे येथील मंदिराचा काळ ठरविणे अशक्य आहे मात्र मंदिराचे काम कोटाचे कामा पूर्वेचे आसवे हे निश्चीत
मंदिराचे पूर्वाभिमुख गर्भगृहात उतरून जावे लागते. गर्भगृहाचे मध्यभागी खंडोबा म्हाळसा यांची छोटी स्वयंभू लिंगे आहेत यांना पितळी मुखवटे लावतात लिंगाचे कडेने योनीचा आकार तयार केलेला आहे. या लिंगाचे पाठीमागे एका चोथर्यावर खंडोबा, म्हाळसा, बानाई यांच्या बैठ्या मुर्ती आहेत. शेगूड गावा जवळील म्हाळुंगी गावातील एका भक्ताचे भक्तीने देव येथे लिंग रूपाने प्रगटला अशी जनश्रुती आहे.
कोटाचे अग्नय कोपऱ्यात एक दगडी बांधणीची विहीर असुन हिला तीर्थाची विहीर असे म्हणतात सुबक बांधकामाचे विहिरीस दोनी बाजुने पायऱ्या आहेत
मुख्य मंदिरामागे पूर्वाभिमुख मंदिरात शिवलिंग आहे.
कोटाचे नेरुत्य कोपऱ्याच्या पूर्वाभिमुख ओवरीत विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केलेली आहे.
शेजारील ओवरीत लाकडी घोडा असुन तो मार्गशीर्ष महिन्यात उत्सवाचे वेळी दर्शना साठी व मिरवणुकीसाठी काढला जातो
कोटाचे उत्तर बाजुस कोटा मध्ये सतीशिळा आहेत या ठिकाणी अनेक विरगळ व सतीशिळा होत्या त्या मंदिराचे नवीन काम करताना काढण्यात आल्या.
उत्तर बाजूचे ओवरीत गणपतीची मुर्ती आहे.
कोटाचे पश्चिम व उत्तर बाजुने एक ओढ वाहतो कोटाची पश्चिम बाजू व ओढ्याचे मध्ये दक्षिण बाजुस एक घुमटीत पादुका आहेत या ठिकाणी लोक नवसाचे बळी देतात याच ठिकाणी उत्तरबाजुस ईस १९९० मध्ये मंदिराचे मंडपाचे काम करताना जुन्या मंडपाचे अवशेष येथे टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात आता ते गाडले गेले आहेत.
यात्रा उत्सव
चंपाषष्टी
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस घट स्थापना होते चंपाषष्टीस देवाचा लाकडी घोडा दर्शनासाठी बाहेर काढला जातो मार्गशीर्ष शुद्ध षष्टीस खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा होतो. मार्गशीष पौर्णिमेस देवाचा छबिना रात्री निघतो छबीन्या पुढे लाकडी घोडा लोक खांध्यावर घेऊन नाचतात छबिना रात्रभर चालतो व पहाटे मंदिरात पोहोचतो सकाळी कुस्त्यांचा आखाडा होऊन उत्सव संपतो.
सोमवतीस देव अंघोळीसाठी महाळूगी गावातील डोहा वर जातात
निमगाव-खंडोबा
निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्या साठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले, आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत .
निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे- नासिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर पासून ६ किमी अंतरावर आहे. निमगावचे उत्तरेस १.५ किमी अंतरावरील टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. येथे थेट गाडी मार्ग मंदिरा जवळ जातो. पायरी मार्गानेही येथे पोहचता येते.
कोटाचे दक्षिण बाजूने सुमारे १०० पायरी चढून कोटा पर्यंत जाता येते. पायरी मार्गाचे सुरवातीस एक पूर्वाभिमुख भैरवनाथाचे मंदिर आहे
कोटाचे पुर्व बाजूने ही पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाचे दक्षिण बाजूस मंदिराचे कोटाचे पुर्व बाजूस हेगडी प्रधानाचे पश्चिमाभिमुख मंदिर असून मंदिरात हेगडीची बैठी दगडी मूर्ती आहे.
समोरच मंदिराच्या कोटाचे पुर्व प्रवेशद्वार दिसते या द्वारावर नागखाना बांधलेला आहे
पुर्वद्वाराचे दोन्ही बाजूस छोट्या मंडपी असून त्या मध्ये दक्षिण बाजूस गणपती व उत्तर बाजूस हनुमान मूर्ती आहेत.
मंदिराचा कोट मजबूत दगडी बांधकामाचा असून चारही बाजूस बुरुज आहेत. या तटाची उंची सुमारे २५ फुट आहे कोटाचा पश्चिम दरवाजा कायम स्वरूपी बंद केलेला आहे. कोटास आतील बाजूने ७६ ओवारी आहेंत कोटाची फरासबंदी लांबी १९५ फुट व रुंदी ११८ फुट आहे या कोटाचे काम ईस १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे .
पुर्वाद्वारातून कोटात प्रवेश केला की दरवाज्याचे उत्तर बाजूस दोन घोडे व वृंदावन आहे मंदिराचे समोर तीन भव्य दिपमाळा व दोन दिपमाळाचे चोथरे आहेत.
मंदिराचे समोर एका मेघदंबरीत नंदी प्रतिमा आहे.
समोरच दिसते ते खंडोबाचे पूर्वाभिमुख मुख्यमंदिर मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह, अशी आहे सदर पंचकमानी असून दोन्ही बाजूचे कमानीत सोफे आहेत मधील कमानी समोर मंडपाचे प्रवेशद्वार आहे.
मंडप घुमटकर असून आठ कमानी युक्त खांब विरहित आहे, मंडपास पुर्वाद्वारा बरोबर दक्षिण व उत्तरे कडून ही दरवाजे आहेत. दक्षिण व उत्तरद्वाराचे दानही अंगास प्रत्येकी दोन खोल्या आहेत दक्षिण बाजुस देवाचे शेजघर आहे.
मंडपाचे पश्चिम बाजुस गर्भगृह आहे गर्भगृहात मध्यभागी एका योनीत खंडोबाची पंचलिंगे आहेत ती पितळी मुखवट्याने झाकलेली असतात, यांचे मागे चोथर्यावर धातूच्या बानाई, खंडोबा, म्हाळसा व खंडोबा म्हाळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत. या उत्सवमुर्तीचे पाठीमागे भिंतीत उभी बानाई बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत.
हे मंदिर निमगाव खंडोबाचे तिसरे स्थान होय, देव अरुडमल येथील धामणटेक येथे प्रथम व नंतर मुख्य मंदिरामागील टेकडीवर व तेथून येथे प्रगट झालेचे मानले जाते. या ठिकाणी रविवार दि. २६ नोव्हेबर १४२४ मार्गशीर्ष ५ रोजी देव लिंगरूपाने प्रगट झाले व ग्रामस्थानी तेथे मंदिर बांधले, पुढे ईस १७३८ मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत.
मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहच्या पाठ भिंतीस एक पश्चिमाभिमुख देवडी असुन त्या मध्ये म्हाळसाबाई शिळा व महिषासुर मर्दिनी भवानीची दगडी मुर्ती आहे.
मंदिराचे परिसरात मंदिराचे दक्षिण बाजुस एक थडगे आहे ते खंडोबाची निस्सीम भक्त असलेल्या मुरुळीचे असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचे कोटाचे सज्यावर जाणेसाठी उत्तर व दक्षिण बाजुने पायरी मार्ग आहे. कोटाचे सज्या व नगारखान्या वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराचे कोटाचे पश्चिमेस एक छोटी टेकडी दिसते या टेकडीवर एक पूर्वाभिमुख देवडी आहे यात पंचलिंग असुन समोर नंदी आहे. या देव्डीस कडेपठार असे म्हणतात खंडोबाचे हे मंदिरातील स्थाना अगोदरचे दुसरे स्थान या ठिकाणाहून देव आजचे मंदिराचे ठिकाणी आल्याचे मानले जाते,
धामणटेक
निमगाव खंडोबा मंदिरा पासुन ईशानेस सुमारे ३ किमी अंतरावर धामणटेक टेकडी आहे. मंदिराचे पश्चिमेकडील रस्त्याने या टेकडीच्या पाथ्याशी पोहचता येते, या टेकडीवर एक पूर्वाभिमुख मंदिर असुन एक दीपमाळ आहे या मंदिरात खंडोबाचे पादुका आहेत हे या परिसरातील खंडोबाचे मुळस्थान असल्याचे सांगितले जाते, पौष शुद्ध पौर्णिमा १७०१ मध्ये गोसासी येथील हरनाक महाराने हे मंदिर बांधले.
भीमा नदी
निमगाव गावा मध्ये भीमा नदीचे तीरावर घाट असुन या नदीवर सोमवतीस देव अंघोळी साठी आणले जातात. या परिसरात काही जुनी मंदिरे उध्वस्त अवस्तेत आहेत
या नदी काठी चंद्रचुडांचा भव्य वाडा आहे तो व आजूबाजूची मंदिरे आता अंतिम क्षण मोजत आहेत.
यात्रा
चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, चंपाषष्टी, दसरा, सोमवती ला येथे यात्रा उत्सव असतात , यात्रा मध्ये घाटा मधून पळविलेले नवसाचे बैल गाडे हे येथील विशेष आकर्षण होय.
नळदुर्ग
नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. अणदूर चे मुळ नाव आनंदपूर होते त्याचे पुढे अणदूर झाले. नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे ईस १०४२ चे दरम्यान कल्याणीचे चालुक्य राज्याचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण या नळराज्याने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले. अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद – सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर आहे महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला या किल्ल्या मधील दूर वरून नजरेत भरणारी वास्तु म्हणजे उपरी अथवा उपली बुरुज
हा बुरुज टेहाळणी व तोफांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते येथील नळराजा [ ईस १०४२ ] ची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले त्यावेळी हे ठिकाण नळराज्याचे रणमंडल या किल्लाचे बाहेर होते या ठिकाणी नळराज्याने खंडोबाचे मंदिर बांधले होते. ईस १६९४ मध्ये इब्राहीम आदिलशहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराचे जागेवरच उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले. बुरुजाचे पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्याची स्मृती म्हणून आजही लोक एका एका ओबड धोबड मूर्तीला लोक भंडारा वाहतात
पुढे पुन्हा खंडोबाची स्थापना व यात्रा सुरु करण्याचा प्रयत्न झाला, बादशाहने फर्मान काढले आणि किल्ल्याचे उत्तर तटाचे बुरुजाखाली दक्षिणाभिमुख कमानी पैकी पश्चिमेकडील कमानीत पूर्वाभिमुख ओटा बांधुन त्यावर खंडोबाची स्थापना करून यात्रा भरू लागली.
कालांतराने ग्रामस्थांनी बोरीनदी किनारी गावाचे वायव्येस खंडोबा मंदिर बांधले पण तेथेही काही अडचणी निर्माण झाले मुळे नळदुर्गचे उत्तरेस २.५ किमी अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले. नळदुर्ग गावाचे पश्चिमेस महामार्गावर उतार दिशेस जाणारा रस्ता मिळतो या रस्त्याने सुमारे १ किमी अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित मंदिर दिसते तेथून पूर्वेकडे सुमारे १ किमी अंतरावर हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तिघई असुन प्रथम चार कमानी सोपा आहे गर्भगृहात एका कट्यावर सयोनी लिंग आहे. मंदिरावर वीट बांधकामाचे शिखर आहे, या मंदिरा मध्ये गाय मारल्याने देव अणदूर मध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. ही घटना १७ व्या शतकाचे उत्तरार्धात घडल्याचे सांगतात आज हे मंदिर परितक्त्य अवस्तेत आहे.
नंतर या मंदिराचे वायव्य दिशेस एक दगडी चोथरा आहे या चोथर्यावर यात्रेच्या वेळी देव अणदूर मधून आणून त्याची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला.
या चोथऱ्याचे पश्चिमेस सुमारे १ किमी अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे हे मंदिर उत्तराभिमुख असुन दगडी बांधकामातील या मंदिराची रचना तीन कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे. कोरपे आडनावाचे भक्ताने बांधलेले मंदिर शिखर विरहित होते अलीकडे शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे . गर्भगृहात एका चोथर्यावरसयोनी लिंग आहे मंदिराचे समोर कमान व त्यावर नगारखाना आहे. मंदिराचे उत्तरे कडून बोरी नदी वाहते.
अणदूर
अणदूर नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो
या रस्त्याने आपण १ किमी अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वारात पोहोचतो. हे मंदिर उत्तर्भिमुख असुन तट बंदीने युक्त आहे तटाची उंची ३५ फुट असुन पुर्व पश्चिम लांबी १९० तर दक्षिण उत्तर लांबी १०५ फुट आहे, तटबंदी चे ओवारीवर व दरवाज्यावर ईस १७४६ व १७४९ चे शिलालेख आहेत या वरून या तटबंदीचे काम या काळी झालेचे स्पष्ट होते.
उत्तर दरवाज्याने प्रवेश केल्यावर समोरच नदी मंडप लागतो तो खांबावर आधारलेला आहे याचे पुर्व, पश्चिम,उत्तर दिशांना अंगास बसण्यासाठी कट्टे असुन तीनही दिशेकडून रस्ते आहेंत या मंडपावर शिलालेख आहे या वरून या मंदिराचे काम ईस १७३९ मध्ये झाल्याचे दिसते.
या मंडपाचे दक्षिणेस मुख मंडप असुन या मंडपात पश्चिम बाजुस देवाचे शेजघर. व पुर्वबाजुस जामदारखाना आहे.
मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असुन गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे या लिंगावर मुखवटा चढवुन सजावट केलेली असते यावर धातूची मेघदंम्बरी असुन मागील बाजुस प्रभावळ आहे मेघदंम्बरीचे दानही बाजुस खंडोबा म्हाळसा यांचे उभ्या मुर्ती आहेत .
मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर पश्चिम बाजुस एक उत्तराभिमुख देवडी असुन त्यात नरसिह मुर्ती आहे .
आवाराचे वायव्य कोपऱ्यात एक पार असुन पारावर शिवलिंग, उभा सूर्य , बैठी शिवपार्वती व गणेश मुर्ती आहेत ही शिल्पे व नरसिह अणदूर जवळील नारायणगुडी नावाच्या उधवस्त मंदिरातील असल्याचे सांगतात.
मंदिराचे आवाराचे बाहेर पश्चिम बाजुस खंडोबाचे जुने मंदिर होते नळदुर्ग मधून खंडोबा येथे आणलेवर प्रथम त्याची स्थपना करून बांधलेले हे मंदिर इंदाई चे मंदिर ओळखले जात होते एका प्राकारात उंच चबुतरा त्यावर तीनकमानी पूर्वाभिमुख सोपा व पश्चिमेस गाभारा व त्यामध्ये सयोनी लिंग अशी त्याची रचना होते आज मात्र तेथे सभागृह बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात .
नळदुर्ग किल्ला – हा किल्ला प्रथम कल्याणीचे चालुक्यचे मांडलिक असलेल्या नळ राज्याने [ईस १०४२] बांधला माती मध्ये बांधलेला ह्या किल्याचे ईस १३६१ ते१४८० मध्ये बहामनी काळात दगडामध्ये पुनबांधणी करण्यात आली. हा किल्ल्याचा भाग आजही रणमंडल म्हणून ओळखला जातो. आदिलशाही काळात यांचा विस्तार करण्यात आला. या किल्ल्या मधील पाणीमहल ही वास्तु १८५८ मध्ये उभी राहिली. बोरी नदीचे पाणी किल्ल्या कडे आणून त्यावर १७४ मी लांब अडीच ते चौदा मीटर रुंद व १९ मीटर उंचीचा बंधारा बांधुन यात पाणीमहल बांधण्यात आला. पावसाळ्यात बंधारा भरल्यावर वरील धबधबे वाहु लागतात गवाक्षा पुढून पाण्याचा पडदा सोडल्या सारखे दृश्य दिसते हा पाणीमहल, नवबुरुज [मांगिणी चा बुरुज] विशेष प्रेक्षणीय.
यात्रा – मार्गशीर्ष प्रतिपदेला अणदूर येथे मोठी यात्रा भरते रात्री देवाचा छबिना निघतो व पहाटे देव पालखीत नळदुर्ग कडे जाण्यासाठी प्रस्थान करतात चंपाषष्टी घटस्थापना व खंडोबा षडरात्र उत्सव नळदुर्ग मध्ये संपन्न होतात. मार्गशीर्ष प्रतिपदे पासुन पौष पौर्णिमे पर्यंत नळदुर्ग मध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते नळदुर्ग खंडोबा चा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छबिना निघतो या मिरवणुकीत काठ्या व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो पहाटे देव पालखीतून अणदूर कडे प्रस्थान करतात
माळेगाव
महाराष्ट्रातील प्रमुख खंडोबा मंदिरा पैकी एक मंदिर, येथे मार्गशीर्ष महिन्यात दुसरया पंधरवड्यात भरणारे खंडोबाचे यात्रेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या प्रदेशातील भटक्यांची ही सर्वात मोठी यात्रा सुमारे २० दिवस चालते. या यात्रे मुळे हे गाव “माळेगाव यात्रा” म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लोह तालुक्यात माळेगाव असुन नांदेड पासुन ६० किमी व लोहा या तालुका ठिकाणा पासुन १८ किमी अंतरावर आहे.
नांदेड महामार्गावर माळेगाव मध्ये रस्त्याचे पुर्वा बाजुस खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची कमान लागते.
कमानीतून आत आल्यावर दक्षिण बाजुस मंदिराचे उत्तर महाद्वार दिसते.ते नव्याने बांधण्यात आले आहे.
याच रस्त्याने पुढे गेले की उतरेकडे मंदिराची दगडी बांधकामातील प्राचीन वेस दिसते.
पुढे मंदिराचे मुख्य पूर्वाभिमुख महाद्वार लागते. हे मंदिराचे परंपरागत मुख्य महाद्वार या महाद्वारातून मंदिराचे प्रांगणात जाता येते.
या समोर मुख्य मंदिराचा मंडप लागतो या मंडपाचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.
मंडपाचे मध्यभागी असणाऱ्या पश्चिमाभिमुख दगडी ओट्यावर काही दगडी मुर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत
या मधील दोन मुखवटे असणारे शिल्प मणि व मल्ल या दैत्यांचे असल्याचे सांगतात.
मंडपात पश्चिमेस जुन्या मंदिराचे मंडपाचे दगडी प्रवेशद्वार आहे याचे उत्तर व दक्षिण बाजुस देवड्या काढण्यात आलेल्या आहेत
दक्षिण बाजूचे देवडीत शिवलिंग नंदी व हनुमानाची दगडी मुर्ती आहे.
उत्तर बाजूचे देवडीत विठ्ठल रुखमाई यांच्या दगडी मुर्ती आहेत.
जुन्या मंदिराचा मंडप दगडी असुन खांबावर आधारलेला आहे. या मंडपातून गर्भगृहा तील मुर्तीचे दर्शन होती. गर्भगृहाचा पूर्वाभिमुख दरवाजा दगडी आहे.
गर्भगृहात एका दगडी चौथऱ्यावर एका पितळी मेघडबरीत मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
यात खंडोबा व म्हाळसा यांचे मुख्व्त्याचे दोन जोड आहेत. यातील पितळी जोड पुढे असुन दुसरा जड थोड्या उंचीवर मागे ठेवलेला आहे. याचे खालील भागात खंडोबा व म्हाळसा यांचे स्वयंभू तांदळे आहेत.
जुन्याकाळी कर्नाटक मधील बिदर जिल्ह्या मधील आदिमैलार या ठिकाणी खंडोबा यात्रेसाठी गेलेला व्यापारी परतीच्या मार्गावर असताना या ठिकाणी विसाव्यासाठी थांबला. येथून पुढे निघताना त्याचे सामानातील एक धान्याची गोणी त्याला हलविणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी गोणी सोडली तर त्यामध्ये त्याला खंडोबा व म्हाळसा यांचे दोन तांदळे दिसले. त्याने त्यांचे या ठिकाणी स्थापना केली.तो दिवस मार्गशीर्ष वद्य चतुर्थीचा होता. आजही या दिवशी येथे यात्रा भरते.
मुख्य खंडोबा मूर्तींचे उत्तर बाजुस एक शिव लिंग आहे.
मंदिराचे मागील बाजुने मंदिराचे पुरातन बांधकाम दिसते मंदिरावर छोटासा कळस आहे.
मंदिराचे पाठीमागील बाजुस एका योनी वर मूर्तींचे अवशेष ठेवले आहेत ही बाणाई ची मांडणूक असल्याचे मानतात.
मंदिराचे उत्तर बाजुस आवारात दक्षिणाभिमुख पाच घुमट्या असुन या मध्ये मंदिर परिसरातील काही मूर्तींचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत.
बनवस
माळेगाव पासुन गंगाखेड रोडवर ८ किमी अंतरावर बनवस नावाचे छोटेगाव आहे येथे एक पुष्करणी काठी दोन मंदिरे आहेत
या मंदिरामधील छोटे मंदिर बाणाईचे आहे
या मंदिरात काही मूर्तींचे अवशेष आहेत. माळेगाव येथे खंडोबावर रुसून बाणाई येथे येवून राहिल्याची दंतकथा आहे
शेजारील मंदिरात लिंग असुन काही लोक बाणाई ची समजूत काढण्यासाठी आलेले देव बाणाई परत न गेल्याने तिच्यासाठी येथेच राहिल्याचे सांगतात पण आज हे मंदिर एक शिव मंदिर म्हणून प्रचलित आहे.
यात्रा
माळेगावची यात्रा मार्गशीर्ष वद्य चतुर्थी पासुन सुरु होते व ती सुमारे वीस दिवस चालते. उंट, घोडे, गाढव, गाय, बैल, अश्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचे बाजार या काळात येथे भरतात. विविध प्राण्यांचे शर्यतींचे व कुस्त्यांचे आयोजनही केले जाते. या ठिकाणी वैदू, गोसावी ,घिसाडी,लोहार,गारुडी, मसन जोगी, पांगुळ, जोशी, कोल्हाटी, अश्या विविध भटक्या जमातींच्या जात पंचायती येथे भरतात, तमाशे, संगीत बारी, हे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्याने येतात.विविध जातीच्या पोशाख दागिने यांचे बाजार भारतात. भटक्यांचे लोकजीवनाचे दर्शन घडवणारी अशी येथील यात्रा असते.
चंदनपुरी
खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईचे सौदर्याला भुलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाई चे घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्या वर चाकरी केली होती व प्रेम बळाने वश करून लग्न लावून जेजुरीस आणले अशी जनश्रुती आहे. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तीच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी.
महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्या मधील मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण नासिक – मालेगाव मार्गावर मालेगावचे अलीकडे चंदनपुरी फाट्या पासुन ३ किमी अंतरावर आहे गिरणा नदी काठी असलेल्या या गावातील गाडी रस्त्याने मंदिरा पर्यंत जाता येते.
मंदिरास दगडी कोट असुन पुर्व व पश्चिम बाजुने दरवाजे आहेत. मंदिराचे पुर्वद्वार प्रमुख असुन या या द्वारा बाहेर दीपमाळ पायारीमार्ग व मार्गाचे बाजुने चोथरे आहेत.
पुर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वाभिमुख मुख्य मंदिर दिसते मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपात जाण्यासाठी पुर्व द्वारास काही पायऱ्या आहेत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगतात
पूर्वाभिमुख गर्भगृहात एका पूर्वाभिमुख कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मुर्ती आहेत. ह्या मुर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात या पूर्वीच्या मुर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मुर्ती बसविण्यात आल्या.या मुर्ती समोर लिंग आहे.
मुख्य मंदिराचे मागे कोटाचे पश्चिम दरवाज्याचे दक्षिण बाजुस एका कोनाड्यात शेदूर चर्चित स्थान आहे.
मदिराचे उत्तर बाजुस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहे.
चंदनपुरी गावाचे पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाई चे छोटेसे मंदिर आहे मंदिरातील मुर्ती संगमरवरी आहे.
यात्रा- पौष पौर्णिमेस मोठी यात्रा भरते उत्सव मुर्ती चा पालखी सोहळा या दिवशी असतो. पुढे दहा दिवस यात्रेची गर्दी असते.
नेवासा
नेवासा हे जनश्रुती नुसार म्हाळसा चे जन्म स्थान मानले जाते. नेवासा शहराला प्राचीन परंपरा आहे येथील कापर्दीकेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली त्या खांबाचे ज्ञानेश्वरी मंदिर बांधण्यात आले आहे. नेवासा गावाचे खुर्द व बुद्रुक असे प्रवरा नदीने दोन भाग पडतात येथील खुर्द मध्ये म्हाळसा मोहिनीचे व बुद्रुक मध्ये खंडोबाचे मंदिर आहे.
नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील तालुक्याचे ठिकाण असुन अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाट्या पासुन ५ किमी अंतरावर आहे.
नेवासे खुर्द मध्ये म्हाळसा मोहिनीचे दगडी सुंदर मंदिर असुन हे मंदिर होळकरांचे दिवान चंद्रचूड यांनी बांधलेले आहे. या आधीचे प्राचीन मंदिराचे मस्जिद मध्ये रुपांतर केले गेल्याने हे नवीन मंदिर बांधल्याचे लोक सांगतात. या मंदिरात विष्णूची अर्धनारी मुर्ती असुन शेजारी लक्ष्मी ची मुर्ती आहे दैत्य व देवांचे समुद्र मंथन येथे झाले होते व त्यावेळी विष्णूने मोहिने रूप घेतले होते असे सांगितले जाते या मोहिनीवर शंकर मोहित झाले होते तेव्हा शंकराचे मार्तंड भैरव अवतारात त्यांची पत्नी होण्याचे वचन विष्णूनी दिले होते तीच ही खंडोबाची म्हाळसा आहे अथवा तिचे रूप घेतलेली पार्वती हीच खंडोबाची म्हाळसा अशी लोकभावना आहे.
नेवासे बुद्रुक मधील प्रवरे काठचे खंडोबा मंदिर सध्या बांधणीचे आहे माळवदी मंदिराची रचना सोपा व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या बैठ्या दगडी मुर्ती आहेत. हे म्हाळसाचे माहेर असल्याचे सांगतात चंपाषष्टीस येथे यात्रा भरते .
नेवासे खुर्द मधेही खंडोबाची काही लहान मंदिरे आहेत.
मलवडी
मलवडी हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुकयात माणगंगा नदीकाठी दहिवडी पासुन १२ किमी अंतरावर वसलेले आहे.
जुन्याकाळी या ठिकाणी धनगर वस्ती होती, ती मल्लेवाडी म्हणून ओळखली जात असे. ईस १४०० चे सुमारास सरदार घाडगे यांनी येथे गाव वसवले व मल्लेवाडीचे नाव मलवडी रूढ झाले. जुन्याकाळी संपुर्ण गावाला असणारा नगरकोट आता ढासळला आहे.
गाडी रस्ता थेट मंदिराचे महाद्वारात पोहोचतो, पुर्व महाद्वार हे जुने मुख्य महाद्वार असुन या महाद्वारा समोर बागाडाचा चौथरा आहे, मंदिराचे प्राकार मोठे असुन त्यास चहूबाजूस ४ दरवाजे आहेत, भव्य अशा पुर्व महाद्वारातून मंदिराचे कोटात प्रवेश केल्यावर उत्तर बाजुस अबड-धोबड चौथरा असुन यास विसावा म्हणतात. उत्सव काळी देवाचा छबिना येथे विसावतो.
पुढे पृवाभिमुख मुख्यमंदिर असुन मंदिरा समोरील दगडी मेघडंबरीत घोड्याची मुर्ती आहे. जुन्याकाळी येथे नंदीची मुर्ती असल्याचे सांगतात. हि मेघडंबरी आता मंदिराचे लाकडी मंडपात सामावली आहे. या पुढे लागतो तो लाकडी मंडप हा मंडप त्याचे कामावरून पेशवेकालीन असावा. लाकडी मंडपाचे पुढे मूळ मंदिराचा दगडी मंडप लागतो, या मंदिराचे बांधकाम सरदार घाडगे यांनी केल्याचे सांगितले जाते.
या मंडपात सुरवातीस अश्वारूढ खंडोबाची मुर्ती आहे. गर्भगृहाचे दरवाज्याचे उत्तर बाजुस देवाचा पलंग आहे.
गर्भागृहाचे दरवाज्याचे दक्षिण बाजुस एका चौथर्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मुर्ती असुन त्यांचे समोर लिंग आहेत. मंदिर निर्मिती नंतर मंदिरात बसविलेल्या या मूळमुर्ती प्रथम या गर्भगृहात होत्या. परकीय हल्ल्या पासून या मुर्ती सुरक्षित राहाव्यात म्हणून परकीय आक्रमणा वेळी या गर्भगृहातुन हलवून लपवून ठेवल्या होत्या, पुढे कालांतराने एका कोल्हाटी समाज्याचे माणसास या मुर्ती सापडल्या तो पर्यंत गर्भगृहात नवीन मुर्ती बसविण्यात आल्या होत्या म्हणुन येथे या मुर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या.
पूर्वाभिमुख गर्भगृहाचे दरवाज्याचे समोर वास्तू बांधकाम शास्त्राचा भंग करणारा एक खांब उभा आहे. कधी काळी मंडपास निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी या बसविण्यात आलेला असावा. आता मात्र हा पितळी पत्र्याने मढविण्यात आलेला आहे. यावर लोखंडी लंगर अडकविण्यात आले आहेत हे उत्सवाचे वेळी वापरण्यात येतात.
गर्भगृहात मधोमध एका उंच चौथर्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या पूर्वाभिमुख दगडी मुर्ती आहेत. गर्भगृहातील मूळ मुर्ती जुन्याकाळी परकीय आक्रमणा वेळी लपविण्यात आल्या होत्या, त्या नंतर लवकर सापडल्या नाहीत, त्या मुळे गर्भगृह रिकामे राहु नये या साठी ग्रामस्थांनी या मुर्ती स्थापन केल्या.
मुळ मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजुने खेटूनच तरटीचे झाड आहे. या झाडास खेटून एक पूर्वाभिमुख छोटी घुमटी आहे. या घुमटीत उत्तर बाजुस तरटीचे झाडाचे खोडा जवळ दक्षिणाभिमुख खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मुर्ती आहेत. हे येथील खंडोबाचे आद्यस्थान होय. येथे मार्गशीर्ष शुध्द एकादशीस देव प्रगट झाल्याची आख्यायिका आहे.
येथील एक धनगर नळदुर्ग येथील खंडोबाचा निस्सीम भक्त होता, तो येथे खंडोबाची अहोरात्र भक्ती करीत होता. खंडोबाने त्याला तुझे भक्तीने येथे वास्तव्यास येत आहे व तुझे घरातील तरटीचे घुसळखांबास पालवी फुटेल तिथे माझे वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला, व त्या प्रमाणे देव येथे आले. व वास्तव्य केले, तेच तरटीचे झाड अजूनही उभे आहे अशी जनश्रुती आहे.
या घुमटी मध्ये पूर्वाभिमुख खंडोबा व कालभैरव यांच्या मुर्ती आहेत.
या घुमटीचे दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख दुसरी घुमटी असून मंडप व गर्भगृह अशी तिची रचना आहे. मंडपात नंदी व गर्भगृहात शिवलिंग आहे.
मंदिराचे उत्तरबाजुस एक चौथरा व खांब असुन तेथे उत्सवाचे वेळी लंगर तोडला जातो.
मंदिराचे प्राकाराचे बाहेर दक्षिण बाजुस पश्चिम दिशेस पुर्वाभिमुख दत्त मंदिर असुन येथे दत्त पादुका आहेत व मागील कोनाड्यातील चौथर्यावर विष्णुची मुर्ती आहे.
उत्सव
मार्गशिर्ष शुध्द पंचमीस येथे खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा असतो, षष्टीस कुलाचार केले जातात. मार्गशीर्ष एकादशी हा येथील उत्सवाचा प्रमुख दिवस होय, या दिवशी दुपारी रथ उत्सव व पालखी नगर प्रदक्षिणा करतात, या वेळी काही मानाच्या काठ्या ही येतात, मध्य रात्री पालखी सोहळा मंदिरा मधुन प्रस्थान करुन गावात फिरतो हा सोहळा द्वादशीस सकाळी मंदिरात पोहोचतो. तेथे वाघ्या लंगर तोडतो व यात्रा उत्सव संपन्न होतो.
बीड
बीड महाराष्ट्रातील जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असुन हे बिंदुसरा नदीकाठावर समुद्र सपाटी पासून ५१६ मी. उंचीवर वसलेले आहे. पांडवकाळी या नगरीचे नाव दुर्गावती व नंतर बलनी होते. चालुक्य विक्रमादित्याच्या भगिनीने चंपावतीने हे घेतल्यानंतर त्याला चंपावतीनगर असे नाव दिले. प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य येथीलच, असा समज आहे. या शहराच्या प्रचलित नावा विषयी दोन कथा सांगण्यात येतात बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदी खोऱ्यात खळग्याप्रमाणे असलेल्या भागात हे शहर वसल्याने ‘बीळ’ वरून ‘बीड’ नाव रूढ झाली असावे. व दुसरी व्युत्पत्ती अशी सांगितली जाते की, ‘पाणी’ या अर्थाच्या ‘मीर’ या फार्सी शब्दावरून इतिहासकाळात मुसलमानी प्रशासकांनी बीड हे नाव ठेवले असेही सांगितले जाते.
बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याश्या टेकडीवर गर्द वनराईत पुर्वभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरास चहूबाजुने व्हरांडा असून त्याचे छत ३२ खांबानवर आधारित आहे. मंदिरात चारखांबी सभामंडप असुन पुर्वभिमुख प्रमुख प्रवेशद्वार व दक्षिण व उत्तर बाजुस दोन प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहातील मागील भिंतीच्या कोनाड्यात हातात तलवार असलेली घोडयावर आरूढ खंडोबा व म्हाळसा यांची दगडी मुर्ती आहे. गर्भगृहावरील शिखर सुंदर सजविलेले असुन शिखराचे आधारावर प्राणी देवदेवतांचे अंकन आहे. हे मंदिर त्याची स्थापत्य रचना व शिल्प कौशल्य या साठी प्रसिद्ध आहे. मंदिराचे बांधकाम मराठा शैली मधील असून त्याचे समोर विटा मधील बांधकामातील सहा मजली ७० फुट उंचीच्या अष्टकोनी दिपमाळा आहेत. या दिपमाळावर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या चुन्यामध्ये बनविण्यात आल्या आहेत. काहीच्या मते हे मंदिर बीड चे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधले. इतर समजुती नुसार हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले असे मानले जाते.
खंडोबा मंदिराचे टेकडीचे बाजुला दक्षिणाभिमुख खंडेश्वरीचे प्राचीन देवालय आहे. मंदिर प्राकारात असुन मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथर्यावर खंडेश्वरीचा शेंदूर चर्चित तांदळा आहे. हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधलेले आहे असे सांगितले जाते. खंडोबा मंदिराचे टेकडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावा वरून व हे बाणाईचे स्थान असावे हे निश्चित. या मंदिराचे समोर या काळोबा वीर धनगराची समाधी आहे.
धामणी
धामणी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात समुद्र सपाटी पासून ७०० मीटर उंचीवर आहे, पुणे नासिक महामार्गावरील मंचर वरून अवसरी मार्गे धामणी २३ किमी अंतरावर आहे, याच महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर येथुन गुळणी – वाफगाव मार्गे धामणी २४ किमी अंतरावर आहे, येथील खंडोबाचे पुरातन मंदिर धामणी गावापासून १.५ किमी अंतरावर आहे, गाडीरस्ता थेट मंदिरा पर्यंत जातो.
गाडी रस्त्याने आपण मंदिराचे कोटाचे उत्तर बाजूस पोहोचतो, या बाजूस कोटा समोर दीपमाळ असुन कोटास दोन दरवाजे आहेत या दरवाजेचे वर दोन अश्व प्रतिमा आहेत, या मधील पूर्वेचे बाजुचे दरवाजा कोटात प्रवेशाचा मार्ग आहे कोटात गेल्यावर एक घुमटी वजा मंदिर दिसते या पुढे
कोटाचे आग्नेय कोपऱ्यात पूर्वाभिमुख दगडी बांधकाम व उंच शिखर असलेले खंडोबाचे मुख्य मंदिर आहे, या मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे, मंडपास पूर्व व दक्षिण बाजूने छोटे दरवाजे आहेत, मुख्य दरवाजा पूर्वेकडील असून या दरवाज्या समोर नंदी प्रतिमा आहे, पुर्व दरवाज्यातून उतरून मंडपात जावे लागते.
मंडपात पूर्वाभिमुख गर्भगृहाचे प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूस खंडोबा व म्हाळसा यांच्या अश्वारुढ दगडी मुर्ती आहेत उत्तरबाजूस एका आसनावर कालभैरव व देवीच्या दगडी मुर्ती आहेत, येथून उतरून मंदिराचे गर्भगृहात प्रवेश करावा लागतो,
गर्भगृहात पूर्वाभिमुख आसनावर खंडोबा म्हाळसा बानुबाई यांच्या भिंतीला खेटुन भव्य मुर्ती आहेत
या मूर्तीचे आसनाचे पुढील बाजुस एका आयताकृती योनी मध्ये खंडोबा म्हाळसा व बाणाई यांची स्वयंभू लिंगे आहेत
गर्भगृहाचे आग्नेय कोपऱ्यात दक्षिण भिंतीतील कोनाड्यात एक देवीची उत्तराभिमुख मुर्ती आहे हि हेडीम्बेची असल्याचे पुजारी सांगतात.
मंदिराचे दक्षिण बाजुचे सुमारे ८० मीटर उंचीचे टेकडीवर सुमारे अर्धा किमी अंतरावर खंडोबाचे पूर्वाभिमुख जुने मंदिर आहे, हे येथील खंडाबाचे मूळस्थान मानले जाते. या मंदिरात दगडी आसनावर देवाच्या मुर्ती असुन या मुर्तीन पुढे खंडोबा म्हाळसा यांच्या पादुका आहेत
रेवडी
रेवडी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालूक्यात समुद्रसपाटी पासून ७५० मीटर उंचीवर वसना नदीचे काठी आहे सातारा वाठार रस्त्यावर साताऱ्या पासुन १६ किमीअंतरावर असलेल्या तांबी या गावामधून रेवडी सुमारे ३ किमी अंतरावर आहे, येथील खंडोबा मंदिर सपाटीवर असून गाडीरस्ता मंदिरा पर्यंत जातो.
गाडी रस्त्याने आपण मंदिराचे कोटाचे दक्षिण बाजूस पोहोचतो, मंदिरास दगडी बांधकामात भव्य कोट यास दक्षिण व पुर्व बाजूस दोन प्रवेशद्वार आहेत मुख्यप्रवेशद्वार दक्षिणाभिमुख असून दक्षिण द्वाराचे समोर नंदी मंडप आहे.
मंदिराचे कोटात प्रवेश केल्यावर आपण नव्याने बांधलेल्या मंदिराचे मंडपात पोहोचतो, दक्षिणाभिमुख असलेल्या या मंदिराची जुनी रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडप दगडी खांबनवर आधारलेला आहे, मंदिराचा व मंदिरात शिलालेख आढळत नाहीत, गर्भगृह दक्षिणाभिमुख आहे. मंदिराचे गर्भगृहावर शिखर असून ते नवीन बांधकामातील आहे.
मंदिराचे गर्भगृहात छोट्या चौथऱ्यावर खंडोबा व म्हाळसा यांची स्वयंभू लिंग आहेत, यांचे मागील उंची वरील कोनाड्यात खंडोबा व म्हाळसा यांच्या अश्वारूढ दगडी प्रतिमा आहेत, रेवडी गावाजवळील परतवडी गावातील महिपती देसले पाली येथील खंडोबाचा निस्सीम भक्त होता, देव पालीवर त्याचे मागे परतवडी या त्याचे गावी निघाले होते, वसना नदी पार करताना त्याने वळून पाठी मागे पहिले त्यामुळे देवांनी येथेच लिंग रूपाने वास केला व पुढे काही भक्तांनी येथे मंदिर उभारले अशी दंतकथा येथील खंडोबाचे आगमना विषयी सांगितली जाते.
मंदिराचे पूर्व प्रवेशद्वाराचे समोर एका दगडी मंडपात हत्तीची दगडी प्रतिमा आहे. रेवडी येथे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी या कालावधीत देवाचा उत्सव साजरा केला जातो.